ज्यात प्रत्यक्षात गल्लती, गफलती आणि गहजब झाले/ चालू आहेत, एकेक अशी प्रकरणे/प्रथा घेऊन त्यांची चिकित्सा करणारे लेखांक या मालिकेत असतीलच. त्याचबरोबर  नेमका विचार करण्यासाठी लागणाऱ्या आयुधांची ओळख करून देणारे लेखांकही असतील. आजचा लेखांक अशाच एका भन्नाट आयुधाविषयीचा आहे.
‘जब तक एक भाई बोलेगा तब तक एक भाई सुनेगा, जब एक मुजरिम बोलेगा तब एक पुलीस अफसर सुनेगा’, ‘मं एक वकील की हैसियत से नहीं बल्कि दोस्त के हैसियत से ये सलाह दे रहा हूं’ अशा संवादांतून व्यक्ती आणि ती कोणत्या भूमिकेतून वागते आहे यातील फरक स्पष्ट होत असतो. अ‍ॅश-ट्रेपासून पेपरवेट बनवायला कोणती प्रक्रिया लागेल? जर अ‍ॅश-ट्रे पुरेसा जड असेल तर कोणतीच लागणार नाही. पेपरवेट म्हणूनच वापरला की झाले. याला इंग्लिशमध्ये अ‍ॅश-ट्रे युज्ड क्वा (qua) पेपरवेट असे म्हणता येते. आपण जर हे क्वा वापरायला शिकलो तर किती गल्लती टाळू शकतो हे आज पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर ‘क्वा’ हे प्रकरण काय आहे याची अधिक ओळख करून घेऊया.
तत्त्वज्ञानात एकमेकांना कूटप्रश्न विचारण्यासाठी कृत्रिम शृंगापत्ती (पॅराडॉक्स) निर्माण करण्याची एक फॅशन होती. त्यापकी एक पाहा. ‘स्वत:ची हजामत करत नाहीत अशांचीच हजामत करणारा तो हजाम, तर मग हजामाची हजामत कोण करणार?’ हा ‘बार्बर्स पॅराडॉक्स’ म्हणून गाजलेला आहे. त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. बार्बर, क्वा बार्बर, शेव्हज सच पर्सन्स हू डू नॉट शेव्ह देमसेल्व्हज. हजाम,  ‘हजाम या नात्याने’ स्वत:ची हजामत न करणाऱ्यांची करतो. असे म्हटले की ‘व्यक्ती या नात्याने’ तो स्वत:ची करण्यास मोकळा! क्वासाठी,  ‘या नात्याने’, ‘च्या भूमिकेतून’ ‘अमुकत्वेकरून’, ‘अमुक म्हणून पाहता’, ‘अमुक-अंगाने’ अशी बरीच मराठी रूपे सांगता येतील.
एका नाण्याला किती बाजू असतात?
एखादे नाणे हे टॉस करण्यासाठी फासा (डाइस) असेल. छापील किमतीनुसार अमुक इतके पसा-एकक असेल. द्रव्य म्हणून,  समजा अ‍ॅल्युमिनियम, त्याहून स्वस्त असेल (नाही तर वितळविले जाईल). कोणत्या तरी काळातल्या नाणी जमविणाऱ्यांसाठी दुर्मीळ वस्तू असेल. ते आकाराने चपटा सिलेंडर असेल. ते कॉइनबॉक्स-डिस्पेन्सर उदाहरणार्थ, पब्लिक बूथ टेलिफोनमध्ये एकाच वेळी आदान (पेमेंट) आणि स्विच किंवा किल्ली अशी दोन काय्रे करत असेल. तबकात टाकल्यावर आवाज झाला पाहिजे असाही त्याचा उपयोग असेल. छाप म्हणजे राज्यसंस्थेचे प्रतीक आणि काटा (तराजू) हे बाजारपेठेचे प्रतीक यातून ते व्यवस्थेचे प्रतीकही ठरते. ‘एकाच नाण्याच्या दोन बाजू’ हा दृष्टान्त म्हणून छान आहे, पण तीही एक ‘बाजू’ झाली. मग एकूण ‘बाजू’ किती असतात? आपण नाण्याकडे काय काय म्हणून पाहू शकतो यानुसार या प्रश्नाचे उत्तर ठरते. नाणे क्वा पसा, नाणे क्वा वस्तू, नाणे क्वा प्रतीक वगरे.
टेलिफोन नंबर ही संख्या नसते. ३३३३३३ हा नंबर दोनदा फिरवल्याने ६६६६६६ हा नंबर लागणार नसतो. जरी अंकांचा वापर असला तरी टेलिफोन नंबर, वाहनाचा नंबर, कैदी नंबर ही सारी विशेषनामेच असतात. ती पासवर्डसारखी वापरता येतात. त्यात अंकासोबत अक्षरेही चालतात. एमएच १२ म्हणजे पुण्याचा माणूस असे विनोदही केले जातात, किंबहुना ओळीने अंक आल्यास ती संख्या म्हणून (क्वा संख्या) घ्यावी की विशेषनाम म्हणून (क्वा विशेषनाम) घ्यावे हे स्पष्ट करण्यासाठीच हॅश (#) हे नवे चिन्ह वापरात आले. वैदिक मंडळी मंत्रांकडे भाषिक अर्थ म्हणूनच नव्हे, तर निसर्गाचे पासवर्ड म्हणूनही बघत असत. हे बरोबर होते का नाही हा मुद्दा अलाहिदा.
बहुअंगी स्वरूपाला साजेसे वैचारिक आयुध
कागदावर काढलेले लंबवर्तुळ (एलिप्स) हे समोरून पाहिलेल्या एलिप्सचे चित्र म्हणून पाहायचे, की कोनातून पाहिलेल्या वर्तुळाचे चित्र म्हणून पाहायचे? हे आपण संदर्भावरून जराही विचार न करता ठरवत असतो. काय म्हणून पाहता ‘असे असे’, म्हणजेच ‘क्वा’ हे आपल्यात इतके भिनलेले आहे, पण त्यांची स्पष्टोक्त मांडणी मात्र, तत्त्वज्ञानाच्या वर्तुळाबाहेर, सामान्य धारणांत (कॉमनसेन्स) पोहोचलेली नाही.
‘चांगला दगड’ हा शब्दप्रयोग अर्थपूर्ण होण्यासाठी, कशासाठी चांगला? याचे उत्तर द्यावेच लागेल. धार लावायला की स्वत:च धारदार, पाटा-वरवंटा बनवायला की गोफणीतून मारायला की वळणदार शिल्पे कोरायला? इत्यादी. कोणत्या प्रकारच्या गवताला ‘तण’ म्हणावे? याचे उत्तर वनस्पतीशास्त्रीय नसून अर्थशास्त्रीय आहे. जे ‘पीक’ नाही पण पिकाचे पोषण खाते ते ‘तण’. ऑर्गॅनिक शेतीच्या एखाद्या प्रवाहात कशालाच तण मानू नका असाही दंडक असेल! आऊटपुट कशाला मानायचे हे ठरल्याशिवाय इनपुट्सचा उचित-व्यय कोणता आणि अप-व्यय कोणता हे कसे ठरणार?
एका व्याख्यानात मी असे म्हणालो की, एक जन्म टाळल्याने १२ हजार मनुष्यदिवसाचा संप होतो. संततिनियमन हे श्रमिकहिताचे आहे. त्यावर एक गृहिणी उसळून म्हणाल्या, जन्मासारख्या गोष्टीकडे तुम्ही ‘असे’ बघता? यावर मी म्हणालो, तुमच्या मिस्टरांचा विमा उतरवलाय ना? मग तुम्ही काय त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन म्हणून बघता? घटनेचे वा कृतीचे एखादे अंग प्रस्तुत मानून काही निष्कर्ष काढला तर त्याचा अर्थ असा नव्हे की, इतर अंगांना तुच्छ लेखले असेल. जन्म टाळल्याने श्रमशक्तीचा पुरवठा कमी होतो हेही खरे आहे आणि व्यक्तीच्या मृत्यूने कुटुंबाच्या उत्पन्नाचा एक स्रोत थांबतो हेही खरे आहे, पण म्हणजे जन्माला आणि मृत्यूला फक्त तेवढाच अर्थ आहे असे नाही. कोणत्या प्रश्नात कोणते अंग सारभूत ठरते हे नेमकेच पाहिले पाहिजे. सर्वागीण, समग्र असे म्हणत प्रश्न धूसर करणे हीच उलट पळवाट आहे. मानवी संबंधात तर ‘क्वा’चे महत्त्व आणखीच वाढते. कारण (कोणत्याही) दोन व्यक्ती परस्परांशी अनेक नात्यांनी संबंधात येऊ शकतात. प्रत्येक व्यक्ती प्रसंगोप्रसंगी अनेक भूमिका (रोल्स) धारण करत असते व उतरवूनही ठेवत असते.   
क्वा-अभावी राजकीय विचारात होणारे घोटाळे
तमिळ-अतिरेकी हे जन्माने हिंदू असतात, पण यावरून ते हिंदू-अतिरेकी ठरत नाहीत, कारण त्यांचा अतिरेकीपणा हा तमिळ या नात्याने केलेला असतो, हिंदू या नात्याने नव्हे. तसे काय कित्येक नक्षलवादीसुद्धा हिंदू आहेत, पण ते माओधर्मीय अतिरेकीच ठरतात. इहवादातील ज्या प्रवाहात ‘धर्माचे’ दुर्गुण ओतप्रोत भरले आहेत ते प्रवाह इहवादी असूनही धर्मच ठरतात. स्त्री-व्यक्ती ही कामगार असली आणि तिला काही ‘कामगार-प्रश्न’ असले तर तेही ‘स्त्री-प्रश्न’ म्हणून गणले जावेत काय? म्हणजेच तो प्रश्न निर्माण होण्यात तिचे स्त्री असणे निर्णायक (सार) आहे की ती स्त्रीदेखील आहे इतकेच(अ-सार)? सारासार विवेक हा या अर्थाने करायला हवा. मराठी माणसे पंक्चर काढायला तयार होत नाहीत हा काही केरळी माणसांचा दोष नसतो. मुख्य म्हणजे यात भाषा हा मुद्दा अवांतर असतो, सारभूत नव्हे.
एखादी विद्यार्थी संघटना जर उदाहरणार्थ फी-वाढविरोधी आंदोलन करत असेल तर ते ‘ग्राहक-चळवळी’तील आंदोलन ठरते, पण तीच जर सिलॅबस बदला अशी मागणी करत असेल तर ते ‘विद्यार्थी-चळवळी’तील आंदोलन ठरते.
आत्महत्या केलेला माणूस शेतकरी आहे एवढय़ावरून ती शेतकऱ्याची आत्महत्या ठरत नाही. त्याला नाडणारा खासगी सावकार हाही एक शेतकरी असू शकतो. एक गरीब माणूस अल्पसंख्याकही आहे याचा अर्थ तो अल्पसंख्याक असण्यानेच गरीब राहिला असा होत नाही. मंडल आयोगाने मागासपणा ठरविताना आर्थिक निकष लावला हे तितकेसे खरे नाही. कारण निकष हा व्यक्तीला लावलेला नाही. एखाद्या जातीतील वर्गीय निम्नस्तर जर दुरवस्थेत असतील तर ती अख्खी जातच मागास गणण्यात आली, यामुळे ज्या जातीत अंतर्गत आर्थिक विषमता तीव्र असेल तिच्यातील उच्चस्तर विनाकारण मागास ठरले.
युनियन कार्बाइड ही कंपनी बहुराष्ट्रीय असण्याने भोपाळ दुर्घटना घडली की भारतीय फॅक्टरी-इन्स्पेक्टर, भारतीय अधिकारी, भारतीय कामगार संघटना, भोपाळचे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इत्यादींच्या ‘पुण्याई’ने घडली हे न तपासताच ठरविता येणार नाही.
‘मुलीला मुलगाच माना’ अशी जाहिरात सरकार करते. स्त्री-पुरुष समानतेची उद्घोषणा म्हणून पाहता ही जाहिरात चूक ठरते, कारण तीत मुलग्याचे श्रेष्ठत्व मुदलात मान्य केल्यासारखे होते. स्त्री म्हणून वैशिष्टय़पूर्ण राहूनही ती व्यक्ती तितकीच गौरवास्पद आहे हा मुद्दा दुर्लक्षित राहतो, पण स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने जाताना, अलीकडच्या टप्प्यावरील एक ‘प्रेरक म्हणून पाहता’ ही जाहिरात योग्यच ठरते, कारण मुलग्याचे श्रेष्ठत्व मानून का होईना, पण मुलीला जास्त चांगली वागणूक मिळायला सुरुवात तर व्हावीच ना?
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल :

Story img Loader