शरद पवार यांना लक्ष्य केल्याशिवाय त्यांचे विरोधक पुढे जात नाहीत, हे गोपीनाथ मुंडे यांच्या ताज्या पवारविरोधी पवित्र्यांवरून पुन्हा दिसू लागले आहे. १९९५ मध्ये मुंडे यांनी पवारांवर अशीच आरोपांची सरबत्ती केली होती. तेव्हा मुंडे जिंकले. आता तसे होईल की, बदललेल्या परिस्थितीचे भान मुंडे यांना राखावे लागेल?
सरकार आल्यावर अजित पवार यांना तुरुंगात टाकणार, असे बीडच्या सभेत बोलणे.. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फारसे समर्थन नसतानाही शरद पवार यांच्याविरोधात अर्ज भरणे (अर्थात तो बाद झाला व तो बाद झाल्याबद्दल पवार यांना दूषणे देणे).. राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देणार.. ही सारी विधाने अथवा कृती पाहिल्या म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर गोपीनाथ मुंडे हे शरद पवार किंवा राष्ट्रवादी यांच्याविरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे स्पष्ट होते. मुंडे यांनी १९९५ च्या अगोदर विविध आरोप करून तेव्हा मुख्यमंत्रिपदावर असलेल्या शरद पवार यांना चांगलेच अडचणीत आणले होते. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी मुंडे यांनी पुन्हा एकदा पवार यांनाच लक्ष्य केले आहे. हे करताना त्यांनी पवार यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर थेट तुरुंगात टाकण्याची भाषा केली. आता कोठे निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती होत असताना मुंडे यांची सुरुवात झाली आहे. निवडणुकीपर्यंत आरोपांची किती राळ उठेल याचा अंदाज येतोच.
निवडणुकीच्या तोंडावर मुंडे हे पवार यांनाच लक्ष्य का करतात, अशी चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात रंगते. वास्तविक शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. दोघांचाही जन्म १२ डिसेंबरचा. पुतण्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे दोघांनाही राजकीय किंमत मोजावी लागली वा अजूनही मोजावी लागत आहे. पवार यांचा राजकीय वारस कोण, अजित की सुप्रिया, हे एक कोडेच आहे व त्यावर नेहमीच चर्चा रंगत असते. मुंडे यांनी मुलीला पुढे आणल्याने पुतणे धनंजय पिसाटले आणि त्यांनी काकाचे राजकीय विरोधक असलेल्या पवार यांच्या कळपात प्रवेश केला. पक्षात मी सारे निर्णय घेतो हे अजितदादांना सुनावण्याची वेळ पवार यांच्यावर मधल्या काळात आली होती. शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राजकीय फायदा होत नाही, असे मुंडे यांचे गणित असावे. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांची ताकद आहे. बलस्थानावर हल्ला केल्याशिवाय लाभ होत नाही. म्हणूनच पवार यांना लक्ष्य करून राजकीय लाभ उठविण्याचा मुंडे यांचा प्रयत्न असतो. १९९२ ते १९९५ या काळात हा प्रयोग यशस्वी झाला होता. राज्यात सर्वच मतदारसंघांमध्ये भाजप व राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढत नाहीत. लोकसभेसाठी बीड, ईशान्य मुंबईसह नऊ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात लढत होते. तरीही मुंडे काँग्रेसपेक्षा पवार यांनाच लक्ष्य करतात. शरद पवार यांच्यावर आरोप किंवा त्यांना अडचणीत आणून पवार यांना मानणारी मते भाजप अथवा युतीकडे फिरविण्याचा मुंडे यांचा डाव स्पष्टच होतो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात राष्ट्रवादीची मते कशी कमी करता येतील हे त्यामागचे मुंडे यांचे गणित आहे. यामुळेच मुंडे यांनी पवार यांच्यावर तोफ तर डागली आहे. १९९०च्या दशकात मुंडे यांनी पवारांवर आरोपांची राळ उठवून त्यांना सत्तेतून दूर करण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली. पवार विरुद्ध मुंडे असा हा सामना असला तरी भाजप आणि पवार यांच्या संबंधात कधीच वितुष्ट आले नाही. मुंडे यांच्यावर राजकीय वरदहस्त असलेल्या प्रमोद महाजन यांचे पवार यांच्याशी शेवटपर्यंत उत्तम संबंध होते. केंद्रात भाजपचे सरकार असताना पवार यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते.
लढतपूर्ण मैत्री?
मुंडे राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक झाले असतानाच दोनच दिवसांपूर्वी मुंडे यांचे पक्षांतर्गत विरोधक व भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मांडीला मांडी लावून पवार नागपुरात बसले होते. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला रोखण्याचा मुंडे यांचा नेहमीच प्रयत्न राहिला असला तरी विदर्भात राष्ट्रवादी आणि भाजपचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा..’ हे सुरूच राहते. काँग्रेसला शह देण्याकरिता विदर्भातील पाच जिल्हय़ांमध्ये राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली. एकीकडे मुंडे यांनी राष्ट्रवादीला झोडायचे आणि दुसरीकडे विदर्भात गळ्यात गळे घालायचे. पवार आणि गडकरी यांच्यातील मैत्रीमुळेच हे सारे होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
राज्याच्या राजकारणात दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची घट्ट मैत्री आणि शरद पवार दोघांचेही राजकीय विरोधक. गेली पाच दशके राजकारणात मुरलेल्या पवार यांनी या दोन्ही नेत्यांच्या विरोधाची धार कशी कमी होईल याची पद्धतशीरपणे खेळी केली. सत्तेत आल्यावर मुंडे यांना साखरेची गोडी लागली. राज्याच्या राजकारणात साखर कारखाने सत्तेसाठी महत्त्वाचे ठरतात हे हेरून मुंडे यांनी साखर कारखान्यांवर भर दिला. ते करताना त्यांनी खासगी कारखाने सुरू केले. युतीची सत्ता गेली आणि आघाडीचे सरकार आले. साखर उद्योगात सरकारी मदत ही आवश्यक असते. राज्य किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकांचे कर्ज किंवा कर्जाला शासनाची थकहमी हे सारेच आले. शिवाय साखर आयुक्तालयाला झुकवावे लागते. साखर उद्योगात मुंडे रमले आणि पवार यांच्या मांडीला मांडी लावून साखर संघाच्या बैठकांमध्ये बसू लागले. एरवी कडवा विरोध असला तरी साखर संघ किंवा ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांवरून पवार-मुंडे यांच्यात साखरेचा गोडवा निर्माण झाला. मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदी विलासराव देशमुख निवडून आले ते शरद पवार यांनी केलेल्या मदतीमुळेच. राजकीय विरोधकांना आपलेसे करण्याचे पवार यांचे कौशल्य मानावेच लागेल.
तेव्हा आणि आता
तब्बल दोन दशकांनंतर पवार विरुद्ध मुंडे हा संघर्ष पुन्हा एकदा नव्या वळणावर आला असताना, तेव्हाचे मुंडे आणि आताचे यात बराच फरक पडला आहे. १९९२-९३ नंतर मुंडे यांनी पवार यांच्याविरोधात मोहीम उघडली तेव्हा काँग्रेसमधील काही नेत्यांनीच मुंडे यांना बरीच माहिती पुरविली होती. महाराष्ट्रातील पवारविरोधी एका बडय़ा नेत्याने तेव्हा त्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा होती. ४५च्या वयातील मुंडे यांचा तेव्हा वेगळाच करिश्मा होता. काँग्रेसविरोधातील वातावरणामुळे आगामी निवडणुकीनंतर सत्तांतर होण्याची शक्यता आहे. याचा लाभ उठविण्याचा मुंडे यांचा प्रयत्न आहे. लोकसभेसाठी राज्यातून भाजप-शिवसेना युतीचे जास्त खासदार निवडून आल्यास त्याचा सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परिणाम होऊ शकतो. राज्यात आजच्या घडीला शिवसेनेपेक्षा भाजप पुढे आहे. नरेंद्र मोदी यांची लाट आल्यास राज्यात भाजपला अधिक यश मिळू शकते. उद्या राज्याच्या सत्तास्थापनेत मनसेची भूमिका निर्णायक ठरणार असल्यास दोन ठाकरे बंधूंना बरोबर घेण्याचे कसब मुंडे हे करू शकतात. हे सारे लक्षात घेऊनच मुंडे अधिक सक्रिय झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि मनसे या राज्यातील पाच प्रमुख पक्षांमध्ये सद्यस्थितीत राष्ट्रवादीची प्रतिमा सर्वात खराब झाली आहे. पक्षाच्या मंत्र्यांवर विविध आरोप होत आहेत. सिंचन, सहकारी बँक घोटाळा अशा विविध प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचा संबंध जोडला गेला. आगामी निवडणूक राष्ट्रवादीसाठी तशी सोपी नाही. मात्र बीडमध्ये मुंडे यांच्याशी दोन हात करण्याची तयारी अजित पवार यांनी सुरू केली आहे. अजित पवार यांना तुरुंगात टाकणार, हे मुंडे यांनी विधान केले आणि लगेचच बीड जिल्हा बँकेतील थकबाकीदारांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. ही कुणकुण लागताच मुंडे यांच्या संस्थेने पैसे भरल्याने मुंडे यांच्यावरील संकट टळले. मुंडे यांचा पुतण्या धनंजय आधीच अजितदादांच्या जवळ आला आहे. अजितदादांनी घर फोडल्याचा संताप मुंडे यांनी अनेकदा व्यक्त केला. पुतण्याच्या पोटनिवडणुकीत आघाडीची १० ते १२ मते फोडून आपणही कच्च्या गुरूचे चेले नाही, हे मुंडे यांनी अजितदादांना दाखवून दिले. बीडमध्ये मुंडे यांना शह देण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे. परंतु जिल्हय़ातील सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत. मुंडे यांचे पूर्वीचे अनेक सहकारी राष्ट्रवादीमध्ये आले आहेत.
मुंडे एकाच वेळी पवार काका-पुतण्याशी दोन हात करण्याच्या तयारीत आहेत. कितीही आरोप झाले तरी शरद पवार यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन प्रत्युत्तर दिले नाही वा टीकाटिप्पणीही केली नाही. अजितदादा मात्र ‘अरेला कारे’ करणारे आहेत. बीड बँकेवरील कारवाईवरून ते स्पष्ट झाले. पवार विरुद्ध मुंडे यांच्यातील संघर्षांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. यात कोण बाजी मारेल हे निवडणूक निकालातून कळेलच, पण मुंडे यांनी दंड थोपटले आहेत. १९९५ च्या निवडणुकांच्या वेळी मुंडे यांच्या आरोपांच्या वेळी पवार यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली होती. आता तसेच होण्याची शक्यता कमी आहे. कारण अजितदादा आता िरगणात आहेत. पवार आणि काँग्रेस यांच्यातही तेवढे सख्य राहिलेले नाही. पाहुण्याच्या वहाणेने विंचू मारला जात असल्यास काँग्रेसलाही ते हवेच आहे. १९९५ मध्ये मुंडे जिंकले, आता २०१४ मध्ये कोण बाजी मारते हे बघायचे.

Story img Loader