भारत आणि पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश, यांविषयी भारतात राहणाऱ्या वेगवेगळ्या माणसांची मतं निरनिराळी असू शकतात आणि एकमेकांच्या मतस्वातंत्र्याचा आदर केला नाही, तर परस्परांना ‘भारतीय’ म्हणून पाहणंही अशक्य बनतं. मतस्वातंत्र्य आणि त्याला जोडूनच येणाऱ्या (भारतात तर घटनादत्त) अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अनादर करण्याची हुकमी युक्ती म्हणजे, ‘उगाच बोलायचं म्हणून बोलू नका’ अशा अर्थानं दरडावणं! पण पाकिस्तान, भारत, बांगलादेश या त्रयींपैकी एखाद्या देशाबद्दल दुसऱ्या देशातलं माणूस बोलतं, त्याला काही ऐतिहासिक कारणं असू शकतात. हा इतिहास फक्त फाळणीचा, त्यानंतरच्या विस्थापनाचा किंवा थेट आणि छुप्या युद्धाचाच असतो असं नाही. अखेर, आपापल्या देशांचा राजकीय इतिहास हाच ‘आपला इतिहास’ असं नागरिकांनी मानणं इष्ट समजलं जातं, पण हे करताना, आपापले कौटुंबिक इतिहास या राजकीय इतिहासाशी किती विसंगत आहेत, असंबद्ध आहेत, याची जाणीव या तिघा देशांमधल्या अनेकांना, अनेकदा होत आली आहे आणि असणार. फाळणीची किंवा बांगलादेशमुक्तीची पिढी आता जुनी झाली, नवी आली, तरीही या नव्या पिढीला तो खासगी, कौटुंबिक इतिहास टाळणं अवघड आहे. ‘धिस साइड, दॅट साइड’ हे ३९ चित्रकथांचं पुस्तक म्हणजे, अशा ऐतिहासिक विसंगती उघड करून दाखवणारा, मानवता वगैरे गुळगुळीत शब्दांना चित्रमयतेचं टोक देणारा आणि देश, संस्कृती, बंधुता अशा मूल्य-संकल्पनांबद्दल विचार करायला लावणारा दस्तावेज आहे.
या पुस्तकाची काही वैशिष्टय़ं आधी सांगितली पाहिजेत. मॅक्स मुल्लर भवन या भारतातील जर्मन सांस्कृतिक संस्थेच्या सहयोगानं तीन देशांतले अनेक तरुण एकत्र येऊ शकले. हे तरुण ‘ग्राफिक नॅरेटिव्ह’ या प्रकारात- चित्र-शब्दमय वर्णनं साकारण्याचं काम करणारे होते. तिथल्या एकत्र येण्यातून पुढे, आपण काही तरी केलं पाहिजे अशी कल्पना पुष्ट होऊ लागली आणि त्यांच्यापैकी सर्वात उत्साही (आणि हुशारही) विश्वज्योती घोष यानं आवश्यक तिथं या चित्र-शब्दकारांची गाठ दुसऱ्या कुणाशी घालून देऊन, अशा प्रकारे वाढलेल्या समूहाला एकत्र ठेवून एका संग्रहाचा ऐवज त्यांच्याकडून तयार होईल याची उस्तवार केली. म्हणजे तीन देशांतली ६०हून अधिक माणसं या पुस्तकाचे सहयोगी आहेत. त्यांचे परिचय त्या-त्या कथेच्या आधी देताना, दिल्ली, पुणे, बेंगळुरू, अतारी, लाहोर, कराची, ढाका, चितगांव.. असं वाचता वाचता ‘एपार बांग्ला’ असंही कुठे तरी आहे.. सध्या बेंगळुरूत राहणाऱ्या अरुंधती घोषच्या परिचयातच, ‘एपार’ (भारत) आणि ‘आपार’ (बांगलादेश) ही एके काळच्या अखंड बंगालची वाहती जखम अलगद ताजी झाली आहे.
तब्बल ३९ चित्रकथा असलेलं हे पुस्तक, पण चित्रपद्धतींचं वैविध्य केवढं तरी आहे, हे जाणवत राहतं. शब्द आहेत, पण त्यातही भावनिक आंदोलनांपासून ते ‘जे घडले ते’ सांगण्यापर्यंत आणि स्वत:च्याच कुटुंबाची किंवा स्वत:चीच गोष्ट सांगण्यापासून ते ‘इथं हे आहेत’ असा तटस्थ दृष्टिकोन घेण्यापर्यंतचं वैविध्य आहे. खुद्द विश्वज्योती घोषनं पुस्तकाच्या अखेरीला, चार पानांवर आठ चेहऱ्यांचे भाग अशा तऱ्हेनं छापले आहेत की, त्यांचे ४० चेहरे व्हावेत! हे करण्यासाठी त्यानं फक्त पानं दोन ठिकाणी आडवी कापून, त्यांचे तीन समान भाग केले. हे सारे चेहरे याच तीन देशांतले आहेत आणि कोण कुठल्या देशातलं हे अजिबात ओळखूच येणार नाही, हे निराळं सांगायला नको. ‘तीन भाग > तीन देश; दोन छेद > (भारताच्या दृष्टीनं) दोन सीमा’ हा योगायोग नक्कीच मानू नये. हा एक शब्दाविना केवळ चित्रांचा अपवाद वगळता, बाकी साऱ्या चित्रकथा (किंवा चित्रांसह ‘न-कथा’ आहेत). चित्रवाचनाची आवड अधिक असेल, तर पुस्तकातल्या ‘मेक इट युअर ओन’ (शब्द : सायबरमोहल्ला- दिल्ली, चित्रं : अमिताभ कुमार) आणि मेहरीन मूर्तझाची ‘बास्टर्ड्स ऑफ युटोपिया’ या चित्रकथा आधी वाचाव्यात. मूर्तझा यांनी डॅनिएल श्रेबर यांच्या- १९०३ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘मेमॉयर्स ऑफ माय नव्र्हस इलनेस’ या महत्त्वाच्या पुस्तकातली काही वाक्यं नि डिजिटल चित्रं यांच्या साह्य़ानं या उपखंडातल्या माणसांचं उपखंडाबाहेरच्या ‘प्रगत’ देशांचं आकर्षण हा कसा मनोरोग आहे हे अस्फुटपणे दाखवून दिलं आहे. ‘बुल्ला की जाणां मै कौण’ या २० वर्षांपूर्वीच्या हिट गाण्याचे गायक रब्बीसिंग यांनी त्यांच्याच ‘वायमार कॅबरे’ या गाण्याच्या आधारानं- १९४७ पासून सुरू झालेला तमाशा किमान २०४७ पर्यंत कसा सुरूच राहणार, हे समजणाऱ्यांना बरोब्बर समजेल असं सांगितलं आहे. त्यापेक्षा समजायला सोपी चित्रमय मांडणी, बानी अबीदी हिनं केली आहे. भारतीयाच्या कोंबडीचं अंडं पाकिस्तानी शेजाऱ्यानं चोरल्याची बातमी भारतीय टीव्हीवर, तर हीच बातमी अगदी उलटी (पाकिस्तान्याची कोंबडी..) पाकिस्तानी टीव्हीवर, अशी सुरू असल्याच्या व्हिडीओ फितीतील ही काही दृश्यं.. उपहासगर्भ. चित्रकार बानी ही जन्मानं पाकिस्तानी आणि आता भारतीय सून आहे!
बाकीच्या अनेक चित्रकथा मात्र ‘गोष्टी’ आहेत! यापैकी सर्वात सुगम-सुलभ अशी गोष्ट २०६व्या पानापासून सुरू होणारी, सलमान रशीद (लाहोर) यांनी सांगितलेली आणि मोहित सुनेजा (दिल्ली) यांनी चित्रबद्ध केलेली. जालंदरला रशीद यांना आपलं जुनं घर शोधूनही सापडत नाही, पण कुणी वयस्कर दर्शनसिंग भेटतो, ‘लाहोरचे’ हे ऐकता क्षणी रशीद यांना घरीच घेऊन जातो आणि आदरातिथ्य करतो. हा लाहोरी शीख, लाहोरपासून दुरावलेला. त्याच्या बालपणीच्या आठवणींची ही कहाणी! तशी नेहमीचीच, पण लाहोरचं चिरतारुण्य उलगडणारी. याउलट, लाहोरातून दिल्लीत स्थायिक झालेल्या कुटुंबातला मरतड खोसला आणि लाहोरचा अहमद रफी आलम यांची ‘९०, अप्पर मॉल रोड’ ही गोष्ट लंडनमध्ये घडते. दोघे रूम पार्टनर. एके दिवशी मरतड अहमदला गमतीनं म्हणतो, ‘ओये भें**, तू घरभाडं द्यायचंस मला’- कारण त्याला अहमदचा पत्ता कळलेला असतो. अप्पर मॉल रोडवरल्या ज्या घरात अहमद वाढला, ते मरतडचं आजोळ होतं फाळणीपूर्वी! दोघांची मैत्री आज अधिकच घट्ट आहे, याची साक्ष त्यांनीच साकारलेल्या या चित्रकथेतून मिळते. काश्मीरच्या अगदी टोकाशी (टेटवाल इथं) गेलेल्या आरिफ अयाझ पारे या पत्रकाराला ओढय़ाच्या पलीकडल्या ‘पाकिस्ताना’तून एक गृहस्थ, अलीकडल्या ‘भारतीय’ गृहिणीशी ओरडून गप्पा मारताना दिसतो.. जाताना तो गृहस्थ, एक पुरचुंडी ओढय़ापल्याड फेकतो.. अळिंब्या -मशरूम- असतात त्या! तिथंच चांगल्या मिळतात, म्हणून. ही कथा किंवा नीना सबनानी यांनी सांगितलेली कच्छमध्ये वसलेल्या सिंधी कुटुंबांची कथा किंवा मालिनी गुप्ता आणि द्युती मित्तल यांनी साकारलेली ‘द टबू’ ही राणाघाट निर्वासित छावणीत मोटर-गॅरेज चालवणाऱ्या महिलेची कथा.. या गोष्टी राजकीय संघर्ष आणि दैनंदिन जगण्यातला संघर्ष यांचा संबंध उघड करणाऱ्या आहेत.
बांगलादेश स्वतंत्र होणार आणि आपलं आता इथं काही खरं नाही, अशी चिंता कराचीतल्या बंगाली (त्या काळच्या शब्दांत, मूळचे पूर्व पाकिस्तानी) कुटुंबांना वाटू लागल्यावर कसंही करून या ‘पश्चिम पाकिस्ताना’तून सुटण्यासाठी त्या ४१ बाप्ये-बायका-मुलांची कशी घालमेल झाली, याची गोष्ट खदीमुल इस्लाम (ढाका) यांनी सांगितली आणि सर्बजीत सिंग यांनी चित्रबद्ध केली आहे. त्याच सुमाराला घडलेली एक विचित्र गोष्टही आहे.. ढाक्यात कामगार म्हणून आलेले बिहारी (मुस्लीम) वडील आणि बंगाली आई यांना झालेल्या मुलीला वर्षांनुर्वष निर्वासित छावणीतच जगावं लागतं, लग्नाचं वय निघून गेलं तरी ती तशीच (तिची बहीण मात्र भारतात जाण्यात यशस्वी होते).. हे अडकलेल्या चिमणीचं जिणं ‘द लिटिल विमेन’ या कथेत सईदा फरहाना (ढाका) यांनी मांडलं, ते मुंबईच्या नीतेश मोहंतीनं चित्रबद्ध केलं. ढाक्याच्याच ‘जीनिव्हा कॉलनी’ची कथा जर्मन छायाचित्रकार मरियम लिटवा यांनी छायाचित्रांतून शब्दांसह मांडली आहे.
पण असे आजच्या पिढीतले अनुभव पाकिस्ताननिर्मितीपर्यंत जात नाहीत. बहुतेक तरुणांच्या आजी-आजोबांनी फाळणीच्या जखमा झेलल्या, त्यांच्या आठवणींमधून त्यांचे अनुभव नातवंडांपर्यंत पोहोचले. आज त्याकडे केवळ जगायला शिकवणारे, परीक्षा घेणारे किंवा राजकीय आकांक्षांचा फोलपणा उघड करणारे अनुभव म्हणून कसं पाहता येतं, हे वाचकाला आपसूक कळेल अशा काही कथा आहेत. यापैकीच एक, दिवंगत लेखिका व सामाजिक कार्यकर्त्यां अमिया सेन यांचं त्या वेळचं अनुभवकथन. बांगलादेशी निर्वासितांसह काम करण्याची जबाबदारी पार पाडताना प्रश्न पडतात : हे निर्वासित माणसं नाहीत का? त्यांच्या मुलांना शिकता यावं म्हणून बोर्डिगात घालायला सांगणारी मी, माझ्या नातवाला मात्र स्वत:च्या नजरेपासून दूर होऊ देईन? निर्वासितांना जे वाटतं त्यावर भावनिक हट्ट असा शिक्का मारणारी मी कोण.. किंवा ही यंत्रणा तरी कोण?
आपल्या भारतीय आजी-आजोबांची मुळं पाकिस्तानातच कशी घट्ट होती, अशाही गोष्टी आहेत. ‘माझी आजी नूरमियाँचाच सुरमा वापरायची, पण तो पाकिस्तानात गेला’ ही हिंदी कवी विद्रोही आणि टीना राजन यांनी साकारलेली गोष्ट किंवा ‘माझे आजोबा भारतात, धंदाच करू शकले नाही’ ही अंकुर आहुजानं सांगितलेली गोष्ट.
दोन प्रेमकथा आहेत, दोन्ही बांगलादेश- पश्चिम बंगाल यांच्यात घडणाऱ्या. दोन्हींत मुलगी भारतीय, मुलगा बांगलादेशी हिंदू. मुलीची सहमती मिळवून तिच्यासह अनेक सुखदु:खं एक जण वाटून घेतो, दुसरा मुलीला काही विचारतच नाही.. पण दोन्ही कथांचा शेवट एकच : मुलगा बांगलादेशात परत, कारण मुलगी तिथं जाणार नाही.
खरेपणा या पुस्तकात भरपूर आहे, तो केवळ सत्यकथांमुळे नव्हे. गोष्ट सांगताना आणि ती चित्रांतून मांडताना नव्या, तरुण जाणिवांचा सहभाग असल्यामुळे त्या जखमा, ती दु:खं यांच्याकडे पाहण्याची निराळी दृष्टी इथं आहे. ती दृष्टी कोरडी नाही, पण ओलाव्याचे कढ गाळून नेमकी ओल टिपण्याचं काम काळानंच जणू केलं आहे. इतिहासाकडे आरपार पाहून, जाणिवांचा खरेपणाच तेवढा टिकवून तो सर्जकतेनं मांडला जाणं, हा पुस्तकाला वाचनीय आणि अद्वितीयसुद्धा करणारा भाग आहे. असं पुस्तक गेल्या ६० वर्षांत कधी झालं नव्हतं, ते आता झालं आहे.
abhijit.tamhane@expressindia.com
आर पार: दक्षिण आशियाई तरूणाई
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातल्या तणावांच्या मुळाशी जाणाऱ्या तब्बल ३९ चित्रमय कथा, त्यापैकी निम्म्याहून अधिक सत्य घटनांवर आधारित, असं पुस्तक यापूर्वी (गेल्या ६० वर्षांत) झालेलं नाही. त्यामुळेच, या निराळ्या पुस्तकाबद्दल सविस्तर..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-03-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This side that side