कालनिर्णयच्या माध्यमातून जयंतराव साळगांवकर या कल्पक उद्योजकाने देशविदेशात मराठी झेंडा रोवला; तर विज्ञानाची कास धरून नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले. त्यांची हत्या ही महाराष्ट्राचा वैचारिक ऱ्हास दाखवणारी ठरते. विचारांचा विरोध विचारांनीच करायला शिकणे हीच दोघांच्याही आयुष्यास पूर्णत्व देणारी श्रद्धांजली ठरेल.
श्रद्धेला सात्त्विकतेच्या कुंपणातून विधायक कामास जुंपणारे जयंतराव साळगांवकर आणि त्याच श्रद्धेच्या मार्गावरील अज्ञानाचे आंधळे तण विचारांच्या ताकदीने काढू पाहणारे नरेंद्र दाभोलकर या दोघांना एकाच दिवशी मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग. हे दोघे म्हणजे महाराष्ट्राचे दोन चेहरे. आपापल्या विचारांना मानणारे, त्या विचारांनुसार आचार करता यावा यासाठी वेगळा मार्ग चोखाळणारे आणि आपण कष्टाने तयार केलेली पायवाट इतरांसाठी राजमार्ग कशी होईल याचाच प्रयत्न करणारे. साळगांवकरांनी कोकणातील मालवणातून स्वकष्टाने, हिमतीने आपला कालनिर्णय स्वत: केला तर मूळ सातारच्या दाभोलकरांनी राज्याला विचारांची साधना म्हणजे काय हे दाखवून दिले. हे दोन्ही चेहरे एकाच दिवशी काळाच्या पडद्याआड जाणे हे महाराष्ट्राला विचारांच्या क्षेत्रात दारिद्रय़रेषेखाली ढकलणारे आहे. त्यातही ज्या प्रकारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, ते राज्याच्या पुरोगामित्वावर आणि विचारक्षमतेवर घाला घालणारे आहे.
साळगांवकर हे सध्याच्या व्यावसायिक अर्थाने उच्चशिक्षाविभूषित वा व्यवस्थापन तज्ज्ञ वगैरे नव्हते. पूर्वीच्या काळात हृदयी अनुकंपेचा पुरेसा साठा बाळगणारे अनेक जण साध्यासोप्या मार्गाने आपले साम्राज्य उभे करू शकले. मग ते शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांतून औद्योगिक विश्व निर्माण करणारे किलरेस्कर असोत वा कॅम्लिनचे दांडेकर वा साध्या दंतमंजनाच्या पुडय़ांतून विको उद्योग उभा करणारे पेंढरकर असोत. साळगांवकर हे याच मालिकेतील. ही सगळी मंडळी महाराष्ट्रास ललामभूत असे काम करू शकली ती अंतरीच्या ऊर्मीस प्रचंड कष्टाची जोड देऊन. या मंडळींची कामे ही अनेक अर्थानी पथदर्शक आहेत. कारण धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रमंती असे दळभद्री संस्कार कुरवाळत बसणाऱ्यांच्या राज्यात असे उद्यमशील आणि संपत्तीस महत्त्व देणारे निपजले हे एका अर्थाने राज्याचेच भाग्य. मालवणात असतानाच जयंतराव स्थानिक साप्तहिकांत काहीबाही काम करीत असत. लिहीत असत. त्यांचा स्वभाव मर्यादित अर्थाने स्थानिक राहण्याचा नव्हताच. त्यामुळेच कोकणातील शांत जीवन सोडून ते मुंबईला आले आणि काही काळ त्यांनी लोकसत्तात सेवा केली. मुंबईला आल्यानंतर त्यांना उभे राहण्यास मदत करण्यात महत्त्वाचा वाटा होता तो लोकसत्ताचा. त्यामुळे त्यांच्या मनात लोकसत्ताविषयी कायम आपुलकी आणि सद्भावना असायची. जयंतराव जगण्याचे स्वत:चे म्हणून नियम करीत आणि त्याचे कठोरपणे पालन करीत. त्यातील दोन नियम म्हणजे २६ जुलै या दिवशी लोकसत्ताच्या कार्यालयात मिठाई वाटायची आणि दुसरे म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबईतील मराठी दैनिकांच्या संपादकांच्या घरी जाऊन शुभचिंतन करावयाचे. काही संपादकांच्या इमारतीस उद्वाहन नसले तरी वाढत्या वयाची फिकीर आणि तमा न बाळगता जयंतराव सर्व मजले चढून जात आणि नियमभंग होऊ देत नसत. हे का करता, असे विचारल्यास जयंतरावांचे उत्तर संपादकांची आणि एकूणच पत्रकारितेची जबाबदारी वाढवणारे असे. जयंतराव म्हणत, जो विचाराने समाजास प्रकाश दाखवतो त्याचे अभीष्टचिंतन प्रकाशोत्सवात व्हायलाच हवे. २६ जुलै साजरा करायचा कारण ते लोकसत्तात सेवेस लागले तो दिवस. त्यातही हृद्य भाग असा की या दिवशी ते लोकसत्ताच्या कार्यालयात येऊन संपादकांस वंदन करीत. स्वत:चे असे जगण्याचे नियम पाळायचे तर मनाचा मोठेपणा आणि उमदेपणा लागतो. तो जयंतरावांकडे विपुल प्रमाणात होता. त्यामुळे वयाने कित्येक पिढय़ा लहान असलेल्या संपादकांस नमस्कार करण्यात त्यांना जराही कमीपणा वाटत नसे. या त्यांच्या कृतीमुळे येणारे अवघडलेपण व्यक्त करून त्यांना रोखू गेल्यास ते संपादकाची खुर्ची ही मानाची असते आणि मी तिचा मान ठेवतो असे सांगत. यंदा प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे नियमभंग झाला याचे त्यांना कोण दु:ख. तरीही त्यांनी स्वत: दूरध्वनी करून त्या दिवसाच्या आपल्या व्रताचे पालन केले. सध्या शब्दकोडी ही दैनिकांच्या नित्यकर्माचा भाग बनली आहेत. हल्ली काही नियतकालिके तर केवळ शब्दकोडय़ांसाठीच प्रसिद्ध होतात. त्यातील अनेकांना हे ठाऊक नसेल की या शब्दकोडी कल्पनेचे जनकत्व जयंतरावांकडे जाते. नंतर लोकसत्तातून बाहेर पडून त्यांनी स्वत:चे साप्ताहिक सुरू केले. त्यातही शब्दकोडय़ास त्यांनी भलतेच लोकप्रिय केले. हा प्रकार त्यांनी एके काळी प्रचंड लोकप्रिय केला आणि त्यातही त्यांचे साहित्यावरचे प्रेम असे की नंतर साहित्यिकांच्या वचनांवर आधारित विशेष शब्दकोडीदेखील त्यांनी चालवली. या केवळ शब्दकोडय़ांवर संपूर्ण अंक काढणे हे त्या वेळी धाष्टर्य़ाचे होते. ते धारिष्ट कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना जयंतरावांनी दाखवले, हे विशेष. वास्तविक परिस्थितीमुळे मॅट्रिकच्या पुढे ते शिकूही शकले नाहीत. तरीही त्यांचे साहित्याचे वाचन आणि त्यातही संतसाहित्यातील अधिकार आदरणीय होता. याच संतसाहित्याचा आविष्कार असलेले देवाचिये द्वारी हे सदर लोकसत्तात त्यांनी कित्येक वर्षे चालवले आणि त्या काळात त्याची लोकप्रियताही कायम राहिली. हे अवघड असते.
त्यातूनच जयंतरावांच्या हातून दोन गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे त्यांच्या आयुष्यास अर्थ आला. पहिली म्हणजे भविष्यकथन. वास्तविक भविष्यकथन करणारे जयंतराव काही पहिले नाहीत. त्यांच्याही आधी भविष्ये सांगितली वा लिहिली जातच होती. परंतु जयंतरावांनी भविष्यकथनाला अशी काही ललितरम्य शैली दिली की त्या लेखनास स्वतंत्र साहित्यकृतींचाच दर्जा मिळाला. एखादा लेखक वा कवी निवडून त्याच्या साहित्यातील निवडक वेचे इतक्या सहज आणि चपखलपणे जयंतराव भविष्यात गुंतवत की वाचक आपल्या नसलेल्या राशींचेदेखील भविष्य वाचत असे. या भविष्यकथनास वाहिलेले मराठीतील नियतकालिक म्हणजे धनुर्धारी. या मासिकाचा दिवाळी अंक फक्त आणि फक्त भविष्यासाठीच विकला आणि वाचला जात असे. कै. वसंत लाडोबा म्हापणकर हे नामांकित ज्योतिषी धनुर्धारीत वार्षिक भविष्य लिहीत. त्यांच्यानंतर ती जबाबदारी समर्थपणे पाळली ती जयंतरावांनीच. १९८३ सालचा धनुर्धारी मासिकाचा संपूर्ण दिवाळी अंक जयंतरावांनी एकहाती लिहून काढला. त्यांचे लालित्यपूर्ण भविष्यकथन कट्टर नास्तिकांसदेखील नादावून टाकत असे.
दुसरी मोठी कामगिरी जयंतरावांच्या खाती आहे ती म्हणजे अर्थातच कालनिर्णय. ज्या काळात पंचांग म्हणजे फक्त दिवाळीतील पाडव्यास वा चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर पुजून फडताळात ठेवून दिले जात असे, त्या काळात पंचांगाची उपयुक्तता जयंतरावांनी ओळखली आणि फडताळातील पंचांग हे भिंतीवर आणले. कालनिर्णय हे त्यांच्या उद्यमशीलतेचे प्रचंड यशस्वी उदाहरण. कै. वसंत बापट यांच्यासारख्या कवीस हाताशी धरून ‘कालनिर्णय’ला त्यांनी असे काही रूप दिले की ते असल्याशिवाय मराठी घरांतील भिंतीच निराधार होत असत. भविष्य, मेनू तसे लेख छान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान पंचांग सोपे सहजी कळावे, भिंतीवरी कालनिर्णय असावे.. या त्याची जाहिरात करणाऱ्या बापटरचित ओळी या मराठी मनाच्याच श्लोक बनून गेल्या. एरवी दिनदर्शिकेची मागील पाने वायाच जातात. त्यांचे महत्त्व जयंतरावांनी ओळखले. मग त्यावर योगाभ्यास, घरगुती औषधोपचार, पाककृती, इतकेच काय, रेल्वेचे वेळापत्रक वगैरे मजकूर देण्याची कल्पना जयंतरावांचीच. त्यामुळे कालनिर्णयचे महत्त्व दोन्ही बाजूंनी वाढले. या प्रकाशनाने त्यांना अफाट प्रसिद्धी आणि यश दिले. पुढे भारतातील जवळपास सर्वच भाषांत आणि नंतर मोबाइल फोन, टॅब्लेट्स आदींसाठी अ‍ॅप विकसित करून कालनिर्णय काळाबरोबर राहील याची दक्षता जयंतरावांनी आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी घेतली. गेले काही महिने ते आजारी होते. मंगळवारी त्यांच्यापुरता कालनिर्णय झाला आणि त्यांच्या दिनदर्शिकेचे अखेरचे पान उलटले गेले.
त्याच वेळी तिकडे पुण्यात महाराष्ट्रास मान खाली घालावयास लावणाऱ्या हल्ल्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आयुष्यसाधना अज्ञात मारेकऱ्यांनी संपुष्टात आणली. एखाद्याचे आयुष्यच आणि एखादी चळवळ हे अद्वैतच तयार होण्याचे भाग्य फार कमी जणांना लाभते. दाभोलकर अशा भाग्यवंतांत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संपूर्ण अस्तित्व दाभोलकर यांच्या व्यक्तिमत्त्वात मिसळून गेले होते वा दाभोलकर पूर्णाशाने ही चळवळमय होऊन गेले होते. इतके की जेव्हा कधी या चळवळीविषयी काही प्रश्न निर्माण होई तेव्हा प्रश्नकर्ता चळवळीचे मत काय आहे, असे विचारत नसे. तर दाभोलकर काय म्हणतात, असा त्याचा प्रश्न असे. हे त्यांच्या कार्याचे यश आहे. सर्वसाधारण अनुभव असा की अशा बुद्धिनिष्ठ चळवळींशी जोडली गेलेली माणसे ही एकांगी, कर्कश आणि कंटाळवाणी होतात. दाभोलकरांचे मोठेपण हे की त्यांनी हे धोके यशस्वीपणे टाळले. श्रद्धा हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि ती विचारांवर, व्यक्तीवर, बुद्धीवरही असायला हवी असे दाभोलकर म्हणत. परंतु ज्याप्रमाणे भक्ती नवविधा असू शकते त्याप्रमाणे श्रद्धादेखील विविधांगी असू शकते हे त्यांना अमान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या सहवासात एखादा देव ही संकल्पना मानणारा आला तर त्याला ते झटकून टाकत नसत वा त्याचा अपमान करीत नसत. गणपतीच्या विसर्जनाने प्रदूषण होते, म्हणून नदी-तळ्यांऐवजी कृत्रिम कुंडांत विसर्जनाची कल्पना आणि मोहीम त्यांचीच. देव मानणाऱ्यांवर त्यांचा राग नव्हता. त्यांचा राग होता तो देवाचे दुकान मांडणाऱ्यांवर आणि त्या दुकानात प्रसाद विकत घेणाऱ्यांवर. दुर्दैव हे की एके काळी पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात त्यांना यासाठी संघर्ष करावा लागला. ज्या महाराष्ट्रात चमत्कार दाखवणारे गुरू अडक्यास तीन मिळतात आणि ते त्याज्य असायला हवेत असे सांगणारे रामदास जन्माला आले त्याच महाराष्ट्रात अलीकडच्या काळात भंपक आणि केवळ लुटारू अशा बाबा आणि बापूंचा सुळसुळाट झाल्याने त्यांच्याशी दोन हात करण्यात दाभोलकरांचा बराच काळ गेला. सरकारी खात्यातून भ्रष्टाचारासाठी निलंबित झालेला कारकून स्वत:स जगद्गुरू म्हणत महाराज होतो आणि मुंबईतला डॉक्टर आपण रामाचे अवतार असल्याचे सांगत बापूगिरी करतो, त्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन हे आव्हान होऊन बसले आहे. या अशा दीडदमडीच्या धर्मगुरूंच्या पायावर राजकारणी आणि त्यामुळे त्यांचे अनुयायीही डोके टेकू लागल्याने अंधश्रद्धा निर्मूलन हे धर्मविरोधी ठरवले जाणे साहजिकच. त्याचमुळे धर्माच्या नावे जादूटोणा करून लुटालूट करणाऱ्यांना रोखू पाहणारा कायदा येथे होऊ शकला नाही. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दाभोलकर या कायद्यासाठी झटत राहिले. नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात हा कायदा आता होईलच, तसे आपल्याला आश्वासन मिळालेले आहे, असे सांगत प्रफुल्लित चेहऱ्याचे दाभोलकर लोकसत्ता कार्यालयात आले असता त्यांचा दुर्दम्य आशावाद जाणवत होता. आता या लढय़ात लोकसत्ताची मदत महत्त्वाची, बाकीची दैनिके बाबाबापूशरण आहेत, असे ते म्हणत. हे विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांना तोड नाही. परंतु त्या कष्टाचे फलित पाहण्याआधीच त्यांची हत्या झाली, हे महाराष्ट्रास अत्यंत लाजिरवाणे म्हणावे लागेल. दाभोलकरांचे मोठेपण असे की अशा लढय़ांचे नेतृत्व करणाऱ्यांचे म्हणून त्याचे मठ तयार होतात. दाभोलकरांचे कधीही असे झाले नाही आणि ते कोणत्याही टप्प्यावर अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचे बाबा झाले नाहीत.
याचे कारण त्यांचा प्रखर बुद्धिप्रामाण्यवाद. अशा बुद्धिप्रामाण्यवादास प्रमाण मानून त्यांच्या आधारे वेगवेगळ्या क्षेत्रांत चळवळी उभारणाऱ्यांची उच्च परंपरा महाराष्ट्रास आहे. कुमार सप्तर्षी आदींची युक्रांद, बाबा आढाव यांची एक गाव एक पाणवठा.. अशा किती तरी उत्तम कार्याचा उल्लेख येथे करता येईल. दाभोलकर याच मालिकेतील. कमीजास्त प्रमाणात डावीकडे झुकणारी समाजवादी विचारसरणी हे या सर्वाच्या कार्याचे मूळ होते. साधी राहणी, वैयक्तिक जगताना कोणताही अभिनिवेश नसणे आणि त्याहूनही मुख्य म्हणजे जगणे आणि विचार हे समांतर असणे असे काही या चळवळींचे विशेष. दाभोलकर यांच्यात या सर्वाचा समुच्चय होता आणि साधना साप्ताहिक चालवताना तो नियमितपणे दिसत होता. एकीकडे धनिक वा उच्चपदस्थांनाच सोनसाखळ्यांचा प्रसाद देणारे सत्यसाईबाबा, भोंदू अस्लम ब्रेडवाला, चमत्कार करणाऱ्या निर्मलादेवी वगैरेंच्या विरोधात आंदोलन छेडणे आणि त्याच वेळी संयतपणे साधना चालवणे ही विचारांच्या तारेवरची कसरतच होती आणि ती दाभोलकरांनी यशस्वीपणे केली.
काल ती विचारांची तार बेजबाबदार आचारांनी तुटली. निर्बुद्ध भक्तांच्या बाजारात अंधश्रद्धेच्या आधारावर भरघोस उत्पन्न देणाऱ्यांच्या पोटावर दाभोलकरांनी पाय आणला आणि त्यामुळे अध्यात्माची झूल पांघरणाऱ्या कोणा सनातन्याने त्यांच्यावर मारेकरी घातले असल्याची शक्यता वर्तवली जाते. ती खरी असेल वा यामागे राजकीय हात असतील. परंतु हे मात्र १०० टक्के खरे की प्रखर विचाराने महाराष्ट्राचे डोळे अलीकडच्या काळात दिपतात. त्या विचारांच्या तेजास उघडय़ा डोळ्याने डोळा देणारी बुद्धिनिष्ठा आजच्या महाराष्ट्रात क्षीण होऊ लागली आहे. विचारांच्या तेजास झेलणारी नजर स्वत: कमावण्याऐवजी ते विचारी तेजच संपवण्यात पौरुष आहे, असे अलीकडचा महाराष्ट्र मानतो. भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर झालेला हल्ला वा अ. भा. मराठी साहित्य संमेलनांच्या निमित्ताने तुकाराम ते परशुराम यांपैकी एखादे नाव घेऊन उफाळणारे वाद ही त्याचीच उदाहरणे. दाभोलकरांची हत्या त्यामुळे ही महाराष्ट्राचा वैचारिक ऱ्हास दाखवणारी ठरते आणि विचार करणाऱ्या प्रत्येक मराठी जनाची मान यामुळे शरमेने खाली जावयास हवी.
साळगांवकर आणि दाभोलकर. ही स्वकर्तृत्वाने मोठे होणाऱ्या महाराष्ट्राची उदाहरणे. दोघांच्या विचारांची दिशा एक नसेल. पण त्या विचारांमागची प्रामाणिकता आणि समोरच्याच्या विचारांचा आदर करणारे उमदेपण हे मात्र एकच होते. दोघांच्याही आयुष्याची काल अखेर झाली. एक आयुष्य पूर्ण होऊन संपले तर दुसरे अनैसर्गिक अपूर्णपणे संपुष्टात आले. विचारांचा आदर आणि विरोध विचारांनीच करायला शिकणे हीच दोघांच्याही आयुष्यास पूर्णत्व देणारी श्रद्धांजली ठरेल. लोकसत्ता परिवारातर्फे  या विचारांना आदरांजली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा