रिकामपणाचे उद्योग करण्यात केंद्रीय मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री शशी थरूर यांचा हात कुणी धरणार नाही. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबतचे कायदे अधिक कडक करण्याची चर्चा सुरू झाल्यावर काही संबंध आणि कारण नसताना या थरूर महाशयांनी या कायद्याला बलात्कारित मुलीचे नाव देण्याची सूचना केली. असे नाव देण्याने तिला सलामी देता येईल, असे सांगून आपल्या बुद्धीचे दिवाळे काढण्याची त्यांची हौस नवी नाही. यापूर्वी आपल्या असल्याच गुलहौशी वर्तनामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला होता. सरकारात मंत्री झाले म्हणजे पंचतारांकित हॉटेल हे आपले निवासस्थान होऊ शकत नाही आणि त्याचे बिल सरकार देऊ शकत नाही, एवढेही भान नसलेल्या या मंत्र्यांना प्रत्येक जाहीर कार्यक्रमात आपल्या पत्नीला बरोबर नेण्याची गरज वाटते. तिच्याबद्दल त्यांच्या मनात असलेला जिव्हाळा जाहीरपणे सांगण्याचीही त्यांना घाई असते. मंत्री म्हणून आपल्या खात्यातील मूलभूत बदलांकडे लक्ष देण्याऐवजी ट्विटर आणि फेसबुकसारख्या माध्यमांतून जगाशी संपर्क साधत बसण्याएवढा वेळ त्यांच्याकडे असतो, हेही आक्रीतच म्हटले पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रात होऊ घातलेले बदल आणि त्याबद्दल जगात होत असलेल्या चर्चा ऐकल्यानंतर भारतातील त्या खात्याच्या मंत्र्याची खरे तर झोप उडायला हवी; परंतु आपल्या मंत्र्यांना भलत्याच उद्योगांमध्ये रस असतो, हे पुन:पुन्हा सिद्ध होते. शशी थरूर हे उच्चशिक्षित आहेत. भारतीय प्रशासनातील परकीय सेवांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते सगळे सोडून केरळमधून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार होण्याची संधी मिळताच, त्यांनी आपला हा सगळा अनुभव विसरायचे ठरवलेले दिसते. मागे कोचीच्या क्रिकेट संघाच्या मालकीबद्दल भलते प्रश्न न विचारण्याचा आदेशवजा सल्ला त्यांनी दिला होता. त्याने ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून पायउतारही व्हावे लागले होते. पुन्हा संधी मिळाल्यानंतर शांतपणे आपले काम करत राहणे पसंत करण्यापेक्षा रोज वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्धीच्या झोतात येण्याची त्यांची धडपड कशासाठी आहे, ते समजू शकत नाही. पालकांचा विरोध नसेल तर दिल्लीतील बलात्कारित मुलीचे खरे नाव नव्या कायद्याला द्यावे, अशी सूचना थरूर यांनी ट्विटरवरून जाहीरपणे केली, पण मंत्री असूनही ते ही सूचना सरकारला करू शकत नाहीत, कारण व्यक्तींची नावे कायद्यांना देण्याची तरतूद देशात कोठेही नाही. म्हणूनच या कृतीमुळे ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचा खुलासा काँग्रेसला करावा लागला. एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रगीताची ध्वनिमुद्रिका वाजू लागल्यानंतर ती मध्येच थांबवून उपस्थितांना छातीवर हात ठेवून राष्ट्रगीत म्हणायला सांगून अपमान केल्याबद्दलचा थरूर यांच्यावरील खटला प्रलंबित आहे. आपली हुशारी भलत्याच मार्गाला वळवण्याऐवजी थरूर यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे. इकडे थरूर यांनी संबंधित मुलीचे नाव कायद्याला देण्याची सूचना केली, तर तिकडे काँग्रेसचे वाचाळ प्रवक्ते दिग्विजय सिंह यांनी तिचा आता मृत्यू झाल्यामुळे आता ते प्रकरण बलात्काराऐवजी खुनाच्या सदरात मोडते, असा जावईशोध लावला आहे. खून असल्याने आता तिचे नाव जाहीर करण्यास हरकत नाही, अशीही त्यांची मागणी आहे. असल्या नेत्यांच्या तोंडी आपला पक्ष दिल्यानंतर काय आफत ओढवते, याचा अनेकदा अनुभव घेऊनही काँग्रेसला काही शहाणपण सुचत नाही, असाच याचा अर्थ होतो.
थरूर यांची थेरं
रिकामपणाचे उद्योग करण्यात केंद्रीय मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री शशी थरूर यांचा हात कुणी धरणार नाही. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबतचे कायदे अधिक कडक करण्याची चर्चा सुरू झाल्यावर काही संबंध आणि कारण नसताना या थरूर महाशयांनी या कायद्याला बलात्कारित मुलीचे नाव देण्याची सूचना केली.
First published on: 04-01-2013 at 02:59 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theory of shashi tharoor