कॉ. गणपत भिसे
दलित, शोषित कष्टकरी, कामगारांची व्यथा आपल्या साहित्यात मांडून मराठी लोकसाहित्य सातासमुद्रापार घेऊन जाणारे एकमेवाद्वितीय साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा गौरव करावा लागेल. अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनसाहित्य आहे. अशा जीवनसाहित्याची निर्मिती करणाऱ्या अण्णाभाऊंची जिवंतपणी जशी अवहेलना झाली तशीच त्यांच्या पश्चात देखील होत आहे. अण्णाभाऊंचा पराभव करण्यासाठी विरोध असणारे जसे अण्णाभाऊंच्या विचारांचा पराभव करण्यासाठी कार्यरत आहेत तद्वतच त्यांचे आपले म्हणवून घेणारे देखील अण्णाभाऊंच्या पराभवासाठी खटाटोप करत सुटले आहेत. एखाद्या निर्मितीकाराला त्याची जात वरदान ठरते तर अण्णाभाउंसारख्या निर्मितीकाराला त्याची जात शाप ठरत आली आहे म्हणूनच अण्णाभाऊ साठे म्हणजे जीवनसाहित्याचा धनी असलेले शापित महानायक ठरणार की काय अशी शंका आज, त्यांच्या १०२ व्या जयंतीलाही वाटते.
पानाफुलावर, कंबर-पोटावर, ओठ-गालावर, केस- वेषावर, नारीच्या रंगावर, ढंगावर लिहिण्याचा तो काळ होता. मराठी लेखक, कवी, साहित्यिक आपापले साहित्य बाजारात घेऊन येत आणि तेच खरे साहित्य म्हणून मराठी वाचकांच्या माथी मारले जात होते. अशा काळात अण्णाभाऊंनी ‘मला कल्पनेचे पंख लावून भराऱ्या मारता येत नाहीत, तर मी जे पाहातो, जगतो, अनुभवतो त्या अनुभूतीच्या जोरावर सहानुभूती ठेवून मी लिहीत असतो कारण ज्यांच्यासाठी मी लिहीत असतो ती माझी माणसं असतात’ अशी डरकाळी फोडून लेखकाची जनतेच्याप्रती एकरूपता असली पाहिजे याचा प्रत्यय दिला. म्हणूनच अण्णाभाऊंचा कुठलाही साहित्यप्रकार वाचला तरी त्यात वाङमयीन सौंदर्यासह भावना, वेदना आणि उपाय सुचवलेला दिसतो. ज्या साहित्यात वेदनेवरील उपाय नाही ते साहित्य ‘जीवनसाहित्य’ ठरत नाही.
ज्यावेळी अण्णाभाऊ लिहिते झाले तेव्हा ‘प्रचारकी साहित्य’ म्हणून त्यांच्या साहित्याची हेटाळणी झाली. खरे तर तो काळ होता, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा चंग तत्कालीन सरकारने बांधला होता. गिरणी कामगारांना देशोधडीला लावणारी सरकारी धोरणे आखली जात होती. या सर्व प्रश्नांवर लढणाऱ्या महाराष्ट्रवीरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याचा तो काळ होता. अण्णाभाऊंनीदेखील एक लेखक म्हणून, क्रियाशील कार्यकर्ता बनून आपली भूमिका बजावली आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, शाहीर द. ना. गव्हाणकर यांनी व यांच्यासारख्या अनेक शाहिर कलावंतानी जनतेच्या जगण्याशी एकरूप होऊन केवळ लिखाणावर समाधान न मानता लढादेखील दिला. पण त्यामुळे, पांढरपेशा साहित्यिक- समीक्षकांनी अण्णाभाऊंना साहित्यिक म्हणून कधीच मान्यता दिली नाही. तरीदेखील अण्णाभाऊ डगमगले नाहीत, खचले नाहीत. राजाश्रयाखालील साहित्यिक जेव्हा सरकारी मलिदा खावून घर-संसार फुलवत होते तेव्हा अण्णाभाऊ आपल्या वैचारिक भूमिकेशी एकरूप होऊन, घर संसारावर तुळशीपत्र ठेवून संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढत होते, तुरुंगवास भोगत होते. अण्णाभाऊंच्या निर्मीतीला कृतीची जोड होती. करणी आणि कथनी यात तसूभर देखील अंतर नव्हते.
विपुल साहित्य संपदा…
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनकाळात ३५ कादंबऱ्या, १३ लोकनाट्ये, १३ कथा संग्रह, १५ पोवाडे, तीन नाटके, सात चित्रपट कथा, एक प्रवास वर्णन अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली. शाळेची पायरी न चढता इतकी सगळी साहित्यसंपदा एका गावलेखकाने निर्माण केली. यातील प्रत्येक कादंबरीमध्ये एक प्रश्न आहे. यातील प्रत्येक पोवाडा एक महाकाव्य. त्यांचे प्रवासवर्णन म्हणजे सोव्हिएत रशियातील साम्यवादी जगताचा परिचय आहे. कथा संग्रहांतून संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या दु:ख, दारिद्रय, अत्याचाराचा इतिहास आहे. एका-एका गावातील गावसमस्येचे टिपण आहे.
अण्णाभाऊंची प्रत्येक निर्मिती हेतू ठेवून निर्मिलेली आहे. त्यामुळेच ती प्रश्नांना वाचा फोडणारी ठरलेली आहे. त्यापैकी काही उदाहरणादाखल नमूद केल्या पाहिजेत. यापैकी एक कादंबरी ‘माकडीचा माळ’. ही कादंबरी भटक्यांचे, पालावरचे जग नागर समाजासमोर आणणारी ठरली. तत्कालीन लेखकांनी केवळ गावकूस आणि गावकुसाबाहेरील दलितांचे जग रेखाटले होते. अण्णाभाऊंनी या दोन्ही जगाेपलीकडे असलेल्या भटक्या समाजांचे तिसरे जग दाखवो. ते जग त्यापूर्वी कधीही साहित्याचा विषय ठरले नव्हते. अधिवास आणि राष्ट्रवादाचा अट्टहास धरणाऱ्या नागरसमाजासमोर ‘माकडीचा माळ’ ठेवून ज्यांना स्वतःचा गाव नाही, स्वतःची जागा नाही, ओळखपत्र नाही, सातबारा नाही, रेशनकार्ड नाही, रहिवासी दाखला नाही, कुठला म्हणून स्वतःचा कागद नाही असे ‘पेपरलेस’ जग अण्णाभाऊंनी विकासशील भारतीयांसमोर उभे केले आहे. या ‘पेपरलेस’ जगाचे दुखणे कोण दूर करणार, असा सवाल उभा केला आहे. ‘वारणेचा वाघ’ ही गाजलेली कादंबरी म्हणजे इंग्रजी आमदनीत सावकारशाहीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले होते, त्या सर्वस्व ओरबाडले गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांची शेतजमीन परत मिळवून देण्यासाठी झालेल्या बंडाची कहाणी आहे. तर पुरस्कारप्राप्त आणि आजही जिच्या आवृत्त्या निघतात अशी ‘फकिरा’ कादंबरी म्हणजे इंग्रजांनी मांग जातीला लावलेली हजेरी आणि हद्दपारी रोखणारी, मित्राचा जिव वाचवून शेतकरी आंदोलन जिवंत ठेवण्याची साक्ष देणारी गाथा आहे. अन्नावाचून मरणारी माणो वाचविण्यासाठी सरकारी धान्याची कोठारे लुटून अन्नदात्याची बाजू मांडणारी ही कादंबरी आहे. महिलांच्या अब्रूशी इमान राखण्याचा महामंत्र देणारी कादंबरी आहे. इतकेच नसून दलित- शोषितांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेत सिंहाचा वाटा अधोरेखित करणारी आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांवर लोकांमधून येऊ शकणारा उपाय सांगणारी अजरामर कादंबरी म्हणून अण्णााभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ कांदबरीचे वाचन झाले पाहिजे. ज्याप्रमाणे अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यातून क्रांतीचे विचार डोकावतात तद्वतच अण्णाभाऊंची शाहिरी- त्यांचे पोवाडे महाराष्ट्रातील दलित, शोषित, कष्टकरी, कामगार वर्गांच्या रक्तरंजित लढ्यांचा जाज्वल्य इतिहास स्मरून अभावग्रस्त जनतेनला क्रांतीप्रवण करतात. अण्णाभाऊची ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहीली‘ ही रचना संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या रक्तरंजित लढ्याचा इतिहास आहे.
महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी साहित्यासाठी अण्णाभाऊंनी आपले जीवन समर्पित केले आहे. अण्णाभाऊ साठे म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या क्रांतिकारी साहित्यातील, क्रांतिकारी लढ्याच्या इतिहासातील सोनेरी पान! अशा महान साहित्यिक-विचारवंताची थोरवी मान्य करण्यासाठी काहीकडून अण्णाभाऊंचा एक ऑगस्ट रोजी साजरा होणारा जयंतीदिन हाच ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला पाहिजे अशी मागणी होत आहे तर काहींकडून ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा झाला पाहिजे अशी नुसती मागणी न होता, यंदाच्या वर्षीपासून तो लाेकांमधून साजरा करण्याची सुरुवातही होते आहे.
परंतु आताच्या काळात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारापुढे आणि त्यांना अपेक्षित असलेल्या चळवळीपुढे जी आव्हाने उभी ठाकली आहेत त्याबाबतीतले चिंतन आणि चिंता करणे गरजेचे झालेलं आहे. आपल्या हयातीत अण्णाभाऊंनी अखेरपर्यंत लाल झेंडा खांद्यावर घेऊन शोषणाच्या विरोधात लढा दिला. त्या अण्णाभाऊंच्या पुतळ्यांवर, पुस्तकावर, चित्रांवर जाणीवपूर्वक पिवळा झेंडा फडकावून अण्णाभाऊंची एकप्रकारे विटंबना सुरू आहे. काही पोथीनिष्ठ आंबेडकरवादी अण्णाभाऊना बौद्ध धर्मात ओढण्यासाठी ‘जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव’ या गीताचा अर्थ निळा झेंडा आणि बौद्ध धर्म एवढाच सांगून अण्णाभाऊंना धर्मांतरात ओढण्यासाठी इरेला पेटले आहेत. वास्तविक पाहाता अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे ‘कार्ड होल्डर’ कार्यकर्ते होते. कट्टर कम्युनिस्ट कार्यकर्ते असल्यामुळे ‘धर्म ही अफूची गोळी’ या संस्कारात वाढलेले अण्णाभाऊ कुठल्याही धर्माचे समर्थन करू शकत नाहीत.
ज्यांनी-ज्यांनी अण्णाभाऊंना तहहयात छळले ते तर अण्णाभाऊंच्या विचाराचा पराभव करण्यासाठी धडपडत आहेतच, परंतु जे-जे अण्णाभाऊंचे आपले म्हणून आहेत ते देखील झेंडयावरून आणि धर्मावरून अण्णाभाऊंची जाणता- अजाणता विटंबनाच करत आहेत. अण्णाभाऊंची कम्युनिस्टांनी उपेक्षा केली असेल, परंतु कोणत्या आंबेडकरवाद्याने अण्णाभाऊना साथ दिली याचा इतिहास सापडत नाही. अण्णाभाऊ मार्क्सवादी की आंबेडकरवादी यावर काथ्याकूट करण्यापेक्षा अण्णाभाऊंची जातिअंताची अन जीवनवादाची परिभाषा समजून घेणे गरजेचे आहे. जीवनवादाचे, जीवनसाहित्याचे धनी असलेले अण्णाभाऊ ‘शापित महानायक’ ठरणार नाहीत यासाठीचा कृतीशील संकल्प करावा लागणार आहे.
(लेखक डाव्या जात्यंतक चळवळीत कार्यरत आहेत)