आनंद नीलकंठन यांनी ‘असूर- टेल ऑफ द व्हॅन्किश्ड- द स्टोरी ऑफ रावणा अॅण्ड हिज पीपल’ या कादंबरीत उभा केलेला रावण हा खलनायक नसून साक्षात हीरो आहे. ज्या गुणांनी रावणाचा हीरो म्हणून उदय झाला, त्याच गुणांनी तो कसा खलनायक ठरला, त्याची ही पुराणकथा. कोणत्याही चमत्कारांनी न भरलेली. देवत्वाचा अंश नसलेली. खा, प्या, मजा करा, या असूर संस्कृतीची. स्वत:च्या विनाशाची कारणे न शोधता फक्त जगण्याचा स्वैर उपभोग घेणाऱ्यांची. लढायांमध्ये मरणाऱ्यांची. अनतिकतेचा टिपूसही न लागलेल्या गर्भगृहांमध्ये जन्म घेणाऱ्यांची.. आणि घातकी, दहशतवादी, लाचार, व्यभिचारी, बलात्कारी, अप्पलपोटय़ा देवांची..
ब्राह्मण बाप आणि राक्षस कुळातील आईच्या पोटी जन्मलेला रावण दहा विद्या जाणणारा. दहामुखी. म्हणजेच सर्वोत्तम दहा मेंदूंची क्षमता असलेला विद्वान. ब्रह्माचा आवडता शिष्य, युद्ध-कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी नेता, धूर्त राजकारणी, शत्रूला किंचितही कमी न समजता त्याला नामशेष करणारा योद्धा रावण जेव्हा देवांच्या विरोधात युद्धाची, आपलं राज्य परत मिळवण्याची घोषणा करतो, त्याक्षणी असूरांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटतात आणि सुरू होतो तडफदार, जिवावर उदार झालेल्या, स्वप्नांच्या लाटांवर आरूढ झालेल्या रावणाच्या सहकारी आणि आप्तजनांचा आत्माविष्कार..
रावण तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मलेला नव्हता. राजा कुबेराचा सावत्र भाऊ म्हणून तो कफल्लक होता. बळाच्या जोरावर कुबेराने स्वत:च्या बापालाही आपल्या टाचेखाली ठेवले होते. त्यामुळे सोन्याच्या लंकेचं काय करायचं, ते सर्व काही कुबेराच्या हाती होतं. त्यामुळे बापाकडे तरी याबद्दल काय दाद मागायची, अशी रावणाची कोंडी. म्हणून मग त्याच्या भावंडांच्या पदरी कुबेराच्या गोठय़ातील गायी सांभाळायची जबाबदारी पडते. सरंजामी वृत्तीच्या कुबेराच्या गायीही माझ्या आणि दूधही माझं, असा कायदा असतो. त्यामुळे रावण आणि त्याच्या भावंडांच्या नशिबी शेणामुताचीच सोबतसंगत येते. ज्या ठिकाणी चूक होईल, हातून काही आगळीक घडेल, तिथं कुबेराच्या सन्याचा मरेस्तोवर मार खाण्याशिवाय रावण, कुंभकर्ण यांना दुसरं काही मिळतंच नसतं. यातून नेहमी सुटत असतो तो फक्त विभीषण. तो देवांचा परमभक्त असतो.
कुबेराच्या सत्तेला किंचितसा तडा जाणारी एक घटना घडते. देव असूरांच्या राज्यावर हल्ला करतात. राज्याच्या वेशीवर एका घरात देव घुसतात. बेभान झालेला एक सनिक झोपलेल्या सहा महिन्यांच्या मुलीला पायाला उचलून गदेसारखं फिरवून िभतीवर आपटतो..त्यानंतर बाजूला भीतीनं थरथर कापणाऱ्या मुलीच्या आईवर काहीजण मिळून बलात्कार करतात. हे घर असतं भद्र नावाच्या शुद्राचं. खरं तर भद्र खरा सनिकवृत्तीचा, पण परिस्थिती त्याला छोटे-मोठे व्यवसाय करायला भाग पाडते. भद्र हा कमालीचा स्वामिभक्त.
देवांच्या हातून आपली मुलगी आणि पत्नीचं शील गमावल्याचं दुख भद्राच्या इतक्या जिव्हारी लागतं की संतापानं पेटलेला भद्र कुबेराच्या सैन्याच्या मुदपाकखान्यात शिरून त्यांच्या अन्नात विष टाकतो आणि अख्खं सैन्य टाचा घासून मरतं. येथून रावणाच्या विजयी मोहिमांना सुरुवात होते. यानंतर भद्र रावणाच्या प्रत्येक विजयी मोहिमेत सामील होतोच, पण तो ती फत्ते करण्यात कमालीची कामगिरी बजावतो. रावणाला सोन्याची लंका जिंकता येते ती भद्रामुळे.
लेखकाने पुस्तकात रावणाच्या युद्धनीतीचं, भद्राच्या स्वामिनिष्ठेचं रेखीव वर्णन केलं आहे. ही दोन पात्रंच अख्ख्या कादंबरीत असूरांचा विजय, पराभव, त्यांची सुखलोलुप वृत्ती, बेपर्वा यांचं वर्णन करतात.
लेखक आनंद नीलकंठन यांनी संपूर्ण पुस्तकात देव राक्षसी वृत्तीचे कसे आहेत, हे सांगितलं आहे. असूर म्हणजे राक्षस नव्हेत. ते सूर नाहीत म्हणून असूर आहेत, असा युक्तीवाद केला आहे. म्हणजे समाजात दोन वर्ग आहेत. एक राज्यकर्ता वर्ग आणि दुसरा सेवेकरी वर्ग. राज्यकर्ता वर्ग राज्यकारभाराच्या दृष्टीने कितीही ‘चांगला’ असला तरी तो सेवेकरी वर्गाला चांगला वाटेलच असं नाही. म्हणजे सेवेकरी वर्गाला जे काही मिळायला हवं ते राज्यकर्त्यां वर्गामुळे मिळत नाही. म्हणून ते नेहमी राज्यकर्त्यां वर्गाच्या विरोधात असतात, हे सूत्र असूर आणि देवांच्या संघर्षांत आहे. नीलकंठन यांनी हे समर्पक भाषेत, प्रत्येक घटनांमधून समजावून सांगितलं आहे. अतिशय रसाळ भाषा, सोपी मांडणी, भावोत्कट प्रसंग नीळकंठन यांनी मोठय़ा ताकदीनं पानोपानांत उतरवलं आहेत. म्हणजे रामायण वाचताना जी भावनिक तल्लीनता लागते, तशी बुद्धीच्या पातळीवरील तार्किकता ही कादंबरी वाचताना लागते.
फक्त नीळकंठन यांचा या पुस्तकातील एक मुद्दा खटकतो. तो म्हणजे वेळोवेळी देवच कसे वाईट, हे त्यांनी ओढूनताणून वारंवार सांगितलं आहे. म्हणजे जर राम हा अंतिम जेता ठरत असेल तर त्याच्यात काहीतरी प्रबळ असायला हवे, जे रावणापेक्षा अधिक आहे. म्हणूनच तो रावणाचा पाडाव करतो.
कादंबरीची सुरुवात रावणाचा प्राण कंठात उतरला आहे आणि त्याचे शरीर कोल्हे खाताहेत, उंदीर पाय कुरतडताहेत, अशी आहे आणि कादंबरीचा शेवट तो भद्रासमोर प्राण सोडतो आहे, असा आहे. म्हणजे सर्वाधिकारी असताना राजा म्हणून ज्याला शूद्र मानलं तो भद्रच उद्धारकर्ता होता, हे रावणाला मृत्यूशय्येवर कळतं, हे चटका लावणारं आहे.
असूर – टेल ऑफ द व्हॅन्कीश्ड –
द स्टोरी ऑफ रावणा अॅण्ड हिज पीपल
आनंद नीलकंठन,
लीडस्टार्ट पब्लिशिंग, नवी दिल्ली,
पाने : ५००, किंमत : २९९ रुपये.
रावण हीरो, देव खलनायक
आनंद नीलकंठन यांनी ‘असूर- टेल ऑफ द व्हॅन्किश्ड- द स्टोरी ऑफ रावणा अॅण्ड हिज पीपल’ या कादंबरीत उभा केलेला रावण हा खलनायक नसून साक्षात हीरो आहे.
आणखी वाचा
First published on: 07-06-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The story of ravana and his people ravana hero god villain