दुखणे अंगावर घेऊन काम करणारी माणसेही दिसतात. ज्यांना राबायचे नाही तेही घाम गाळतात, पण हा घाम वेगळा. त्यांचे घाम गाळणे कोणी वापरून घेत नाही. हेही घामाने निथळतात, पण त्यावर त्यांचे पोट अवलंबून नाही. उष्मांक जाळण्यासाठी घाम गाळणे आणि पोट जाळण्यासाठी घाम गाळणे यात मोठे अंतर आहेच; पण दोहोत पूर्वापार संघर्षही आहे..
‘माणूस मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी शोभून दिसतो’ असा सुविचार कुठल्या तरी भिंतीवर वाचला होता. राबण्याचे, कष्टण्याचे महत्त्व त्यातून सांगण्यात आले होते. कष्टाशिवाय फळ नाही आणि घाम गाळल्याशिवाय समृद्धी नाही, असे आजवर सर्वानीच अनेकदा ऐकलेले असते. श्रमाचे संस्कार सांगताना आणि कष्टाचे महत्त्व सांगताना हे वारंवार बोलले जाते. प्रत्यक्षात घाम गाळणाऱ्या सर्वानाच समृद्धी लाभते असे नाही आणि कष्ट करणारे सगळेच सुखात जगतात असेही नाही. याउलट कोणाच्या तरी घाम गाळण्यावर दुसऱ्याच कोणाची तरी समृद्धी अवलंबून आहे, असेही बऱ्याचदा प्रत्ययाला येते. अशा वेळी घामाच्या धारा मोत्यांच्या हारापेक्षाही कशा काय शोभून दिसतात, असा प्रश्न पडतो.
शेतात राबताना अंग पाझरून बाहेर येणाऱ्या घामाचे लोट मातीतच जिरून जातात. कधी कधी पाण्याअभावी आणि तापणाऱ्या उन्हाच्या तडाख्याने सृष्टीतले बारीकसारीक जीव नष्ट होतात. त्याच उन्हात माणसे राबत असतात. रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांची लहान चिल्लीपिल्ली कुठल्या तरी सावलीच्या आडोशाच्या आधाराने झोळणीत टाकलेली असतात. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे चाललेली असतात आणि तापत्या उन्हात मजूर दुतर्फा खडी फोडण्याचे काम करतात. ‘खडी फोडणे’ हा आपल्याकडे सश्रम कारावासाला पर्यायी शब्द आहे. अशा मजुरांचे अंग घामाने निथळत असते. रस्त्यावर गरम डांबर ओतण्याच्या कामी उन्हात तळपणाऱ्यांचा घाम तर अंगातच जिरून जातो. विहिरी फोडताना म्हणजे त्यातल्या कातळाला भेदताना तर पाण्याने भिजलेले अंग आणि दगड फोडताना पाझरणारा घाम हे दोन्हीही एकमेकांत मिसळून जातात. फक्त मोठय़ाच माणसांचे अंग कामाच्या ठिकाणी घामाने निथळत असते असे नाही. अनेकदा संसाराच्या या गाडय़ाला लहान लहान लेकरेही जुंपलेली असतात. बांधकामावर राबणारी, वीटभट्टीवर दिसणारी छोटीछोटी मुलेही अशीच घामाच्या धारांनी भिजलेली दिसतात. हे सर्व जण मोत्यांचे हार परिधान करणाऱ्या माणसांपेक्षाही कसे काय शोभून दिसत असतील? ज्यांना तसे दिसते त्यांनीच घामाला सुगंधाचीही जोड देऊन टाकली. कष्टकऱ्यांनी निर्माण केलेल्या अमुक एखाद्या गोष्टीला घामाचा सुगंध आहे, असे म्हटले जाते. म्हणजे शेतातून निघालेल्या ज्वारीला किंवा कापड गिरणीतून निघालेल्या कापडाला किंवा आणखी कशालाही हा घामाचा सुगंध असू शकतो. मुळात जी गोष्ट कमालीची कष्टप्रद आहे ती ‘देखणी’ आणि ‘सुगंधी’ कशी असेल? एकदा दु:खाला देखणेपण बहाल केले, की ते समजून घेण्याची, या दु:खाच्या आड असलेल्या दृश्य-अदृश्य कंगोऱ्यांचा शोध घेण्याची आपल्याला गरजच वाटत नाही किंवा असेही असेल की, एकदा राबणाऱ्याच्या घामाला ‘मोती’ म्हटले, की पुन्हा त्याच्या घामाचे वेगळे मोल करण्याची गरजच वाटू नये.
राबणाऱ्यांचे प्रत्यक्ष जग आणि त्यांच्या कष्टप्रद जगण्यालाही सुगंधित करणाऱ्या आपल्या कल्पना यात मोठी दरी आहे. एक प्रसंग असाच पक्का रुतून बसलेला. दिवस ऐन लग्नसराईचे होते. अशा वेळी कपडय़ांच्या दुकानात माणूस मावणार नाही अशी गर्दी असते. एक शेतमजूर आपल्या लग्न जमलेल्या मुलीला घेऊन या दुकानावर आलेला, लग्नाच्या काही दिवसांअगोदर कपडय़ांची खरेदी करावी म्हणून. मुलीला लग्नातल्या साडय़ा घेण्यासाठी, निवडण्यासाठी सोबत आणलेले. बसलेल्या त्या दोघांपुढे साडय़ांच्या चळतीच्या चळती दुकानदार टाकतो. नजर थांबणार नाही इतके नाना रंग आणि त्या साडय़ांवरची 77कलाकुसर. पाहता पाहता मुलीची नजर एका मोरपंखी साडीवर खिळते. ही साडी घ्यावी असा तिचा बापाकडे आग्रह असतो. बापाने दुकानदाराला किंमत विचारल्यानंतर काही क्षण मुकेच जातात. या स्तब्धतेची कोंडी शेवटी बापच फोडतो. ‘‘बाई, कापडच ते, कितीही महागामोलाचं असलं तरी फाटूनच जाणार अन् अशा जरीकाठाच्या, भरजारी साडय़ा नेसून कुठं तुला शेतात कामाला जाता येणार? कापूस येचताना, िनदन-खुरपण करताना थोडंच ही साडी नेसून जाता येईल. अशी कापडं वापरायची म्हणजे आरामाचं जिणं पाह्य़जी.. त्यापेक्षा असं कर, याच साडीच्या किमतीत दुसऱ्या दोन-तीन जरा बऱ्या साडय़ा घे. तुला नेहमी नेसायलाही कामी येतील अन् काम करतानाही अडचण होणार नाही.’’ ज्या साडीवर नजर खिळलेली होती तीच साडी पुन्हा पाहताना तिचे डोळे तुडुंब भरलेले होते. तिच्या आयुष्यातल्या सर्वाधिक आनंदाच्या क्षणीही तिला मनाप्रमाणे साडी नेसता येणार नव्हती. म्हणजे राबायचे असेल, कष्टप्रद जगायचे असेल, तर महागडे आणि चांगले काही परिधान करायचे नाही, किंबहुना असे काही नेसून राबता येत नाही किंवा राबणाऱ्यांसाठी हे नाहीच, अशी समजूत आणि तीही प्रत्यक्षात जगण्यातल्या अनुभवातून आलेली. आपण मात्र या राबणाऱ्यांच्या जगालाही देखणेपण बहाल करणार आणि त्यांच्या घामात मोती शोधणार.
‘एक हात भू नांगरणे, शत व्याख्यानांहून थोर’ हे श्रमाच्या प्रतिष्ठेसाठी ठीक आहे. प्रत्यक्षात श्रमाला प्रतिष्ठा आणि श्रम करणाऱ्याला मोल अजून तरी मिळत नाही. तुझ्या घामामधून उद्या सोन्याचे रान पिकेल, असा आशावाद पेरला जातो. प्रत्यक्षात राबणाऱ्यांच्या जगात असे सोन्याचे रान अजून तरी पिकले नाही. राबणाऱ्या हातांना चतुराईने वापरून घेणाऱ्यांकडेच हरी दिसतो आहे. वर्षभर काबाडकष्ट करूनही ज्यांना काही उरत नाही त्यापेक्षा कैक पटीत त्याच उत्पादनाच्या दलालीत हेराफेरी करणारे मिळवतात आणि आनंदी राहतात हे वास्तव आहे. ज्या भागातून कामधंद्यासाठी मजुरांचे स्थलांतर होते त्या मजुरांना घेऊन जाणारे ठेकेदार असतात, त्यांना राबविले जात नाही; पण राबणाऱ्यांपेक्षा त्यांना मिळणारा मोबदला अधिक असतो. घाम गाळणाऱ्यांपेक्षा तो गाळून घेणाऱ्यांना या व्यवस्थेत सुखाचे दिवस येतात. अशा वेळी घामाला सुगंध येण्याऐवजी त्याचे दाम मिळण्याचीच गरज जास्त आहे. राबणाऱ्यांना घाम गाळावाच लागतो कारण त्याशिवाय त्यांना जगताच येत नाही. ऊन, वारा, पाऊस कशाचीच तमा बाळगता येत नाही. जगण्याच्या या लढाईत त्यांना ना उसंत ना मनाजोगती विश्रांती. अनेकांना आजारपणातही शांतपणे बसून राहता येत नाही. दुखणे अंगावर घेऊन काम करणारी माणसेही दिसतात. ज्यांना राबायचे नाही तेही घाम गाळतात, पण हा घाम वेगळा. त्यांचे घाम गाळणे कोणी वापरून घेत नाही. हेही घामाने निथळतात, पण त्यावर त्यांचे पोट अवलंबून नाही. उष्मांक जाळण्यासाठी घाम गाळणे आणि पोट जाळण्यासाठी घाम गाळणे यात मोठे अंतर आहेच; पण दोहोत पूर्वापार संघर्षही आहे. तो संघर्ष समजून घेतला तर ‘घामाला सुगंध असतो’ असे म्हणण्याचा भाबडेपणा कुणी करणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा