अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा राज्यभरातील लाखो विद्यार्थी गुरुवारपासून देणार आहेत. अभ्यासाचा ताण त्यांच्यावर असला तरी त्यांच्या व पालकांच्या सुदैवाने परीक्षेच्या कुंडलीला लागलेले अनेक पापग्रहांचे ग्रहण सुटले आहे. संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांनी उगारलेले बहिष्काराचे अस्त्र म्यान केले आहे. परीक्षेच्या वेळापत्रकावरून आक्षेप घेतला गेल्याने त्यात बदल झाले. त्यातच कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या देशव्यापी संपाचा फटका या परीक्षेला बसणार होता. पण रिक्षा, टॅक्सी, बेस्ट, एसटी, रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांवरील मानसिक ताण दूर झाला आहे. दहावी-बारावी हे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष. त्यामुळे आयुष्याची दिशा ठरत असते. हे दडपण घेऊन विद्यार्थी अभ्यास करीत असतो. पण अभ्यासाच्या ताणापेक्षाही परीक्षेवरील बहिष्कार, आंदोलने, वेळापत्रकातील बदल अशा गोष्टींचा मनस्ताप विद्यार्थी व पालकांना अधिक होतो. दर वर्षी नेमाने या परीक्षांमध्ये अडथळे आणण्यासाठी जणू अहमहमिका लागलेली असते. कधी शिक्षक, तर कधी संस्थाचालक, नाही तर शिक्षकेतर कर्मचारी यांपैकी एखादे तरी किंवा सर्व जण एकी करून विद्यार्थी व पालकांना वेठीला धरत असतात. अभ्यासापेक्षाही त्यांच्या सहनशीलतेची आणि ताण सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये किती आहे, याची परीक्षा या काळात होत असते. मूळ परीक्षेपेक्षाही ही परीक्षा कठीण असते. ही प्रथा दर वर्षी सुरूच राहणार असेल, तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या पालकांना ‘तणावमुक्ती व्यवस्थापन’ प्रशिक्षण देण्यासाठी किंवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पावले टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. नाही तर पालकांनी स्वत:सह आपल्या पाल्यांना तणावमुक्ती कार्यशाळेत पाठविले पाहिजे. त्यामुळे परीक्षा काळात मन:स्वास्थ चांगले राहण्यासाठी आणि पुढे अगदी विद्यापीठ स्तरावरही अशा प्रसंगांना वारंवार तोंड देण्यासाठी त्यांची मानसिक तयारी होईल.
परीक्षा काळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक विद्यार्थ्यांना तर गणपती-दिवाळी या काळात महापालिका किंवा अन्य कर्मचारी बोनस व अन्य मागण्यांसाठी नागरिकांना वेठीला धरत असतात. सर्वोच्च न्यायालयाने संपबंदीचा आदेश देऊनही आणि राज्य शासनाने कायदेशीर तरतूद करूनही संप होतात. त्याची भरपाई संघटनांकडून वसूल करण्याची आणि कारवाईची तरतूद असूनही ती कागदावरच राहते. सरकारने संघटनांच्या दबावाला बळी न पडता खंबीर भूमिका घेऊन आणि संघटनांचे मुद्दे चिघळत न ठेवता त्वरित योग्य निर्णय घेऊन निकालात काढले पाहिजेत. भूलथापा किंवा खोटी आश्वासने सरकार देते आणि आंदोलने वारंवार होत राहतात. दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या दहा महिने आधी म्हणजे जूनमध्येच जाहीर करण्याचे धोरण राज्य सरकार व मंडळाने स्वीकारले आहे. त्यानुसार यंदाही ते जाहीर होईल. पण वेळापत्रक तयार करताना कोणत्याही चुका होणार नाहीत, यासाठी मंडळाने दक्ष व काटेकोर राहिले पाहिजे. प्रत्येक विषयाच्या पेपरसाठी किती दिवसांची सुटी आहे, देशपातळीवरील अन्य संस्थांच्या परीक्षा कधी आहेत, याचा विचार करून वेळापत्रक तयार केल्यास त्यात बदल करण्याची वेळ येणार नाही. नाही तर दहावी-बारावीत गेलो, म्हणजे काही पापकर्म केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मनस्ताप भोगावा लागणार नाही. यंदाच्या वर्षी बारावी व दहावीच्या परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे शुभेच्छा!
..तणावमुक्ती प्रशिक्षण हवे
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा राज्यभरातील लाखो विद्यार्थी गुरुवारपासून देणार आहेत. अभ्यासाचा ताण त्यांच्यावर असला तरी त्यांच्या व पालकांच्या सुदैवाने परीक्षेच्या कुंडलीला लागलेले अनेक पापग्रहांचे ग्रहण सुटले आहे. संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांनी उगारलेले बहिष्काराचे अस्त्र म्यान केले आहे.
First published on: 20-02-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tension free training needed