सुनीता कुलकर्णी
करोनाकहराच्या काळात म्हणजे २०२०-२१ या वर्षात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणामधले स्त्रियांचे प्रमाण घटले असे उच्च शिक्षणासंदर्भातील सरकारी सर्वेक्षण सांगते.
दोन वर्षांपूर्वीच्या करोना महासाथीच्या परिणामांची गणना अजूनही सुरू आहे. काही क्षेत्रांवर झालेले तिचे परिणाम ताबडतोब जाणवले तर काहींचे हळूहळू लक्षात येत आहेत. शिक्षण क्षेत्र हे त्यापैकीच एक. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षणाच्या (AISHE), २०२०-२१ च्या अहवालातून दिसून येते की त्या वर्षासाठी शिक्षणातील स्त्रियांच्या प्रमाणाला ओहोटी लागली आहे. त्याआधीच्या काही वर्षांच्या वाढलेल्या प्रमाणाच्या तुलनेतही कमी झालेली आकडेवारी विशेषत्वाने डोळ्यात भरणारी आहे.
स्त्रियांचे शिक्षण ही आधीच जगभरात सगळीकडेच चिंतेची बाब आहे. आपल्यासारख्या पुरुषप्रधान, विकसनशील आणि वाढत्या लोकसंख्येच्या देशात तर ती अधिकच चिंतेची ठरते. कारण पुरुषप्रधानमुळे मुलींपेक्षा मुलग्यांच्या शिक्षणाला जास्त प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे घरातली स्त्री शिकलेली असेल, तर त्या कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत फरक पडतो. एक स्त्री शिकलेली असेल तर सगळे कुटुंब शिकते. त्यामुळे मुलींच्या शिक्षणावर भर देणाऱ्या, त्यासाठी लोकशिक्षण करणाऱ्या वेगवेगळ्या मोहिमा आपल्याकडे सतत राबवल्या जातात. तसे संदेश दिले जातात. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, या अलीकडची घोषणा त्यापैकीच.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाच्या अहवालातील आकडेवारीकडे पाहिले तर काय आढळते? ही आकडेवारी सांगते की २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या दर १०० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे. बीए या अभ्यासक्रमासाठी २०१९-२० या वर्षासाठी १०० मुलग्यांनी प्रवेश घेतला असेल तर मुलींचे प्रमाण होते, १२७, ते २०२०-२१ या वर्षात १०८ वर आले आहे. बीसीए या अभ्यासक्रमाला १०० पुरुषांमागे आधीच्या वर्षी ७३ मुली होत्या तर २०२०-२१ या वर्षासाठी हेच प्रमाण ५९ वर आले आहे. बीकॉम या अभ्यासक्रमासाठी २०१९-२० या वर्षासाठी स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान म्हणजे १०० होते तर तेच २०२०-२१ वर्षासाठी ते ९४ झाले आहे.
नर्सिंग, बीएड् या अभ्यासक्रमासाठी स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत जास्त संख्येत असतात असे चित्र आहे. २०१९-२० या वर्षासाठी या अभ्यासक्रमाला १०० पुरुषांनी प्रवेश घेतला असेल तर स्त्रियांची प्रवेशसंख्या होती ३८५. आणि २०२०-२१ मध्ये स्त्रियांची ही संख्या झाली ३०८. म्हणजे तब्बल ७७ ने कमी. बीएड् अभ्यासक्रमाच्या बाबतीत आधीच्या वर्षा २१५ विद्यार्थिनी या अभ्यासक्रमासाठी आल्या असतील तर २०२०-२१ या वर्षासाठी या अभ्यासक्रमाला येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या आहे १८५. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची संख्या आधीच्या वर्षी ११० होती तर नंतरच्या वर्षी म्हणजे २०२०-२१ मध्ये ती झाली १००. अशीच परिस्थिती कायदे, बीटेक, बीएस्सी, बीफार्म या अभ्यासशाखांच्या स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये आहे. मुख्य म्हणजे ते कुठेही वाढलेले नाही, तर घटलेलेच आहे.
या सर्वेक्षणानुसार उच्च शिक्षणाच्या बाबतीत सांगायचे तर २०१९ मध्ये ३.८५ कोटी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता, तर २०२०-२१ मध्ये ४.१३ कोटी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. म्हणजे करोनापश्चात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २९ लाखांनी वाढली. त्यात पुरुषांचे प्रमाण ५१.३ टक्के (२.१२ कोटी) आहे तर स्त्रियांचे प्रमाण ४८.७ आहे.
सर्व पदवी अभ्यासक्रमांमध्ये बीए या अभ्यासक्रमाला पुरुषांपेक्षा (४७.३) जास्त स्त्रियांनी (५२.७) प्रवेश घेतला. त्यापाठोपाठ बीएस्सी या अभ्यासक्रमासाठीदेखील पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त होती. बीकॉमसाठी ४८.५ टक्के स्त्रियांनी प्रवेश घेतला तर बी.टेक, इंजिनीअरिंग अशा तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रमांसाठी स्त्रियांचा सहभाग ३० टक्क्यांपेक्षा कमी आढळला. समाजविज्ञान हा अभ्यासक्रमदेखील पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त लोकप्रिय असल्याचे या सर्वेक्षणातून दिसते. २०२०-२१ या वर्षासाठी या अभ्यासक्रमासाठी ५६ टक्के स्त्रियांनी प्रवेश घेतला आहे. पदव्युत्तर पदवीसाठी व्यवस्थापन (४३.१) हा अभ्यासक्रम वगळता इतरत्र स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.
विशेष म्हणजे या सर्वेक्षणानुसार २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये एकूण विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या प्रवेशांसाठीची नावनोंदणी ७.५ टक्क्यांनी वाढली असून २०२०-२१ या वर्षासाठी एकूण ४.१३ कोटी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे. पण त्यात स्त्रियांची संख्या कमी होणे ही धोक्याची घंटाच म्हणायला हवी.