पडद्यामागचे राजकारण समजावून घेण्यासाठी भरपूर कच्चा माल हे पुस्तक पुरवतं. ‘रॉ’ ही भारतीय गुप्तचर यंत्रणा व त्यातले अधिकारी कच्च्या गुरूचे चेले नव्हते, हे सांगणं हा पुस्तकाचा हेतू..पण त्याच्या तपशिलांमधून,  फेब्रुवारी १९८४ मध्ये ब्रिटनने भारताला सुवर्णमंदिरावरील कारवाईसाठी मदत केली होती यासारखे बारकावे २००७ सालीच उघड झाले होते.. म्हणून हा परिचय!
राजकारण हा मराठीत तरी एक असा विषय आहे, की ज्यात सगळेच तज्ज्ञ असतात. तशात ते राजकीय बातमीदार असतील, तर विषयच संपला! राजकीय नेत्यांशी जवळीक आणि त्यांच्याकडून मिळणारे गॉसिपचे तुकडे एवढय़ा आधारावर त्यांची तज्ज्ञता फळते, फुलते. लिहिण्याची झोकदार शैली असली, की ही तज्ज्ञता पाजळताही येते. वाईट असे की, पुढे त्यांना स्वत:लाही वाटू लागते, की आपल्याला राजकारणाच्या गूढगर्भातलेही सारे काही कळते. ‘द कावबॉईज ऑफ रॉ’सारखी पुस्तके वाचली, की मग लक्षात येते, की राजकारण इतके सोपे नसते. एकपदरी नसते. त्याला अनेक पापुद्रे असतात.
 प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. भिन्न प्रतलांवरून ते चालत असते. ‘द कावबॉईज ऑफ रॉ’सारखी इंग्रजी पुस्तके हे भान देतात. अर्थात राजकारणाचे हे पदर उलगडून दाखविणे हा काही ‘कावबॉईज ऑफ रॉ’चा हेतू नाही. हा राजकारणावरचा सटीप प्रबंध नाही. रिसर्च अँड अॅनालिसिस िवग (आर अँड ए डब्ल्यू- रॉ) ही भारतीय गुप्तचर यंत्रणा. देशाबाहेरील हेरगिरीचे काम करणारी. पण हे रोचक आणि सुरम्य हेरकथांचे पुस्तकही नाही. ‘डाऊन मेमरी लेन’ हे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. तेव्हा हे सरळसोटच आठवणींचे पुस्तक आहे. बी. रमण हे रॉच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख होते. अशा व्यक्तीच्या आठवणी या नुसत्याच आठवणी राहात नसतात. तो इतिहासाचा भाग बनतो. या पुस्तकातून भारताच्या राजकीय प्रवाहाला वेगळी वळणे लावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटना-घडामोडींचा अज्ञात पट आपणांसमोर उलगडतो. पुस्तकाच्या मथळ्यातला ‘कावबॉईज’ हा शब्दही महत्त्वाचा आहे. काव म्हणजे रामेश्वर नाथ काव. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाहिलेली श्रद्धांजली असेही या पुस्तकाचे स्वरूप आहे.
 तसे काव यांचे नाव फारसे कुणाला माहीत असण्याची शक्यता नाही. कारणही नाही. पण हा गुप्तचरांच्या विश्वातला बापमाणूस होता. आज रॉ जी दिसते आहे, ती त्यांच्यामुळे. प्रारंभी देशांतर्गत आणि बाहेरील हेरगिरीचे काम इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या एकाच संस्थेकडे होते. पण ६२चे चीन युद्ध, ६५चे पाकिस्तान युद्ध आणि त्याच काळात ईशान्येकडील राज्यांतील बंडखोरांच्या कारवाया यामुळे देशाबाहेरील हेरगिरीसाठी स्वतंत्र संस्था असावी असा विचार सुरू झाला. रामनाथ काव हे तेव्हा आयबीच्या बाह्य़ हेरगिरी विभागाचे प्रमुख होते. इंदिरा गांधी यांनी त्यांना पाचारण केले. त्यांनी रॉची उभारणी केली. ते वर्ष होते १९६८. त्यानंतर अवघ्या तीनच वर्षांत भारताने पाकिस्तानची फाळणी केली. बांगलादेशची निर्मिती झाली. त्याला बांगलादेशातील जनतेइतकीच रॉ कारणीभूत ठरली. मुक्तिवाहिनीची स्थापना, बंडखोरांना प्रशिक्षण, शस्त्रपुरवठा, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानसिक युद्ध- सायवॉर अशा मार्गानी आपण पाकिस्तान फोडले. याचे मोठे श्रेय काव यांच्याकडे जाते. पण त्यांनी ते कधीच घेतले नाही. हा त्यांचा मोठेपणा. हा माणूस अखेपर्यंत इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासातला होता. अगदी आणीबाणीच्या काळातही संजय गांधीसुद्धा त्यांना आडवे जाऊ शकत नव्हते. ही त्यांची ताकद होती. रॉमध्ये असताना काव यांनी अनेक अधिकारी घडविले. अनेक कामगिऱ्या पार पाडल्या. या सगळ्याचे रमण हे साक्षीदार होते. कधी प्रत्यक्ष. त्यांच्या कहाण्यांतून भारताच्या एका वेगळ्याच, बातम्यांमधून फारशा न आलेल्या इतिहासाचे काही अंश आपणांस दिसतात.
 रॉची स्थापनेनंतरची पहिलीच यशस्वी कामगिरी म्हणून बांगलादेशचे नाव घेतले जाते. बांगलादेशमुक्तीचा तो लढा, त्यानंतर ईशान्येकडील राज्ये, तसेच पंजाबमधील दहशतवाद, श्रीलंकेतील तमिळ प्रश्न, इंदिरा आणि राजीव गांधी यांची हत्या, बोफोर्स, रामजन्मभूमी आंदोलन, बाबरीचे पतन, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट अशा विविध घटनांतील गूढ आणि गुप्त प्रवाह या पुस्तकातून समोर येतात. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चंद्रशेखर, राजीव गांधी, व्ही. पी. सिंह, नरसिंह राव या पंतप्रधानांची कार्यपद्धती, स्वभाव, त्यांच्या काळातील काही महत्त्वाच्या घटनांची पडद्यामागील कहाणी हाही या पुस्तकातील मोठा रोचक भाग आहे. मुंबई बॉम्बस्फोटांनंतर शरद पवार यांनी ज्या तडफेने तेथील परिस्थिती हाताळली त्यावरची, तसेच राव आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजेश पायलट यांच्याबाबतची रमण यांची अनुकूल निरीक्षणे पाहिली, की आपण अशा गोष्टींकडे किती झापडबंद पद्धतीने पाहात असतो ते जाणवते. हीच बाब आणीबाणीच्या कालखंडातील इंदिरा गांधी यांच्या प्रसिद्ध ‘परकी हात’ सिद्धान्ताची. संघिष्ठ आणि समाजवाद्यांच्या टिंगलीचा तो विषय होता. हे पुस्तक वाचताना त्या टिंगलीतील अडाणीपणा लख्खपणे समोर येतो. पंजाबमधील दहशतवादाचेही तसेच. त्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय कंगोरे होते. त्याचे इंदिरा गांधी आणि झैलसिंग यांनी िभद्रनवालेंचा भस्मासुर उभा केला, असे सुलभीकरण करणे विरोधी पक्षांच्या राजकारणास उपयुक्त ठरते. त्यात तथ्य आहेच. पण ते सर्वागीण विश्लेषण नसते. तो जागतिक सत्तास्पध्रेतला भीषण िहसक खेळ होता. केवळ पाकिस्तानच नव्हे, तर पाश्चात्त्य राष्ट्रांचेही त्यात हितसंबंध होते. पंजाब प्रश्नाचा संबंध काश्मीरइतकाच बांगलादेशाशीही होता. एकंदरच अमेरिकेचे डावपेच, भारताला सतत गुडघ्यावरच ठेवण्यासाठी सुरू असलेले पाश्चात्त्य देशांचे प्रयत्न याचा भारतातील दहशतवादाशी निकटचा संबंध होता आणि आहे. रमण यांनी हे सगळे येथे व्यवस्थित उलगडून दाखविले आहे.
 अमृतसरमधील सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईच्या वेळी ब्रिटनने भारताला मदत केली होती. दोन ब्रिटिश गुप्तचरांनी सुवर्णमंदिरात जाऊन पाहणी केली होती, असा ‘गौप्यस्फोट’ नुकताच ब्रिटनमधील एका खासदाराने केला. वस्तुत: त्यात नवे काहीही नाही. काव यांच्या विनंतीवरून ब्रिटिश एमआय-फाइव्हने तशी मदत केल्याची आपलीही माहिती असल्याचे रमण यांनी या पुस्तकात आधीच नमूद केले आहे. आता अशा गोष्टींना काही नेहमीच ठोस पुरावे देता येत नसतात. तेव्हा रमण यांच्यासारखी जबाबदार व्यक्ती जेव्हा ती नोंदविते तेव्हा त्यात किमान तथ्यांश असलाच पाहिजे असे मानून चालावे लागते. याच प्रकरणी रमण यांनी दिलेली माहिती अधिक उद्बोधक आहे. इंदिरा गांधी यांनी या कारवाईस उशीर केला. फेब्रुवारी १९८४ मध्ये ब्रिटिश गुप्तचरांची मदत घेण्यात आली होती. यावरून ही समस्या सुरुवातीलाच खुडून काढावी वा सुवर्णमंदिरातून अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी अन्य पर्याय शोधावेत असे भारत सरकारला वाटत नव्हते, ही बाब अधोरेखित होते, असा आरोप अलीकडेच भाजप नेते अरुण जेटली यांनी केला आहे. तो किती भंपक आहे हे या पुस्तकातून कळते. इंदिरा गांधी आणि रॉने ही कारवाई टाळता यावी यासाठी मनापासून प्रयत्न केले होते, याचे काही दाखलेच रमण यांनी दिले आहेत.
 एक प्रकारे ‘कावबॉईज ऑफ रॉ’ हा या गुप्तचर संस्थेचा अल्पेतिहास आहे. हेरकथांमध्ये रस असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अनिवार्य वाचनाचा भाग आहेच. पण राजकारणाच्या अभ्यासकांनी आणि ‘चर्चिलां’नीही ते वाचले पाहिजे. माध्यमांतून समोर येत असलेल्या घटना-घडामोडींच्या अंतरंगात खोलवर खूप काही घडत असते. त्या गोष्टी आपणांसमोर कधी येतीलच असे नाही. पण त्या कशा असतात याची किमान जाणीव तरी अशा पुस्तकांतून होत असते. आपली समज वाढण्यासाठी ते बरे असते.
द कावबॉइज ऑफ आर  अ‍ॅण्ड  ए डब्ल्यू :
डाऊन मेमरी लेन :  बी. रमण
लॅन्सर पब्लिशर्स, २००७,
पाने :  २९४, किंमत :  ७९५ रु.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा