तारेने मागच्या पिढीपर्यंतच्या कोटय़वधींना तातडीच्या संपर्कात राहण्याचे साधन दिले आणि त्यांच्या जगण्याचा वेग किंचितसा वाढवण्याचा प्रयत्नही केला..
घरात दूरध्वनी असणे हेच ज्या काळात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात होते, तेव्हा आजच्या मानाने संपर्क किती कमी प्रमाणात होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. घरात दूरध्वनी येण्यासाठी प्रतीक्षायादी असे. काही निवडक गटांना मंत्र्यांच्या सहीने प्राधान्याने असा दूरध्वनी मिळायचा. म्हणजे घरात कुणी आजारी असेल तर किंवा पत्रकार, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच दूरध्वनी मिळायचा. तेव्हा त्याचे कोण अप्रूप असायचे. एकमेकांशी संवाद ठेवण्याचे महत्त्वाचे साधन हे पोस्ट नावाचे खातेच होते. म्हणजे पोस्ट कार्डापासून ते पाकिटापर्यंत आणि इनलॅण्डपासून ते लिफाफ्यापर्यंत सगळा संपर्क लिखित स्वरूपात होत असे. त्या काळात लोक एकमेकांकडे शिळोप्याच्या गप्पांसाठीही सहजपणे जात असत. सहज घरावरून चाललो होतो, म्हणून डोकावलो, असे वाक्य कुणाला खटकत नसे. आदरातिथ्य करणे हा धर्म होता आणि खासगीपणाला त्यात फारसा थारा नव्हता. शाळांच्या सुटीच्या काळात महिनाभर आजोळी जाणे हे त्या समाजाचे व्यवच्छेदक लक्षण. तातडीने संपर्क करण्याची गरज फारशी वाटत नसावी. बहुतेक वेळा दूरचा नातेवाईक आजारी असल्याची माहिती देणारे पत्र घरी पोहोचेपर्यंत त्याचे निधनही झालेले असायचे. लग्नाच्या पत्रिका बारशाच्या वेळी मिळण्याने तेव्हा कुणाचे फारसे बिघडतही नव्हते. तशी सगळ्यांनी सवयच करून घेतली होती. पण नोकरीच्या मुलाखतीची वेळ कळवणारे पत्र जेव्हा ती वेळ टळून गेल्यानंतर मिळायचे, तेव्हा केवळ हताश व्हायला होत असे. जगण्याला काही वेग असतो, याचे भान यायचे होते अजून तेव्हा! अगदी फारच म्हणजे भयंकरच महत्त्वाचे असेल, तर तार नावाची पोस्ट खात्याची संपर्क यंत्रणा उपयोगाला यायची. तार हे भारतीयांच्या गेल्या दीडशे वर्षांच्या समाजजीवनातील एक अतिशय हळवे आणि गंभीर असे प्रकरण राहिले आहे. येत्या महिन्याभरात पूर्णविराम मिळणाऱ्या या तारेने मागच्याच पिढीपर्यंतच्या कोटय़वधींना तातडीच्या संपर्कात राहण्याचे साधन दिले आणि त्यांच्या जगण्याचा वेग किंचितसा वाढवण्याचा प्रयत्नही केला.
पोस्टमन नावाच्या देशातील स्वभावाने सर्वात गरीब असणाऱ्यांनी एकमेकांचे निरोप पोहोचवण्याचे काम इतक्या इमानेइतबारे केले, की त्यांचे ऋण फिटणे शक्य नाही. दिवसातून दोन वेळा येणाऱ्या या पोस्टमनची वाट पाहण्यात कितीतरी कुटुंबांचा वेळ जात असे. परंतु कधीही आणि अचानकपणे येणारा तारवाला ही भीतिदायक व्यक्ती असे. मध्यरात्री दारावरची कडी वाजवून ‘तार’ असा आवाज आला, की झोपलेले सगळे जण ताडकन उठून बसत आणि थेट देवाचाच धावा सुरू करत. परगावातल्या आपल्या आप्तेष्टांच्या जिवंतपणाविषयीचा दुर्दम्य विश्वास त्या एका शब्दाने पार गळून पडत असे. तार आली, म्हणजे नक्की कुणी तरी निवर्तल्याचे वृत्त असणार, अशी खात्रीच असायची जणू. घरात इंग्रजी येणारे कुणी नसेलच, तर ती तार वाचण्यासाठी शेजाऱ्यापाजाऱ्यांचीही झोपमोड व्हायची. बहुतेक तारांमधला मजकूर ‘अमुकतमुक सीरियस. स्टार्ट इमिजिएटली’ असा असायचा. मग रडारड आणि धावपळ सुरू व्हायची. निधनाचे थेट वृत्त कळवून धक्का देण्यापेक्षा ‘सीरियस’ हा शब्द सोयीचा पडायचा. अहोरात्र जागे राहणारे तार खाते म्हणजे त्या काळातल्या तंत्रज्ञानाचा जिवंत आविष्कार होते. सॅम्युअल मोर्स या अमेरिकन वैज्ञानिकाने शोध लावलेले हे तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारची गुप्त भाषा होती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने एका यंत्राद्वारे विशिष्ट आवाज पोहोचवले जात. त्या आवाजावरून शब्द ओळखणे हे काम तार खात्यातील कुशल कर्मचाऱ्यांनाच जमायचे. कट्ट कट्ट कडकट्ट कट्ट अशा प्रकारचे आवाज करणारे हे यंत्र म्हणजे कुतूहलाचे केंद्र असे. मोर्सने हे तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी घटनाही तशीच घडली. त्याच्या प्रिय पत्नीच्या निधनाची बातमी त्याला वेळेत मिळाली नाही. आपले जे झाले, ते इतरांचे होऊ नये, या उदात्त हेतूने तो प्रयत्नाला लागला आणि हे यंत्र बरोबर एकशे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अवतरले. तार हे प्रकरण असे सगळ्यांच्या मनात भीती बसून राहिलेले होते. तार खात्यानेच मग ही भीती दूर करण्यासाठी तारेचे विविध प्रकारचे मजकूर तयार केले. म्हणजे लग्नाच्या शुभेच्छा, प्रवासासाठी शुभेच्छा, पुत्रप्राप्तीचा आनंद, पारितोषिकासाठी अभिनंदन वगैरे. अशा मजकुरांना क्रमांक असायचे. पोस्टात जाऊन नुसता क्रमांक सांगितला, की ती तार घरपोच मिळायची. तार वेळेत पोहोचवणे हे पोस्टासाठी दिव्य असायचे. पत्ता शोधून वेळेत पोहोचणे हे पोस्टमनसाठी २४ तासांचे काम असे. नोकरदारांना अनेकदा तार हे रजा मिळण्याचे हुकमी शस्त्र वाटत असे. दूरच्या गावातून आलेली ‘स्टार्ट इमिजिएटली’ची तार रजेच्या अर्जाला जोडली की काम फत्ते! तार हे त्या काळातल्या वृत्तपत्रांचे एक अतिशय विश्वासू आणि जलद दळणवळणाचे साधन असे. बातमी वेळेत पोहोचण्यासाठी पत्रकारांना तारेशिवाय पर्याय नसे. त्यासाठी मराठी शब्द रोमन लिपीत लिहिण्याचे कसब अंगी बाणवावे लागे. प्रत्येक पन्नास शब्दांनंतर कंसात पन्नास असा आकडा लिहिण्याचे बंधन असे. तारेचे दर शब्दागणिक असल्याने प्रत्येक शब्दाला महत्त्व फार. निवडणुका, साहित्य संमेलन अशांसारख्या घटनांचे वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांना तारेचे अधिकृत ओळखपत्र दिले जायचे. पैसे न देता तार करण्याचा हा परवाना म्हणजे पत्रकारांसाठी कितीतरी प्रतिष्ठेची गोष्ट असायची.
माहितीच्या दळणवळणाचा हा वेग इतक्या झपाटय़ाने बदलला, की तार नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे, याचाही विसर पडला. १९९५ मध्ये इंटरनेटने आणि मोबाइल दूरध्वनीने भारतात आगमन केले आणि गेल्या अठरा वर्षांत त्यापूर्वीच्या काळातील अतिशय महत्त्वाची आणि उपयोगी तंत्रज्ञाने कालबाह्य़ होऊ लागली. त्यापूर्वीच्या दशकात भारतात झालेल्या दूरध्वनीच्या क्रांतीने घरोघरी दूरध्वनी बसू लागले. नंतरच्या मोबाइलने तर ही क्रांतीही पुसून टाकली. जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी क्षणार्धात प्रत्यक्ष संपर्क साधण्याची इंटरनेटची यंत्रणा हे मानवाच्या जगण्याच्या वेगाचे खरे इंधन ठरले. मोबाइलने थेट संपर्क साधण्याची सोय केल्याने पत्र, इनलॅण्ड आणि पाकिटे यांचा वापर मर्यादित होऊ लागला. खुशीपत्रे पाठवण्याऐवजी एका एसएमएसने काम व्हायला लागले आणि ईमेलने हवा तेवढा मोठा मजकूर कोणत्याही अडथळय़ाविना थेट ‘इनबॉक्स’मध्ये पडू लागला. संगणकीय क्रांतीने टाइपरायटर नावाची वस्तू थेट पुराणवस्तू संग्रहालयात धाडली आणि इंटरनेट व मोबाइलने तारेचे यंत्र. देशात आजमितीस वापरात असलेल्या एकूण साडेनऊ कोटी दूरध्वनींपैकी मोबाइलची संख्या सव्वानऊ कोटी एवढी आहे. इंटरनेट वापरासाठी आवश्यक असणाऱ्या संगणकाचीही बरीचशी कामे मोबाइल करू लागल्याने माणसाची हाताच्या तळव्यावर सारे जग माववण्याची इच्छा आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. भारतीय तार खात्याने तारेला जगवण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण तंत्रज्ञानाच्या धबधब्यापुढे ही तार इतकी क्षीण झाली, की तिच्यात प्राण फुंकणे व्यर्थ ठरू लागले. ज्या सॅम्युअल मोर्सने तंत्रज्ञान विकसित केले, त्याच्या खांद्यावर बसून पुढे गेलेल्या तंत्रज्ञानाने त्याचेच स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केले आहे. तारेच्या अस्तंगत होण्याने गळा काढण्यापेक्षा त्या तंत्रज्ञानाच्या योगदानाबद्दल ऋणात राहणेच अधिक चांगले!
कट्ट कडकट्ट कट्ट..
तारेने मागच्या पिढीपर्यंतच्या कोटय़वधींना तातडीच्या संपर्कात राहण्याचे साधन दिले आणि त्यांच्या जगण्याचा वेग किंचितसा वाढवण्याचा प्रयत्नही केला..
आणखी वाचा
First published on: 15-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telegram to internet