ते दोघेही गोध्रापासून १३७ किलोमीटरवर, अहमदाबाद येथे राहणारे. २००२च्या ‘उत्स्फूर्त प्रतिक्रिये’तील त्या दोघांची छायाचित्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजली होती : अशोक हातात तलवार घेऊन, डोक्यास ‘बजरंग दल’ असे लिहिलेली आडवी रिबीन बांधून, बेभान धावत सुटला आहे; तर दुसऱ्या छायाचित्रात अन्सारी हा हात जोडून, डोळ्यांत प्राण आणून रडवेल्या चेहऱ्याने आणि जखमी अवस्थेत जिवाची भीक मागतो आहे. ‘गुजरात २००२’ असा गुगल-प्रतिमाशोध दिला तरी आजही सहज सापडावीत, अशी ही छायाचित्रे : एक छायाचित्र गुजरात दंग्यांतील हिंदू आक्रमकतेचे प्रतीक, तर दुसरे अल्पसंख्य असहायतेचे. यापैकी अन्सारीचे छायाचित्र खोटेच आहे, असा प्रचार हिंदुत्ववादय़ांनी करून पाहिला होता, तर ‘हा तर आपला अशोक मोची’, हे अनेक अहमदाबादवासींना माहीत होते. हे दोघे गुजरातपासून दूर, केरळच्या कण्णूर जिल्ह्य़ातील तालिपरम्बा येथे एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होते, शाहिद रूमी यांनी अन्सारीचा जीवनसंघर्ष मल्याळम् भाषेत पुस्तकरूपाने आणला, त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. फोटो निघाल्यापासून आजपर्यंत दोघे कसे जगताहेत, हे याच कार्यक्रमात, त्यांच्याच तोंडून उलगडले आणि हा कार्यक्रम मार्क्‍सवादय़ांचा असल्याने ‘धर्मनिरपेक्षतेची प्रयोगशाळा’ म्हणून का होईना, पण आपण सारे भाऊच आहोत, धर्मभेद मानत नाही आणि गेल्या दहा वर्षांत गुजरातमध्ये शांतता आहे हेच बरे, असे दोघांनीही सांगितले.
अन्सारीचा फोटो निघाल्यानंतर तो दंगलग्रस्तांच्या छावणीत, तिथून मालेगावात नातेवाइकांकडे, मग कोलकात्याला असा छोटेमोठे व्यवसाय करीत पै-पैसा जोडत राहिला. पुन्हा अहमदाबादेत सव्वातीन लाख रुपये मोजून त्याने कपडेशिलाईचे दुकान थाटले, पत्नी आणि तिघा मुलांसह तो राहतो आहे आणि त्याच्या त्या फोटोने त्याचा पिच्छा सोडला नव्हता, तो आता कुठे सुटतो आहे! तो फोटो दहशतवादी गटानेही ई-मेलवर वापरल्याच्या वार्तेने आपल्याला शरम व संताप वाटला आणि याच फोटोमुळे एकदोघे मदत करण्यासही तयार झाले, असे त्याचे अनुभव.
अशोक मात्र आजही हलाखीत कसा राहिला आहे, याचे दर्शन त्या कार्यक्रमात घडले. सारे शांत झाल्यानंतर त्याला वाटले होते आपले भले होईल, पण त्याचे लग्नही रखडले- कारण नोकरीधंदा नाही. अखेर पादत्राणांच्या दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय त्याने पत्करला. आजही तो त्याच रस्त्यावर आहे. त्या दोघांची ही कहाणी, कदाचित सहानुभूतीमुळे अन्सारीला मिळालेल्या मदतीची आणि दंगलखोर असा शिक्का एकदा बसल्यावर मदतीच्या वाटा बंद होण्याचीही असू शकेल. पण आहे हे असे आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा