तें विहित कर्म पांडवा। आपुला अनन्य वोलावा। आणि हे चि परम सेवा। मज सर्वात्मकाची! तुला लाभलेलं जीवन जर एकमेव आहे, तर मग ती माझी परमसेवा मानून का जगत नाहीस? आपलं जीवन ही सर्वात्मक ईश्वराची परमसेवा मानायला माउली सांगतात त्यामागे रहस्य आहे. आपण आपलं जीवन काय मानतो? ते स्वसुखासाठीच आहे, असं आपण मानतो. आपलं जगणं म्हणजे आपल्या देहबुद्धीचीच चाकरी असते, सेवा असते. खरं सुख म्हणजे काय, आपल्या कृतीची परिणती खऱ्या अर्थानं सुखदायक आहे का, याचं कोणतंही आकलन आपल्याला नसतं. तरी सुखासाठीच आपण क्षणोक्षणी धडपडतो, सुखासाठीच जीवनातली प्रत्येक गोष्ट करतो व टाळतोदेखील! देहबुद्धीची सेवा हाच जीवनाचा खरा आणि एकमेव हेतू मानणाऱ्या मला माउली सांगतात की, जगणं ही सर्वात्मक ईश्वराची परमसेवा मान! थोडक्यात माझ्या जगण्यामागचा माझा हेतूच माउली बदलून टाकतात, तो अधिक व्यापक करतात. आणि कोणत्याही गोष्टीत कृतीपेक्षा हेतूला अधिक महत्त्व असतं. भगवंत कृतीपेक्षा त्या कृतीमागचा भाव पाहतो, हेतू पाहतो. हेतू शुद्ध असेल आणि कृतीत त्रुटी असेल तरी ती कृती तो स्वीकारतो. अगदी प्रेमानं स्वीकारतो आणि त्या कृतीचा अतक्र्य लाभ पदरात टाकतो. मूठभर धान्याच्या बदल्यात काय मिळेल हो जगात? पण भगवंतानं मात्र सुदाम्याला मूठभर पोह्याच्या बदल्यात अपरंपार वैभव दिलं! कारण पोहे मूठभरच होते, पण त्यामागचं प्रेम, ते देण्यामागचा हेतू हा त्या वैभवापेक्षाही मोठाच होता! तेव्हा तुझं जीवन कसं का असेना, ते माझ्यासाठी म्हणून जग. ती माझी सेवा मान. मग आपल्या जीवनाचं बाह्यरूप तर बदलायचं नाही, पण आंतरिक धारणा फक्त बदलायची आहे. आपल्या जगण्याची बाह्य चौकट वरकरणी तशीच राहील पण तिचा आंतरिक प्रवाह हा देहकेंद्रित नव्हे तर देवकेंद्रित असेल. कसं साधावं हे? रामकृष्णांच्या रूपकाची इथे आठवण होते. एखाद्या धनिकाचा ंनेक वर्षांपासूनचा विश्वासू गडी त्या श्रीमंताच्या हवेलीची, त्याच्या मुलाबाळांची अगदी आपुलकीने काळजी घेत असतो. कुणी पाहुणे आले तर त्या धनिकाची हवेली, त्याची मालमत्ता दाखवतो. ही आमची बाग, हे आमचे शेत, वगैरे तोंडानं म्हणतोही. प्रत्यक्षात यातलं काहीच आपलं नाही, हे तो पक्केपणानं जाणत असतो. गावातल्या आपल्या लहानशा घरालाच तो सर्वस्वानं आणि सर्वार्थानं आपलं मानत असतो. तसंच हे जीवन वरकरणी आपलेपणानं जग. तुला जी काही ओळख मिळाली आहे, तिला अनुसरूनच या जगात वावर. तुला जी माणसं मिळाली आहेत, त्यांच्याशीही आपलेपणानं वाग; पण यातल्या कशातच खऱ्या आपलेपणानं आसक्त होऊन अडकू नकोस. मगच जगताना सर्वात्मकाची परमसेवा साधेल. आता इथे परम शब्दालाही मोठा अर्थ आहे. देहबुद्धीने जगणं वाईटच, पण देहबुद्धीनं भगवंतासाठी काही करणंही तितकंच वाईट! मग मी देहबुद्धी न सोडता, जगणं ही त्याची सेवा मानू लागलो, तर ती तितकीच बाधक असेल. संकुचित देहबुद्धी सोडून व्यापक देवबुद्धीनं जीवन जगणं हीच खऱ्या अर्थानं जो परम आहे त्याची परम सेवा आहे!
१२२. परमसेवा
तें विहित कर्म पांडवा। आपुला अनन्य वोलावा। आणि हे चि परम सेवा। मज सर्वात्मकाची! तुला लाभलेलं जीवन जर एकमेव आहे, तर मग ती माझी परमसेवा मानून का जगत नाहीस?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan worshiping of god