चमकदार वक्तव्ये करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यात वा मुख्य विषयाकडून ते वळवून दुसरीकडे नेण्यात दिग्विजयसिंग यांचा हात धरणारा कोणी नाही. संघ परिवाराला झोडण्याची वा खिल्ली उडविण्याची एकही संधी दिग्विजयसिंग सोडीत नाहीत. त्याचबरोबर मुस्लीम समाजाचे तारणहार अशी काँग्रेसची प्रतिमा कायम राहील याची दक्षता ते घेताना प्रसंगी पोलिसांच्या कारवायांवर शंका व्यक्त करतात. दिल्लीतील बटाला हाऊसमधील चकमक ही बनवेगिरी होती, असे सांगून दिग्विजयसिंगांनी वादळ उठविले होते. काँग्रेसला सोयिस्कर अशी डावी विचारधारा ते सातत्याने मांडतात व डाव्या विचारांशी जवळीक असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये दिग्विजयसिंगांची ऊठबस असते. या पाश्र्वभूमीवर सूरजकुंड येथील काँग्रेसच्या संवाद बैठकीत त्यांनी मांडलेल्या निरीक्षणाने अनेकजण चक्रावून गेले. भारतातील तथाकथित भगवा दहशतवाद हा दिग्विजयसिंगांचा हातखंडा विषय. त्यावर ते कितीही वेळ बोलू शकतात व कोणतेही आरोप बिनधास्त करतात. मात्र सूरजकुंडमधील संवाद बैठकीत त्यांनी भगव्या दहशतवादाऐवजी ‘हिरवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केला आणि या हिरव्या दहशतवादाची पक्षाने गंभीरपणे दखल घ्यावी असे प्रतिपादन केले. दिग्विजयसिंगांचा हा शब्दप्रयोग बहुधा पर्यावरणाशी संबंधित असावा असे प्रथम उपस्थित काँग्रेसजनांना वाटले. पण दिग्विजयसिंगांनी जेव्हा धर्माध मुस्लीम संघटनांच्या वाढत्या कारवायांचा उल्लेख केला तेव्हा काँग्रेसजन थक्क झाले. मुस्लीम समाजातील काही गट दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होत चालले आहेत व भगव्या दहशतवादाइतकेच हे धोकादायक आहे, असे दिग्विजयसिंग म्हणाले. दहशतवादाला खरे तर कोणताही रंग देऊ नये. भगव्या रंगाबद्दलच्या पवित्र भावना लक्षात घेऊन भगवा दहशतवाद असा शब्दप्रयोग करू नका, अशी विनंती काही वर्षांपूर्वी ए. के. अँटनी यांनी काँग्रेस कार्यकारिणीला केली होती. हिरव्या दहशतवादाबद्दल दिग्विजय अधिक काय बोलले याचा तपशील कळलेला नाही. फक्त इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधीची बातमी दिली. हिंदू या दैनिकात फक्त एका ओळीत याचा उल्लेख आहे. ऊठसूट दिग्विजयसिंग यांना बोलते करणाऱ्या माध्यमांना त्यांच्या इतक्या महत्त्वाच्या वक्तव्याकडे लक्ष द्यावेसे वाटलेले नाही. मुस्लीम दहशतवादी संघटनांचा धोका इतक्या वर्षांनंतर अचानक दिग्विजयसिंग यांना कसा काय लक्षात आला हा प्रश्न माध्यमांनी करायला हवा होता. उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा पराभव हे त्यामागील कारण असावे. दिग्विजय जे बोलले तेच गेली कित्येक वर्षे अन्य अनेकजण सांगत आहेत. पण समाजात दुही पेरण्याचा हा उद्योग आहे या शब्दात त्यांच्या वक्तव्याची वासलात आजपर्यंत लावली गेली व मुस्लीम दहशतवादी संघटनांपेक्षा हिंदू दहशतवादाचा धोका मोठा आहे असा युक्तिवाद विविध व्यासपीठांवरून करण्यात आला. देशाला खरा धोका दहशतवादापासून आहे. तो कोणाकडून होत आहे हे तितके महत्त्वाचे नाही. पण या मुख्य मुद्दय़ाकडे काणाडोळा करून मतांचे राजकारण खेळले गेले व त्यामध्ये दिग्विजय आघाडीवर होते. त्याच डिग्गीराजांना आता वस्तुस्थिती कळून चुकली. मात्र पक्षबैठकीत तसे स्पष्टपणे बोलण्याचे धैर्य त्यांनी दाखविले हेही कौतुकास्पद आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा