विजया जांगळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
केदारनाथमध्ये नुकतेच हेलिकॉप्टर कोसळून चालकासह सात जणांचा जीव गेला. केदारनाथचं दर्शन घेऊन हे पर्यटक परतत असताना गरुड चट्टी इथं १८ ऑक्टोबर रोजी हा अपघात घडला. वाईट हवामान, चालकाला त्या हवामानात आणि अशा पर्वतरांगामध्ये हेलिकॉप्टर चालवण्याचा सराव नव्हता अशी यामागची कारणं दिली जात आहेत. अर्थात अशा अपघाताचं हे पहिलंच उदाहरण नाही आणि एकमेव उदाहरणदेखील नाही. असे अपघात सातत्याने घडताना दिसतात.
प्रतिकूल हवामानात हेलिकॉप्टर उडवणं, पॅराग्लायडिंगसाठी नवशिके पायलट नेमणं, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबणं, गणेशोत्सवाच्या गर्दीची संधी लाटण्यासाठी जुनाट बस रस्त्यावर उतरवणं, रिव्हर व्ह्यूसाठी थेट नदीच्या पात्रातच हॉटेल बांधणं, कधीच डागडुजी न केलेल्या धोकादायक आकाशपाळण्यात भरभरून माणसं भरणं… भारतात हे नित्याचंच झालं आहे. पर्यटकांचे जीव गेलेत तरी चालतील, पण संधी मिळेल तेव्हा पैसे कमवून घ्या, या सूत्रावरच पर्यटन क्षेत्रं चालतंय की काय, असा प्रश्न पडावा, अशा घटना वारंवार घडतात. केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघाताच्या पार्श्वभूमीवर या- ‘कुछ नही होता!’ वृत्तीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेलं उत्तराखंड हे पूर्वीपासूनच यात्रेकरूंची गर्दी खेचणारं राज्य होतं. गेल्या काही वर्षांत या गर्दीत भर पडली ती हौशी साहसी पर्यटकांची. गिर्यारोहणापासून, बंजी जंपिंग, पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, कॅम्पिंगच्या निमित्ताने इथे तरुणांची रीघ लागलेली असते. हिमालयातली परिसंस्था अतिशय संवेदनशील आहे. पर्यटकांचा एवढा मोठा भार ती पेलू शकते का, याचा विचार न करता अधिकाधिक पर्यटकांना वाट्टेल त्या मार्गांनी आकर्षित करण्याची स्पर्धा लागलेली दिसते. त्या नादात अनेक नियम धाब्यावर बसवले जातात. सरकारी यंत्रणाही भरगच्च महसुलावरचं आणि चिरीमिरीवरचं लक्ष ढळू न देता, या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करतात. यातूनच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात नद्यांच्या दोन्ही काठांवर हॉटेल्स उभी राहिली. नदीचं दर्शन अधिक जवळून घडावं म्हणून थेट पात्रातच बांधकामं सुरू झाली. पुढच्या हॉटेलमुळे रिव्हर व्ह्यू गेला, म्हणून मागच्यांनी आणखी मजले चढवले. अशा स्थितीत २०१३ मध्ये झालेली ढगफुटी असो वा गेल्याच वर्षी चामोलीत झालेलं हिमस्खलन… लहान मोठी कोणतीही आपत्ती आली की सगळा पर्यटन विकास पुरात वाहून जातो.
उत्तराखंड असो वा कुलु- मनाली… तिथल्या पॅराग्लायडिंगचा थरार काय वर्णावा? उंच शिखरावरून पक्ष्यांप्रमाणे उडताना खालच्या बर्फातून डोकावणाऱ्या सूचिपर्णी वृक्षांची रांग पाहणं हा खरोखरंच अविस्मरणीय अनुभव असतो. पण तो मिळवण्यासाठी काय करावं लागतं? एकतर भरभक्कम शुल्क भरावं लागतं. गंडोला किंवा रोपवेने शिखर गाठायचं, गुडघाभर बर्फातून कसंबसं उड्डाणाच्या ठिकाणी पोहोचायचं आणि तिथे पोहोचल्यावर दिसतं काय? मुंबईतल्या रेल्वेचा फलाट शोभेल अशी गर्दी. त्यात आपला नंबर किती तासांनी लागेल, तोपर्यंत वारा अनुकूल असेल का, हेही सांगता येत नाही. आपल्या जीवाची जाबाबदारी आपणच घेत असल्याचं आधीच लिहून दिलेलं असल्यामुळे आपल्याला श्वसनाचे, हृदयाचे, रक्तदाबाशी संबंधित काही त्रास आहेत का, हे जाणून घेण्याची तसदी बहुतेकदा या साहसी पर्यटनी दुकानं उघडून बसलेल्यांनी घेतलेलीच नसतेच. पॅराशूट पुरेसं मजबूत आहे का आणि पायलट प्रशिक्षित व अनुभवी आहे का, याची खातरजमा करून घेण्याचा काहीही मार्ग नसतो. मग कधी पॅराशूटच्या दोऱ्या एकमेकांत गुंतल्यामुळे तर काही वेळा पायलट पुरेसा प्रशिक्षित नसल्यामुळे जवळपासच्या कड्यांवर आदळून किंवा जमिनीवर कोसळून अपघात होतात. कुल्लू आणि कांग्रा जिल्ह्यात गेल्या दशकभरात पॅराग्लायडिंग करताना झालेल्या अपघातांत एकूण २० जणांनी प्राण गमावले आहेत आणि १२ हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अशा वेळी गरज असते ती त्वरित वैद्यकीय उपचारांची, मात्र या साहसी खेळांच्या परिसरात रुग्णवाहिकाही तैनात ठेवली जात नाही. अनेकदा बर्फामुळे रस्ते बंद झालेले असतात. अशा परिस्थितीत रुग्णाला वाहनापर्यंत पोहोचवण्यातच बराच वेळ वाया जातो. पूर्वी तर हेल्मेट्सही दिली जात नसत. वारंवार दुर्घटना होऊ लागल्यानंतर ती दिली जाऊ लागली आहेत. हिमालयात अनेक ठिकाणी ही स्थिती दिसते.
पॅराग्लायडिंग पायलटचं लायसन्स देण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला असतो. ज्या व्यक्तीने किमान पाच वर्षांत कमीत कमी ५०० तास ग्लायडिंग केलं आहे, अशी व्यक्तीच या लायसन्ससाठी पात्र असते. मात्र अनेकदा लॉगशीटमध्ये फेरफार करून अनुभव वाढवून दाखवला जातो. हे टाळण्यासाठी या नोंदी डिजिटल स्वरूपात ठेवल्या जाव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.
जे पॅराग्लायडिंगच्या बाबतीत तेच रिव्हर राफ्टिंगच्या बाबतीत होताना दिसतं. ऋषीकेशमध्ये १४० अधिकृत राफ्टिंग साइट्स आहेत आणि अनधिकृत साइट्सची संख्या आहे तब्बल ३१०. यावरून राफ्टिंगबाबत स्थानिक प्रशासनाची बेफिकीर वृत्ती अधोरेखित होते. तिथे दरवर्षी एखाद-दोन तरी अपघात होतात आणि त्यात काही जण जखमी तरी होतात किंवा जीव जातात. तरीही पर्यटकांचा ओघ कायम आहे. गंगा असो वा बियास राफ्ट उलटून वा खडकांवर आदळून होणारे अपघात नेहमीचेच आहे. त्यामुळे राफ्टिंग करवणाऱ्यांना लायसन्स देण्याची प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवण्यात यावी आणि एकाच गाव किंवा जिल्ह्यातल्याही प्रत्येक राफ्टिंग साइटसाठी स्वतंत्र लायसन्स मिळवणं बंधनकारक करण्यात यावं, अशी मागणी होत आहे.
या खेळांच्या तुलनेत स्कुबा डायव्हिंग आणि बंजी जंपिंग या साहसी क्रीडा प्रकारांत अपघातांचं प्रमाण कमी आहे. बंजी जंपिंगसारख्या प्रकारात रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार नसल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक करणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाची कोणतीही खातरजमा न करताच हे खेळ खेळले जातात. यात जीवाशी खेळ होण्याची भीती असते. काही वर्षांपूर्वी एक मरिन इंजिनीअर बंगळुरूमध्ये बंजी जंपिंग करत असताना हार्नेसचा एक पट्टा तुटला. जमिनीवर आदळून त्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं आणि पुढे त्यात त्याचा मृत्यू झाला. अशाप्रकारे दुय्यम दर्जाची उपकरणं वापरणं, उपकरणांची डागडुजी न करणं अनेकांच्या जीवावर बेतलं आहे.
अम्युझमेन्ट पार्कमधील अपघात हा केवळ बेफिकीर वृत्तीचा परिणाम आहे. इथे हवामान, नैसर्गिक आपत्ती वगैरे प्रश्नही नसतात. सर्व राइड्सची वेळच्यावेळी निगा राखली, तपासणी आणि डागडुजी केली तरीही सुरक्षेचा प्रश्न मिटू शकतो. मात्र इथेही तीच ‘क्या फरक पडता है, कुछ नहीं होता’, वृत्ती मारक ठरते. मोहालीत जॉयराइड जमिनीवर आदळून झालेल्या अपघाताच्या स्मृती अद्यापही ताज्या आहेत. या अपघातात १६ जणांना जीव गमावावा लागला होता.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून जीव गमावावा लागल्याच्या अनेक घटना आसाम, उत्तरप्रदेश आणि केरळमध्ये घडल्या आहेत. अशा घटना घडल्या की तात्पुरती कारवाई होते मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. हीच गत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांची. गणपती आगमनाच्या आधीचे तीन-चार दिवस आणि विसर्जनाच्या नंतरचे काही दिवस कोकणच्या वाटेवर प्रचंड गर्दी होते. कमवून घेण्याची ही संधी सोडण्यास खासगी ट्रॅव्हल्सवाले अजिबात तयार नसतात. अवाचेसवा भाडे आकारून एरवी मोडीत काढण्याच्या योग्यतेच्या बसगाड्या मुंबई-गोवा मार्गावर पळविल्या जातात. अर्धप्रशिक्षित चालक आणि विस्कळीत कारभारामुळे होणारा विलंब भरून काढण्यासाठीची घाई यामुळे अनेकदा अपघात होतात. लग्न-कार्यांच्या काळात खासगी वाहनांना अपघात होऊन अख्खं वऱ्हाड जखमी झाल्याच्या किंवा मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या जवळपास दरवर्षीच येतात. यात सुस्थितीत नसलेल्या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबणं आणि वाहन अतिशय बेशिस्तपणे चालवणं हे घटक कारणीभूत असतात.
पर्यटन हा व्यवसाय आहे, त्यामुळे तो करणाऱ्यांनी विविध मार्गांनी अधिकाधिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. नियमांची काही प्रमाणात मोडतोड प्रत्येकच व्यवसायात केली जाते, हे वास्तव आहे. मात्र नफा कमावण्यासाठी काही जीवांची किंमत मोजण्याची तयारी कशी काय असू शकते? यंत्रणा अनेक जीव जाईपर्यंत हातावर हात घेऊन बसण्याएवढ्या निगरगट्ट कशा होऊ शकतात, याचा विचार व्हायला हवा. अन्यथा नवनवे प्रदेश दाखवणारा, नवे अनुभव गाठीशी बांधण्याची संधी देणारा अतिशय समृद्ध पर्यटन व्यवसाय रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही.
vijaya.jangle@expressindia.com