नक्षलवाद, चार पिढय़ा, १९६० च्या दशकापासून आतापर्यंतचा कालखंड.. कोलकाता शहरापासून अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर घडत जाणारे कथानक अशी वैशिष्टय़े असलेली ‘द लोलँड’ ही झुम्पा लाहिरी यांची कादंबरी महत्त्वाकांक्षी आहे खरी. पण ती पिढय़ांबद्दल सांगत नाही की नक्षलवादाबद्दलही नाही. एका कुटुंबाच्या गोष्टीतून नात्यांबद्दलचे सत्यच लेखिका शोधू पाहाते..
‘द लोलँड’ ही झुम्पा लाहिरी यांची महत्त्वाकांक्षी कादंबरी आहे. नक्षलवाद, चार पिढय़ा, कोलकाता ते अमेरिकेतले पूर्व व पश्चिम किनारे, नायक-प्रतिनायकाचे द्वंद्व हा सारा पट महत्त्वाकांक्षी कादंबरीचाच आहे. शिवाय, कादंबरीतील पात्रांच्याही पलीकडे- या पात्रांबाबत घडणाऱ्या गोष्टीच्याही पलीकडे- वाचकाला कथनशैलीचे जे प्रयोग एरवी नेऊ पाहातात, तसे प्रयोग ‘द लोलँड’मध्येही असावेतच, यासाठी लाहिरी आग्रही असल्याचे दिसते. परंतु एवढे करूनही कादंबरी उच्चपातळीला जात नाही. मॅन बुकर पारितोषिकाच्या अंतिम फेरीतील अव्वल सहा पुस्तकांत निवड होऊनही या कादंबरीला तो मान (आणि लाहिरी यांना ‘बुकर’) न मिळणे हा दुर्लक्षिण्याजोगा योगायोग नाही. म्हणजे हे सारे बुकरकौतुक दुर्लक्षिण्याजोगे म्हणताही येईल, पण कुठे तरी ही कादंबरी लक्षणीय असूनही सरस ठरत नाही, याला योगायोग नाही म्हणता येणार. कादंबरीतील कथानकाच्या जरा पलीकडे पाहिले, तर त्या यशापयशाची कारणमीमांसा करता येईल.
कथानकापलीकडे जाण्याआधी ते संक्षेपाने पाहूच. पण असे करताना, लाहिरी यांनी जी लेखकीय तंत्रे वापरून कथानक मांडले, त्याचाही उल्लेख अप्रत्यक्षपणे करू. सुभाष आणि त्याचा धाकटा भाऊ उदयन मित्रा यांचे बालपण सांगताना लेखिकेने कोलकात्यातले टॉलीगंज कसे वसले याचा इतिहास आणि तिथला ‘टॉली क्लब’ ही वसाहतवादाची खूणच आजही असल्याचे वास्तव मांडून, पुढल्या राजकीय कृतींची भूमी तयार करण्याचे तंत्र वापरले आहे. दोघे भाऊ नायक, त्यामुळे त्यांना शालान्त परीक्षेत चांगलेच गुण मिळतात, पण उदयन हा घरात पाय न ठरणारा- अचपळ तर सुभाष शांत, अभ्यासू, उदयनच्या तुलनेत शामळूच. या सहजप्रवृत्तींचा झगडा आता किती टोकाला जाणार, याची चुणूक दोघे कॉलेजात असताना दिसते. नक्षलवाद हा आपला मार्ग नव्हे असे सुभाष ठरवून टाकतो, पदव्युत्तर शिक्षण घेऊ लागतो. उदयन मात्र त्याच वेळी चारू मजुमदार- कनू सन्याल यांच्या भाषणा-पुस्तकांकडे आकृष्ट होतो, शिक्षकी पेशा पत्करतो. सुभाष (नेमका कसा याचे तपशील लेखिकेने दिलेले नाहीत, तरी) अमेरिकेला जातो. तिथेच राहायचे असे तो ठरवणार, अशी अटकळ असतानाच उदयन स्वत:च्या लग्नाची बातमी देतो : गौरीच्या फोटोसकट. हा फोटो सुभाषला कसा वाटला, याच्या वर्णनातून लेखिका त्याला वाटणारे वृथा आकर्षण सूचित करते. दुसरी बातमी येते ती घरासमोरच उदयनला पोलिसांनी पकडून, मग गोळ्या घालून ठार मारल्याची. उदयनने एका पोलिसाच्या खुनाचा कट रचला आणि प्रत्यक्ष सुरा चालवला नाही तरी त्या पोलिसाच्या रक्ताने त्यानेही हात अक्षरश: माखवून घेतले हे त्यामागचे कारण, कादंबरीच्या शेवटल्या काही पानांत समजणार आहे. पोटुशी असलेल्या गौरीचे काय होणार, हा प्रश्न कथानकात महत्त्वाचा ठरतो आणि सुभाष घरी आल्यावर, तिच्या सुटकेचा मार्ग म्हणून आईवडिलांचा विरोध पत्करून, तिच्याशी लग्न करतो. ‘पाच महिन्यांची’ गौरी अमेरिकेत- ऱ्होड आयलंडला थडकते. आई होते, पण आपल्यात तिला रस नाही, हे सुभाषला त्यानंतरच्या काही दिवसांतच कळून चुकते आणि पोटच्या मुलीतही तिला आता रस नाही, हे वाचकाला काही प्रकरणांत कळते. बुद्धिमान गौरीला तत्त्वज्ञान विषयाचे शिक्षण पुढे चालू ठेवायचे आहे. त्यासाठी लहानगीला एकटी सोडायला ती तयार आहे. हा कौटुंबिक ताण, मुलीला- बेला हिला- घेऊन सुभाष कोलकात्यात सहा आठवडे राहून परत येतो, तेव्हा गौरी घर सोडून संपवते. ती कॅलिफोर्नियात प्राध्यापक होते; तर बेलाची शालेय शैक्षणिक प्रगती या दु:खापमानामुळे मंदावल्यामुळे तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे न्याच, असे तिची शाळा सुभाषला सांगते. मानसोपचारतज्ज्ञाच्या खोलीचे, आणि बेलाच्या मनाचेही दार सुभाषसाठी कायमचे बंद. ही बेला मग फार न शिकता कृषी पदविका घेते, लोकांचे मळे- बागा करून देण्याची कामे जिथे मिळतील तिथे करत, लग्नाविना फिरते, न घाबरता आणि काहीशी बिनधास्तही राहते आणि पस्तिशी उलटता उलटता, अमेरिकेतच मजूर म्हणून आलेल्या काही बांगलादेशींकडे पाहून ओळखीचे हसू लागते. सुभाषकडे वर्षांतून एकदाच येणारी बेला, कुठूनशी गरोदर होऊन राहायलाच येते. तेव्हा, तिचे वडील म्हणजे उदयन हे सत्य सुभाष तिला सांगतो आणि कोलकात्यात बेलाच्या आजीने ‘तुझे वडील’ म्हणत भिंतीवरल्या काकांच्या फोटोकडे बोटे का दाखवली, हे बेलाला कळते! थोडी विस्कटून, घर सोडून आठवडाभरात बेला सुभाषच्या पितृवात्सल्याला न्याय देते. बेलाच्या मुलीचे नाव मेघना, तिचेही दिसणे दक्षिण आशियाईच. बाप कोण हे तिला सांगणार नाहीच आणि मीही विसरणार, मी तिची आई हेच सत्य, असे बेलाने ठरवलेले असते. परंतु सुभाषचे एलिस नामक बेलाच्या एके काळच्या शिक्षिकेशी, आणि बेलाचे तिच्यासारख्याच पर्यावरण आणि शेतीप्रेमी तरुणाशी भावबंध जुळू लागले आहेत. तिकडे गौरीने विद्वत्क्षेत्रातील यशाला इतके महत्त्व दिले आहे की, शरीरसंबंध कुणाशी केले वा न केले, कधी कुणाचे आकर्षणही वाटले, याचे तिला फार महत्त्व नाही. घरांवरले हक्क सोडण्यासाठी सुभाष तिला इतक्या वर्षांत पहिल्यांदाच पत्र पाठवतो, तेव्हा त्याचा अर्थ घटस्फोट दे हाच असल्याचे जााणून गौरी सुभाषच्या घरी थडकते. फोनही न करता. गौरीला सुभाषऐवजी त्या घरी भेटते बेलाच- आणि मेघनाला ‘ही तुझी मावशी’ अशी गौरीची ओळख करून देणारी बेला, तू मला नको आहेस हे गौरीला निक्षून सांगते. यानंतर बेला कोलकात्यात परतते, तेव्हा कुठे तिचे रितेपण तिच्यावर कोसळते आणि आत्महत्या करणे काय वा कॅलिफोर्नियात परतणे काय, दोन्ही सारखेच, या मन:स्थितीप्रत ही नायिका येते.
‘नक्षलवाद ही फसणारच असलेली, तार्किक पायापासून फारकत घेणारी चळवळ’ हा सद्य भांडवली व्यवस्थेचे लाभार्थी असलेल्या कोटय़ानुकोटी भारतीयांनी कधीच काढलेला निष्कर्ष पुन्हा (जगासाठी?) कादंबरीच्या कथेतून लाहिरी यांनी मांडल्याने त्याची कादंबरीगत चर्चा सपक आहे. चार पिढय़ांपैकी पहिल्या पिढीत दोन, दुसऱ्या पिढीत तीन आणि पुढल्या पिढय़ांतील एकच पात्र (त्यात मेघना अ-पात्रच) असल्याने ही गोष्ट फारच सुटसुटीत आहे. तिच्यात गुंते नाहीतच. सुभाषचा रूममेट, त्याला काही वेळा देह देणारी आणि पुढे घटस्फोटित नवऱ्याशी जुळवून घेणारी एक अमेरिकी स्त्री, गौरीला प्रोत्साहन देणारे जर्मन प्राध्यापक आणि तिच्याबद्दलचे समलिंगी आकर्षण पूर्ण करून घेणारी एक विद्यार्थिनी, यांचे प्रसंग हे तोंडी लावण्यापुरते- मूळ पात्रांच्या स्वभावदर्शनापुरतेच येतात. म्हणजे अखेर ही कौटुंबिक कथा (फॅमिली सागा) पद्धतीची कादंबरी ठरते. ही सारी पात्रे, पाणी जसे सखल भागाकडे वाहते त्याप्रमाणे आपापल्या परिस्थितीत गुंते टाळून एकटे राहण्याकडेच वाहतात, परंतु नात्यांची तळी तयार होतातच.
टॉलीगंजमध्ये सखल भागात दोन तळी होती, असा भूगोल कादंबरीत वारंवार येतो, तेच कादंबरीचे नावही आहे. कादंबरीतील वर्णने तपशील देणारी आहेत. दोन-तीनच ठिकाणी चित्रदर्शी वर्णने आहेत, पण ‘आईच्या शिवणयंत्रासारखा आवाज करणारा पक्षी इथे ऱ्होड आयलंडमध्ये आहे’ यासारखी, अवचित तपशील देऊन नाटय़ आणणारी वर्णने अधिक. गोष्ट सांगण्याचे बंधन झुगारण्याच्या अपेक्षा लाहिरी यांच्याकडून यापुढल्या- तिसऱ्या कादंबरीत तरी ठेवाव्यात, इतपत तंत्रकौशल्य या लेखिकेकडे आहे. परंतु कदाचित तसे होणार नाही. लेखकीय कौशल्याचे पाणी वाचकप्रियतेच्या ‘लोलँड’कडेच जाणार.
महत्त्वाकांक्षी.. परंतु सखल
नक्षलवाद, चार पिढय़ा, १९६० च्या दशकापासून आतापर्यंतचा कालखंड.. कोलकाता शहरापासून अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर घडत जाणारे कथानक अशी वैशिष्टय़े असलेली ‘द लोलँड’ ही झुम्पा लाहिरी यांची कादंबरी महत्त्वाकांक्षी आहे खरी.
आणखी वाचा
First published on: 26-10-2013 at 12:25 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The lowland very ambitious novel by jhumpa lahiri