‘तुमच्या घरात तुम्ही सुरक्षित आहात असे तुम्हाला कितीही वाटत असले तरी ध्यानात ठेवा, आम्ही कधीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो..’ तहरिक-ए-तालिबान या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने १३ एप्रिल रोजी केलेले हे ट्विट. ती धमकी पोकळ नव्हती, हे कराची विमानतळावरील हल्ल्याने सिद्ध झाले. एकीकडे कराची विमानतळावर हल्ला सुरू असतानाच बलुचिस्तानात दोघा आत्मघाती तालिबान्यांनी २० शिया मुस्लिमांची हत्या केली. अफगाणिस्तानातून शेवटचा अमेरिकी सनिक निघून गेल्यानंतर पाकिस्तानपुढे काय वाढून ठेवलेले आहे, याचेही भान या दोन्ही हल्ल्यांनी दिले. कराची विमानतळावरील हल्ला अनेकार्थाने लक्षणीय आहे. कराची हे पाकिस्तानच्या आíथक राजधानीचे शहर. गेल्याच आठवडय़ात मुत्तहिद कौमी मूव्हमेंटचे प्रमुख अल्ताफ हुसेन यांच्या लंडनमधील अटकेचे िहसक पडसाद या शहरात उमटले. अशा घटना तेथे वारंवार होतच असतात. त्यावर विमानतळावरील हल्ल्याने कडी केली. कराची विमानतळ म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने किल्ला, पण दहशतवाद्यांनी तो भेदला. विमानाच्या अपहरणाचा त्यांचा डाव होता. विमानतळावरील इंधनाच्या टाक्याही ते शोधत होते अशा बातम्या आहेत. त्या सापडल्या नाहीत. अन्यथा नुकसान मोठे झाले असते, पण या घटनेने पाकिस्तानची त्याहून मोठी हानी झाली. परदेशी गुंतवणूकदारांना विश्वास देण्याचे काम नवाझ शरीफ यांनी सुरू केले होते. त्यावर पाणी पडले. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी तालिबान्यांबरोबर संधी करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण तालिबान्यांनीच त्या उधळून लावल्या. हा हल्ला काही एका दिवसात झालेला नाही. त्यामागे गेल्या कित्येक दिवसांची तयारी होती, हे तालिबानच्या प्रवक्त्यानेच स्पष्ट केले आहे. या हल्ल्याआधी दोन आठवडे उत्तर वझिरीस्तानात तालिबानी आणि लष्कर यांच्यात चकमकी सुरू होत्या. त्यात किमान १२ सनिक मारले गेले. याचा अर्थ शरीफ सरकार शांततेची स्वप्ने पाहत असताना त्यांना बत्ती देण्याची तयारी तालिबानी करीत होते. शरीफ यांच्या राजकारणाची ही खासियतच म्हणावी लागेल. ते शांततेची कबूतरबाजी करीत असतात आणि त्यांच्या पाठीमागे कधी लष्कर, कधी आयएसआय, तर कधी तालिबानी त्या कबुतरांवर नेम धरून बसलेले असतात. अमेरिकेचा अफगाणिस्तानातून माघारीचा निर्णय तालिबान्यांच्या या वाढत्या आक्रमकतेमागे नसेलच असे म्हणता येणार नाही. ओबामा यांनी अफगाणिस्तानातून माघारीचे वेळापत्रक जारी केल्यानंतर तालिबानशी चच्रेचे प्रयत्न चालविले होते. शरीफ पाकिस्तानी तालिबान्यांबरोबर शांततासंधी करू इच्छित होते. पण तालिबान्यांनी त्या दोघांचीही विमाने जमिनीवर आणली. पाकिस्तानी तालिबानला तेथे शरियतचे राज्य हवे आहे. म्हणजे झिया काळातील इस्लामीकरणाचे पुढचे पाऊल त्यांना टाकायचे आहे. कराचीतील या हल्ल्यानिमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे. असे असताना, त्यात भारताला गोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानतळावर दहशतवादी घुसल्यानंतर चारच तासांनी त्या हल्लेखोरांकडील शस्त्रास्त्रे भारतीय बनावटीची असल्याचे जाहीर करून टाकण्यात आले.. काही काळाने ते हल्लेखोर ‘परदेशी’ असल्याचे मोघमपणे सांगण्यात आले. यावर कडी केली ती मुंबई हल्ल्याचा सूत्रधार समजल्या जाणाऱ्या हाफिज सईदने. या हल्ल्यामागे मोदींचा नवा सुरक्षा गट असल्याचे ट्विट करून आपण मनोवैज्ञानिक युद्धातही मागे नाही हे त्याने दाखवून दिले आहे. भारतविरोधी भावना भडकावण्याचाच हा प्रयत्न. त्याचे पडसाद भारतातही उमटतात, हे त्याला चांगलेच माहीत असणार.. तसे पडसाद आपण उमटू दिले, तर एका दगडात दोन पक्षी मारल्याबद्दल हाफिजच्या नेमबाजीची वाखाणणी करावी लागेल.
शरीफ स्वप्नांना सुरुंग
‘तुमच्या घरात तुम्ही सुरक्षित आहात असे तुम्हाला कितीही वाटत असले तरी ध्यानात ठेवा, आम्ही कधीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो..’ तहरिक-ए-तालिबान या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने १३ एप्रिल रोजी केलेले हे ट्विट.
First published on: 10-06-2014 at 12:10 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban claim deadly attack on karachi airport