पैसा मिळवायचा कसा याचे मार्ग वेगवेगळे, तसे तो सांभाळावा कसा, अंगावर वागवावा कसा याचे प्रकारही निरनिराळे आणि बदलत गेलेले! पैसा म्हणजे नाण्यांचा खुर्दा आणि नोटांची बंडलं, ही कल्पनाच गेल्या काही वर्षांत बदलत गेली.. आधी धनादेश, मग क्रेडिट कार्ड, आता डिजिटल वॉलेट.. या बदलांना आपण सहजपणे सामोरे जाणारच, पण पैशाचं काय होणार?
अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत ‘पेरूचा पापा’ हे शब्द घराघरात सकाळी घुमत असत. घराबाहेर पडताना ज्या आवश्यक गोष्टी जवळ आहेत ना, याची खात्री करायची असते. त्यात पेन, रुमाल, चाव्या, पाकीट आणि पास (मुंबईत राहणाऱ्यांसाठी विशेषकरून) अशा गोष्टींचा समावेश आवश्यक असायचा. हा पेरूचा पापा म्हणजे, काही विसरलं म्हणून, फिरून परत न येण्याची हमी असे. आता त्यात बऱ्याच वस्तूंची भर पडली आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल आणि तेवढंच महत्त्वाचं म्हणजे आर्थिक व्यवहार करण्यासाठीचं कार्ड्स हे नवं साधन. या दोन वस्तू जवळ नसल्या की किती मोठी आफत ओढवते, त्याचा अनुभवही अनेक विसरभोळ्यांनी घेतला असेल. पैशांचे व्यवहार पैसे जवळ न बाळगता करता यायला लागल्यापासून माणसाचं जगणं बरंच सुकर झालं. जगातल्या एकूण आर्थिक व्यवहारांमध्ये या कार्ड्सच्या माध्यमातून होणारा एकूण व्यवहार ६.७ ट्रिलियन डॉलर्स एवढा असून येत्या वर्षभरात तो दुपटीने वाढण्याची खात्री बँकांना वाटते आहे. गेल्याच आठवडय़ात म्हणजे १३ नोव्हेंबरला अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील संगणकीय उद्योगांमध्ये अंकीय पाकीट (डिजिटल वॅलेट) या नव्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली. अगदी पंधरा-वीस वर्षांत डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सचे तंत्रज्ञान पुसून टाकून मोबाईलद्वारेच खरेदीचे व्यवहार करता येणाऱ्या या नव्या तंत्रज्ञानाने येत्या काही वर्षांत जगावर राज्य करायचं ठरवलं आहे. व्हिसा, मास्टर कार्ड्सच्या कंपन्यांनाही या नव्या तंत्रज्ञानाला सामोरं जावं लागणार असून ज्यांच्याकडे आत्ता कार्ड्स आहेत, त्यांना या नव्या तंत्रज्ञानाला शरण जाण्यावाचून पर्यायच राहणार नाही. एरवी कोणत्याही नव्या बदलाला विरोध करण्याच्या माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती गेल्या शतकभराच्या काळात गाडून टाकण्याची अचाट क्षमता तंत्रज्ञानानं दाखवली. ‘जुनं ते सोनं’ या म्हणीला हद्दपार व्हावं लागण्याइतका तंत्रज्ञानाचा झपाटा आपण सगळेजण अनुभवतो आहोत. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या चमत्कारानं अचंबित होता होता, ते आपल्या अंगवळणी पडतं आणि काहीच काळात आपण त्याचे गुलाम होतो, असा हा साक्षात्कार आहे!
पैशांच्या व्यवहाराचंही असंच झालं.. खिशात पैसे नसताना हॉटेलात जाणं म्हणजे नंतर भांडी धुण्याचंच काम करायला लागण्याची भीती असे. दुकानात जाऊन हवी ती वस्तू खरेदी करताना बिल होण्यापूर्वीच पाकिटात पुरेसे पैसे असल्याची गुपचूप खात्री करावी लागत असे. म्हणजे हवं तेव्हा हवं ते खरेदी करण्यासाठी बऱ्याच पूर्वअटी असत. त्यामुळे खरेदी ही एक आखीव पद्धतीने ठरवून केलेली कृती असे. कारण त्यासाठी आधी बँकेत जाऊन पैसे काढावे लागत असत. बँकेत खातं उघडण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंतच्या सगळ्या व्यवहारात बँकांमधील कर्मचाऱ्यांकडून होणारा कमालीचा उपद्रव हा जगण्याचा दैनंदिन भाग असतो. पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी भल्या मोठय़ा रांगेत उभं राहावं लागतं. त्यापूर्वी तिथल्याच एका स्लीपवर सगळा तपशील लिहावा लागतो म्हणजे त्यासाठी जवळ लेखणी असणं आवश्यक असतं. (बहुतेकजण तिथल्याच कुणाकडूनतरी पेन उसनं घेतात आणि बहुतेकवेळा ते परत देण्याचं विसरतात. पेन देणारा हुशार असेल, तर तो टोपण स्वत:कडे ठेवून घेतो, नाहीतर स्वत:च समाजकार्य म्हणून ती स्लीप भरूनही देतो.) स्लीपमध्ये काहीतरी भरायचं राहून गेलेलंच असतं. त्यामुळे खिडकीपाशी गेल्यानंतर आपल्याच खात्यातले पैसे मागताना आपल्यालाच ओशाळल्यागत व्हावं, इतक्या जोरात खिडकीमागचा माणूस आपल्यावर खेकसतो. हा अपमान गिळत आपण नोटा मोजण्याच्या भानगडीत न पडता बँकेबाहेर पडतो. आपल्यावर सतत कुणीतरी नजर ठेवून आहे आणि आपण आत्ताच काढलेल्या पाचशे रुपयांवर कुणाचा तरी डल्ला मारण्याचा विचार असावा, या भीतीने आपण पैसे ठेवलेल्या पाकिटाला सतत स्पर्श करत राहतो.
बँकेतून कर्ज घेण्याएवढा दुसरा अपमानास्पद प्रकार नाही, यावर भारतातल्या सगळ्या बँक ग्राहकांचं एकमत व्हायला हरकत नाही. कर्ज घेणारी व्यक्ती ते फेडूच शकणार नाही, असा पवित्रा घेऊन तो अधिकारी ज्या पद्धतीने उलटतपासणी घ्यायला सुरुवात करतो, ती पद्धत पाह्यल्यावर भीक नको, कुत्रा आवर, असं म्हणण्याची वेळ येते. पण ‘अडलेल्या हरी’ ला दुसरा पर्यायही नसतो. कर्ज घ्यायचं म्हणजे आपलं सगळं जीवन त्या बँकेकडे गहाण टाकल्यासारखं शे-दोनशे ठिकाणी पटापट सह्य़ा करायच्या. आपण काय कबूल करतो आहोत, याची जराही जाणीव नसताना कर्ज घेणाऱ्यांची भारतात मुळीच कमी नाही. अशिक्षितांना सावकार जसं बेकायदा लुबाडतात, तसंच बँका कायदेशीर लुबाडतात, एवढंच. हे सारं चित्र जगातल्या श्रीमंत देशांनी गेल्या काही वर्षांत एकदम पालटवून टाकलं. क्रेडिट कार्ड म्हणजे कर्जाची सोप्पी सोय. खिशात पैसे नसताना हवं ते खरेदी करण्यासाठीचं आणि ‘ऋण काढून सण साजरा’ करण्याचं साधन. वर्षांकाठी छत्तीस टक्क्यांपर्यंतच्या पठाणी व्याजानं त्याची परतफेड करता न आलेल्या भारतातीलच काय पण जगातील अनेक देशांमधील असंख्य मध्यमवर्गीयांवर भयानक वेळ आल्यानंतर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणं काही कमी नाहीत. अगदी अलीकडे अमेरिकेसारख्या श्रीमतं देशावर कोसळलेल्या आर्थिक आरिष्टाचं क्रेडिट कार्ड हेही एक कारण होतं. खिशात रोख रक्कम बाळगण्याची गरजच भासू नये, अशी ही व्यवस्था अतिशय लोकप्रिय झाली. तंत्रज्ञानानं त्यात वेळोवेळी भर घातली आणि इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगसारख्या सुविधा निर्माण झाल्या. विजेच्या बिलापासून ते रेल्वेच्या आणि विमानाच्या तिकिटापर्यंत बहुतेक व्यवहार प्रत्यक्षात नोटा न देता आणि रांगेत उभं न राहता संगणकीय व्यवहारांतून करता येऊ लागले. मोबाईलचं तंत्रज्ञान आपण जितकं विनासायास अंगिकारलं, तितक्याच सहजपणे आपण हे संगणकीय आर्थिक व्यवहाराचं तंत्र स्वीकारलं. जगण्यातला हा बदल लक्षात येण्याच्या आत तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला.
पैशाचं पाकीट एकवेळ जवळ नसलं तरी चालेल पण कार्ड मात्र असलं पाहिजे, इतकी त्याची अनिवार्यता आपण मान्य करतो, तेव्हा आपण सतत काहीतरी खरेदी करत राहिलं पाहिजे, अशी अर्थसंस्थांची गरज असते. एकेकाळी विमा कंपनीचे प्रतिनिधी विमा काढावा, म्हणून चिकटपणे गिऱ्हाईकाचा पाठलाग करीत. तसाच पाठलाग आता क्रेडिट कार्ड घ्यावं, यासाठी सुरू झाला. काहीही करून हे कार्ड घ्या, त्यावर खिशात पैसे नसतानाही भरपूर खरेदी करा आणि आयुष्यभर ते फेडत बसा, ही नवी बाजारपेठीय मक्तेदारीची संस्कृती अस्तित्वात आली. कार्डचा हप्ता न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी गुंडांकरवी मारहाण करून त्याच्या घरातल्या वस्तू पळवून लावण्याचेही प्रकार आपोआप सुरू झाले. या नव्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग झाला. ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ ही म्हण कालबाह्य होण्याचाच हा काळ. दरमहा बचत करून मग वस्तू खरेदी करण्यापेक्षा ती आधीच खरेदी करून तिचा उपभोग घ्या आणि सावकाशीने पैसे फेडा असल्या सहज भुरळ पाडणाऱ्या कल्पनेला बळी न पडणारा विरळाच.
पैशांचे व्यवहार रोखीने किंवा धनादेशाद्वारे करणाऱ्यांचे प्रमाण आजही जगात प्रचंड आहे. सध्या ८५ टक्के लोक याच व्यवस्थेचा वापर करत असले, तरी नव्या अंकीय पाकिटाच्या योजनेमुळे या ८५ टक्क्य़ांपैकी बरेच जण गळाला लागतील, असा कयास आहे. खिसा गरम असणं, म्हणजे बँकेतल्या खात्यात भरपूर पैसे असणं, असा नवा अर्थ आता वापरात येऊ लागला आहे. बँकेच्या वेळा सांभाळत पैसे काढण्याच्या रांगेत तिष्ठत उभं राहून पैसे घेण्यापेक्षा सरळ कार्डवर खर्च करण्यातली सोय आणि सुख अनुभवता अनुभवता आपण या नव्या मोहजालात इतक्या अलगदपणे येऊन पडलो आहोत की आता पैसे काढण्यासाठी होणारे कष्टही आठवण्याची इच्छाही होऊ नये. काळ बदलला आणि आपण आपल्या सवयीही बदलल्या. पूर्वी माणसं सोनंनाणं भिंतीत चिणून ठेवत असत. नंतर त्या पैशांनी मालमत्ता खरेदी करणं सुरू झालं. कालांतरानं पैसे बँकेत ठेवून त्यावरच्या व्याजावर उदरनिर्वाह सुरू झाला. तेव्हा ‘बँक बॅलन्स’ ला फार महत्त्व असे. आता बॅलन्स किती यापेक्षा कार्डे किती याकडे लक्ष असतं. नवनव्या सुविधांनी आपण आपले दैनंदिन व्यवहार सुकर करण्याच्या प्रयत्नात असतो. मोबाइल न वापरणारा जसा ‘मागासलेला’ म्हणून ओळखला जातो, तशीच आता अंकीय पाकीट नसणाऱ्याची गत होईल. पैशांची ऊब आता फक्त पाकिटातल्या रोख रकमेवर अवलंबून असणार नाही. कालांतराने ‘पेरूचा पापा’ मधला पाकिटासाठीचा ‘पा’ रद्दबातलही होईल. कॅमेऱ्यापासून ते सीडीप्लेअर आणि कॅलक्युलेटर ते इंटरनेट अशा सगळ्या व्यवहारांसाठी आत्ताच मोबाईल अपरिहार्य ठरायला लागला आहे. कालांतराने तोच मोबाईल आपले पैशाचे पाकीटही बनून जाईल. आपण या सगळ्याच बदलांना साहजिकपणे सामोरे जाणार, यात शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा