१९व्या शतकाच्या मध्यास चार्ल्स डार्विन या थोर शास्त्रज्ञाचा उत्क्रांतिवादासंबंधीचा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर सामाजिकशास्त्रांवर त्याचा लक्षणीय प्रभाव पडला. त्यानंतर जवळजवळ १०० वर्षांनी १९५३ मध्ये डॉ. राइसमन यांनी समाजशास्त्रीयदृष्टय़ा ‘एथ्नीसिटी’ (Ethnicity) हा शब्द वापरला आणि त्यानंतर १९६०च्या आणि १९७०च्या दशकांत तो सर्वत्र रूढ व्हावयास प्रारंभ झाला. पण सुरुवातीपासूनच समाजशास्त्रात हा शब्द ‘हॉट पोटॅटो’ म्हणजे सतत चर्चेचा, वादविवादाचा राहिला. सांस्कृतिक भेद-फरकासंबंधीचा विशिष्ट प्रकार सांगण्यासाठी या शब्दाचा वापर होत होता, तरीही अँग्लो अमेरिकन परंपरेने हा शब्द ‘राष्ट्र-राज्या’च्या मोठय़ा समाजातील अल्पसंख्याक गटांसाठी वापरला गेला. १९५०च्या व १९६०च्या दशकातील व वसाहतिक जगांची कोसळती अवस्था झाल्यानंतर वंश, संस्कृती आणि नृवंशशास्त्रासंबंधी अधिकच गोंधळ निर्माण झाला. साम्यवादाचा पाडाव व सोव्हिएत पद्धतीचे फेडरेशनचे वांशिक रीतीने विभाजन आणि बाल्कन व कॉकेशसमधील वांशिक धुलाईच्या धोरणामुळे या व्याख्येत अधिकच गुंतागुंत झाली आहे.
डब्लीन येथील विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक असलेले लेखक सिर्नासा मारसेव्हिक यांच्या ‘द सोशॉलॉजी ऑफ एथ्नीसिटी’ या प्रस्तुत पुस्तकास वरील घटनांची पाश्र्वभूमी आहे. यामध्ये एकंदर ११ प्रकरणांत ‘नृवंशविद्येच्या समाजशास्त्रा’चे माहिती विवेचन, विश्लेषण केले आहे. ‘एथनीसिटी’ या संज्ञेत अनेक अर्थ सामावले आहेत. अशा स्वरूपामुळे व अस्पष्टतेमुळे खूप मोठे गैरसमज व राजकीय दुरुपयोग निर्माण झाले आहेत. ही संज्ञा केवळ बौद्धिक, वैचारिक क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिली नाही तर ती प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय पातळीवरही वापरली गेल्यामुळे ‘वांशिक गट’, ‘वांशिक अल्पसंख्याक’ असे शब्दप्रयोग प्रचलित झाले. फक्त मॅकरावेवर या समाजशास्त्रज्ञाने त्याचा वापर केला. इतरत्र तसा न केल्यामुळे इतर समाजशास्त्रज्ञांना मानववंशशास्त्राकडे वळावे लागले. या शब्दप्रयोगामध्ये एक सूक्ष्म वा स्थूल वंशश्रेष्ठत्वाची भावना असते. वांशिकसंबंधाविषयी मार्क्‍सने स्वतंत्र पुस्तिका वा लेख लिहिला नाही, पण त्याने नृवंशविद्येविषयी एक सुसंगत असा सिद्धान्त मांडला. हा सिद्धान्त तीन संकल्पनांमधून तयार झाला आहे.
१. सांस्कृतिक व म्हणून वांशिक पाया आधारापेक्षा आर्थिक आधाराला प्राधान्य.
२. मानवतेच्या सार्वत्रिक प्रगतीस वांशिक वैशिष्टय़े ही अडथळा, अडसर आहेत.
३. वांशिक अस्मितेवर वर्ग संकल्पनेचे ऐतिहासिक आरोहण.
मार्क्‍सच्या विचारसरणीचे मार्गदर्शक सूत्र आहे वर्गविग्रह. वर्गविषयक जाणीव ही सामाजिक परिवर्तनाची प्रभावी शक्ती व वांशिक अस्मिता या दुसऱ्या दर्जाच्या वास्तवात आहेत आणि खरीखुरी साम्यवादी समाजव्यवस्था एकदा निर्माण झाल्यानंतर त्यांचा जोर, शक्ती राहणार नाहीत.
यात सिमेल व मॅक्स वेबर या यांच्या सिद्धान्तासंबंधीही विस्ताराने विवेचन, विश्लेषण आहे.
एका स्वतंत्र प्रकरणात नृवंशविद्येच्या अभ्यासाच्या नवमार्क्‍सवादी पद्धतींचे परीक्षण केले आहे. समकालीन मार्क्‍सवादी दोन भूमिकांचा फरक सांगितला आहे. वांशिक गटांच्या अधिक स्थितीमधील विषमता व वांशिकदृष्टय़ा भेद निर्माण करून आणि ते कायम ठेवण्यासाठी तसेच वर्ग एकत्र होऊ नये म्हणून वांशिक विचारसरणीचे कार्य या साऱ्याविषयी शासनाचे अथक प्रयत्न होत आहेत. परंपरेने मार्क्‍सवादाने तात्त्विक, वैचारिक मुखवटा म्हणून नृवंशविद्येचे विश्लेषण केले आहे. पण त्यामुळे वर्गीय विरोध लपवला जातो आणि भांडवलदारी पद्धतीच्या उत्पादनावरच लक्ष केंद्रित होते. समकालीन नवमार्क्‍सवादी विचार सांस्कृतिक कोणत्याही स्वायत्ततेबद्दल अधिक संवेदनशील आहे.
वांशिक घटना, प्रसंग, घडामोडींचा प्रतीकात्मक संवादाचा, देवघेवींचा अर्थ लावणे महत्त्वाचे आहे. कारण सामाजिक कृती ही नेहमीच प्रतीकात्मक असते. म्हणून विश्लेषणाचे केंद्रबिंदू व्यक्ती असते. या दृष्टीने नृवंशविद्या ही एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि त्यामधून व्यक्ती व गटांना आपल्या ‘परिस्थितीची व्याख्या’ तयार करता येते, कायम ठेवता येते आणि बदलताही येते. प्रतीकात्मक व सांस्कृतिक निर्मितीवर सामाजिक, जीवशास्त्रज्ञांनी कडाडून टीका करताना म्हटले आहे की, नृवंशविद्या ही नातेवाईक निवडीहून अधिक काही नसते. माणसे ही इतर पशूसारखीच असतात. त्यांनाही प्रजोत्पादन हवे असते. वांशिक गट समान आनुवंशिक सर्वसाधारणपणे ज्ञातिविवाह असतात. वांशिक संबंधाचे सामाजिक जीवशास्त्रीय वर्णन विश्वासार्ह स्पष्टीकरण पक्के वाटत नाही. नृवंशविद्येच्या बौद्धिक निवड सिद्धान्तानुसार ती वैयक्तिक फायद्यासाठी वापरावयाचे एक साधन आहे. समान भाषा, समान धार्मिक परंपरा, सांस्कृतिक सारखेपणाचे वेगळे प्रकार यामुळे माणसे एकत्र येतात आणि त्यामुळे ऐक्यभावना निर्माण होण्यास साहाय्य होते म्हणून जेव्हा व्यक्तीचा फायदा होतो तेव्हा वांशिक गटाची सामूहिक कृती ही सहजशक्य होते. नृवंशविद्या गतिशील व हिशेबी वैशिष्टय़ांवर भर देताना यशस्वी झाली तरी या मार्गासंबंधी, विचारासंबंधी टीकाच झाली आहे, कारण संस्कृती व राज्यशास्त्र यांचा अनादर झाला आहे. वैयक्तिक निवडी ज्या परिस्थितीत होतात त्याला पुरेसे महत्त्व दिले गेले नाही. वांशिक हेतू, वर्तन व परस्पर संवाद या बाबी वांशिक संबंध समजून घेताना विशेष महत्त्वाच्या आहेत. वांशिक गटांना एकत्र आणण्यासाठी योजिलेले डावपेच, नीती, वांशिक प्रतीकांचे वैचारिक आवाहन हे समजून घेण्यासाठी बुद्धिजीवींच्या वैयक्तिक व सामूहिक कृतींचे बारकाईने विश्लेषण करावे लागेल. नृवंशविद्या ही आंतरसंबंध व एकमेकांमधील संबंधांचे प्रमुख राजकीय साधन असले तरी ती राजकीय साधनेहून अधिक असल्यामुळे आग्रही सामाजिक शक्ती आहे.
शेवटच्या प्रकरणात नृवंशविद्येच्या आठही समाजशास्त्रीय सिद्धान्तांचे तौलनिक व विरोधी स्वरूप स्पष्ट केले आहे. १९९४ मधील रवांडातील नरसंहाराचे उदाहरण घेऊन या सिद्धान्तांच्या जमेच्या बाजू व मर्यादा दाखवून दिल्या आहेत. नृवंशविद्या वैविध्यपूर्ण फसवी, प्रवाही घटना आहे. हिंदू देवदेवतांच्या अवतारांसारखी तीही अनेक वेगवेगळ्या रूपांत तयार झाली आहे.  
द सोशॉलॉजी ऑफ एथ्नीसिटी – सिर्नासा मारसेव्हिक,
सेज पब्लिकेशन्स,
पाने : २००, किंमत : ७५ पौंड.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा