काही लोक बोलतात खूप आणि लिहितातही खूप. किंवा असं म्हणू या की, ते काही बोललं तरी त्याची बातमी होते, पण त्यांनी काही लिहिलं तर त्याची मात्र तेवढय़ा पटकन दखल घेतली जात नाही. शशी थरुर त्यापैकीच एक. त्यांचे अलीकडच्या काळात जवळपास दरवर्षी एक नवीन पु्स्तक येत आहे. गेल्या वर्षी त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी एक पुस्तक लिहिलं होतं. त्याची तशी थोडीफार चर्चा झाली. त्यानंतर आता त्यांचं नवं पुस्तक येऊ घातलं आहे. पण ते स्वतंत्र नसून संपादित आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत ते बाजारात दाखल होईल असा अंदाज आहे.
पुस्तकाचं नाव आहे ‘इंडिया : फ्युचर इज नाऊ’. त्याचं उपशीर्षक आहे – ‘द व्हिजन अँड रोड मॅप फॉर द कंट्री बाय हर यंग पार्लमेंटरियन्स’. सध्याच्या संसदेमध्ये तरुण खासदारांची संख्या जास्त आहे. हे सर्वच तरुण उच्चशिक्षित आहेत. स्वतंत्र विचाराचे आहेत. आणि त्यांना देशाबद्दल काही स्वतंत्र मतेही आहेत. त्याचंच प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल.
यात अनुराग ठाकूर, संजय जैयस्वाल, कालिकेश सिंग देव, जय पांडा, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे अशा काही खासदारांच्या लेखांचा हा संग्रह आहे. हेच तरुण उद्याचे आपले नेते असणार आहेत. त्यामुळे ते काय म्हणताहेत, या देशातील प्रश्न, समस्या आणि वर्तमानाचे भान याविषयीचं त्यांचं आकलन नेमकं कसं आहे, आहे ते बरोबर आहे की नाही, याचा पडताळा या पुस्तकातून घेता येऊ शकतो.
तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आरोग्य, पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, राजकीय सुधारणा, सर्वासाठी शिक्षण असा अनेक विषयांवर या तरुण खासदारांनी आपली मते आणि विचार मनमोकळेपणाने व्यक्त केले आहेत.
हे विषय तसे कळीचे आणि महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या प्रश्नांवर या तरुण खासदारांचा कस लागणार आहे हे नक्की.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा