शाश्वत सुख हवे असेल तर भगवंताचा आधार आवश्यक आहे. भगवंताचा आधार प्राप्त करून घेण्यासाठी खरा परमार्थ साधला पाहिजे. आपल्या आजच्या स्वभावबद्ध मनोरचनेनुसार खरा परमार्थ कोणता, हे ज्ञान आपल्याला होणे शक्य नाही. त्याबाबत शाब्दिक ज्ञान झाले तरी ते आचरणात कसे आणावे, हे उकलणार नाही. जोवर ज्ञान आचरणात येत नाही तोवर ते निर्थकच आहे. आपण जे जे काही ‘ज्ञान’ म्हणून कमावतो, ते आपल्या भ्रम व मोहयुक्त अशा देहबुद्धीद्वारेच असल्याने ते अज्ञानच असते! त्यामुळेच श्रीमहाराज जेव्हा सांगतात की, ‘‘..त्या अज्ञानाची निवृत्ती करण्याकरिता ज्ञान व अज्ञान या दोहोंपेक्षा तिसऱ्या कोणत्या तरी वस्तूची गरज आहे..’’ तेव्हा ते हाच संकेत करतात की देहबुद्धीद्वारे मी जे मिळवतो ते ‘ज्ञान’ आणि माझ्या ठायी ओसंडून वाहात असलेले अज्ञान या दोहोंचा निरास करणारी ‘तिसरी वस्तू’च पाहिजे. ‘ज्ञानेश्वरी’त एक ओवी आहे की माणूस गाढ झोपेत असतो तेव्हा जागेपणाचं ज्ञान त्याला नसतं, हे झालं अज्ञान. तो जागा होतो तेव्हा ‘आपण जागे झालो’, ही जाणीव त्याला होते, हे झालं जाग आल्याचं ज्ञान. पण नंतर ते ज्ञान आणि अज्ञान दोन्ही मावळतं. त्यामुळे दिवसभर जागे असतानाही ‘मी जागा आहे’ ही जाणीव त्याला होत नाही! अगदी त्याचप्रमाणे देहबुद्धीचं अज्ञान जाऊन आत्मज्ञान झालं की नंतर ज्ञान ‘झाल्या’ची जाणीवही ओसरते आणि तो सदाजागृत अर्थात अखंड जाणिवेनुसार वावरू लागतो. त्यासाठी त्याला आधी जागं करणारं जे साधन आहे ते ज्ञान आणि अज्ञान या दोहोंपेक्षा अलिप्त असलं पाहिजे. जो जागाच आहे, तोच झोपलेल्याला जागं करू शकतो. ती ही ‘तिसरी वस्तू’ आहे! ही तिसरी वस्तू कोणती? श्रीमहाराज सांगतात, ‘‘..त्या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी ज्ञान व अज्ञान या दोहोंपेक्षा तिसऱ्या कोणत्या तरी वस्तूची गरज लागते. त्यालाच मार्गदर्शक सद्गुरू म्हणतात!’’ (बोधवचने, क्र. १२८). तेव्हा जागं होण्यासाठी मार्गदर्शक सद्गुरुची गरज आहे. सद्गुरू मला जागं करून परमार्थाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. त्या मार्गावर जेव्हा मी पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न सुरू करतो तेव्हा श्रीसद्गुरू त्या मार्गावरून मला चालायला शिकवतात, चालायला लावतात, चालवतात आणि प्रसंगी कडेवर घेऊन त्या मार्गावर मला अडू न देता, पडू न देता मुक्कामापर्यंत नेतात. त्याची सुरुवात आहे ती एखाद्या मार्गदर्शकाच्या रूपातली. श्रीमहाराजांच्या सांगण्यानुसार, माणसाच्या सर्व दु:खांवर परमार्थ हाच खात्रीचा तोडगा आहे, ही गोष्ट त्या परमार्थाचा अनुभव घेऊन संतांना पक्की कळली. तो अनुभव त्यांच्या आत इतका मावेनासा झाला की तो अनुभव दुसऱ्यांना वाटून टाकण्यासाठी त्यांनी तो जगासमोर ठेवला. संतांनी आपला अनुभव जगाला सांगितला तो त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून. हा परमार्थाचा शाश्वत, नित्यानंदाचा, अनुभवसिद्ध मार्ग आपल्या ग्रंथांतून संतांनी आपल्यासाठी प्रकट केला. अध्यात्ममार्गावरील आपल्या वाटचालीची सुरुवात हे ग्रंथच तर असतात!

Story img Loader