केंद्र सरकारने मुलींना सोळाव्या वर्षांत शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देण्याबाबत विचार चालविला होता; मात्र सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून तसेच अन्य राजकीय पक्षांतून विरोध झाल्याने शरीरसंबंधासाठी संमती वय १८ हेच कायम ठेवण्यात आले. मात्र आता ‘लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचे संरक्षण’ अशा नव्या कायद्याअंतर्गत १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी तिच्या संमतीने ठेवलेले शरीरसंबंध गुन्हा ठरत नसल्याचा निर्णय दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने दिल्याची बातमी (लोकसत्ता, २६ ऑगस्ट) आहे.
एखाद्या गोष्टीची परवानगी असणे याचा अर्थच मुळात जबाबदारी माहीत असणे आणि या जबाबदारीचे होणारे परिणाम माहीत असणे. १८ वर्षांखालील मुले-मुली नोकरीसाठी, मतदानासाठी असमर्थ आहेत तर शरीरसंबंधासाठी कसे समर्थ असतील? शिवाय िहदू विवाह कायद्यानुसार मुलगी १८ वर्षांची झाल्यावरच लग्न करू शकते तर मग ती ते वय उलटण्यापूर्वीच या गोष्टीसाठी कशी परवानगी देईल? याचा दिल्लीतील स्थानिक न्यायालयाला बहुधा विसर पडला असावा.
लगिक संबंधातून आलेले मातृत्व पेलण्यास १६ वा १७ वर्षांची मुलगी शारीरिकदृष्टय़ा जेमतेम परिपक्व असली तरी ती मानसिकदृष्टय़ा खंबीर नसते. दुसरे म्हणजे, संमतीने संबंध ठेवण्याच्या वयात शिथिलता आणली तरी महिला अत्याचार प्रतिबंधक विधेयकाचा तिढा सुटणार नाही. तसेच अत्याचाराचे प्रकारदेखील कमी होणार नाहीत. कारण अत्याचार करणारे वयाकडे पाठ फिरवून अत्याचारच करत राहणार.
बलात्कार, फसवणूक, विनयभंग यांसारखे प्रकार थांबवण्यासाठी पौगंडावस्थेत लैंगिकतेबद्दल सकारात्मक भावना निर्माण करणे आणि त्याबद्दल आदर निर्माण करणे आवश्यक आहे. जर मुलांना सेक्सविषयी मोकळेपणाने सकारात्मक बाजू मांडून माहिती पटवून दिली, तर सेक्सचं रूप हिडीस न राहता ते एक भावनांचा आविष्कार ठरेल.
सागर श्रीकांत तावडे, विक्रोळी

त्यांचेही संमोहनशास्त्र..
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना जाहीर श्रद्धांजली वाहताना ज्येष्ठ समाजसुधारक श्याम मानव यांनी संमोहनशास्त्राद्वारे संमोहित व्यक्तीची विचारशक्ती नाहीशी कशी करता येते याचे वर्णन केले असून यापुढील लढाई माणसांशी नाही तर अशा संमोहित यंत्रमानवाशी करायला लागणार असल्याचा इशारा दिला आहे (लोकसत्ता २६ ऑगस्ट). श्याम मानव म्हणतात त्यापेक्षा अधिक भयानक आणि अत्यंत मोठय़ा प्रमाणावर संपूर्ण समाजावर संमोहन राजकीय नेते केवळ स्वत:च्या लाभासाठी करत असतात. सरकारच्या झेड सिक्युरिटीत राहणारीही संधिसाधू मंडळी दुसऱ्या धर्माची काल्पनिक दहशत निर्माण करून समाजाला सतत भीतीच्या सावटाखाली ठेवतात. समाजात घाबरणाऱ्या व्यक्ती जास्त असतात आणि लोक घाबरले की त्यांना अगदी आरामात संमोहित करता येते. एकदा संमोहित (हिप्नोटाइज)झाले की ते कसलाच विचार करू शकत नाहीत. ते हिप्नोटाइज करणाऱ्या माणसाचं ऐकतात. एखाद्दुसऱ्या व्यक्तीचे नव्हे तर मास हिप्नॉटिझम राजकीय नेते सातत्याने करतात. आणि स्वत: त्या भांडवलावर कल्पनातीत मोठे होत जातात. लोकांना मूलभूत गरजेच्या बाबी मिळत नाहीत तरी ते त्यांच्या नादी लागतात.
परधर्मीयांना झुकते माप, अधिक सवलती मिळत असतील त्या काढून घ्यायला कायदेशीर, सनदशीर लढय़ाचे मार्ग असतात. त्यांच्यावर वचक ठेवायला धर्माचे रक्षक असल्याची आवई उठवून धर्माच्या नावाने समाजात दुफळी माजविण्याची गरज मुळीच नसते. परंतु दहशतीच्या सावटाखाली वावरणारा सर्वसामान्य त्याच्या वैचारिक शक्तीचे खच्चीकरण झाल्याने हा विचार करू शकत नाही आणि या स्वयंघोषित, तथाकथित धर्माच्या कैवाऱ्यांचेच फावते असे नव्हे तर त्यांच्या पुढील १० पिढय़ांचे कोटकल्याण होते. लोकांच्या श्रद्धाळू मानसिकतेचा गरफायदा घेऊन, रूढी-परंपरा यांचे कैवारी असल्याचे सोंग आणून, धार्मिकतेला आवाहन करून, धार्मिक भावनांना हात घालून, धर्माचे रक्षणकत्रे असल्याचा आव आणून विविध धार्मिक उत्सावांद्वारे जनतेला रस्त्यावर नाचवत ठेवून स्वत:च्या तुंबडय़ा भरणाऱ्या आणि डॉक्टर दाभोलकरांसारख्या धर्मनिरपेक्ष निरलस समाजसुधारकाच्या जादूटोणा विधेयकासदेखील धार्मिकतेचे काळेकुट्ट रंग देऊ पाहणाऱ्या ‘संमोहनतज्ज्ञ’ राजकीय नेत्यांना वेसण घालणे हेही तितकेच गरजेचे आहे.
रजनी अशोक देवधर, ठाणे</strong>

Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

कार्यक्षमतेत सातत्य हवे..
‘पोलिसांचे अभिनंदनच, पण.. ’ हा ‘अन्वयार्थ’ (२६ ऑगस्ट) अतिशय सडेतोड शब्दांत पोलीस विभागाच्या अपवादात्मक कार्यक्षमतेवर आसूड ओढणारा आहे. शक्ती मिल सामूहिक बलात्कार घटनेच्या थोडे दिवस आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात दिवसाउजेडी हत्या झाली, तिचे धागेदोरे लवकर सापडले नाहीत आणि सामान्य जनतेची तर शेकडो प्रकरणे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकताना दिसतात. पोलीस खात्यामधील प्रत्येक कर्मचाऱ्याने गुन्हे अन्वेषणात तत्पर असावे अशी सर्वसामान्य अपेक्षा असते आणि काही तसे असतात, म्हणूनच कधी तरी आरोपींना विनाविलंब अटक झाल्याचे पाहायला मिळते.पण इतर वेळी पोलीस ठाण्यांतील संथ व अनास्था दर्शवणारा कारभार यांमुळे कित्येकदा गुन्ह्याची नोंदही होत नाही, तर नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांच्या तपासातही पोलिसांच्या भीतीने सामान्य जनतेचे सहकार्य कमीच मिळते.
एकूणच पोलिसांचे कमी संख्याबळ, प्रशासकीय कामाचा बोजा आणि त्यातून वाढणारी कामाविषयीची अनास्था या गोष्टी गुन्ह्य़ांच्या तपासातील अकार्यक्षमता वाढवतात. ज्याप्रमाणे शक्ती मिल बलात्कार घटनेतील आरोपी तातडीने पकडण्यात आले, तशीच तत्परता सातत्याने दिली तर नक्कीच गुन्हेगारांना वचक बसेल. अन्यथा सध्या पोलिसी अकार्यक्षमता व संथ न्यायप्रक्रिया यांमुळे समाजकंटक बिनघोर गुन्हे करत सुटले आहेतच.
माया हेमंत भाटकर, चारकोप (मुंबई)

स्मारकाचे काम डिसेंबपर्यंत तरी सुरू होईल?  
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे ही आंबेडकरी जनतेची अनेक दिवसांपासूनची आशा होती. यासाठी झालेल्या अनेक आंदोलनांनंतर सरकारने मुंबईमधील इंदू मिलची संपूर्ण जमीन स्मारकासाठी देऊ केली पण सरकारने जमीन दिल्याची घोषणा करून आठ महिने झाले तरी त्या जागेवर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात होऊ शकलेली नाही.
असे का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे हे स्वाभाविकच आहे. सरकारने लवकरात लवकर स्मारकउभारणीसाठी प्रत्यक्ष जमीन संपादन कामात लक्ष घालावे. महापरिनिर्वाण दिनाला आता तीन महिने उरले आहेत. सरकारने येत्या पाच डिसेंबरपूर्वी स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, स्मारकाचा आराखडाही पाच डिसेंबरच्या रात्रीपासून चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांना पाहायला मिळावा, हीच सरकारची येत्या महापरिनिर्वानदिनी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल.
प्रबोध मधुकर माणगावकर, ठाणे

जादा गाडय़ा सुटतील, रस्त्यांचे काय?
राज्य परिवहन महामंडळातर्फे यंदा कोकणात गणेशोत्सवासाठी सोडल्या जाणाऱ्या एकंदर १६६० जादा गाडय़ांपैकी १०६५ मुंबईतून सुटणार असल्याची माहिती वाचली. गेल्या वर्षी एसटीने पावणेबारा कोटी रुपयांची कमाई अशा जादा गाडय़ा पाठवून केल्याने यंदा त्या कमाईत भरच पडेल, हेही खरे. पण या गाडय़ा ज्या रस्त्यांवरून ‘धावणार’, त्यांची अवस्था काय आहे?
मुंबईत मोनोरेलच्या प्रकल्पांनी रस्त्यांचा भाग व्यापला आहे, तर वाशी ते पनवेल या मार्गात सानपाडा, उरण फाटा, कामोठे येथे उड्डाणपुलांची आणि नेरुळ, जुईनगर, खारघर, बेलपाडा भागात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. बेलापूरच्या खिंडीचे रुंदीकरण अपूर्ण अवस्थेत आहे. पुढे पळस्पे ते पेण, इंदापूर, माणगाव, खेड, चिपळूण भागांतही रस्ता रुंदीकरण कामांनी वेग घेतला असताना ती पूर्ण झालेली नाहीत. सध्या असलेल्या दुय्यम-तिय्यम दर्जाच्या रस्त्यांची तर चाळण झाली आहे.
– राजेंद्र घरत, वाशी