भारतीय संगीत ऐकणं आणि त्याबद्दल लिहिलेलं वाचणं हे दोन्ही आज महत्त्वाचं आहे, अशा विश्वासानिशी सुरू होणारं हे नवं पाक्षिक सदर..
स्त्रियांना नाटकांमध्ये भूमिकाच काय, पण ते पाहायलाही बंदी असण्याच्या काळात आपल्या सर्जनशीलतेने साऱ्या महाराष्ट्राला डोलायला लावणाऱ्या बाई सुंदराबाई यांची नोंद इतिहासाने ज्या आत्मीयतेने घ्यायला हवी होती, तशी घेतली नाही. संगीताच्या प्रांतात स्त्रीला दुय्यम वागणूक देणाऱ्या त्या काळातील संस्कृतीमध्येही बाई सुंदराबाई यांच्यासारख्या कलावंतांनी सामाजिक रूढींविरुद्ध दिलेला लढा असामान्य म्हणता येईल एवढा मोठा होता यात शंका नाही. ‘एकच प्याला’ हे संगीत नाटक १९१८ मध्ये रंगभूमीवर आले आणि त्यातील नाटय़पदे रसिकांच्या कानामनांत रुंजी घालू लागली. १८८५ मध्ये जाधवांच्या कुटुंबात जन्मलेल्या सुंदराबाई या कलावतीने गझल, लावणी यांसारख्या गायनप्रकारात कमालीचे नैपुण्य मिळवले होते. ‘एकच प्याला’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर त्यातील पदांना चाली लावण्यासाठी या सुंदराबाईंना पाचारण करण्यात आले आणि त्यांनी मिळालेल्या या संधीचे अक्षरश: सोने केले.
सुंदराबाई जाधव यांच्यामध्ये हे सारे धैर्य एकवटले असणार, याचे कारण त्याआधी गौहरजान (१८७३-१९३०), जोहराबाई आग्रेवाली (१८६८-१९१३) यांच्यासारख्या कलावतींनी भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आपले नाव कलागुणांनी मंडित केले होते. त्याकाळी सार्वजनिक पातळीवर गायनाचे कार्यक्रम फार मोठय़ा प्रमाणात होत नसले तरी खासगी कार्यक्रमांमध्येही स्त्री-गायकांना कला सादर करण्याची मुभा नव्हतीच. गायला जवळजवळ बंदी असतानाच्या सामाजिक स्थितीतही स्त्रियांनी आपल्या गात्या गळ्याला न थांबवण्याचा घेतलेला निर्णय किती अडचणीचा होता, याची आजच्या मोकळ्या वातावरणात कल्पनाही करता येणार नाही. निसर्गत: बाईचा गळा गायनाला अतिशय अनुकूल असतो. तरीही पुरुषप्रधानतेने गांजलेल्या अवस्थेत तिला तसे करण्यापासून परावृत्त करणारी संस्कृती भारतात प्रचलित होती. पुरुषांच्या वर्चस्वाने गांजलेल्या समाजातील स्त्रियांना किमान सुखाने जगण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्यासाठी स्त्रियांनी सामाजिक स्तरावर बंड करण्याची आवश्यकता होती. परंतु त्यासाठी आवश्यक असणारे मानसिक बळ त्यांच्या ठायी गोळा होत नव्हते. काही तुरळक घटना वगळता प्रवाहाविरुद्ध लढण्याची ऊर्मी त्यांच्यामध्ये अभावानेच दिसत होती. सामाजिक क्षेत्रातील ही लढाई स्त्रियांनी मोठय़ा खुबीने कलेच्या क्षेत्रात सुरू केली आणि त्याला अपेक्षेपेक्षा जरा अधिकच यश मिळाले, असे आता मागे वळून पाहताना लक्षात येते. सुधारणांचा हा प्रयोग कलाप्रांतातून जगण्याच्या अन्य क्षेत्रांत सहजपणे पोहोचला. ज्या संस्कृतीत स्वर्ग आणि नरक अशा संकल्पनांचा ‘प्रादुर्भाव’ होता, तेथे महिलांना स्वर्गातही गायनाचे काम दिले नव्हते. त्यांनी अप्सरा बनून देवांसमोर नृत्य करणे अपेक्षित होते. ‘गंधर्व’ अशी उपाधी लावून घेतलेल्या पुरुषांकडे मात्र गायनाचे काम सोपवण्यात आले होते. निसर्गत: पुरुषाचा आवाज पौगंडावस्थेत येताना फुटतो आणि तो गायनानुकूल करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. नृत्य करणाऱ्या अप्सरांच्या कमनीयतेवर भर देणाऱ्या त्या संस्कृतीत भरडल्या जाणाऱ्या स्त्रियांना जगणे नकोसे झाले होते. पतीच्या निधनानंतर केशवपन करून तिला विद्रूप करणाऱ्या समाजाचा तिने कोणत्याही परिस्थितीत सामाजिक क्षेत्रात प्रवेश करायला विरोध होता. त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अवतीर्ण झालेल्या संगीत नाटक या कलाप्रकारातही तिला भाग घेणे शक्य नव्हते. अण्णासाहेब किलरेस्करांनी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाच्या निमित्ताने १८८० मध्ये रंगमंचावर सादर केलेल्या या नव्या कलाप्रकाराने अल्पावधीतच लोकमान्यता मिळवली. परंतु तिचा आस्वाद घेण्याएवढेही स्वातंत्र्य महिलांना मिळाले नव्हते. संगीत नाटकांना केशवपन केलेल्या आलवणातल्या महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे हीसुद्धा त्याकाळी एक मोठीच क्रांती होती. ‘शाकुंतल’मध्येही एकटय़ा दुष्यंताला शेकडय़ावर पदे; पण शकुंतलेला त्यामानाने बेताचीच. हे स्वाभाविक होते- कारण शकुंतलेची भूमिका करणारा पुरुष गायक नट मिळणं, हीच मोठी अडचण असणार.
नाटकात स्त्रीला बंदी होती, तरीही भास्करबुवा बखले यांच्या सांगण्यावरून ‘एकच प्याला’साठी सुंदराबाईंना त्यातल्या पदांना चाली देण्यासाठी बोलावण्यात आले. याचाच अर्थ तोवर त्यांची गायनकीर्ती सर्वदूर पसरली होती. आपल्या खास ठेवणीतील ज्या सुंदर चाली त्यांनी या नाटकातील पदांना दिल्या, त्या कोणत्यातरी मूळ संगीतरचनांवर आधारितच होत्या. प्रसंगानुकूल आणि रसपरिपोष करणाऱ्या त्या चाली रसिकांना अतिशय आवडणे स्वाभाविक होते. शब्दसंगीताच्या प्रांतात शब्द आणि स्वरांचा संकर घडवून आणताना कोणताच पक्ष एकमेकांवर ‘हावी’ होणार नाही, याची काळजी घेतली नाही तर त्या शब्दांना स्वरार्थ प्राप्त होऊ शकत नाही, याचे भान बाई सुंदराबाई यांना होते. ‘कत्ल मुझे कर डाला’च्या चालीवर ‘सत्य वदे वचनाला नाथा’ हे गीत किंवा ‘दिल बेकरार तूने’च्या चालीवर ‘कशी या त्यजू पदाला’ हे नाटय़गीत आधारीत असूनही त्यातील मराठीपण शोधून काढण्याचे कसब सुंदराबाईंकडे निश्चितच होते. नाहीतर केवळ शब्द मराठी आहेत म्हणूून संगीत मराठी होते, असे घडते ना! संगीतरत्न ए. पी. नारायणगावकर यांच्याशी गप्पांच्या ओघात नटसम्राट बालगंधर्व एकदा त्यांच्याबद्दल