आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत होणाऱ्या बदलांचे तपशीलवार पृथ:करण हा, जेफ्री केंप यांच्या ‘द ईस्ट मूव्ह्ज वेस्ट – इंडिया, चायना अँड आशियाज् ग्रोइंग प्रेझेन्स इन् द मिडल ईस्ट’ या पुस्तकाचा गाभा आहे. भारत आणि चीन या देशांचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील उदय आणि मध्य आशियाई देशांशी असलेल्या त्यांच्या संबंधांमध्ये झालेले बदल यांचे सर्व अंगांनी वेध घेणारे विस्तृत विवेचन लेखक या पुस्तकाद्वारे करतातच, पण त्याबरोबरच जपान, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान या देशांचे या संबंधांवर होणारे परिणामही केंप यांनी अधोरेखित केले आहेत. अमेरिका हा अर्थातच, पृथ:करणाच्या केंद्रस्थानी असलेला घटक आहे. २००८ साली आलेल्या जागतिक मंदीच्या संकटानंतर झालेले बदल लक्षात घेता, अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय क्षितिजावर अस्त होत असून आशियाई सत्तांचा (भारत आणि चीन) आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उदय होत आहे.
या दोनही देशांच्या अर्थव्यवस्थेत होणाऱ्या वाढीचा वेग लक्षात घेता, त्यांची ऊर्जा आणि अन्य साधनांची मागणी सातत्याने वाढणार हे तर ओघाने आलेच. आणि मध्य आशियाई राष्ट्रांशी असलेले या दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे. भारत आणि चीन ही दोन्ही राष्ट्रे ऊर्जा आणि इंधनासाठी अन्य पर्यायांच्या शोधात आहेत, मात्र मध्य आशियाई देशांकडे असलेल्या इंधनाच्या साठय़ांचे आकारमान प्रचंड असल्याने यास पर्याय नाही, असे केंप आपल्याला ठासून सांगतात. स्वाभाविकच, मध्य आशियाई राष्ट्रे चीन आणि भारताच्या आर्थिक समीकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका वठवणार यात शंका नाही, असा केंप यांचा दावा आहे.
आशियाई आणि मध्य आशियाई देश यांच्यातील संबंध आणि त्याचे परस्परांशी असलेले सामरिक नाते यांच्याशी संबंधित बाबींचाही ऊहापोह केला आहे.
या भागात सध्या प्रगतीपथावर असलेल्या अनेक प्रकल्पांचा विस्तृत तपशील दिला आहे. विस्तृत आणि तपशीलवार माहिती ही पुस्तकाची खरी ताकद आहे. उदाहरणच द्यायचे तर, सातव्या प्रकरणात संबंधित देशांचा संरक्षणविषयक तपशील सविस्तर दिला आहे. भारत आणि चीन या देशांमधील संरक्षण आणि ऊर्जाविषयक समीकरणांची वीण समजावून सांगताना लेखकाचे कौशल्य जाणवते. याच दोन देशांमधील संबंधांची गुंतागुंत समजावून सांगण्याचे आव्हानही केंप यांनी लीलया पेलले आहे. मध्य आशियाई भागातील देशांचे भारत-चीन-जपान-दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान आदी देशांच्या सापेक्ष असलेले द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय संबंध समजावून घेणे आणि या संबंधांचे विविध पदर उलगडून सांगणे हे निश्चितच आव्हानदायी आहे. मात्र तपशीलवार माहिती संकलन आणि त्या माहितीचे सविस्तर पृथ:करण असलेले हे पुस्तक विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासाठी निश्चित उपयुक्त आहेच, पण जिज्ञासूंसाठीही वाचनीय आहे.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सध्या होणाऱ्या या बदलांबाबत मध्य आशियाई राष्ट्रे अनुकूल असून त्या दृष्टीने या देशांचा आशिया खंडातील महासत्तांशी उत्तम संवाद सुरू असतो, असा दावा केंप यांनी केला आहे. अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे सत्ताकेंद्र अन्य कोणत्याही राष्ट्राकडे सरकणे ही मध्य आशियाई देशांच्या दृष्टीने फारशी अडचणीची बाब नाही, असे केंप म्हणतात. उलट एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे आशियाई महासत्ता अशा दोघांशी व्यापार होत असल्यामुळे या देशांना कोणा एकावर अवलंबून राहावे लागणारे नाही.
 मात्र असे असले तरीही हा समतोल फार काळ टिकेल असे नाही असे केंप निग्रहाने सांगतात. पुस्तकाच्या शेवटाकडे लेखक म्हणतात की, ‘(भारत आणि चीन) या देशांची विद्यमान भूमिका किती काळ टिकू शकेल याबद्दल साशंकताच आहे.  कारण एकीकडे अमेरिका महासत्ता पदाच्या ओझ्याखाली दबली जात असतानाच ही दोन राष्ट्रे आपले आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी तसेच सामरिक हेतू सांभाळण्यासाठी आखाती देशांच्या राजकारणात सक्रिय झाली आहेत.’
मध्य आशियाई राष्ट्रे आणि आशिया खंडातील महासत्ता यांच्यासमोरील विद्यमान समस्या आणि आपापसातील वाद (काश्मीर समस्या, भारत-चीन सीमावाद, इस्राइल-अरब संघर्ष) यांचा ऊहापोह करत केंप यांनी वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. केंप यांच्या मते हे वाद परस्परांशी असलेल्या संबंधांमध्ये कटुता निर्माण करू शकतात. इस्राइलशी असलेल्या संबंधांवरून भारत आणि चीन या देशांमध्ये होणारी वाढती चर्चा हीसुद्धा अशाच कटुता निर्माण करू शकणाऱ्या विषयांपैकी एक आहे. ही बाब अन्य आखाती राष्ट्रांना फारशी रुचणारी नसल्याने याचा आखाती राष्ट्रांशी असलेल्या संबंधांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. सामरिक हेतू आणि आर्थिक हितसंबंध परस्परव्यापी असल्याने दोन्ही बाजूंपैकी कोणताही एक देश या प्रदीर्घकालीन संघर्षांमध्ये ओढला जाण्याची दाट शक्यता आहे.
या पुस्तकाच्या शेवटच्या भागात भविष्यवेध घेण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये होणारे संभाव्य बदल लक्षात घेत, आगामी काळात आखाती / मध्य आशियाई राष्ट्रांमधील परिस्थिती नेमकी कशी असेल याच्या काही शक्यता मांडल्या आहेत. विद्यमान जागतिक परिस्थितीच्या विस्तृत विश्लेषणाद्वारे घेण्यात आलेला भविष्यवेध हा या पुस्तकातील सर्वात उत्तम विभाग ठरतो.
आज जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवर जे साहित्य उपलब्ध आहे त्यात हे पुस्तक अतुलनीय माहिती आणि सविस्तर पृथ:करण यांच्याद्वारे मोलाची भर घालते असेच म्हटले पाहिजे. एक अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीचा विषय उलगडण्यात केंप नक्कीच यशस्वी झाले आहेत. बदलती परिस्थिती आणि त्यासाठी कारणीभूत असणारे घटक यांचा चांगला विचार केला गेला आहे. (भारत-चीन यांसारखी) विकसनशील राष्ट्रे आणि आखाती देश यांच्यातील संबंध हा केवळ उभयपक्षी मामला राहत नाही, हे केंप यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे संबंध केवळ ऊर्जा-इंधने आणि स्रोत यांच्यावरच अवलंबून आहेत असेही नाही. या संबंधांमध्ये समाविष्ट झालेले दोन्ही पक्ष परस्परांवर अवलंबून आहेत आणि या संबंधांवर अमेरिका आणि (पाकिस्तान-दक्षिण कोरिया आदी) अन्य घटकांचा पडणारा प्रभाव हा अद्वितीय म्हणावा असाच आहे, असे केंप आग्रहाने नोंदवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा