श्रुती कोहलीने स्त्रीला तिच्या आयुष्यात वठवाव्या लागणाऱ्या विविध भूमिका आणि स्त्रीने आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र आणि परिपूर्ण असण्याची गरज, आर्थिक गुंतवणूक कशी करावी हे स्वत: जाणून घेण्याची आवश्यकता, स्वतंत्र व्यवसाय सुरू करताना पाळावयाची काही पथ्यं इत्यादी गोष्टींना प्राधान्य देऊन, प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळालेलं व्यवहारज्ञान ‘द पेटिकोट जर्नल- मनी अॅण्ड द इंडियन वुमन’ या पुस्तकात अतिशय सोप्या, प्रभावी आणि रंजक पद्धतीने मांडलं आहे.
स्त्रीला वठवाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांचा ‘कन्या’, ‘बहीण’, ‘गर्लफ्रेंड’, ‘वधू’, ‘पत्नी’, ‘आई’, ‘विशेष गरजा असलेल्या मुलाची आई’, ‘सासू’, ‘सून’, ‘मैत्रीण’, ‘एकटी स्त्री’, ‘व्यावसायिक स्त्री’ आणि ‘स्वतंत्र उद्योजक’, अशा प्रकरणांतून वेध घेतला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी एक थिअरी मांडली आहे.
‘कन्या’ पहिल्याच प्रकरणात ‘द फिलिअल अकाऊंटेबिलिटी थिअरी’ सांगितली आहे. कुटुंबातील लोक तुमच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे घरखर्चाला हातभार लावला पाहिजे, असे ती सांगते. एकुलत्या एक असाल तर पालकांची जबाबदारी उचलण्याचा, भुणभुण करणाऱ्या आईशी किंवा वडिलांशी मैत्री करण्याचा, बरीच भावंडं असतील तरी त्यांनी आईवडिलांना मदत करण्याची वाट बघत न बसण्याचा, इतर भावंडांना सल्ले देण्यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रुती देते.
‘बहीण’ या प्रकरणात कुटुंबातील भाऊ बहिणीवर पारंपरिक दृष्टिकोन असल्याने तिच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणं आणि तिच्यासाठी निर्णय घेणं, हे कसं ठरवून टाकतात, ते धीटपणे मांडलं आहे. त्याला ‘स्पॅशिअल डेफिनिटिव्हनेस थिअरी’ म्हटलं आहे. मदतीचा हात द्या, पण भावंडांना तुमच्यावर अवलंबून असलेलं बनवू नका. ती मिळवती झाल्यावर आर्थिक मदत करणं थांबवणं, नोकरी नसेल तर साध्या राहणीचा अंगीकार करणं आणि भावंडांना स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा मार्ग दाखवणं, हे उदाहरणासह स्पष्ट केलं आहे.
‘गर्लफ्रेंड’ या प्रकरणाची थिअरी आहे ‘द इंटिग्रेटेड माइंडफुलनेस थिअरी’. बेकार बॉयफ्रेंडला टाळणं, सांकेतिक भेटींसाठी गेल्यावर स्वत:च्या खिशातून बिल भागवणं किंवा आपापलं बिल भरणं, श्रीमंत पुरुषाबरोबर डेटिंगला गेल्यावर परिणामांना सामोरं जाण्याची तयारी नसेल तर आर्थिकदृष्टय़ा लाभदायक रिलेशनशिप्सना नाही म्हणणं, बाहेर जाताना दोघीही स्त्रिया असतील तर आपापलं बिल देणं, एकत्र राहत असाल तर घरखर्च वाटून घेणं, या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, असं श्रुती सांगते.
हुंडा, लग्नप्रसंगी मिळणाऱ्या भेटवस्तू, लग्नाचा खर्च आणि या गोष्टींवरून उद्भवणारे वादविवाद यांचा ‘वधू’ या प्रकरणात ऊहापोह केला आहे. या संदर्भातली थिअरी आहे, ‘द न्यूप्टायल सेंसिबिलिटी थिअरी’. हुंडय़ाच्या देवाणघेवाणीला ठामपणे नकार देतानाच भेट म्हणून आलेल्या वस्तू सरळ चॅरिटीला देण्याचं ती सुचवते. या प्रकरणात तिने सुचवलेली, वाग्दत्त वराची निवड करताना वधूमध्ये जर स्पर्धात्मक प्रवृत्ती असेल तर तुमच्यापेक्षा कमी मिळवणारा वर शोधा, हा सल्ला मात्र बराचसा खटकतो. भारतीय मानसिकतेप्रमाणे किंवा अगदी पुरुषांच्या मानसिकतेनुसार स्वत:पेक्षा जास्त पगार घेणारी वधू ही त्यांचा इगो दुखावणारी ठरू शकते.
‘पत्नी’ या प्रकरणात ‘द रॅशनल अॅग्रेशन थिअरी’ मांडली आहे. पत्नीने आर्थिक बाबतीत अग्रेसर राहणं, गुंतवणुकींच्या बाबतीत शिकून घेणं, कुटुंबासाठी अंदाजपत्रक बनवणं, तार्किक दृष्टीने विचार करणं, नवऱ्याच्या व्यसनाला न स्वीकारता ते सुटत नसेल तर त्यालाच गुडबाय करणं.. श्रुतीच्या मते संसारात विनर्स किंवा लुझर्स नाहीत. तो चालू ठेवणं महत्त्वाचं.
दुसऱ्याकडून आíथक मदत घेणं किंवा उधार-उसनवार करणं टाळणं, निवृत्तीनंतरच्या काळासाठी आधीच आर्थिक नियोजन करणं, गुंतवणुकीबद्दल नवऱ्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता त्याचे तपशील माहीत करून घेणं, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर सौहार्दपूर्ण संबंध राखण्यासाठी परस्परांतील आर्थिक व्यवहारांत चोख राहणं, स्वत:च्या स्त्रीत्वाचा उपयोग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही पद्धतीने करण्याचं निक्षून टाळणं, स्वत:चा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी कोणतीही तडजोड न करणं, पगारवाढ मागायला न कचरणं, स्त्री एकटी असल्यास करिअरच्या पहिल्या दहा वर्षांत आर्थिक नियोजन करणं, करिअरसाठी सोपा मार्ग स्वीकारण्याचं टाळणं, इझी मनी टाळणं, कोणत्याही कारणाने आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडणार नाहीत याची खबरदारी घेणं इत्यादी बाबींवर श्रुतीचा भर आहे.
हे पुस्तक लिहिताना प्रामुख्याने भारतीय समाजातली उच्च मध्यमवर्गीय कुटुंबं नजरेसमोर ठेवली असली तरी थिअरीज थोडय़ाफार फरकाने कनिष्ठ मध्यमवर्गीयांनादेखील उपयुक्त ठराव्यात.
काही मूलभूत प्रश्नदेखील श्रुतीने उपस्थित केले आहेत. मिळवती झाली म्हणून स्त्री खरोखरच आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असू शकते का? स्त्रियांची परावलंबी मानसिकता त्याला कितपत जबाबदार आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नसल्याची कडवट प्रतिक्रिया देताना श्रुती म्हणते, ‘यशस्वी स्त्रीला तिचं श्रेय देण्याऐवजी किंवा महत्त्वाकांक्षी स्त्रीला समजावून घेण्याऐवजी आपल्या स्त्रीत्वाचा त्या चलाखीने उपयोग करत असाव्यात, असाच ग्रह सर्वसामान्य करून घेतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.’
स्त्रीची भूमिका कोणतीही असो, पैसा तिच्या आयुष्यात प्रमुख भूमिका बजावतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ विवंचनेपासून मुक्ती असं नाही, तर आजच्या जगात बऱ्याच गोष्टी ठरवण्यात पैसा कळीचा मुद्दा असतो. त्यासाठी या पुस्तकाचा हॅण्डी गाइड म्हणून उपयोग होऊ शकतो.
द पेटिकोट जर्नल –
मनी अॅण्ड द इंडियन वुमन :
श्रुती कोहली,
रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : २२७, किंमत : २९५ रुपये.
shobhana_shiknis@yahoo.com