म्हणाले की, बाईंचे डोळे बोलके आणि मिश्किल होते. लावणीतील दर्दभरी कहाणी डोळ्यांनी आणि सुरांनी त्या उकलून दाखवीत. लय अशी संथ, की जणू ख्यालाची लय. ‘दर्द’ या शब्दाचा उच्चार त्या अशा हळुवारपणे करीत, की जणू हृदयातील खोल जखम त्यांच्याच जिव्हारी गेली आहे. नारायणगावकर यांनी लिहून ठेवले आहे की, एक सोज्वळ, साधी, पाचवारी एकरंगी पातळ नेसलेली, चारचौघांसारखी वाटणारी मूर्ती असणाऱ्या सुंदराबाईंच्या बोलण्यात, वावरण्यात विलक्षण मार्दव होते. १९१७ ते ३५ या काळात लावणीप्रमाणेच होरी, कजरी, भजन, कव्वाली अशा सर्व प्रकारचे गाणे ढंगदारपणे आणि समर्थपणे गाण्यात त्यांच्याइतकी दुसरी कुणीही गायिका चमकली नाही, असे वयोवृद्ध जाणकार सांगत असत. खुद्द हैदराबादच्या निजामसाहेबांनी भर जलशात ‘मराठी होनेपर भी क्या साफ उर्दू जबान दिमाख से बोल रही है!’ असे उद्गार काढून बाई सुंदराबाईंचा गौरव केला होता.
ज्या पुण्याने १८४८ मध्ये महात्मा फुले यांच्या भिडे वाडय़ातील मुलींच्या शाळेला कडाडून विरोध केला आणि त्या विरोधाला न जुमानता एका महत्त्वाकांक्षी सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ फुल्यांनी रोवली, त्याच पुण्यात सुंदराबाईंचा जन्म व्हावा, हा खचितच योगायोग नव्हे. त्या काळात बाई सुंदराबाई ‘पुणेकरीण’ या नावानेही ओळखल्या जात. शोधक आणि सूक्ष्म अभ्यास करण्याची कुशाग्र बुद्धी लाभलेल्या सुंदराबाईंनी प्रभातच्या ‘माणूस’ चित्रपटात प्रेमळ आईची भूमिका वठवून रसिकांची वाहवा मिळवली होती. संगीत नाटकाच्या प्रारंभानंतर पाऊणशे वर्षांनी त्यामध्ये एखाद्या स्त्री-कलावंताला पदांना संगीत देण्याचे पडद्यामागील का होईना, पण अतिशय महत्त्वाचे काम मिळाले, हाही एका अर्थाने मोठाच उशीर म्हणायचा. त्यानंतर अगदी दहाच वर्षांनी गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्करांनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय पातळीवरील संगीत परिषदेमध्ये हिराबाई बडोदेकर यांचा शालीन, अभिजात स्वर पहिल्यांदाच उमटला. भर मैफलीत एखाद्या स्त्रीने आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ही घटना केवळ सांगीतिक नव्हती; त्याला सामाजिक बदलाची महत्त्वाची किनार होती. गात्या गळ्याची निसर्गदत्त देणगी मिळालेल्या स्त्रियांचा तो अतिशय महत्त्वाचा हुंकार होता. रस्त्यावर येऊन आपल्या अधिकारांसाठी चळवळ करण्यापेक्षा या सांस्कृतिक घटनेने खरे तर केवढी तरी उलथापालथ घडून आली होती. चित्रपटांच्या आगमनानंतर त्यात स्त्रियांना मिळालेले स्थान हा त्याचा दृश्य परिणाम होता. पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात नंतर आलेल्या सगळ्या कलावतींनी भारतीय संगीत परंपरेतील या मैलांच्या दगडांना त्यासाठीच सलाम करायला हवा.
सीताकांत लाड यांनी सुंदराबाईंबद्दल लिहिले आहे की, ‘प्रत्यक्ष भास्करबुवा त्यांना ‘धाकटी बहीण’ म्हणत. बालगंधर्व ‘ताई’ म्हणत. त्या त्यांना ‘दादा’ म्हणत. मास्तर कृष्णरावांचा बाईंवर लोभ होता. हे भाग्य असामान्य गुणांशिवाय लाभणारे नव्हते. परंतु या भाग्याने त्या फुगल्या नाहीत. रेडियोच्या सुरुवातीपासून त्या खासगी ‘बाँबे प्रेसिडेन्सी रेडियो ट्रान्स्मिटिंग स्टेशन टूएफव्ही’समोर दीड-दोन तास गात. त्यात पैसे कितीसे मिळणार? पण हे काहीच नव्हे. आपली मोटार घेऊन त्या आपल्या मुंबईभरच्या मैत्रिणींकडे वारी करीत, त्यांच्या विनवण्या करीत, त्यांना समजावीत, की ‘बायांनो, आज तुम्हाला काही मिळणार नाही. यंत्रासमोर गावे लागेल. पण तुमचे गाणे, तुमचे नाव हजारो लोकांपर्यंत पोचेल. हा रेडियो वाढणार, पसरणार आहे.’ अशा स्वयंस्फूर्त कष्टांनी खरोखर त्यांनी रेडियोवरील संगीत कार्यक्रमांचा जणू पायाच घातला. रेडियोचे महत्त्व त्या काळात चिनॉय, सेठना, ढोलेकर, निमकर या मंडळींना जेवढे समजले, तेवढेच या अडाणी बाईलाही समजले होते. पण बाईंच्या म्हातारपणी वाढलेला, पसरलेला सरकारी ‘ऑल इंडिया रेडियो’ हे सर्व विसरला. तिच्यावर स्फुट लिहिणारे निवृत्त रेडियो अधिकारीही बाईंचे पूर्वश्रम व तिचे पूर्ववैभव विसरले. काळाच्या पुढे असणे म्हणजे काय, याचा हा एक अपूर्व नमुना म्हणायला हवा.
बाई सुंदराबाई यांच्या निमित्ताने ही मैलाची खूण स्त्रियांच्या हक्कांसाठी झालेल्या एका ‘मूक लढय़ा’ची साक्ष आहे. देशभरातून त्यांना गायनासाठी भरपूर निमंत्रणे मिळायची. यश, कीर्ती आणि पैसा त्यांच्या पायाशी लोळण घेत होता. पण सुंदराबाईंनी जमिनीवर आपले पाय घट्ट रोवले होते. मुंबईतील बोरीबंदरसमोरच्या एका मोठय़ा हवेलीचा एक पूर्ण मजला त्यांनी विकत घेतला होता. पदरी दोन मोटारी असणाऱ्या या कलावतीने त्या काळातील समाजात आपल्या कलेच्या आधारे मिळवलेली प्रतिष्ठा हा चर्चेचा विषय होता. पण त्याहीपलीकडे त्यात एका नव्या पर्वाचे बीज होते. बदलाच्या वाऱ्याची दिशा होती. आकाशवाणीवर सन्माननीय गायक कलाकार म्हणून काम करताना बाई सुंदराबाईंनी तंत्राच्या या नव्या अंगाचा फार कलात्मकतेने उपयोग करून घेतला. त्यापूर्वी ध्वनिमुद्रणाच्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून त्यांनी अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांना दिल्या. त्या लोकप्रियही झाल्या. मुंबईतील आपल्या सहकारी कलावतींच्या घरी जाऊन ध्वनिमुद्रण यंत्राचे महत्त्व सांगणाऱ्या बाईंना संगीताच्या भविष्याचीही अचूक जाणीव होती. गायन हे केवळ मनोरंजनाचेच साधन नाही, तर त्यातून त्यापलीकडच्या सामाजिक जगालाही साद घालता येते, याचे बाई सुंदराबाई हे एक मूर्तिमंत उदाहरण होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा