मुंबई-गोवा महामार्गावर नुकताच एक अपघात होऊन एकाच कुटुंबातील सर्व माणसे ठार झाली, ही धक्कादायकच बाब आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. असे अपघात झाले की माध्यमांपासून वृत्तवाहिन्यांपर्यंत सर्वत्र एकच चर्चा सुरू होते. महामार्ग चौपदरी कधी होणार?
पण या महामार्गावरून जे प्रवास करतात ते हे पाहू शकतात की या मार्गावरील रहदारी ही गणपती उत्सव किंवा होळी या कोंकणी माणसाच्या खास सणांच्या वेळी जशी असते तशी वर्षभर नसते आणि जी काही थोडीबहुत असते ती महाड – फार फार तर चिपळूणपर्यंतच असते. पुढे संपूर्ण रस्ता मुंबई-पुणे किंवा मुंबई-नाशिक मार्गाच्या तुलनेने मोकळाच असतो आणि म्हणावी तेवढी रहदारी नसते. हेच कारण असावे चालकांच्या गाडय़ा सुसाट सुटण्याला आणि नंतर होणाऱ्या अपघातांना. आणखी एक गोष्ट म्हणजे खासगी बसेसचे किंवा गाडय़ांचे अपघात होण्याचे प्रमाणच जास्त आहे, त्यामानाने एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण खूपच कमी आहे (त्यासाठी एसटीचालकांना कुर्निसात).
अरुंद रस्ता हा एकच मापदंड लावून रस्ता रुंद करायचा तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर का अपघात होतात? तो तर चांगला सहापदरी आणि व्यवस्थित लेन आखलेला आहे.
बेदरकार वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यावर उपाय कुणालाच सुचत नाही. या वाहनचालकांचा बेदरकारपणा तर आपण जिथे राहतो तिथेही अनुभवतच असतो. गाडी चालवताना काही शिस्त न पाळता बेफामपणे गाडय़ा चालवता याव्यात यासाठी निसर्गाची तोडफोड करून हा रस्ता रुंद केला तर उत्तराखंडच्या अनुभवातून आपण काहीच शिकलो नाही असेच म्हणावे लागेल.
अनिल करंबेळकर, बदलापूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा