एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानं जग बदलवलं असं खरोखर म्हणता येईल की नाही, असा प्रश्न काहींना नक्की पडू शकतो. पण या दशकात घडलेल्या नानाविध घटना, घडामोडी, तंत्रज्ञानातील बदल आणि जग गमावून बसलेल्या गोष्टी यांची गोळाबेरीज केली तर त्यात तथ्य आहे हे नाकारता येत नाही.
कुठलंही शतक संपून नवीन शतक सुरू झालं की, त्याचा आढावा घेण्याची पद्धत असते. मागे वळून त्या शतकाकडे पाहिलं की, त्यात घडून आलेल्या किती तरी उलथापालथींनी आपण स्तिमित होऊन जातो. केवळ भारतापुरता विचार करायचा तर एकोणिसावे शतक हे भारतीय प्रबोधनाचं शतक मानलं जातं. या शतकात केवळ भारतातच नाही तर जगातही उत्क्रांतीचा अतिप्रगत टप्पा ओलांडला गेला. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, माहिती, संस्कृती, व्यापार अशा अनेक क्षेत्रांत विधायक बदल घडून आले. जगाची एका नव्या संकल्पनेशी ओळख होऊन त्याचा प्रवास अधिकाधिक विधायकतेकडे होईल, असा आशावाद निर्माण झाला. पण विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानंतरच त्याला पहिल्या महायुद्धाच्या रूपानं तडे जायला सुरुवात झाली. नंतर दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध यांनी जग ढवळून निघालं. जगातले किती तरी देश स्वतंत्र झाले आणि मग जग पुन्हा नव्या बदलांना सामोरं जाऊ लागलं. साठीच्या दशकानं तर साहित्यापासून समाजापर्यंत मोठं स्थित्यंतर घडवून आणलं. त्याचा प्रभाव ओसरतो न ओसरतो तोच नव्वदचं दशक सुरू झालं. विसाव्या शतकातल्या या शेवटच्या दशकानं एकविसाव्या शतकाची नांदी केली आणि मग एकविसावं शतक पुन्हा नवी आव्हानं घेऊन आलं आणि नव्या संधीही.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानं आशा, निराशा आणि अनेक धक्कादायक गोष्टी यांचे संमिश्र रूप दाखवलं. म्हणून या दशकाला ब्रिटिश पत्रकार, लेखक आणि संपादक टीम फुटमन ‘द नॉटिज’ असं म्हणतो. २००० ते २००९ या दशकानं जग बदलवलं. दहशतवाद, युद्ध, आर्थिक पेचप्रसंग यांनी सुरुवात केली. यूटय़ूब, ट्विटर, फेसबुक, आयपॅड, विकिलिक्स, सीसीटीव्ही अशा अनेक तंत्रज्ञानीय चमत्कारांची सुरुवात केली. ग्लोबल वॉर्मिग, रिअ‍ॅलिटी टीव्ही शोज, उच्चभ्रू संस्कृती-सेलिब्रिटी संस्कृतीचा उदय, ऑनलाइन शॉपिंग, सुपरमार्केट्स, आयटय़ून्स, आयपॉड, आयटय़ुन्स अशा गोष्टींना जन्माला घातलं.
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवाद्यांनी जमीनदोस्त केले आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘वॉर ऑन टेरर’ची ललकारी दिली. ही घटना टीव्हीमुळे जगभर पोहोचली, पाहिली गेली. साहित्यापासून चित्रपटापर्यंत या घटनेचे कसकसे पडसाद उमटले याचा आढावा फुटमन यांनी पहिल्या प्रकरणात घेतला आहे.
दुसऱ्या प्रकरणात अमेरिका-युरोपात मुस्लिमांविषयी तयार झालेल्या वातावरणाची आणि बुश यांच्या युद्धखोर कारनाम्यांची जंत्री सादर केली आहे.
तिसऱ्या प्रकरणात ग्लोबल वॉर्मिगच्या समस्येचं गांभीर्य सांगतानाच अमेरिकेसारख्या भांडवलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या देशांनी पर्यावरणाच्या तत्त्वांना सोडचिठ्ठी कशी दिली, तर कतार, सौदी अरेबिया, चीन या देशांनी नव्या संधींचा कसा वापर करून घेतला याचा स्थूल आढावा घेतला आहे.
प्रकरण चार ते आठमध्ये रिअ‍ॅलिटी टीव्ही शोजपासून आयपॉडपर्यंतच्या तंत्रज्ञानातील करामतींचे विहंगावलोकन केलं आहे.
नवव्या प्रकरणात जगातील एकमेव महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेचा ऱ्हास आणि नवी महासत्ता म्हणून पुढे येत असलेल्या चीनची घोडदौड मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दहाव्या प्रकरणात २००८च्या आर्थिक पेचप्रसंगाची उकल केली आहे.
शेवटच्या निष्कर्षांच्या प्रकरणात पुढच्या दशकात काय काय होऊ शकेल, याचा अदमास वर्तवला आहे. म्हणजे क्लिंटन कन्या चेल्सा ही ब्रिटनची पंतप्रधान होईल आणि तिला कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांच्यातील युद्ध थांबवल्याबद्दल शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाईल, पॉप गायिका मॅडोना आणि हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जोली या (चुकून) एकमेकांची मुलं दत्तक घेतील, रिचर्ड ब्रॅनसनसारखा उद्योगपती पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं विमान तयार करेल इत्यादी इत्यादी.  
तर ते असो. त्यानंतरच्या तीन परिशिष्टांत या दशकात जन्माला आलेले नवे शब्द, काळाच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्ती, संकल्पना आणि सांस्कृतिक मानदंड आणि दशकातील महत्त्वाचे वाक्प्रचार दिले आहेत.
९११, इस्लामोफॅसिझम, इनरेनॉमिक्स, नूब, ब्लूक (ब्लॉगचं पुस्तकरूप), सेक्सटिंग, डिकॅडिटीज, सेलेब्युटार्ड, बँकस्टर, टय़ाइब अशा अनेक शब्द-संकल्पना २०००-२००९ या शतकात जन्माला आल्या, रूढ झाल्या.
जगाला एका विशिष्ट दिशेनं ढकलण्याचं, त्याला वळण लावण्याचं, निदान त्याला विचारप्रवृत्त करण्याचं काम वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान, बुद्धिमान आणि प्रतिभावान मंडळी करत असतात. पण या दशकात त्या आघाडीवरही मोठी हानी झाली आहे. बार्बारा कार्टलंड, डॉन ब्रॅडमन, जॉर्ज हॅरिसन, स्टॅन्ले अनविन, रॉबर्ता बोलॅनो, यासर अराफत, मर्लिन मन्रो, एडवर्ज सैद, जॅक देरिदा, रोनाल्ड रेगन, आर्थर मिलर, बेटी फ्रिडमन, जे. के. गालब्रेथ, सद्दाम हुसेन, इंगमार बर्गमन, बेनझीर भुत्तो, ऑर्थ सी क्लार्क, बॉबी फिशर, एडमंड हिलरी, मरिअम मकेबा, हेरॉल्ड पिंटर, जॉन अपडाईक अशा अनेक मान्यवरांना जग या दशकात गमावून बसलं. हे पुस्तक केवळ घटना-घडामोडींची जंत्री देत नाही तर त्यांचा कार्यकारण संबंध आणि त्यांची इष्टनिष्टताही स्पष्ट करतं. त्यामुळे पुस्तक दशकाचा अदमास देण्यात चांगल्यापैकी यशस्वी झालं आहे. ते केवळ दशकाची दैनंदिनी झालेलं नाही, हे विशेष.
हे पुस्तक वाचणं हा काहीसा रोलरकोस्टरमधून दशकभराचा केलेल्या प्रवासासारखा गमतीशीर अनुभव आहे.
द नॉटिज- अ डिकेड दॅट चेंजन्ड
द वर्ल्ड २०००-२००९ : टीम फुटमन
क्रिमसन, लंडन,
पाने : २०३, किंमत : ९.९९ पौंड.

Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Loksatta viva Digital Bollywood Reels Social Media
डिजिटल जिंदगी: ब्रेनरॉटचा भेजाफ्राय
UCC
UCC in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये आजपासून लागू झाला समान नागरी कायदा, आता नेमकं काय बदलणार?
first generation of immigrants is mirror of social changes taking place in India
समृद्ध अडगळीचे ओझे…
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
painting show woman in the Byzantine period
दर्शिका: बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं…?
Donald Trump News
Donald Trump : राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिलं भाषण, “अमेरिकेचं सुवर्ण युग या क्षणापासून…”
Story img Loader