इंटरनेटच्या क्रांतीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात जन्माला आलेल्या रीडिफ डॉट कॉमचे जनक अजित बालकृष्णन यांचे हे पुस्तक इंटरनेट क्रांतीचा आढावा घेत भविष्यातील परिणामांचे गांभीर्यही स्पष्ट करते. आपल्या आसपास झालेली परिवर्तने आणि त्यांची आर्थिक परिमाणे उलगडवत हा प्रवास मांडला गेल्याने तो रोचक झाला आहे.
आज ज्याला आपण इनोव्हेशन-नावीन्य या अर्थाने स्वीकारले आहे ते खरे तर आधीपासून स्थापित क्रिया, पद्धती, तंत्रप्रणालीच्या अंताचा घंटानादच बनून पुढे आले आहे. इंटरनेटच्या सार्वत्रिकीकरणाला आज २५ वष्रे उलटली आहेत. माहिती महाजालाचे द्वार जनसामान्यांना खुल्या करून देणाऱ्या या क्रांतीने नव्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला जन्माला घातले. पण आजच्या मुक्त बाजारव्यवस्थेतही या नव्या ज्ञानाधारित व्यवस्थेच्या रुजुवातीने केवळ माध्यम अथवा संचारच नव्हे, तर जवळपास सर्वच क्षेत्रांत बरीच उलथापालथ घडवून आणली. जुन्याची धूळधाण करूनच नव्याची वहिवाट जर खुली होत असेल, तर पुढे जाऊन आज जनामनाचा अभिन्न हिस्सा बनलेल्या इंटरनेटला वरचढही असे काही नक्कीच पुढे येईल. ही उत्सुकतावजा भीतीच या इंटरनेट लाटेचे भारतातील सुरुवातीचे पाईक आणि रीडिफ डॉट कॉमचे संस्थापक अजित बालकृष्णन्  ‘द वेव्ह रायडर’ या पुस्तकातून व्यक्त करतात. उत्साहदायी सोडाच, पण लाक्षणिक अर्थाने अपशकुनी म्हणता येईल अशी सुरुवात आणि त्यानंतरच्या इंटरनेटच्या जगद्व्यापी विस्तीर्ण विश्वात टक्केटोणपे खात झालेल्या विहाराचे कथारूपातील सादरीकरण म्हणजे हे पुस्तक होय. पण सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे या वास्तव कथेतील घटना आणि पात्र हे अगदी सहजगत्या आसपासच्या तंत्रज्ञान विश्वातील बदलांचा झपाटा आणि त्यांची आíथकदृष्टय़ा परिमाणे उलगडून सांगतात.
सत्तरीचे दशक हे स्वातंत्र्योत्तर जन्मलेल्या तरुणाईचे अस्वस्थतेचे दशक म्हणून ओळखले जाते. त्या काळात आयआयएम कोलकातामधील शिक्षणात अनुभवलेला नक्षलबारी चळवळीचा उदय ते संगणक संचाचे आधी भारतीयीकरण आणि पुढे जाऊन घरगुतीकरण अशा सामाजिक-तंत्रवैज्ञानिक-आíथक पर्यावरणातील संघर्ष आणि स्थित्यंतरांचे साक्षीदार नव्हे सक्रिय भागीदार या नात्याने  बालकृष्णन् यांचा चिंतनाचा व्यापक आवाका या पुस्तकातून स्पष्टपणे झळकताना दिसतो. त्यामुळे हा केवळ इंटरनेट विश्वाचा ताजा वेध नव्हे तर गत ३०० वर्षांतील जगभरातील तंत्रज्ञानात्मक उत्क्रांतीचा आणि त्याबरोबरीने घडत आलेला सामाजिक-आíथक बदल आणि त्याला लाभलेल्या राजकीय साद-प्रतिसादांचा इतिहासपट ठरतो.
रीडिफ्युजन या नावाने अत्यंत यशस्वी ठरलेल्या जाहिरात व्यवसायातून वळण घेऊन बालकृष्णन यांना इंटरनेटचा ध्यास जडला आणि रीडिफ डॉट कॉमच्या रूपाने त्याने मूर्तरूप धारण केले. १९९५ सालचे ते सुरुवातीचे दिवस. त्या काळी दक्षिण मुंबईतील तरी तुलनेने किमान भाडे भरावे लागेल अशी जागा निवडून सुरू झालेल्या या व्यवसायाला पहिला एकमेव ग्राहक लाभला तो न्यूझीलंडमधील एका महिलेच्या रूपाने. प्रयोग नवीन आणि अभिनव असला तरी वार्षकि १६०० रुपये वर्गणी भरून लोकांनी तो स्वीकारावा, या अपेक्षेचा पार विचका व्हावा अशीच एकंदर स्थिती होती. पण हे असे असले तरी विकसित जगाला तोवर डॉट-कॉमच्या ज्वराने पुरते कवेत घेतले होते. तोळामासा जीव असलेल्या रीडिफला त्यातून मग दररोज नवनव्या व्यवसायबाह्य़ आव्हानांचा सामना करावा लागत होता. साहसी भांडवलदार गुंतवणुकीच्या राशी खुल्या करून दाराशी उभे आहेत, अथवा या ना त्या इन्व्हेस्टमेंट बँकेचा प्रतिनिधी अमेरिकेच्या शेअर बाजारात सूचिबद्धतेचा अर्थात आयपीओचा प्रस्ताव घेऊन हजर झाला आहे, हे बालकृष्णन यांच्यासाठी नित्याचे बनले. इंटरनेट विश्वात सूक्ष्मसा ठिपका असलेल्या रीडिफला गिळंकृत करण्याचेही प्रयत्न सुरू होतेच. किंमत सांगा, क्षणाचाही विलंब न लावता चुकती करतो, अशी भुणभुण सारखी सुरूच असे. त्यातच अमेरिकेच्या मॅनहॅटनसारख्या कठोर न्यायासनासमोर लोभी वकिलाकडून क्लास अ‍ॅक्शन कज्जाचा ससेमिरा सुरू झाला. अखेर न्यूयॉर्कच्या नॅसडॅक शेअर बाजारात सूचिबद्धतेच्या आग्रहापुढे त्यांनी नमते घेतले. लंडन, हॅम्बर्ग, हाँगकाँग, सिंगापूर, न्यूयॉर्क, बोस्टन आणि सॅन फ्रान्सिस्को वगरे भूमंडळावरील वित्तीय साम्राज्याची सर्व आगारे आणि तेथील दिग्गज गुंतवणूकदारांच्या प्रश्न-शंकांचे समाधान करत, त्यांची मनधरणी करण्याचे काम अनिच्छेने अंगावर आले. पण तरी खूपच नवख्या असलेल्या रीडिफच्या प्रत्येकी १२ डॉलरला समभाग विक्रीच्या प्रस्तावाला अपेक्षेपेक्षा सरस प्रतिसाद लाभला. नॅसडॅकवरील पदार्पणातच प्रत्येकी २० डॉलरने सौद्यांना शुभारंभ झाला. प्रतिकूल बाजारस्थितीत त्या वर्षी यशस्वी ठरलेल्या आयपीओमध्ये रीडिफची गणना झाली. आयपीओचे यशापयश हे त्या काळीही गुंतवणूकदारांना बाजारातील पहिल्या पावलानिशी कंपनीचा समभाग किती लाभ मिळवून देतो यावर ठरत असे.
नफाक्षमता नगण्य, पण बाजारमूल्य अवाच्या सव्वा अशी स्थिती नॅसडॅकवर सूचिबद्ध अनेक डॉटकॉम कंपन्यांबाबत होती, त्यात खरे तर ही नवीन यशस्वी भर होती. पण रीडिफच्या भागविक्रीला भारताची विशाल संगणकक्षम लोकसंख्या आणि पर्यायाने अमर्याद व्यवसायशक्यतेचे कोंदण तरी होते. १९९५ मध्ये व्यक्तिगत दोन लाख डॉलरची मिळकत गुंतवून सुरू झालेल्या व्यवसायाने पाच वष्रे खस्ता खाल्ल्यानंतर, परिसस्पर्श झाल्याप्रमाणे अवघ्या काही मिनिटांत ३० कोटी डॉलरचे मूल्यांकन मिळवावे, हा नव्या वित्तव्यवस्थेचा करिश्मा जसा होता, तसा रीडिफच्या गुंतवणूकदारांना भारताची या नव्या तंत्रक्रांतीला आसुसलेली महाकाय जनसंख्या खुणावणारी असल्याचीही जाणीव होती.
विकसित जगतातील डॉटकॉमच्या ताणलेल्या फुग्याला टाचणी लागावी, बरोबर त्या काळात रीडिफने त्या प्रांगणात उडी घेतली. लोकांच्या गरजा, पसंतीक्रम बदलतो, तसा तंत्रप्रणालीनेही बदल करत आणावा आणि पर्यायाने व्यवसाय आराखडय़ानेही अपेक्षित वळण घ्यावे असे धडे गिरवतच सुरुवात झाल्याने रीडिफची नौका या वादळात सुखरूप तरून गेली. पुढे २००० सालच्या आणि नंतर २००८च्या भयानक वित्तीय संकटांचे अरिष्ट उभे ठाकले. न्यूयॉर्कच्या जागतिक व्यापार केंद्राचे जुळे मनोरे अर्थात आíथक महासत्ता अमेरिकेच्या वित्तीय साम्राज्याचा मानिबदू जमीनदोस्त होत असताना त्यांनी पाहिली. एओएल आणि नेटस्केप यांसारखी जुन्या रुळलेल्या नाममुद्रा लुप्त झाल्या, तर त्यांच्या जागा घेत फेसबुक आणि गुगल ही नावे सर्वतोमुखी झाली.
कोणत्याही नव्याचे सर्जन हे प्रस्थापिताच्या विलोपातून होत असते, असा अर्थसिद्धान्त सर्जनशील विनाश या नावाने प्रसिद्ध आहे. अमेरिकी अर्थतज्ज्ञ जोसेफ शूम्पीटर त्याचा जनक. त्या आधी मार्क्‍स आणि एंगल्सचा कम्युनिस्ट जाहीरनामा आला. त्यात लौकिक अर्थाने हा शब्दप्रयोग वापरात आला नसला तरी सर्वप्रथम याच सिद्धान्ताच्या पायावर वर्गीय विलोपातून नव्या समाजघडणीचा मार्ग त्यांनी जगाला दाखवून दिला. बालकृष्णन् यांना शूम्पीटरप्रेरित ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’मधून जन्म घेणाऱ्या नावीन्याची भीती म्हणण्यापेक्षा उत्सुकताच आहे. पण त्या आधी ओघानेच येणाऱ्या ‘डिसर्प्टिव्ह इनोव्हेशन’ची म्हणजे उपद्रवी धुडगुशीची चिंता त्यांना सतावते आहे. माहितीच्या युगातील ही धुडगूस काय आणि कोणता उपद्रव माजवेल याचा थांग लावणे कठीण आहे. पण तो जनमाध्यमांच्या फायद्यांनाही मात देणारा ठरू शकतो, असा इशारा बालकृष्णन् आवर्जून देतात.      
द वेव्ह रायडर – अ क्रॉनिकल ऑफ द इन्फम्रेशन एज : अजित बालकृष्णन्,
प्रकाशक : मॅकमिलन, नवी दिल्ली,
पाने : २१३, किंमत : ५९९ रुपये.

Story img Loader