अनाहूतपणे आलेली थंडी, अचानक आलेला उकाडा, अवकाळी पडलेला पाऊस.. हे सारे यंदाच्या हिवाळय़ात महाराष्ट्राला फारच अनुभवायला मिळाले. हा परिणाम उत्तरेकडच्या थंडीचा आहे म्हणावे, तर दुपारी हिवाळा नसून उन्हाळाच आला असे का होते?  महाराष्ट्रात सध्याचे हवामान विचित्र झाले आहे, ते तसे का झाले याचा हा मागोवा..

भारतावर मुख्य प्रभाव आहे तो उत्तरेचाच. आपली राजधानी दिल्ली. राष्ट्रभाषा हिंदी. उत्तर भारतच देशाचा पंतप्रधान ठरवतो. बहुतांश पंतप्रधानही उत्तरेतलेच.. भाषा, संस्कृती, राजकारणावर उत्तरेचा प्रभाव आहे, तसाच तो हवामानावरही! त्यामुळेच तर आपला उन्हाळा आणि हिवाळा किती तीव्र असणार हे ठरवतो तो उत्तर भारतच!
लांबचं नाही, तर अगदी आजच्या घडीलाही हेच अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सध्या जो उकाडा-थंडी यांचा लपंडाव सुरू आहे, त्यालाही उत्तर भारताचेच हवामान जबाबदार आहे. दोनतीन दिवस कडाक्याची थंडी, पाठोपाठ उकाडय़ाने हैराण होण्याची वेळ, तर मध्येच पावसाच्या सरी.. जणू चारपाच दिवसांना ऋतू बदलावा असे हे संमिश्र दिवस! नेमका कोणता ऋतू सुरू आहे याबाबत गोंधळ निर्माण करणारे वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. हवामानशास्त्रात त्याची उत्तरे आहेतच, पण उत्तरेकडचा प्रभाव ही बाब लक्षात घेऊन हे सारं समजून घेतलं, की आपला गोंधळ दूर होण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर भारताच्या हवामानात असलेली विविधताही खऱ्या अर्थाने समजते.
एकीकडे धो-धो पावसाचा डोंगरी प्रदेश, तर दुसऱ्या टोकाला तप्त वाळवंटी सपाट भाग ही भारताच्या भूगोलातील विविधतेची झलक. त्याचबरोबर उष्णतेच्या लाटांमुळे होरपळून निघणारा एक प्रदेश आणि त्याच वेळी थंडीच्या लाटेत गारठून जाणारा दुसरा प्रदेश ही भारताच्या हवामानातील विविधता. याच विविधतेचा प्रत्यय आताची हवा अनुभवताना येतो, त्याच्यावर जगाच्या विविध घटकांचा असलेला प्रभावही लक्षात येतो. सध्याच्या या चढ-उताराला कारणीभूत ठरला आहे, भारताच्या हवामानाचा अति उत्तरेकडील वैशिष्टय़पूर्ण घटक. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्सेस’ किंवा ‘पश्चिमी प्रक्षोभ’ हे त्याचं नाव. त्याच्या नावाची धास्ती वाटेल कदाचित, पण त्याची नियमितता कौतुकास्पद आहे. हा घटक म्हणजे- अति उत्तरेला, अगदी हिमालयाच्या प्रदेशात पश्चिमेकडून येणारे वारे. हे वारे काही वेळा बाष्प घेऊन येतात, मग तिथलं सारं वातावरण पालटून टाकतात. हिमालयात हिमवृष्टी, वायव्य व उत्तर भारतात पाऊस आणि धुक्याची दुलई.. बरंच काही घडतं. या घटकाचा प्रभाव केवळ हिमालय किंवा उत्तर भारताच्या पट्टय़ापुरता नसतो, तर अनेकदा तो दक्षिणेपर्यंत उतरून महाराष्ट्रात येऊन पोहोचतो. तेच सध्या पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळेच आताचे आपले हवामान प्रभावित झाले आहे.
खरंतर ‘वेस्टर्न डिस्टर्बन्सेस’ हा जागतिक हवामानाचाच एक भाग. पृथ्वीवर विषुववृत्ताचा उष्ण प्रदेश सोडून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना समशीतोष्ण प्रदेशाचा- थंड व उष्ण हवामान असलेला- पट्टा लागतो. त्यात या घटकाचं अस्तित्व आढळतं. आपल्याकडे तो हिमालयात दिसतो, त्याचप्रमाणे समशीतोष्ण असलेल्या युरोपातही तो जाणवतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे असेच त्याचे वैशिष्टय़. परिणामी या वाऱ्यांचा व त्यांच्यामुळे येणाऱ्या पावसाचा अंदाज व्यवस्थित बांधता येतो. त्यामुळेच तर युरोपमध्ये पावसाचे व हवामानाचे अंदाज आपल्यापेक्षा अधिक बरोबर येतात. याचा अनुभव कधी-कधी आपल्याकडेही येतो. गेल्याच महिन्यात दिल्लीत प्रचंड पाऊस पडला. विशेष म्हणजे त्याचा अचूक अंदाज आठवडाभर आधीच देण्यात आला होता आणि घडलेही तसेच. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले, पण हा अंदाज बरोबर येण्यामध्ये हवामानतज्ज्ञांप्रमाणेच ‘वेस्टर्न डिस्टर्बन्सेस’ चाही प्रमुख वाटा होता, कारण हा पाऊस त्याच वाऱ्यांमुळे पडला होता.
या वाऱ्यांचा प्रभाव मुख्यत: जाणवतो तो आपल्या पावसाळ्यानंतर, मान्सून निघून गेल्यानंतर. मान्सूनच्या काळातही काही प्रमाणात हा घटक सक्रिय असतो आणि मान्सूनवर काही प्रमाणात का होईना बरा-वाईट प्रभाव टाकतो, पण मान्सूनच्या काळातील प्रचंड पावसामुळे या घटकाकडे स्वाभाविकपणे दुर्लक्षच होते. त्यामुळेच मान्सूननंतर म्हणजे हिवाळ्यात त्याचे विशेष अस्तित्व जाणवते. ते या हिवाळ्यातही पाहायला मिळाले. थंडीचे येणे, तिचे दाटणे आणि निघून जाणे यामध्ये बहुतांश वेळा याच घटकाचा परिणाम असतो. उत्तर भारतातील दाट धुक्याला तोच कारणीभूत ठरतो. त्यामुळे दिल्लीतही विमानांची उड्डाणे रद्द होतात, रस्ते-रेल वाहतूक ठप्प बऱ्याच काळासाठी होते आणि अनेक अपघातांनाही हाच घटक अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरतो, पण या वाईट प्रभावाबरोबरच त्याचा चांगला भाग असा, की हिवाळ्यात रब्बीच्या हंगामासाठी पिकांना पाऊसही याच घटकामुळे मिळतो. उत्तरेकडे गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे या काळात पाऊस पाडणाऱ्या या घटकाचाही अर्थव्यवस्थेवरही चांगला परिणाम होतो.
पश्चिमी प्रक्षोभांचा- म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्यासाठी कारणे जुळून आलेली असतात. या घटकाचा आपल्यावर कसा, कधी व किती परिणाम होणार, याची नेमकी वैशिष्टय़े आहेत. हा घटक पश्चिमेकडून हिमालयात सरकत येतो. येताना भूमध्य सागरावरून (मेडिटरेनियन सी) बाष्प आणतो. त्यामुळे त्याचा प्रवास इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान व हिमालय असा होता. त्याचाही नियम असा, की ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ काश्मीरकडे येत असताना उत्तर भारतात (बऱ्याचदा महाराष्ट्रात सुद्धा) वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात, त्यामुळे आपल्याकडे उबदार वातावरण असते. पण एकदा का हा घटक जम्मू-काश्मीर ओलांडून पूर्वेकडे सरकला की उत्तर भारतातील वाऱ्यांची दिशा बदलते. हे वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहू लागतात. त्यांच्याबरोबर आपल्याकडे उत्तरेतील थंडीसुद्धा येऊन पोहोचते.
त्यामुळेच चार दिवस उबीचे, तर चार दिवस थंडीचे असे चित्र निर्माण होते. हेच हिवाळ्यात पाहायला मिळते. उत्तरेकडील वारे बाष्प घेऊन दक्षिणेत उतरले, तर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या काही सरीसुद्धा आपल्याकडे बरसतात. आंब्याचा मोहर, द्राक्षाच्या बागा आणि काढणीला आलेली रब्बीची पिकं यांना झटका देतात.
हिवाळ्यात या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ च्या जोडीने इतरही काही घटक सक्रिय असतील. तर मात्र ही गुंतागुंत आणखी वाढते. आणि आता सुरू आहे तसे, दर चार दिवसांनी वातावरण बदलू लागते. ही गुंतागुंत म्हणजे- वाऱ्यांच्या शह-कटशहाचा खेळच असतो. दक्षिण भारतात (महाराष्ट्रातही) बऱ्याचदा पूर्वेकडून म्हणजेच बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव जाणवतो. हे वारे समुद्रावरून येत असल्याने बाष्प आणतात. ते उबदारही असतात. बऱ्याचदा असे घडते, की पूर्वेकडून हे वारे आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सेमुळे उत्तरेकडून थंड वारे एकमेकांना भिडतात. मग त्यांच्या शह-काटशहामध्ये कधी उबदार वातावरण, कधी ढगाळ हवा, मध्येच थंडीचे चार दिवस, तर कधी पावसाच्या सरी अशी गुंतागुंत अनुभवायला मिळते. महाराष्ट्रातील गेल्या दोन-तीन आठवडय़ांचे हवामान हे त्याचे उत्तम उदाहरण ठरले. महाराष्ट्रप्रमाणेच भारताच्या बाऱ्याचशा भागात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्सेस’ चा प्रभाव जाणवला. गेल्या दोन महिन्यांमध्ये उत्तर व मध्य भारतात जास्त प्रमाणात पडलेल्या पावसाच्या स्वरूपातही त्याचा पुरावा दिसला.
असे हवामान अवतरते तेव्हा त्याच्याबद्दल बरेच काही बोलले जाते. अनाहूतपणे आलेली थंडी, अचानक आलेला उकाडा, अवकाळी पडलेला पाऊस असे बोलले जाते. त्याच्यामुळे होणाऱ्या नुकसानीवरून हवामानाच्या नावाने बोटंही मोडली जातात. प्रत्यक्षात मात्र या गोष्टी हिवाळ्यातील हवामानाची वैशिष्टय़च आहेत. कधी असे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस एकापाठोपाठ एक अशा क्रमाने येतात, तर कधी बराच काळ विश्रांती घेतात. एवढाच काय तो फरक. पण ते आलेच नाहीत, असे सहसा होत नाही. आताचा फेब्रुवारी महिना तर त्यासाठी प्रसिद्धच आहे. या महिन्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सेसच्या असे तीनचार चढाया होतच असतात. तेच या वर्षी पाहायला मिळाले, पण आताच्या चढाया अतिशय तीव्र असल्याने त्यांच्याबद्दल बोलले गेले आणि त्यांची चर्चा जनसामान्यांपर्यंत पोहोचली.. हवामानाचा एक घटक एखाद्या प्रदेशावर किती प्रमाणात प्रभाव टाकू शकतो, याचेच हे उदाहरण. भारताच्या दृष्टीने मान्सून हा असा घटक ठरतो. उत्तर, वायव्य व मध्य भारताच्या दृष्टीने हे स्थान निश्चितपणे ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ ला आहे.
खरं तर हवामानाच्या सर्वच घटकांचे प्रमुख कार्य असते, ते ऊर्जेचे समान वितरण करण्याचे. विषुववृत्तावर प्रखर सूर्यप्रकाशामुळे भरपूर ऊर्जा असते, तर दुसऱ्या टोकाला ध्रुवीय प्रदेश या ऊर्जेविना असतात. हवामानाचे घटक या ऊर्जेचे वितरणच करत असतात, मग तो मान्सून असेल, घोंघावत येणारी चक्रीवादळे असतील, ढगांच्या गडगडाटासह अवतरणारा पाऊस असेल, नाहीतर हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस.. त्यामुळेच ऊर्जावितरणाचे आपले प्रमुख काम करता करताच ते इतर गोष्टी करतात. मग कुठे पाऊस पाडतील, कुठे थंडी आणतील, नाहीतर कुठे हिमवृष्टीला कारणीभूत ठरतील. भारताच्या संदर्भात बोलायचे, तर त्यांनी आपल्या देशावरील उत्तरेचा प्रभाव अधोरेखित केला आहे, आपल्याला आवडो वा न आवडो!
  

Story img Loader