पूजा करणारा स्वत:ला विसरला, देहबुद्धीच्या पकडीतून सुटला, शून्यवत झाला की पूजा खरी झाली. त्याप्रमाणे वाटय़ाला आलेली, अटळ अशी कर्तव्यर्कम करताना ती परमेश्वराची सेवा आहे, असं मानून, ती परमेश्वराची इच्छा आहे, असं मानून जर र्कम करीत गेलो तर कर्मातही ईश्वराचीच जाणीव टिकून राहील. आपल्याकडून सध्या होणाऱ्या कर्मात ती जाणीव टिकते का? नाही. ती कर्मे स्वार्थातून होत असतात, मीपणातून होत असतात, अपेक्षांतून होत असतात. कर्मामध्ये अपेक्षा असल्या तर कर्माची साखळी होते आणि ती जन्म-मृत्यूच्या बंधनात पाडते. पूजावत् भावनेनं जेव्हा र्कम होतील आणि त्यात मीपणाचं भान नसेल तर अशा कर्तव्यकर्मानी मात्र तू या बंधनातून पार पडशील, असं भगवंत सांगतात. या कर्मानी मग तू भवबंधनांतून पार होशील आणि एकदा बंधनातून पार पडल्यावर परम संतोषाशिवाय काय आहे? जिथे बंधन नाही तिथेच मुक्तीचा आनंद आहे. मुक्त असण्याइतका परम आनंद दुसरा कोणताही नाही. इथे एका प्रसंगाची आठवण होते. श्री. रा. कृ. तथा राजाभाऊ रानडे, मिरज यांनी ‘सद्गुरू स्वामी स्वरूपानंद स्मृतीसौरभ’ (प्रकाशक- स्वरूपानंद मंडळ, पावस, १९७५) या ग्रंथात तो लिहिला आहे. ते म्हणतात, ‘‘आमची तिन्ही मुले विद्यार्थिदशेमध्ये शिकत असताना १९६८मध्ये प्रथमच पावसला गेली होती. त्यांनी परतल्यावर स्वामींच्या अलौकिकत्वाने भारावून सांगितलेला अनुभव असा- सकाळी श्रीस्वामींच्या प्रथम दर्शनाला खोलीमध्ये जाताना पूजा साहित्यामध्ये त्यांनी बागेतील फुले तोडून नेली होती. आत गेल्यावर मुलांनी पूजा साहित्याचे ताट स्वामींच्या पुढे कॉटवर ठेवले. स्वामींनी त्यातील फुले आपल्या हातात घेतली व एक एक फूल कॉटशेजारील भिंतीवरील फोटोंना घालू लागले. जेवढे फोटो होते तेवढीच फुले त्यांच्या हातामध्ये होती. कमी पडली म्हणून पुन्हा ताटातून घ्यावी लागली नाहीत व जास्त झाली म्हणून ठेवावी लागली नाहीत. नंतर स्वामींनी मुलांना नित्यपाठ ज्ञानेश्वरीचे पुस्तक दिले व उघडून त्यातील ओवी वाचावयास सांगितल्या. तर काय आश्चर्य, मुलांनी जे पान उघडले त्यावर ओव्या होत्या- ‘‘तें विहित कर्म पांडवा। आपुला अनन्य वोलावा। आणि हे चि परम सेवा। मज सर्वात्मकाची।।’’ आणि दुसरी ओवी- ‘‘तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा। तोषालागीं।।’’ बागेतील फुलांपेक्षा तुमची स्वकर्म-कुसुमे मला सर्वात्मकाला अर्पण करणे हीच पूजा!’’ (पृष्ठ २). आपली पूजा दिवसातून एकदा होते. जीवन एवढं धावपळीचं झालं आहे की अनेकदा पूजा मनाजोगती करायला वेळ नसतो, उसंतही नसते. त्या धावत्या पूजेत ना मन स्थिर होतं ना एकाग्र होतं. जाग आल्यापासून झोपेपर्यंत र्कम मात्र काही सुटत नाहीत. मग त्या कर्मानाच पूजा मानलं आणि ती कर्म करताना त्यात मनानं न गुंतता, मन भगवंताकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर मग ही पूजा अखंड चालणारी आणि अधिक फलदायी नाही का? कर्मातच भगवंताचं स्मरण शिकविणारी कला या प्रसंगातून स्वामींनी त्या मुलांच्याच नव्हे आपल्याही मनावर बिंबवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा