भाव शुद्ध होण्यासाठी श्रीगोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेला सर्वात सोपा पण सर्वात कठीण उपाय म्हणजे, ‘संतांच्या घरी नुसतं पडून राहणं’! आता यात सोपं काय? तर नुसतं पडून राहायचं की झालं, विनासायास भाव शुद्ध झालाच.  मग कठीण काय? तर ‘नुसतं’ पडून राहणं आपल्याला साधतच नाही. आपण नुसतं पडून राहू शकतो का?  मनाच्या, देहाच्या, चित्ताच्या, बुद्धीच्या सर्व ओढी, सवयी, वृत्ती सोडून स्वस्थ होणं म्हणजे हे ‘नुसतं’ पडून राहणं आहे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदानं नाचू लागला. मी त्याला विचारलं, ‘तुला एवढा आनंद कसला झाला आहे?’ त्यावर तो म्हणाला, ‘मला आज गुरू भेटले!’ जो असा झाला, त्यालाच खरी गुरूची भेट झाली’’(प्रवचने, १५ जुलै). त्यांच्या घरी पोहोचल्यावर आपली ही स्थिती झाली का? सद्गुरू भेटले म्हणजे स्वत:च्या ओढीने भौतिकात काही करायची गरज उरलेली नाही, अशी भावना होऊन वृत्ती स्थिर झाली का? ती झालेली नाही आणि होत नाही म्हणूनच आपण ‘नुसतं’ पडून राहू शकत नाही. आता एक लक्षात घ्या, सद्गुरू भेटले म्हणजे भौतिकात निष्क्रिय व्हायचं, असा रोख नाही. सद्गुरू भेटल्यानंतरही प्रारब्ध लगेच नष्ट होत नाही. भौतिक लगेच सुटत नाही. ते मनातून सुटणं आणि कर्तव्यकर्म करणं, हेच महत्त्वाचं असतं. ज्या क्षणी भ्रामक आसक्तीतून भौतिकामागे होणारी धावपळ थांबेल तेव्हाच सद्गुरूंची खरी भेट झाली, असं होईल. आजही आपली ती भावना झालेली नाही. वृत्ती स्थिर, भौतिकाच्या दृष्टीने निरपेक्ष झालेली नाही. आज आपली स्थिती कशी आहे? आपण श्रीमहाराजांकडे आलो आहोत पण आपली भावना शुद्ध आहे का? श्रीमहाराज म्हणतात, ‘‘शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा’’(प्रवचने, १२ जुलै). आपण त्यांच्या पायी पडतो, त्यांचे म्हणवतो पण मनाची, बुद्धीची, चित्ताची चळवळ काही थांबत नाही. त्यांच्याकडून कितीतरी गोष्टी आपल्याला हव्या असतात. ‘मी रोज एवढा जप करतो मग तुम्हीही माझी इच्छा पूर्ण करा’, ही ओढ म्हणजेच मोबदल्याची किंवा जपाने भौतिकातलं फळ मिळावं, ही इच्छाच आहे. भाव शुद्ध होत नाही तोवर ही इच्छा मावळणार नाही. यावर उपाय एकच त्यांनी जे साधन सांगितलं ते आवडो वा न आवडो, ते करताना आनंद वाटो वा त्रास वाटो, मन एकाग्र होवो वा न होवो, ते साधन सांभाळायचा प्रयत्न केला पाहिजे. ‘पडून राहण्या’वरून आठवलं. श्रीमहाराजांनी म्हटलं आहे, जो सतत नाम घेईल त्याच्या दारी मी कुत्र्यासारखा पडून राहीन! पू. घरतभाऊंना मी म्हणालो, महाराजांनी किती हीनपणा घेतला आहे स्वत:कडे! त्यावर भाऊ म्हणाले, दत्ताभोवतीचे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत. जो नाम घेतो त्याच्या दारी वेदाचं ज्ञान पडून राहील, असं महाराजांना म्हणायचं आहे. तेव्हा सतत नाम घेत राहणं आणि कर्तव्यकर्म करीत फळाचा भार त्यांच्यावर सोपवणं, हेच त्यांच्या घरी पडून राहणं आहे. त्यानंच भाव शुद्ध होईल. हाच एकमेव अभ्यास आहे.