आपलं जगणं सहवास विषयांनी भारलेलं असतं आणि विषयांच्या पूर्तीसाठीच जीवन आहे, या एकाच विचारानं प्रेरित होऊन आपण जगत असतो. सद्गुरूकडे आपण याच विषयांच्या पूर्तीसाठी म्हणून जातो. पण कोणत्याही का हेतूने जाईना, खरा सद्गुरू हा आपल्याला निर्विषय केल्याशिवाय राहात नाही. जो भोंदू आहे, स्वत:च विषयपूर्तीच्या उद्योगाला लागला आहे तो मात्र मला निर्विषय करू शकणार नाही. श्रीमहाराज सांगतात, ‘‘जे तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात’’ (प्रवचन, २१ एप्रिल). खरा सद्गुरू जो आहे तो माझ्या हिताच्या आड येणार नाही, अशाच माझ्या मागण्या पूर्ण करील. त्यांच्या पूर्तीसाठीचे व्यवहारातले प्रयत्नही मला करायला लावेल. हे करीत असतानाच माझ्या मनातील विषयांची आसक्ती कमी करण्याकडेच त्याचे लक्ष असेल. आपल्या कित्येक मागण्यांमधील फोलपणाही ते आतून पटवून देतील. त्यासाठी आपण आधी त्यांच्या पायी पडलं पाहिजे आणि त्यांच्या चरणांना घट्ट पकडून राहिलं पाहिजे. इथे पायी पडणं आणि चरण घट्ट पकडणं, म्हणजे त्यांच्या बोधानुरूप, त्यांनी दाखवलेल्या वाटेनं जात राहणं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणं. आपलं जगणं म्हणजे भ्रम आणि मोहाच्या झंझावातातलं जगणं असतं. त्यांच्या चरणांचा अर्थात त्यांच्या मार्गाचा पूर्ण स्वीकार करून जे होतं ते खरं सदाचरण असतं. सद् म्हणजे चांगले, आ म्हणजे संपूर्ण आणि चरण म्हणजे सद्गुरूंची पायवाट! मनात कोणत्याही हेतूने का होईना, आपण या मार्गाला लागलो की मुक्कामाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही वर्गात बसणारी असोत, इतकेच नव्हे तर विनातिकिटाची माणसेदेखील, गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात; त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली विनातिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य माणसेसुद्धा तरून जातात. कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते’’ (प्रवचन, २२ एप्रिल). तेव्हा कसाही का असेना, कशाही रीतीने का असेना, कोणत्याही कारणातून का असेना; सद्गुरूंचा संग झाला तर ते माझ्या अंतरंगात आपोआप पालट करण्याची प्रदीर्घ प्रक्रिया सुरू करतात आणि अखंड त्याच उद्योगाला लागतात. मी पापी आहे, दुराचारी आहे, अयोग्य आहे म्हणून मला नाकारत तर कधीच नाहीत. दवाखान्यात जशी रुग्णांचीच गर्दी असायची तशी भवरोग जडलेल्यांचीच गर्दी सद्गुरूंकडे असायची! शाश्वत अशा परमात्म्याला विसरून अशाश्वत असलेल्या ‘मी’च्या जोपासनेसाठी अहोरात्र प्रयत्न करीत राहणं याच्यापेक्षा कोणतंही पाप मोठं नाही. यापेक्षा दुसरा कोणताही मोठा दुराचार नाही. याइतकी अयोग्य गोष्ट दुसरी नाही. तेव्हा अशा दुराचारी, पापी आणि अयोग्य-अपात्र मला सद्गुरू जवळ करतात आणि पालट घडवू लागतात.

Story img Loader