पाश्चात्त्यांच्या दृष्टीने मध्यपूर्व तर भारतीयांच्या दृष्टीने पश्चिम आशिया असलेल्या २४ आखाती देशांविषयीचा हा कोश अतिशय मनोरंजक आहे. यातून या प्रदेशांचा इतिहास, त्यांची गुंतागुंत, संघर्ष, धर्म, राजकारण आणि इतिहास यांची थोडक्यात पण मूलभूत माहिती जाणून घेता येते. पश्चिम आशिया जाणून घेण्यासाठी हे पुस्तक हा अनिवार्य असा पर्याय आहे.
काही काही पुस्तकांचा आधार वाटतो. त्यांच्यावर विसंबून राहता येतं. हे पुस्तक त्यातलं. पश्चिम आशियाच्या वाळवंटातलं काहीही विचारा त्याला. या पुस्तकात ते नाही, असं होणारच नाही. त्यामुळे ते केव्हाही हाताशी असावंच लागतं. इतकं काय काय चालू आहे तिकडच्या वाळवंटात. जेव्हा या पुस्तकाची माहिती मिळाली तेव्हाही खरंच वाटेना. कारण तब्बल १२५ डॉलर्स.. म्हणजे वट्ट ६,८७५ रुपये.. अशी दणदणीत किंमत आहे त्याची. ती जेव्हा कळली तेव्हा थोर वाटलं होतं. किमतीसाठी नाही. तर इतकी सणसणीत किंमत ठेवण्याचा आत्मविश्वास ज्या लेखकाला आणि प्रकाशकाला आहे.. आणि तरीही ते घेणारे वाचक आहेत..
पुस्तकाचं नाव ‘द कंटिनुअम पोलिटिकल एनसायक्लोपीडिया ऑफ द मिडल ईस्ट’. मध्य आशियाचा चालता-बोलता, अखंड असा इतिहास असं या भव्य पुस्तकाचं भारदस्त नाव आहे. (पाश्चात्त्यांच्या नजरेतनं या प्रदेशाकडं पाहिलं की हा परिसर मध्यपूर्व होतो. पण भारतासाठी तो पश्चिम आशिया असतो.) पृष्ठसंख्या आहे ९५० इतकी घसघशीत. ते इतकं जाडजूड आहे की एक तर टेबलावर ठेवून वाचावं लागतं किंवा आडवं झोपून छातीवर ठेवून. पण काही वेळानं छातीवर दडपण येण्याची शक्यता अधिक. पण लेखक अव्राहम सेला यांचं काम पाहून तसंही दडपणच येतं. अव्राहम हे स्वत: इतिहासकार आहेत. जेरुसलेम इथल्या विद्यापीठात ते शिकवतात. तिथे हॅरी ट्रमन यांच्या स्मरणार्थ एक अध्यासन काढण्यात आलं आहे. त्याचे ते प्रमुख आहेत. पश्चिम आशियासंदर्भातल्या वेगवेगळ्या विषयांवर ते लिहीत असतात. ‘द डिक्लाइन ऑफ द अरब इस्रायली कॉन्फ्लिक्ट’ आणि ‘द पॅलेस्टिनियन हमास’ अशी दोन पुस्तकं याआधीच त्यांच्या नावावर आहेत. ती वाचलेली नाहीत अद्याप. पण त्याच्या आधीच हा भलाथोरला ऐवज हाती लागला.
राज्यशास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक, पश्चिम आशियाचे अभ्यासक, पत्रकार अशा अनेकांनी तो संग्रही ठेवायलाच हवा, असा मामला आहे. एरवी घराघरांत तसे वेगवेगळ्या विषयांवरचे विश्वकोश दिसतात. ब्रिटानिका वगैरेंचे. पण बऱ्याचदा त्याचा उपयोग दिवाणखान्यातील नेपथ्यरचनेसाठी होत असतो. दिसतातही बरे ते. एकसारखे असे. पण त्यांचा तितकासा वापर होतो असं अनेकांच्या बाबत म्हणता येणार नाही. या पुस्तकांचं तसं नाही. त्याचा वापर होईल अशाच प्रकारे लेखकानं त्याची रचना केलेली आहे. मलपृष्ठावर आखातातल्या २४ देशांची उडती, पण महत्त्वाची अशी माहिती. म्हणजे राजधानी, लोकसंख्या, अर्थव्यवस्थेचा आकार, भौगोलिक आकार अशी अगदी मूलभूत माहिती, सहजपणे कळेल अशा पद्धतीनं दिलेली. ती वाचल्यावर या प्रदेशाविषयी साधारण अशी पाश्र्वभूमी तयार व्हायला मदत होते. अल्जिरिया ते टय़ुनिशिया अशा टप्प्यांतल्या २४ देशांसंबंधी मनोरंजक माहितीचा खजिना तिथपासून हाती लागायला लागतो.
अशा प्रकारच्या अन्य कोशांत कोणत्याही विषयासंबंधीची माहिती अगदी जुजबी असते. म्हणजे नुसती दखल घेण्यापुरती. इथे तसं नाही. अत्यंत ऐसपैस अशा स्वरूपात व्यक्तींचा, घटनांचा तपशील यात दिलाय. म्हणजे समजा, अब्बास मेहमूद यांच्याविषयी काही माहिती हवी आहे आपल्याला तर ती अगदी रंगीतसंगीत पद्धतीनं देण्यात आली आहे. म्हणजे नुसता जन्म, पदवी, गाव, पदनाम.. इतकाच कामापुरता तपशील नाही. अब्बास तरुणपणी कुठे होते, पॅलेस्टिनी चळवळीकडे कसे आकृष्ट झाले, अरब इस्रायली संघर्षांत त्यांची भूमिका नक्की काय होती.. असा संपूर्ण ऐवज इथे हाताशी लागतो. पुस्तकांची मांडणी आकारविल्हे आहे. महत्त्वाचा भाग असा की व्यक्ती, देश, संस्था असा काही भेद तीत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर देशही असू शकतो. त्यामुळे इंतिफदा नंतर इराण येऊ शकतो, पाठोपाठ इराक असतो आणि लगेच इस्माइली हेदेखील भेटतात. प्रत्येकाची अत्यंत सविस्तर अशी नोंद. किती? तर इस्रायल आणि अरब संघर्षांवर यात तब्बल ७० पानं खर्ची करण्यात आली आहेत. या ७० पानांत ज्यांची भूक भागणार नाही, त्यांनी आणखी काय वाचायला हवं, त्याचंही मार्गदर्शन हा कोश करतो. या प्रदेशाच्या इतिहासात अनेकअंगी गुंतागुंत आहे. धर्माच्या शाखा, पोटशाखा आहेत. ते सगळं यातून समजून घेता येतं.
आणि या वाळवंटाचा इतिहास अनेकांगांनी समजून घ्यावा असा आहेदेखील. एकेका देशाचे, धर्माचे किती कंगोरे आहेत. उदाहरणार्थ आपल्याला इराण क्रांती म्हणजे फक्त अयोतोल्ला रूहल्ला खोमेनी हेच माहीत असतात. पण इराणातल्या इस्लामी क्रांतीत आणखी एका अयातोल्लांची महत्त्वाची भूमिका होती. ग्रॅण्ड अयातोल्ला हुसेन अली म्हणून होते. त्यांच्याविषयी अत्यंत रंजक असा तपशील यात आहे. वाळवंटातल्या इस्लामबहुल देशांत ख्रिस्ती बांधवही मोठय़ा प्रमाणावर होते. म्हणजे त्यांची गिरिजाघरंदेखील असणार. त्यात पुन्हा सीरियन ख्रिश्चन्स असा एक प्रकार. मोनोफसाइट्स म्हणजे काय हे तर आपल्याला माहीतच नसतं. ते कुठे असतात, काय करतात, त्यांची धार्मिक विचारधारा काय.. हे माहिती करून घेणं आनंददायक होऊन जातं या पुस्तकात. एरवी कधी आयुष्यात कमरान बेटांशी आपला संबंध आलेला नसतो. पण तांबडय़ा समुद्रातली ही बेटं आपल्याला इथं भेटतात. येमेनच्या जवळच्या या बेटांची लोकसंख्या फक्त दोन हजार इतकी आहे. पूर्वेकडून मक्का-मदिनेला जाणाऱ्या भाविकांना इथं मुक्काम करायला लागायचा. एक प्रकारचं शुद्धीकरणच ते. एखाद्या देशाविषयी लिहिताना त्या देशाचा इतिहास, राजकीय भूमिका कसकशा बदलत गेल्या, कोणाच्या राजवटीत काय परिस्थिती होती.. असा सगळा तपशील हा कोश देतो. त्यामुळे तो वाचणं हा निखळ आनंद होऊन जातो.
तेलाच्या तीन तीन पुस्तकांच्या निमित्तानं पश्चिम आशियाचं वाळवंट माझ्यापुरतं नादावणारं ठरलेलं आहे. हे जग ही रंगभूमी असेल तर त्या रंगभूमीचं केंद्रस्थान हे पश्चिम आशियाचं वाळवंट आहे, यात जराही शंका नाही. अत्यंत सामथ्र्यवान अशी ऑटोमान राजवट ते आता दहशतवाद वगैरेनं झालेली दशा एवढा मोठा टप्पा या भूमीनं पाहिलाय. जग समृद्ध झालं ते या प्रदेशातल्या भूभागाखाली सापडणाऱ्या काळ्या सोन्यामुळं. पण जिथे हे काळं सोनं आढळलं तो प्रदेश मात्र अजूनही काळाकुट्टच आहे. एके काळी मानवी संस्कृतीच्या समृद्ध पाऊलखुणा या प्रदेशात उमटत होत्या. आता त्याचा कसला मागमूसही नाही. आणि आपण पाश्चात्त्यांच्या नजरेतूनच जगाकडे बघत असल्यामुळे त्यांनी या प्रदेशाला दहशतवाद्यांचा इलाखा ठरवून टाकलं, आपणही त्यावर विश्वास ठेवला.
तेव्हा हा प्रदेश आहे तरी कसा, हे समजून घ्यायचं असेल, त्याबाबतची खात्रीलायक माहिती हवी असेल तर या कोशाला पर्यायच नाही. सध्या सीरियातल्या प्रश्नाच्या निमित्तानं हा प्रदेश पुन्हा एकदा बातम्यांत आहे. सीरियातल्या असाद यांनी धुमाकूळ घातलाय. पलीकडचा इराण आणि त्याचे प्रमुख अहमेदीनेजाद हे चर्चेत आहेत. या सगळ्यांचा आवाज बंद करण्याची भाषा इस्रायल करतोय.
अशा वेळी हा प्रदेश आहे तरी कसा हे माहीत असायला हवं. त्यासाठी खरं तर तिकडे जायलाच हवं. पण ते शक्य नाही होणार सर्वानाच. तेव्हा प्रत्यक्ष भेटीला पर्याय हवा असेल तर तो हा आहे. पश्चिम आशियाच्या वाळवंटात नियतीनं, मग तिथल्या मंडळींनी मारलेल्या रेषा हेलावून टाकतात हे नक्की.
(ता. क. – पुस्तकाची किंमत वाचून अनेकांना तो आपल्याला झेपणारच नाही वगैरे वाटेल. बरोबरच आहे ते. मी हा कोश कुठे मिळेल मुंबईत वा दिल्लीत त्याच्या शोधात होतो. मध्येच कधी तरी मुंबईच्या सुंदराबाई सभागृहात एका पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो. तेव्हा हा कोश डोक्यातही नव्हता. पण तिथल्याच एका टेबलावर तो आढळला. वजन कसं कमी करावं, विचार सकारात्मक कसे ठेवावेत, शाकाहारी आहाराचं महत्त्व वगैरे मौलिक विषयांवरच्या पुस्तकांत हा एकटाच निरुपयोगी असल्यासारखा कोपऱ्यात पडलेला होता. प्रदर्शनाचा आठवा दिवस होता तो. शेवटचा. पण या आठ दिवसांत त्याच्याकडे कोणी पाहिलंही नव्हतं. दिसल्यावर झडपच घातली त्याच्यावर. अवघा हजार रुपयांत मिळाला.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा