भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन आजवर अनेकांनी अनेक अंगांनी केले आहे. पण त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक व्यवहारांबद्दल आणि बुद्धिमत्तेबद्दल कुणीही वावगे उद्गार काढलेले नाहीत. त्यांचे खासगी जीवनही प्रसारमाध्यमांपासून बऱ्यापैकी दूर होते. पण आता त्यात डोकावून पाहण्याची संधी भारतीयांना मिळणार आहे. येत्या १४ ऑगस्ट रोजी मनमोहनसिंग यांची मुलगी दमन सिंग यांनी लिहिलेल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल-मनमोहन अँड गुरशरण’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात दमन यांनी आपल्या आई-वडिलांचे पूर्णपणे खासगी जीवन उलगडून दाखवले आहे. मध्यमवर्गीय शीख कुटुंबात जन्मलेल्या मनमोहन यांना फाळणीत आपल्या आईला आणि इतर नातेवाईकांना गमवावे लागले. ते भारतात आले. उच्चशिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले. तिथे त्यांना जगदीश भगवती, अमर्त्य सेन, अशोक देसाई हे सहकारी मित्र मिळाले. पण परदेशातल्या उत्तम करिअरच्या संधी नाकारून मनमोहन भारतात आले आणि प्रशासकीय सेवेत दाखल झाले. हळूहळू राजकारणात उतरले. या सर्व प्रवासात मनमोहन सिंग यांनी खंबीरपणे साथ दिली ती त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांनी. पती-पत्नी म्हणून हे दाम्पत्य कसे आहे, त्यांचे कौटुंबिक जीवन कसे आहे, सार्वजनिक जीवनात त्यांची जी प्रतिमा आहे, त्यापेक्षा ते वेगळे आहेत की नाहीत, अशा पूर्णपणे अराजकीय आणि खासगी गोष्टी या पुस्तकात असणार आहेत. या त्यांच्या  अपरिचित ओळखीचे काय दूरगामी परिणाम होतात, ते स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कळेलच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा