अमेरिकी स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती या पाश्चात्त्य जगाचा आधुनिक इतिहास घडवणाऱ्या संघर्षांना थॉमस पेन यांच्या निबंधांनी वैचारिक ऊर्जा पुरवली. थॉमस पेनचा वैचारिक प्रवास विशद करणारे आणि त्याच्या समकालीनांनी या विचारांना कसा प्रतिसाद दिला याचा धांडोळा घेणारे पुस्तक केवळ ‘वैचारिक चरित्र’ सांगून थांबत नाही. संघर्षांना वैचारिक पाठबळाची गरज किती आणि का आवश्यक असते, याची गाथाच हे पुस्तक मांडते..
अमेरिकन राज्यक्रांतीला वैचारिक इंधन पुरवणारा आणि फ्रेंच राज्यक्रांतीची धग जिवंत ठेवणारा विचारवंत म्हणून थॉमस पेनकडे पाहिले जाते. ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील अमेरिकी वसाहतींनी स्वतंत्र व्हावे, असा विचार त्याने ‘कॉमन सेन्स’ या पुस्तिकेतून मांडला. तर एरवी पुरोगामी, परंतु आश्चर्यकारकरीत्या राजेशाहीची तळी उचलत ‘रिफ्लेक्शन्स ऑन द रिव्होल्यूशन इन फ्रान्स’ नामक पुस्तक लिहून फ्रेंच राज्यक्रांतीला विरोध करणारा ब्रिटिश विचारवंत एडमंड बर्क याच्या विचारांचा प्रतिवाद करण्यासाठी पेनने ‘राइट्स ऑफ मॅन’ हे पुस्तक लिहिले. तेव्हापासून हे पुस्तक जगभरातील सर्व उदारमतवादी आणि मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या चळवळींच्या तत्त्वज्ञानाचा पाया बनून राहिले आहे. पेनच्या विचारांनी प्रभावित झालेल्या विसाव्या शतकातील महत्त्वाच्या विचारवंतांमध्ये ख्रिस्तोफर हिचन्सचा समावेश होतो. किंबहुना, त्याला विसाव्या शतकातील थॉमस पेन म्हणूनच संबोधले गेले. ज्या उदारमतवादी परंपरेशी हिचन्स नाते सांगतो, तिचा उद्गाता असलेल्या पेनचे जागतिक इतिहासातील स्थान, त्याच्या विचारधारेची समकालीन आणि नंतरच्या वैचारिक चळवळीवरील झाक, ‘डिक्लरेशन ऑफ राइट्स ऑफ मॅन’ या त्याच्या ग्रंथाचा सव्वादोनशे वष्रे उलटूनही कायम असलेला प्रभाव या गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ख्रिस्तोफर हिचन्सने पेनवरील ‘थॉमस पेन्स राइट्स ऑफ मॅन’ हे चरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. पेनच्या त्या पुस्तकाने अमेरिकेतील राजकीय चळवळीला सद्धान्तिक बठक प्राप्त करून दिल्याचे या पुस्तकातून विशद करतानाच हिचन्स पेन कार्याची महती गाताना म्हणतो, ‘ज्या काळात मानवी हक्क व कार्यकारणभावाचा आग्रह या दोन्हीही गोष्टींवर छुपे वा खुलेआम हल्ले होतील, त्या काळात अशा प्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी थॉमस पेनचे आयुष्य व लेखन आपणास ऊर्जा पुरवत राहील.’
हिचन्सने हे पुस्तक पेनचे आयुष्य आणि त्याचे साहित्यिक कार्य अशा दोन भागांत विभागले आहे. परंतु या पुस्तकाचा मुख्य भर ‘राइट्स ऑफ मॅन’मधून पेनने बर्कच्या विचारांचा केलेला प्रतिवाद व त्यातून प्रतििबबित होणारे त्याचे राजकीय तत्त्वज्ञान यावर आहे. पेन व हिचन्स, दोघेही मूळचे इंग्लंडमधले. पण राजकीय विचारवंत म्हणून त्यांची ओळख पक्की झाली ती ते अमेरिकेत स्थलांतरित झाल्यानंतर. क्रांती अमेरिकेच्या उंबरठय़ावर आलेली असतानाच पेनचे अमेरिकेत आगमन झाले होते. त्याने ‘कॉमन सेन्स’ ही पुस्तिका लिहून अमेरिकन वसाहतींवर लादण्यात आलेल्या ब्रिटिश साम्राज्यवादाचे जोखड झुगारून देण्याचे आवाहन केले. ‘थॉमस पेनची लेखणी नसती, तर जॉर्ज वॉिशग्टनने ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधात उगारलेल्या तलवारीला काहीच अर्थ उरला नसता’, अशा शब्दांत अमेरिकेच्या संस्थापकांपकी एक जॉन अडम्स याने ‘कॉमन सेन्स’ची महती वर्णिली आहे. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा वणवा पेटल्यानंतर युरोपातील परंपरावाद्यांनी तिचा धसका घेतला. या वणव्याची झळ पोहोचून आपली सिंहासनेदेखील भस्मसात होतील, या भीतीपोटी राजेशाहीच्या समर्थकांनी युरोपिअन जनतेला क्रांतीची निर्थकता पटवून देण्याचा खटाटोप सुरू केला. अमेरिकन राज्यक्रांतीला पािठबा देणारा बर्कसारखा खंदा पुरोगामी विचारवंतदेखील त्यांच्या सुरात सूर मिसळून फ्रेंच राज्यक्रांतीच्या विरोधात भूमिका घेऊ लागला होता. त्यामुळे गोंधळलेल्या युरोपीय समाजाला आणि युरोपातील राजेशाह्य़ा उलथवून टाकण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी व बर्कच्या विचारांचे पितळ उघडे पाडण्यासाठी पेनने ‘राइट्स ऑफ मॅन’ लिहिला. बर्कवरील टीकेची झोड असह्य झालेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पेनविरोधात (त्याच्या अनुपस्थितीत) सरकार उलथवून टाकण्याचा कट रचल्याच्या गुन्ह्याखाली खटला चालवला होता. मानवी हक्कांचा पुरस्कार आणि राजेशाहीचा नि:पात हे उद्दिष्ट  डोळ्यांसमोर ठेवून काम करणाऱ्या पेनच्या विचारांमधील सत्यता तत्कालीन राज्यकर्त्यांनाही पटली होती. परंतु आपले हितसंबंध अबाधित राखण्यासाठी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याच्याच प्रयत्नात ते कसे असत, याचे एक उदाहरण हिचन्सने या पुस्तकात दिले आहे. पेनच्या विचारांमधील खरेपणा इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विल्यम पीट यांनी मान्य केल्याची आठवण त्याच्या पुतणीने लिहून ठेवल्याचा दाखला हिचन्स देतो. परंतु पेनचे विचार मान्य करून आम्ही काय क्रांतीला आमंत्रण द्यायचे, असा सवाल विचारणारा पीट राजेशाहीचे समर्थन करताना दिसतो. अशा राजेशाहीचा पेन कट्टर विरोधक होता. वंशपरंपरागत राजेशाही ही संकल्पना त्याला ‘वंशपरंपरागत गणितज्ञ’ यासारखी अतक्र्य वाटत असे.  त्या काळात इंग्लंड आणि फ्रान्स हे एकमेकांचे परंपरागत वैरी होते. त्यांच्यात सातत्याने होणारी युद्धे आणि त्यासाठी पोसावे लागणारे लष्कर यांचा खर्च दोन्हीही देशांतील सर्वसामान्य जनतेच्या माथीच मारला जात असे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि समाजव्यवस्थेतील आपले उच्च स्थान अबाधित राखण्यासाठी दोन्हीही देशांमधील सत्ताधारी वर्ग या युद्धांचा वापर करतो, याचा अनुभव पेनला आला होता. स्वत:कडे कुठलेही राजनतिक पद नसताना इंग्लंड आणि फ्रान्समधील तणाव दूर करण्यासाठी पेन प्रयत्नशील राहिला.
पेन केवळ मानवी हक्कांचा पुरस्कार करूनच थांबला नाही, तर कल्याणकारी राज्याच्या निर्मितीच्या दृष्टीने लोकांची गरिबी आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी त्याने ‘राइट्स ऑफ मॅन’मध्ये मूलभूत उपाययोजनादेखील सुचवल्या. ‘‘जॉन बनयानच्या ‘पिलग्रिम्स प्रोग्रेस’ने अगणित गरीब घरांमधील इंग्लंडमध्ये क्रांती घडवण्याची आशा तेवती ठेवली असेल आणि जॉन स्टुअर्ट मिलसारख्या विचारवंतांच्या कार्याने व्हिक्टोरियन काळातील सामाजिक सुधारणांचा पाया रचला असेल, परंतु थॉमस पेनचे ‘राइट्स ऑफ मॅन’ सामाजिक पुनर्रचनेसाठी अधिक वस्तुनिष्ठ, चांगला आणि समर्पक आराखडा पुरवते’’, अशा शब्दांत हिचन्स पेनने सुचवलेल्या सुधारणांचे महत्त्व विशद करतो.
अमेरिकन राज्यक्रांतीप्रमाणेच फ्रेंच राज्यक्रांतीदेखील लोकशाहीच्या वळणावर येऊन थांबेल, असा त्याचा होरा होता. तो मात्र चुकला. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर निर्माण झालेल्या अराजकाचा फायदा घेऊन नेपोलियनसारखा हुकूमशहा सत्तेवर आला. पेन व त्याच्यासारख्या इतर विचारवंतांच्या अपेक्षेप्रमाणे क्रांतीनंतर जरी फ्रान्सची राजकीय व्यवस्था बदलली नाही, तरी क्रांतीने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांमुळे जगातील लोकशाही चळवळींनी बाळसे धरले. खुद्द पेनचा मायदेश असणाऱ्या इंग्लंडमध्येही पेनच्या विचारांनी भारून जाऊन आयरिश आणि स्कॉटिश स्वातंत्र्याच्या चळवळी उभ्या राहिल्याचे निरीक्षण हिचन्स नोंदवतो. जगाच्या पाठीवरील बहुतांश मानवी समुदायांना अगतिक- असहाय बनवणाऱ्या साम्राज्यशाही व्यवस्थांच्या चौकटी खिळखिळ्या करण्याचे काम पेनच्या विचारांनी केले. त्याच्या विचारांच्या आधाराने अनेक प्रागतिक चळवळींनी आपली उद्दिष्टे साध्य केली.  या वैचारिक प्रयत्नांना दाद हिचन्सच्या या पुस्तकाने दिली आहे.
थॉमस पेन्स राइट्स ऑफ मॅन :
अ बायोग्राफी.
– ख्रिस्तोफर हिचन्स
 ग्रोव्ह प्रेस, न्यूयॉर्क
पृष्ठे : १५८ किंमत : २५० रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा