बालपणी दह्य़ादुधाची चोरी करणारा, तरुणपणी खोडकर छेड काढणारा आणि मोठेपणी संपूर्ण मानवजातीला कायम मार्गदर्शक ठरेल असे जगण्याचे महान तत्त्वज्ञान गीतेच्या माध्यमातून सांगणारा म्हणून श्रीकृष्ण हा वर्षांनुवर्षांपासून प्रत्येक वयोगटाला आपलासा वाटणारा पुराणपुरुष. बालपणी आईच्या मांडीवर पहुडताच डोळ्यांवर झोपेचा अंमल चढत असताना श्रीकृष्णाच्या बाललीलांची आईने सांगितलेली एखादी लहानशी गोष्टदेखील एखाद्याच्या मनावर पुढच्या आयुष्यभर कोरलेली राहते, तर याच श्रीकृष्णाच्या तरुणपणीच्या रासलीलांच्या रंजक कथा तरुणाईला सदैव आपल्याशा वाटत राहतात. उतारवयात हरिनामाची आस लागली, की अनेक जण याच श्रीकृष्णाच्या नामस्मरणात रंगून जातात. अशा, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याशी, भक्तिभावापलीकडच्या जिव्हाळ्याचं नातं जडलेल्या श्रीकृष्णाच्या लीलांची सांस्कृतिक आठवण म्हणून कधी काळापासून आपल्याकडे दहीहंडीचा उत्सव सुरू झाला आणि काळाच्या ओघाबरोबर जुना होऊन रटाळ होण्याऐवजी तो अधिकाधिक सूत्रबद्ध आणि समृद्ध होत गेला. गेल्या काही वर्षांपासून या उत्सवात तरुणाईच्या संघटित शक्तीचे सुनियोजित प्रदर्शन घडू लागताच, बघता बघता त्याचे व्यापारीकरणही सुरू झाले. ‘गोविंदा रे गोपाळा’ असा गजर सुरू होताच वयातील अंतर पुसून सर्वाना एकत्र आणणारा आणि साहस, धाडस आणि संघटित शक्तीच्या मुत्सद्दी नियोजनाचा कस लावणारा उत्सव ही दहीहंडीच्या उत्सवाची वैशिष्टय़े ठरली. पुढे वर्षांगणिक या उत्सवाची लोकप्रियता वाढू लागली आणि त्यामुळे बाजारपेठांचे आर्थिक गणितांचे गुणाकार सुरू झाल्याने, साहजकिच मतपेढीच्या राजकारणाची नजरही या उत्सवावर पडली. गोविंदाच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी किंवा या उत्सवाच्या आनंदाचा एखादा क्षण आपल्याही वाटय़ाला यावा आणि सदोदितच्या कटकटींमुळे विटलेल्या मनाला थोडीशी उभारी मिळावी म्हणून रस्त्यावर ताटकळणाऱ्या प्रत्येकासाठी हा उत्सव तितकाच आनंददायी असला तरी त्यामागच्या आर्थिक गणितांचा अलीकडे या मानसिकतेवर चांगलाच पगडा बसला आहे. साहसाला आव्हान देणाऱ्या उंचीवर लटकणारी दहीहंडी आणि तिच्याभोवती मिरवणाऱ्या लाखोंच्या बक्षिसांच्या माळा, डीजेच्या तालावरचा वाद्यांचा आणि रीमिक्स गीतांचा ढणढणाट, गायक-गायिका आणि सेलिब्रिटींच्या हजेरीचे, त्यांच्या नृत्यांचे आणि अदांचे आकर्षण यांमुळे या उत्सवाचा गर्दीचा उत्साह विभागण्याची तीव्र स्पर्धा सुरू झाल्यापासून अर्थकारणाचे नवनवे ओघही या उत्सवात ओतले जाऊ लागले आहेत. मुंबई-ठाणे या शहरांत तर कुणाची हंडी किती लाखांची यावर राजकारण्यांचे महत्त्वही मोजले जाऊ लागले आहे. या अर्थकारणाच्या आहारी जाऊनही, सामाजिक सभ्यतेच्या मर्यादांचे भान राखणे ही संघटित तरुणाईची जबाबदारी वाढली आहे. वाढत्या गर्दीभोवती संकटांचे सावट अधिकच गहिरे असते. संघटित शक्तीने जागरूकतेचेही भान ठेवले, तर आसपास फिरकण्याचे धाडसही संकटांना होणार नाही. सण-उत्सवांच्या काळात याचीच गरज वाढली आहे आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी तरुणाईवर आहे. मनात उत्साहाचा आनंद सळसळत असला, तरी त्याची झिंग चढणार नाही, याची काळजी त्यासाठी घ्यावी लागेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा