विष्णुभटजी गोडसे यांनी जेमतेम अडीच-पावणेतीन वर्षे उत्तर हिंदुस्थानात केलेल्या मुशाफिरीनंतर आपले अनुभव शब्दबद्ध करून ‘माझा प्रवास’ या पुस्तकाची मुहूर्तमेढ रोवली, या घटनेला आता शंभरहून अधिक वर्षे लोटली आहेत. ‘माझा प्रवास’ केवळ मराठी साहित्य प्रांतासाठीच नव्हे, तर ब्रिटिशपूर्वकालीन ऐतिहासिक घटनांची एतद्देशीय नोंद म्हणूनसुद्धा महत्त्वपूर्ण ठरते. केवळ अर्थार्जनासाठी काका रामभट यांच्यासह विष्णुभटांनी वरसईहून उत्तर भारताकडे प्रस्थान ठेवले, तो काळ हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक धगधगता कालखंड होता. १८५७च्या बंडामुळे संपूर्ण उत्तर प्रांत ढवळून निघाला होता. त्याचा इतिहास कालपरत्वे नंतर अनेकांनी वेगवेगळ्या अभिनिवेशात उलगडून दाखविला असला तरी या वेगवान ऐतिहासिक कालखंडाची प्रत्यक्षदर्शी म्हणून विष्णुभटांनी करून ठेवलेली नोंद त्यातल्या अंगभूत वेगळेपणासह आजही वैशिष्टय़पूर्ण ठरते. काहींना ते केवळ प्रवासवर्णन वाटते, तर काही जण त्याच्या सत्यासत्यतेविषयी शंका घेऊन हे एक अनैतिहासिक बाड असल्याचे मानून त्याची बोळवण करतात. काहीही असले तरी या पुस्तकाविषयीचे औत्सुक्य अबाधित आहे. आजमितीला ‘माझा प्रवास’चे मराठीत चार, हिंदीत दोन, तर इंग्रजीत एकमेव अनुवाद उपलब्ध होते. अलीकडेच सुखमणी रॉय यांनी केलेला इंग्रजी अनुवाद मूळ पुस्तकाशी प्रामाणिक राहून केलेला असल्याने त्याची नोंद घेणे आवश्यक वाटते.
    सुखमणी रॉय यांना हा अनुवाद करावासा वाटला याचे कारण अर्थात अगदी व्यक्तिगत आणि भावनिक आहे. सुखमणी (पूर्वाश्रमीच्या मीनाक्षी) या मातुल घराण्याकडून थेट विष्णुभटांशी वारसा असलेल्या. विष्णुभटांच्या कामगिरीचा अभिमान बाळगणाऱ्या गोडसे घराण्यातील बहुतेक संबंधितांशी त्यांचा संपर्क आलेला असल्याने साहजिकच या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करण्याची ऊर्मी उफाळून आली असावी. त्याला एक निमित्तही मिळाले. ‘माझा प्रवास’च्या इंग्रजी अनुवादाचे काम गोडसे कुलोत्पन्नांपैकी चंद्रशेखर ओक यांनी सुरू केले होते, मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे ते अर्धवट राहिलेले काम सुखमणींनी हाती घेतले. या कामी त्यांना ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’चे सहकार्य मिळाले. एवढेच नव्हे, तर सोसायटीने त्यांचा हा उपक्रम आपलाच मानला.
     ‘माझा प्रवास’सारख्या पुस्तकाचा शब्दश: अनुवाद करण्यात हशील नाही. तेव्हाचा कालखंड, सामाजिक स्थिती, जीवनशैली, संस्कृती यांचे भान राखून त्याबरहुकूम संदर्भाचा अर्थ लावण्याचे कसब असावे लागते. मराठी भाषेचे ज्ञानही महत्त्वाचे ठरते. सुखमणी यांना या साऱ्याचा अवकाश प्राप्त झाला असल्याने त्यांनी या बाबींकडे विशेषत्वाने लक्ष देऊ केले आहे.
विष्णुभट यांचे लिखाण प्रवाही आहे. त्यांची निरीक्षणक्षमता अचंबित करणारी आहे. एखाद्या घटनेचे वा प्रसंगाचे वर्णन करताना त्यातील बारकावे तसेच तपशील यांची नोंद घेतानाची निवेदनाची धाटणी नाटय़मय आहे. त्या काळातील प्रथा, परस्परसंबंध, देवभोळेपणा, परिस्थितीशरणता यांनी ‘माझा प्रवास’ ओतप्रोत भरलेला आहे. हे सर्व इंग्रजीत अनुवादित करताना त्यातले सत्त्व अन् मर्म सुखमणी यांनी कोठेही हरवू दिलेले नाही.
अनुवादाचे आव्हानात्मक काम हातावेगळे करताना कोणत्या पुस्तकाचा आधार घ्यावा याचा पेच होता. त्याची सुखमणींनी पुस्तकाच्या मनोगतात केलेली चर्चा आणि कारणमीमांसा उद्बोधक आहे.
विष्णुभटांनी ‘माझा प्रवास’चे हस्तलिखित सन १८८३ मध्ये पूर्ण केले. भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या सूचनेनुसारच त्यांनी हे ऐतिहासिक काम हाती घेतले होते. १८८३ मध्ये त्यांनी आपल्या प्रवासाची हकीकत भारताचार्याकडे सुपूर्द करताना हे पुस्तक आपल्या निधनानंतरच प्रसिद्ध करावे, अशी अट घातली. भारताचार्यानी ती मान्य केली. १९०१ (की १९०५?) साली विष्णुभटांचे निधन झाल्यानंतर लगोलग भारताचार्यानी मूळ मोडी लिपीत असलेला ‘माझा प्रवास’ मराठीत आणण्याचा घाट घातला अन् १९०७ मध्ये ‘माझा प्रवास – सन १८५७च्या बंडाची हकीकत’ हे पुस्तक आकाराला आले. विष्णुभटांच्याच अटीमुळे पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी तब्बल पाव शतकाचा कालावधी लोटला.
मोडीतून मराठीत पुस्तक आणताना भारताचार्यानी मूळ हस्तलिखितातील भाषाशैली व काही संदर्भ आणि वर्णने बदलण्याचे स्वातंत्र्य घेतले. हा पुढे वादविषय ठरला. भारताचार्याची एक कृती थोर मानावी लागेल, ती म्हणजे, त्यांनी आपल्याकडील मूळ मोडी लिपीतील प्रत पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाकडे १९२२ मध्ये सुपूर्द केली. ही प्रत उपलब्ध झाल्यानेच महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी मूळ हस्तलिखिताशी पूर्णत: प्रामाणिक असलेला अस्सल मराठी अनुवाद १९६६ मध्ये प्रकाशित केला. दरम्यानच्या सुमारे सहा दशकांत भारताचार्य संपादित ‘माझा प्रवास’ वाचला जात होता. इतिहास संशोधक न. र. फाटक यांनाही भारताचार्यानी केलेल्या अनुवादातील त्रुटी जाणवल्या होत्या.  आजमितीला दोन्ही पुस्तके उपलब्ध असल्याने अनेकांची गफलत होऊ शकते. तशी झाली असल्याचे प्रमाण सुखमणी यांनी यानिमित्ताने केलेल्या चर्चेत नमूद केले आहे. विशेषत: ‘माझा प्रवास’ला शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने मृणालिनी शहा यांनी संपादित केलेली आवृत्ती मार्च २००८ मध्ये राजहंस प्रकाशनाने बाजारात आणली. या पुस्तकात संदर्भ, नावे, घटनाक्रम, गोडसेंची वंशावळ याबाबत काही गफलती झाल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
‘माझा प्रवास’चे हिंदीत दोन अनुवाद झाले आहेत. भारताचार्यकृत अनुवादावर आधारित ते असल्याने मूळ लिखाणापासून दूर जातात असे सुखमणी यांना वाटते. अमृतलाल नागर (राजपाल प्रकाशन, १९९८) यांनी एक अनुवाद केलेला असून मधुकर उपाध्याय यांनी ‘विष्णुभट की आत्मकथा’ या नावाने केलेला दुसरा अनुवाद (वाणी प्रकाशन, २००७) पोतदारांच्या पुस्तकाधारे केलेला असला तरी त्यात ढिसाळपणा खूप असल्याचे त्या म्हणतात.
इंग्रजीत ‘माझा प्रवास’ प्रथम अनुवादित करण्याचे काम पत्रकार मृणाल पाण्डे यांनी केले ही उल्लेखनीय बाब आहे. अलीकडेच (२०११ मध्ये) प्रसिद्ध झालेल्या या अनुवादाचा आधारही भारताचार्यकृत व नागर अनुवादित हिंदी पुस्तक आहे. मराठी भाषा, संस्कृती यांची ओळख नसल्याने हा अनुवाद सत्यापासून दूर तर जातोच, तसेच काही ठिकाणी पांडे यांनी काल्पनिक वर्णने केल्याचे सुखमणी सांगतात.
‘माझा प्रवास’चा अनुवाद आणि संपादन यांसाठी भारताचार्य चिंतामणराव वैद्य, महामहोपाध्याय पोतदार, न. र. फाटक यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच अभ्यासक, संशोधक, इतिहासात रस असणाऱ्या अशा सर्वानाच एक मोठा दस्तावेज खुला झाला आहे.