परंपरा आणि रूढी यांना बदलत्या सामाजिक परिस्थितीत किती महत्त्व द्यायचे, याचा गांभीर्याने विचार केला नाही, तर काय उत्पात घडू शकतात, याची उदाहरणे भारताने गेल्या काही दशकांत पाहिली आहेत. सुरक्षेच्या प्रश्नावरून अशा रूढींना हद्दपार करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिल्यानंतरही तो पाळण्यापेक्षा रूढीवादी राहणे म्हणजे काळाच्या मागे जाण्यासारखे आहे. अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश-परीक्षेच्या वेळी ख्रिस्ती जोगिणींच्या आश्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या डोक्यावरील स्कार्फ काढण्याची सूचना नाकारून परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. लखनऊमधील एका मुस्लीम विद्यार्थिनीनेही कपडय़ांवरून घालण्याचा लांब झगा काढून ठेवण्यास सांगितल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची पूर्वपरीक्षा न देण्याचे ठरवले. या परीक्षेत मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने, खबरदारी म्हणून तिला ही सूचना करण्यात आली होती. धर्मस्वातंत्र्याऐवजी अन्य गोष्टींना जेथे प्राधान्य असायलाच हवे, अशा ठिकाणी रूढींना किती महत्त्व द्यायचे? गेल्या काही काळात भारतात होत असलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाची सुरक्षा तपासणी करण्यात येऊ लागली. परीक्षा केंद्रात प्रत्येक विद्यार्थ्यांची सुरक्षा तपासणी हाही त्याचाच भाग करण्यात आला. अशा तपासणीच्या वेळी कपडय़ांवरून पेहेरण्याचे वेश तपासण्यासही नकार देणे अनुचित असते, याचे भान अनेकदा राहत नाही. शीख समाजात कृपाण जवळ बाळगले जाते. परीक्षा केंद्रांवर त्याची तपासणी करण्यास त्या समाजाने कधी विरोध केल्याचे दिसत नाही. एवढेच काय, चित्रपटगृहापासून ते निवडणुकीच्या मतदान केंद्रापर्यंत सर्व ठिकाणी अशी सुरक्षा तपासणी अत्यावश्यक असते. केवळ वर्षांनुवर्षे चालत आलेली रूढी आहे, म्हणून तिला कवटाळून बसण्याने आपण मोठी चूक करीत आहोत, याचे भान सर्वच समाजाला यायला हवे. हिंदू समाजातील पतीनिधनानंतर त्याच्या चितेवर पत्नीने उडी मारून जिवंतपणे सती जाण्याची भयानक रूढी बंद होण्यासाठी किती तरी समाजसुधारकांना लढा द्यावा लागला. बदलत्या काळात सुरक्षेचा मुद्दा अधिक चिंताजनक बनल्यानंतर त्यासाठी आवश्यक असणारी तपासणी नाकारणे, हे मागासलेपणाचेच म्हटले पाहिजे. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात छायाचित्राची ओळख ही आता अनिवार्य ठरली आहे. अगदी पॅन कार्डपासून ते आधार कार्डपर्यंत प्रत्येक ठिकाणी छायाचित्र ही अधिकृत ओळख समजली जाते. अशा वेळी रूढीवादी म्हणून बुरखा न काढणे हे परवडणारे नसते. समाजातील अशा जुनाट पद्धती बदलत्या काळाबरोबर मागे टाकण्यासाठी वैचारिक प्रगल्भता येणे आवश्यक असते. विमानतळांवर होणारी सुरक्षा तपासणी तर अधिकच कडक असते. तेथे अशा रूढी आणि परंपरांना कवटाळून चालतच नाही. अगदी मुस्लीम देशांमध्येही या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात आणि त्यास कोणीही विरोध करीत नाही. म्हणूनच डॉक्टर होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षणापेक्षा रूढी अधिक मोलाच्या वाटणे, यात काही तरी गफलत आहे. अशा रूढींशी काही भावनात्मक संबंध जुळलेले असतात, हे खरे असले, तरीही जेव्हा नियम आणि कायदे पाळण्याची गोष्ट पुढे येते, तेव्हा समाजाचा विचार करून त्यांना बाजूला ठेवणे अपरिहार्य असते. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निकालाचा आदर करणे म्हणजे समाजाच्या सुरक्षेलाच मदत करण्यासारखे आहे, हे उमगणे त्यासाठी आवश्यक आहे.
परंपरा हव्या की नियम?
परंपरा आणि रूढी यांना बदलत्या सामाजिक परिस्थितीत किती महत्त्व द्यायचे, याचा गांभीर्याने विचार केला नाही, तर काय उत्पात घडू शकतात, याची उदाहरणे भारताने गेल्या काही दशकांत पाहिली आहेत.
First published on: 27-07-2015 at 12:29 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tradition or rules