ही एका खजिन्याच्या शोधाची गोष्ट आहे. कादंबरीचा काळ हा ऐतिहासिक आहे, अगदी अकबराच्या काळातला. त्यामुळे त्यात कटकारस्थाने, लढाया, अपहरण, शत्रुत्व अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे ही कादंबरी रोमांचकारी आणि वेधक झाली आहे. आणि त्यामुळेच वाचनीयही.
इतिहास हा असा विषय आहे, कोणाला आवडो न आवडो- त्याच्याशिवाय पुढे जाताच येत नाही. बरं इतिहासात अनेक अताíकक, भन्नाट, रोमांचक, गूढ, रम्य अशा बऱ्याच गोष्टी, उपगोष्टी असतात. त्यातल्या काही खऱ्या तर काही सांगोवांगी असतात. मात्र, त्या गोष्टींना इतिहास असतो हे मात्र खरे. त्यामुळे इतिहासाची ही पाने आपण उलगडू तितकी थोडी. यातलाच एक कथाभाग म्हणजे मलिक काफरचा खजिना..
१२९६ ते १३१६ या कालावधीत दिल्लीत अल्लाउद्दिन खिलजीची सत्ता होती. अर्थातच त्याकाळचे दिल्लीतले सत्ताधारी साम्राज्यवादी होते. त्यामुळे अखंड हिंदुस्तानात आपला एकछत्री अंमल हवा अशी त्यांची इच्छा असायची आणि त्यानुसार मग ते पूर्वेवर, पश्चिमेवर, दक्षिणेवर, उत्तरेवर स्वारी करायचे व तेथील स्थानिक राजांशी संघर्ष करून त्यांना आपले मांडलिक बनवून आपला साम्राज्यविस्तार करायचे. खिलजी तर त्यात अधिक आक्रमक होता. त्याच्या उण्यापुऱ्या दोन दशकांच्या कालावधीत त्याने हिंदुस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यावर आपली सत्ता स्थापण्याचा धडाका लावला होता. दक्षिण भारत त्याला अपवाद नव्हताच. आपल्या विश्वासू सहकाऱ्यांच्या साथीने त्याने दक्षिणेवर स्वारी केली होती. त्यातलाच एक विश्वासू सहकारी म्हणजे मलिक काफर. या मलिक काफरने दक्षिणेतून अमाप संपत्ती लुटली. मात्र, एवढी मोठी संपत्ती लांब दिल्लीपर्यंत नेणे धोक्याचे होते. त्याने मग खिलजीच्या संमतीने ही संपत्ती दडवून ठेवण्याची योजना आखली. एवढी अमाप संपत्ती लपवण्यासाठी त्याने जागा निवडली ती खानदेशाची.. याच खानदेशातील एका नदीच्या तळाशी त्याने ही संपत्ती दडवली आणि एक मोठे सत्य इतिहासाच्या पोटात गडप झाले.. मात्र, पुढे सुमारे २५० वर्षांनंतरही या संपत्तीचा शोध सुरूच राहिला.. अकबराच्या काळात खानदेशचा राजा असफ बेगला या संपत्तीची कुणकुण लागली. शिवाय तिचा ठावठिकाणा माहीत असलेल्या व्यक्तीचाही शोध लागला.. ती कोण, तिच्या मदतीने काफरची संपत्ती त्याला मिळते का, त्या संपत्तीचा विनियोग त्याला कशासाठी करायचा असतो, त्यात तो यशस्वी होतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘द ट्रेझर ऑफ काफर’ या कादंबरीत मिळतात.
‘द शॅडो थ्रोन’ या यशस्वी कादंबरीनंतरची अरुण रामन यांची ही दुसरी कादंबरी. इतिहास आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ करत रामन यांनी या कादंबरीची रचना केली आहे. पुस्तकाचा काळ अकबराच्या काळातला, म्हणजे १५८०चा. अखंड हिंदुस्तानावर मुघल सम्राट अकबराचा अंमल असतो. मात्र, त्याचे विरोधकही असतातच. अशातलाच एक म्हणजे खानदेशचा राजा असफ बेग. खानदेशचा अत्यंत क्रूर राजा अशी त्याची ख्याती असते. प्रजेला जाच देऊन आपल्या संपत्तीत वाढ करण्याचा त्याचा एककलमी कार्यक्रम असतो. सम्राट अकबराला युद्धाचे आव्हान देऊन त्याला नेस्तनाबूत करणे ही त्याची महत्त्वाकांक्षा असते. आता अकबराचा नायनाट करायचा म्हणजे बलाढय़ सन्य हवे, बलाढय़ सन्यासाठी पसे खूप हवेत, त्यामुळेच असफ कायम अस्वस्थ असतो. आपल्याच राज्यात असलेल्या सातपुडा डोंगरांच्या रांगांतून वाहणाऱ्या नदीच्या तळाशी मलिक काफरने अमाप संपत्ती दडवून ठेवली असल्याचे ऐतिहासिक सत्य त्याला समजते. अडीचशे वर्षांपूर्वीची ही संपत्ती नेमकी आहे तरी कुठे याचा त्याला छडा लावायचा असतो. बरं ही संपत्ती एवढी आहे की तिच्या जोरावर तो अकबराशी कित्येक वष्रे लढू शकतो. त्यामुळेच या संपत्तीचा छडा लावायचा या एकमेव उद्देशाने तो पेटून उठतो. त्याच्याच राज्यातल्या सिल्लोडमध्ये राहणाऱ्या एका वृद्धेला, अम्बूला या संपत्तीचा ठावठिकाणा माहीत असतो. बेगला त्याच्या गुप्तचरांकरवी ही माहिती समजते. बरं ही अम्बू काही साधीसुधी वृद्धा नसते. तिला मुक्या प्राण्यांशी बोलण्याचं ज्ञान असतं, तिची आध्यात्मिक शक्ती उच्च प्रतीची असते. शिवाय ती वयाने वृद्ध असली तरी तेजपुंज असते. सिल्लोडमध्ये तिचे स्थान मानाचे असते. अशा या अम्बूला दत्तात्रय नावाचा २० वर्षांचा नातू असतो. आपली सर्व विद्या अम्बूने या नातवाकडे सोपवलेली असते. या आजी-नातवाला कैद करून आपल्या ताब्यात ठेवायचे आणि संपत्तीचा छडा लावून अकबराचे साम्राज्य गिळंकृत करण्याचा कट बेग रचतो. मात्र, त्याच्या या कटाची कुणकुण अम्बूला कंक या कावळ्याकडून लागते. ती मानस कासव, अदिती गाय, शुक्राचार्य पोपट यांना दत्तात्रयला सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देते. त्याची तयारी सुरू असतानाच बेगचे सनिक अम्बूचे अपहरण करतात. दत्तात्रय मात्र मानस, अदिती आणि शुक्राचार्याच्या मदतीने सहीसलामत सुटतो. मात्र, आजीच्या काळजीने त्याचा जीव कासावीस होतो. अखेरीस तो आजीच्या सुटकेसाठी थेट अकबराकडेच मदत मागण्याची योजना आखतो.
दत्तात्रयला त्यासाठी खानदेशाची सीमा ओलांडून बाबर दरवाजा या मुघल साम्राज्याच्या सीमेपर्यंत जाणे अर्थातच भाग असते. बेगचा विश्वासू सरदार रहमतुल्ला खान मात्र त्याचा पिच्छा पुरवतो. परंतु पुन्हा मानस, अदिती, कंक, शुक्राचार्य आणि शहरआझाद (हाही पोपटच, मात्र साधारण चार फूट उंची असलेला.) यांच्या मदतीने तो बाबर दरवाजा गाठतोच. तिथे त्याची भेट राजा मानसिंहाशी होते. अम्बूला माहीत असलेल्या गुपिताची वाच्यता फक्त अकबराकडेच करायची असा त्याचा निर्धार असतो. मानसिंहाच्या मदतीने मग पुढे दत्तात्रय आगर्‍याला पोहोचतो. तिथे तो अकबराची भेट घेऊन सर्व प्रकार कथन करतो. अम्बूची सुटका होते का, अम्बू त्याला काफरच्या दडवलेल्या संपत्तीचा ठावठिकाणा सांगते का, बेगचे मनसुबे सफल होतात का, दत्तात्रय आणि अम्बू पुन्हा भेटतात का, या सर्वाच्या उत्तरासाठी मूळ कादंबरी वाचायला हवी.
कथानकात कुठेही रटाळपणा येणार नाही याची पुरेपूर काळजी लेखकाने घेतली आहे. त्यामुळेच पुढे काय होणार, ही उत्सुकता अगदी पहिल्या पानापासूनच निर्माण होते.  लेखकाने बारीकसारीक तपशील गोळा करून अकबराचे व्यक्तिचित्रण केले आहे. त्याशिवाय मेवाडचे सिंह राणा प्रताप यांच्या मनात असलेली कटुता, राणा प्रताप यांच्या अफाट शौर्याविषयी अकबराच्या मनात असलेले आदराचे स्थान या पाश्र्वभूमीवर त्यांच्यात झालेला संवाद मुळातूनच वाचनीय आहे. शिवाय जारणमारण तंत्राने आपल्या सावजाला मारणारे तारक यांचेही उपकथानक कादंबरीत रोमांच उभे करते. एकूणच रोमांचकारी अनुभवासाठी आणि काफरच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी.
द ट्रेझर ऑफ काफर : अरुण रामन,
पॅन मॅकमिलन, नवी दिल्ली,
पाने : ४००, किंमत : २९९ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा