रामलीला मैदानावरील गेल्या वर्षीच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर देशभरात प्रचंड मोठी संतापाची लाट उठली. ही लाट इतर कोणत्याही ठिकाणी फुटण्याऐवजी ती सोशल नेटवर्किंग साइट्सवर जास्त प्रमाणात फुटली. याच दरम्यान इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीत सोशल नेटवर्किंग साइट्सचा, त्यातही फेसबुकचा फार मोठा हातभार असल्याचे वृत्त आले. त्यामुळे ही लाट अधिकच तीव्र झाली. यात ‘जनआंदोलन’ कसे बरोबर आणि सरकार कसे कुचकामी, हे दाखवण्याची प्रचंड अहमहमिका लागली. यातूनच एका ‘निर्भय’ समाजाचे चित्र पुढे आले. याचे पर्यवसान अलीकडेच शाहीन धाडा फेसबुक प्रकरणात झाले. पालघरमधील या महाविद्यालयीन तरुणीने ‘उत्स्फूर्त बंद’बद्दल फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्या एका पोस्टवरून गदारोळ उडाला. भरीस भर म्हणून शाहीनला अटक करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती अशा प्रकारच्या ‘व्हच्र्युअल जगातील’ अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आणि त्याला असलेल्या मर्यादांची. शाहीन धाडा प्रकरणानंतर फेसबुक आणि त्यावरील पोस्ट यांच्या बाबतीत प्रत्येक माणूस सजग झाला आहे. त्यानंतर पालघरमधील एका अल्पवयीन मुलाने राज ठाकरे आणि मराठी माणूस यांबाबत केलेल्या कमेंटमुळेही गदारोळ उडाला. संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्कदिला असला, तरी तो निदान फेसबुकवर तरी कशा प्रकारे वापरावा, याचा विचार आता होत आहे. याबाबत शाळा-महाविद्यालय यांतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.
फेसबुक स्टेटस- सुहाग रात है, घूंघट उठा रहा हूँ मैं..
त्याखालील क्षणातच भरपूर सारे ‘लाइक्स्’..
खाली काही जणांचे अपडेट्स- ‘अपडेट्स टाकत राहा, आम्ही अजून जागेच आहोत.’
..गेले काही दिवस हा विनोद एसएमएस किंवा मेसेंजर अॅप्समधून देशभर फिरतोय. त्यावर मोठा हंशाही पिकतो. पण यातील अतिशयोक्ती ही प्रत्यक्षात आली तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, अशीच स्थिती सध्या आपल्याकडे आहे. फेसबुक स्टेटसमध्ये आजवर आलेला नाही, असा एकही विषय आता जगभरात शिल्लकनाही. आपण सकाळी उठल्यापासून काय काय करतो, काय खातो, काय पितो, या साऱ्याची सचित्र जंत्रीच अनेकांनी फेसबुकवर शेअर केलेली दिसते.. अगदी सकाळी उठल्यानंतर चूळही फेसबुकचे तोंड पाहूनच भरली जाते, हे अलीकडे झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. हे सारे केवळ धक्कादायक तर आहेच, पण त्याच पलीकडे ते चिंताजनकही आहे. फेसबुक हे केवळ व्यक्त होण्याचे साधन नव्हे तर ते आता एका पिढीचे व्यसन होऊ पाहते आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा