सभ्य माणसांचा खेळ समजल्या जाणाऱ्या गोऱ्या लोकांच्या क्रिकेटमध्ये पैशांच्या लालसेने होणारे असभ्य आणि अनैतिक वर्तन आता नवे राहिलेले नसले, तरीही आयपीएलमध्ये घडलेल्या स्पॉट फिक्सिंगच्या घटनेने पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा विस्फारल्या आहेत. खेळ सुरू होण्यापूर्वीच सामन्याचा जय-पराजय ठरवण्यासाठी होणाऱ्या प्रचंड आर्थिक उलाढालीने काहीच वर्षांपूर्वी क्रिकेट जग हादरून गेले होते. त्या वेळी असा अनैतिकतेचा गुन्हा करणाऱ्यांना जर आयुष्यभराची शिक्षा झाली असती, तर कदाचित आज असे काही करण्यास कुणी धजावले नसते. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पोलिसांनी केलेल्या पहिल्याच कारवाईत एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या खेळाडूंना अटक करण्यात आल्याने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आयपीएल हा खेळ आहे, की करमणूक असा वाद निर्माण करून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू झाला असला, तरीही नैतिकतेचा मुद्दा बाजूला ठेवताच येत नाही. आयपीएल जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये आले, तेव्हा सर्वच जण सुखावले. खेळाडूंचा लिलाव होऊ लागला आणि त्यांना गलेलठ्ठ पैसाही मिळू लागला. याच पैशाची हाव वाढत गेली. गेल्यावर्षी आयपीएलमध्ये सर्वप्रथम स्पॉट फिक्सिंग प्रकरण घडले, तेव्हाच जिथे धूर दिसतो, तिथे काहीतरी जळत असणार याची जाणीव सर्वाना झाली होती. काही वर्षांपूर्वी जागतिक क्रिकेटला मॅच फिक्सिंग प्रकरणाने ढवळून काढले होते. त्या वेळी मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीची प्रकरणे भारतात उजेडात आली. मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, अजय शर्मा, मनोज प्रभाकर या क्रिकेटपटूंवर बीसीसीआयने कठोर कारवाई केली. परंतु ही सारी मंडळी आता राजरोसपणे वावरत आहेत. अझरुद्दीन आता खासदार झाला आहे, तर जडेजा टीव्हीवर क्रिकेट समालोचक म्हणून उजळ माथ्याने वावरत आहेत. एखाद्या वर्षांपुरते मैदानाबाहेर ठेवण्याची शिक्षा देण्याच्या यापूर्वीच्या निर्णयांना क्रिकेट संघटनांमधील राजकारण कारणीभूत होते. आता हा विषय थेट पोलिसांकडे सोपवण्यात आल्याने त्यामध्ये या संघटनांनी ढवळाढवळ न करणेच इष्ट ठरणार आहे. आयपीएलचे क्रिकेट म्हणजे २०-२० षटकांचे वेगवान मनोरंजन. इथे चीअर लीडर थिरकतात, गलेलठ्ठ उद्योगपती, बॉलीवूडमधले कलावंत आणि राजकारणी अशा सगळ्यांनाच या खेळात रस. सामन्याचा निकाल क्षणार्धात या संघाकडून, त्या संघाकडे झुकतो. खेळाडूंना मालकांकडून पैसा मिळतो आणि मालकांना अन्य ठिकाणांहून. खेळाचे खेळपण हरवत चाललेल्या या सामन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या धुंदीने सारा देश बेहोशीत असतानाच, ही अटकेची बातमी आल्याने सारे वातावरण काही काळ कुंद होणार. या साऱ्या अतिउत्साहामुळेच आयपीएल क्रिकेटबद्दल संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. पण बीसीसीआयला आयपीएलचा फक्त पैसा दिसतो. त्यामुळे त्याच्या दुष्परिणामांकडे कानाडोळा केला जातो, त्याचीच ही फळे आहेत. महत्त्वाच्या संघांचे आव्हान समोर उभे ठाकल्यावर दुखापतीचे कारण पुढे दटावणारे अनेक भारतीय खेळाडू आयपीएल आले की तंदुरुस्त होऊन मैदानावर जोमाने वावरताना दिसतात. काही खेळाडूंनी तर देशासाठी खेळायचे, विश्वचषक जिंकायचे ही सारी स्वप्ने टाळून फक्त आयपीएल खेळायचे अशी स्वप्ने जोपासायला सुरू केल्याचे प्रत्ययास येत आहे. पैशाने खेळातील नैतिकतेला दिलेले हे आव्हान वेळीच स्वीकारले, तर या खेळातील मजा किरकिरा होणार नाही आणि सभ्य लोकांचा खेळ अशी त्याची ख्याती टिकून राहील.
ये तो होना ही था!
सभ्य माणसांचा खेळ समजल्या जाणाऱ्या गोऱ्या लोकांच्या क्रिकेटमध्ये पैशांच्या लालसेने होणारे असभ्य आणि अनैतिक वर्तन आता नवे राहिलेले नसले, तरीही आयपीएलमध्ये घडलेल्या स्पॉट फिक्सिंगच्या घटनेने पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा विस्फारल्या आहेत.
First published on: 17-05-2013 at 05:38 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This must be happend