स्त्रीचे, व्यक्तिस्वातंत्र्य मिळविणे आणि विकसित करणे, ही प्रक्रिया अनेक टप्प्यांतून जात आहे. बहुतेक चळवळींच्या विद्रोही टप्प्यात, जहालमतवाद उफाळून येणे, ही अवस्था अटळ असते. पण या अवस्थेचे, जर सार्वत्रिक तत्त्वज्ञान बनविले गेले तर ते तत्त्वज्ञानच, मुक्तीमार्गातील अडथळा बनू शकते. कारण विभिन्न वर्गात, देशांत, टप्प्यांवर, पिढय़ांत आणि वयांतसुद्धा आव्हानेही वेगळी आणि उत्तरेही वेगळी असतात.
जगात चळवळी अनेक आहेत. पण जिचा विजय निश्चित आहे आणि नजरेच्या टप्प्यात आहे अशी फक्त एकच चळवळ आहे. ती म्हणजे स्त्री-चळवळ. हे एवढय़ा आत्मविश्वासाने म्हणता येते, कारण मानवी इतिहासात, निर्णायक व परत मागे जाता न येणाऱ्या अशा काही घटना घडल्या आहेत की ज्यांच्या आधारे विजय निश्चित आहे असे वस्तुनिष्ठपणे म्हणता येते.
१. एकत्र कुटुंबपद्धती नष्टप्राय होणे. (फूट पडू नये याखातर स्त्री-पुरुषांना विलग ठेवून त्यांच्यावर संवाद-सहवास-बंदी घातली गेली व कामजीवन अपवित्र मानले गेले. तसेच ज्येष्ठांची हुकूमशाही रुजली) २. लोकशाही येऊन स्त्रीला मताधिकार मिळणे. ३. स्त्रीला घराबाहेर रोजगार मिळणे. ४. गर्भनिरोधक साधने उपलब्ध व प्रचलित होणे. ५. अनेक घरकामांचे औद्योगिकीकरण होणे. ६. संपर्कशक्ती आणि माध्यमे सर्वत्र पोहोचणे. ७. युद्धासकट सर्व व्यवहारातील उपकरणांमुळे ‘शारीरिक ताकद’ अप्रस्तुत बनणे. हे सात, असे भीमटोले आहेत, की ज्यांच्यापुढे पुरुषशाहीचे चलाख प्रतिडाव व सुप्त मानसिक अवशेष निष्प्रभ ठरणे अटळ आहे. अनेक कारणांनी स्त्रियांच्या दास्याच्या-दुय्यमतेच्या तीव्रता आणि परी वेगळ्या असतात. ज्यांच्यावर ठोस अत्याचारच होत आहेत त्यांना लागणारी ताबडतोबीची सुटका पुरविण्याचे कार्य वेगळे असते. ज्यांचे दुय्यमपण जास्त सूक्ष्म (सटल) असते त्यांना लागणारी वैचारिक साधने अगदीच वेगळी असतात. सटल अवस्थेत प्रस्तुत ठरणारे सिद्धान्त जर ढोबळ अवस्थेत लागू केले तर ‘बाजारात तुरी आणि भटीण भटाला (!) मारी’ असे होऊन आपण का भांडतोय हे कोणालाच कळेनासे होते. तिसऱ्या पिढीचे वैराग्यविरोधी बंड  
स्त्री-चळवळीबाबत जरी आशादायक चित्र असले, तरी ‘स्त्रीवादा’ची जी वैचारिक प्रारूपे नेहमीप्रमाणे पश्चिमेत उत्पन्न होऊन (माझा आक्षेप ‘पश्चिमेत’ला अजिबात नाही.) विद्यापीठांतून पाझरत आहेत, ती अनावश्यक गोंधळ निर्माण करीत आहेत. अगोदरच बऱ्यापकी स्वतंत्र बनलेल्या स्त्रियांच्या, व्यक्ती म्हणून चालू असलेल्या आत्मशोधात, विघ्ने आणत आहेत. कसेही करून त्यांच्यात ग्रस्ततागंड टिकवून ठेवण्यासाठी, ‘खाजवून खरूज काढणे’ व जगातील प्रत्येक गोष्टीकडे पुरुषसत्ताक कारस्थान म्हणून बघणे, ही विघातक शिकवण देऊ पाहत आहेत.
अशा नको इतक्या ताणलेल्या स्त्रीवादाविरुद्ध, पश्चिमेतील तरुणीच बंड करू लागल्या आहेत. ‘मी नाही होणार आईसारखी शुष्क’, ‘या स्त्रीवादी सनातन्यांची दहशत नको’, ‘रडक्या स्त्रीवादाकडून हसऱ्या स्त्रीवादाकडे’, ‘स्त्री म्हणून फुलू देणारा स्त्रीवाद’, ‘विजय साजरा करण्यात वाईट ते काय?’ अशा आशयसूत्रांनी युक्त पुस्तके त्या प्रकाशित करीत आहेत. आता हेही विद्यापीठांत पाझरायला विद्यापीठीय विलंब लागेलच. म्हणूनच ही सुवार्ता मी बाहेरच परस्पर देऊन टाकत आहे.
मी स्त्रीवादी असूनही आनंदी कशी (किंवा कसा)? असा प्रश्न पडणे व ज्याअर्थी आनंदी आहे त्याअर्थी प्रस्थापितशरण तर नाही ना, अशी चिंता वाटणे ही एक गोची असते. दु:खांना वाचा फोडणे, अन्यायाविरुद्ध चीड येणे, कुप्रथांवर हल्ला चढविणे, त्यात झीज सोसणे हे आवश्यकच असते. पण ते पुरेसे नसते. मानसिक ऊर्जेचे अर्थशास्त्र कधीच विसरून चालत नाही. संघर्षांसाठी लागणाऱ्या ऊर्जेचे पुनर्भरण करण्यासाठी आणि एरवीसुद्धा वट्टात सुखी असावे लागते. तितपत समन्वयवाद म्हणजे संधिसाधूपणा नव्हे. तसेच माझा परिवर्तनवाद हा अस्सल प्रतिसाद म्हणून उमटला पाहिजे. अमुक वर्तुळात प्रतिमा टिकविण्यासाठी सुखाच्या संधी सोडणे, हाही अहंकाराचा संधिसाधूपणाच असतो. आपल्या मानसिक अर्थशास्त्राचे ऑडिट करण्याचा अधिकार, विद्रोही समूहाच्या स्वयंघोषित धुरीणांना देऊन टाकणे, म्हणजे नवी गुलामी पत्करणे असते. असे केल्याने, ना आपण स्वत:शी प्रामाणिक राहतो, ना चळवळीशी!  तिसऱ्या पिढीचे बंड हे या गोचीतून सुटण्याचे बंड आहे. ‘उलटी अडकणूक म्हणजे सुलटी सुटका नव्हे,’ हे त्यांचे सामान्य तत्त्व दिसते. साचेबद्ध प्रतिमांच्या आहारी न जाणे, हे महत्त्वाचे आहेच. पण याचा अर्थ असा नव्हे की उफराटय़ा-साचेबद्ध प्रतिमांत अडकावे! पारंपरिक स्त्रीची साचेबद्ध प्रतिमा विरुद्ध विद्रोही स्त्रीची साचेबद्ध प्रतिमा, यापकी कोणतीच ‘मला’ न्याय देणारी नसूही शकते. माझी स्वत:शी सर्वाधिक आत्मीयता ज्यात आहे ते सतत निवडायचे असते. मग ते योगायोगाने पारंपरिकही निघेल! लादलेल्याला शरण न जाणे हे महत्त्वाचे आहे. माझे स्वातंत्र्य टिकवून, मी पुरुषांना पूरक ठरले किंवा आवडले, तर मी गद्दार ठरते की काय? असा सवाल या मुली उभा करीत आहेत.
‘शाही’ झुगारणे म्हणजे पुरुषद्वेष नव्हे
काही प्रमाणात स्त्रियाही पुरुषशाहीच्या एजंट बनतात व काही प्रमाणात पुरुषही पुरुषशाहीचे जाच सोसत असतात. त्यामुळे समोरील व्यक्ती ही स्त्री आहे की पुरुष, एवढय़ावरून ती कोणत्या बाजूने असेल, हे ठरवता येत नाही.
आपल्याला स्त्री-व्यक्ती-धार्जण्यि आणि स्त्री-समूह-वाद यात फरक करता आला पाहिजे. कोणतीही स्वातंत्र्यप्रेमी व्यक्ती (सरासरी स्थिती पाहिल्याने) स्त्री-धार्जणिी असणे स्वाभाविक आहे. पण यातही एक मेख आहे. जे सरासरीने खरे असते, ते प्रत्येक प्रकरणात खरे नसते. त्या त्या प्रकरणातील न्याय्य बाजू कोणती हे प्रकरणाच्या मूल्यमापनात (मेरिट्समध्ये) शिरूनच ठरविले पाहिजे. पण हे भान सुटून, सरासरीवर आधारित बाजू घेणे, म्हणजे काही वेळा अन्यायाच्या बाजूने उभे राहणे ठरते आणि समूहवादी ठरते. म्हणूनच न्यायप्रेमी व्यक्तीने सर्वच आघाडय़ांवर समूहवाद टाळला पाहिजे. स्त्रीची बाजू जास्त आस्थेने समजावून घेणे एवढय़ा अर्थाने आपण स्त्री-धार्जणिे असलो पाहिजे, यावर दुमत होऊ नये. मात्र ‘स्त्रीवादी’ असणे ही वेगळी गोष्ट आहे.
जहाल-स्त्रीवाद असे मानतो की, आतापावेतो जमा झालेले सर्व मानवी ज्ञान, बहुतांश पुरुषांनी घडविलेले आणि म्हणून शंकास्पद आहे. मानवाची जगाविषयी, स्वत:विषयी, अशी संपूर्ण समजच, स्त्री-केंद्री ज्ञाननिर्मितीद्वारे बदलणार आहे. या भूमिकेशी मी असहमत आहे. कारण स्त्री-पुरुषांत भेद आहे हे खरे असले तरी सामायिक-मानवीही बरेच काही आहे. त्यामुळे स्त्रीवादी ज्ञानशास्त्रच (फेमिनिस्ट एपिस्टेमॉलॉजी) वेगळे असेल, हे शक्य नाही.  जहाल स्त्रीवादाचे दुसरे एक टोक असे की, सर्व मानवी दुर्गुणांचे मूळ हे ‘नर’ असण्यात आणि सद्गुणांचे मूळ ‘मादी’ असण्यात शोधणे!
मानवी सद्गुण व दुर्गुण हे प्रत्येक मानवी व्यक्तीत कमी-अधिक प्रमाणात असतातच. त्यापकी वाव कशाला मिळेल हा व्यवस्थेचा प्रश्न असतो. तसेच सद्गुण-दुर्गुण जरी तेच असले, तरी ते कसे अभिव्यक्त होतील, याच्या शैली मात्र स्त्रीविशिष्ट व पुरुषविशिष्ट असतात, हे बऱ्याच अंशी खरे आहे. लहानपणीसुद्धा मुलगे मारामाऱ्या करतात व मुली एकमेकींविषयी अफवा पसरवतात असे एक निरीक्षण आहे. हा शैलीतला भेदसुद्धा सरसकट लागू पडतो असे नाही. व्यक्तीची जनुकीय, संस्कारबद्ध आणि स्व-निर्णित जडणघडण अनन्य असतेच. त्यामुळे काही पुरुषांची शैली काहीशी बायकी व तसेच उलटपक्षी स्त्रियांतही आढळते.
मुख्य मुद्दा असा की, उफाळून येणारे दुर्गुण हे सत्तास्थानामुळे आहेत की जेंडरमुळे? गल्लत अशी होते आहे की, सत्तास्थानी पुरुष जास्त प्रमाणात असणे, ही वस्तुस्थिती वेगळी आहे आणि पुरुषांतच नरत्व-अंगभूत जुलमीपणा असतो हे सामान्यीकरण वेगळे. सत्तास्थानी स्त्रियाही कशा पोचतील, वा सत्तास्थानेच कशी बरखास्त वा सौम्य करता येतील, याचा कार्यक्रम वेगळा आणि त्यांना पुरुषद्वेष्टय़ा बनवणे, हा कार्यक्रम वेगळा आहे. जहाल-स्त्रीवादाने, काचोळ्यांच्या होळ्या करणे, लेस्बियनिझमला मुक्तीची आवश्यक अट मानणे, पुरुषांना नकोसे वाटेल असा पेहराव व आविर्भाव राखणे, अशा प्रतिक्रियावादी गोष्टी केल्या. त्याच वेळी स्वत: (दुर्गुणांसकट) पुरुषासारखे बनण्याचा प्रयत्नही केला.
सर्वच प्रश्नांचे जेंडरीकरण कशाला?
आणखी एक घोटाळा टाळला पाहिजे. स्त्री-व्यक्तीला अनेक प्रश्न असतात. ती कामगारही असेल तर तिला कामगार-प्रश्न असतात. तिला जातीय, धार्मिक, आíथक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, वार्धक्याचे असे सगळेच प्रश्न असतात. ते ते प्रश्न हे त्या त्या क्षेत्रानुसार सोडवावे लागतात. कोणताही प्रश्न हा, स्त्रीला आहे याखातर, ‘स्त्रीप्रश्न’ बनत नसतो. इतर प्रश्नांतही स्त्रीत्वाचे अंग असू शकते. उदा. कामगार स्त्रीची लैंगिक छळवणूक हा नक्कीच ‘स्त्रीप्रश्न’ आहे. पण उदा. जास्त तास राबवणे हा ‘कामगारप्रश्नच’ आहे. जिथे तिथे ओढूनताणून जेंडर आणणे हे एकारलेपणाचे आणि संभ्रम उत्पन्न करणारे आहे व तेही टाळले पाहिजे.
जिथे अद्याप काहीच यश आलेले नाही, तिथे चळवळ पोहोचवणे महत्त्वाचे आहे. पण ते सोडून जिथे बऱ्यापकी यश आलेले आहे, तिथे कोरून कोरून जेंडर काढत बसण्याचा अट्टहास कशाला?
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.  त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा