शुचित्व, साधुत्व यांच्याशी सौंदर्याची कल्पना भारतीय संस्कृतीने जोडली. त्याचे आज अनेकांना विस्मरण होते आणि जगणे सुंदर असावे म्हणजे काय, याचे भान उरत नाही.. आनंदाऐवजी सुखाचा शोध घेत माणसे गुरफटतात, ती हे भान सुटल्यामुळे..
सकाळी फिरायला गेलो असताना बागेतल्या बाकावर टेकलो. समोर लहान मुलांसाठी घसरगुंडी वगैरे बसवलेले होते. थंडीतसुद्धा छोटी मुले दुडदुडत होती. परत परत उडय़ा मारीत होती. घसरगुंडीची मजा घेत होती. एक छोटे मूल डोक्याला घातलेली माकडटोपी काढून टाकत होते आणि इकडे-तिकडे धावत होते. त्याची आई ती टोपी परत त्याला घालायचा सारखा प्रयत्न करीत होती. तिची धडपड पाहून इतर मुले आणि त्यांच्याबरोबरची मोठी माणसे हसत होती.
बालके थंडीची मुळीच पर्वा करीत नाहीत. त्यांना आपले सारखे खेळायचेच असते. तरुणाई मात्र थंडीच्या प्रेमातच पडलेली असते. कर्तबगारीची आव्हाने खुणावत असतात. अगदी बर्फ पडले तर त्यात खेळायला तयार. परत प्रेमाची, मैत्रीची, सहवासाची, स्पर्शाची ऊब असली म्हणजे थंडी काहीच करू शकत नाही, हेही जाणवलेले असते.
पण वृद्धांच्या बाबतीत मात्र थंडी शत्रुत्वच घेऊन येते. शरीराच्या सांध्यांतल्या, निरनिराळ्या भागांतल्या वेदनाच बनून येत असते ती. मग तिच्याशी कसे पटवून घेणार? ऋतूंच्या बाबतीत हवामान अनुकूल नसले तर सहनशक्ती वाढवणे हाच एक उपाय शिल्लक असतो. म्हातारपणात मुळातलीच सहनशक्ती नाहीशी होऊन जाते, मग तिच्यात वाढ कशी करणार?
ऋतू आणि हवामान या आपल्या नियंत्रणाच्या पार पलीकडल्या गोष्टी आहेत. त्यांच्याबद्दल चिडचिड करण्याने आपलाच उत्साह मुळासकट नाहीसा होतो. निरुत्साही आणि चिडचिडय़ा व्यक्ती इतरांनासुद्धा डोकेदुखी होऊन बसतात. पुन्हा आपली कोणालाच पर्वा वाटत नाही, अशी तक्रार करायला तयार. यासाठी छांदोग्य उपनिषदांत सामाचे व्रत सांगितले आहे. ‘तापणाऱ्या सूर्याची, वर्षणाऱ्या मेघांची आणि ऋतूंची निंदा करू नये. उलट आपणच ही सारी आहोत, अशी भावना निर्माण करावी’ म्हणजे त्यांच्यावर आपलेपणाने प्रेम करावे.
हे करण्यासाठी आपली सौंदर्यदृष्टी जोपासायची असते. प्रत्येक ऋतूतले निसर्गसौंदर्य आगळेवेगळेच असते. त्याचा आस्वाद घ्यायची मनाची तयारी करण्याच्या ऐवजी आपण त्यातल्या नावडत्या गोष्टींवरच लक्ष एकाग्र करायला लागलो तर नुकसान आपलेच आहे. जाणतेपणाचा आणि शहाणपणाचा अर्थ, नको असलेले सहज करून हवे असलेल्याचा आनंदाने आस्वाद घेणे हा आहे.
‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ हे शब्द संस्कृत आहेत, युरोपातल्या रेनेसाँपेक्षा प्राचीन आहेत आणि आपल्या तत्त्वज्ञानात त्यामागची कल्पना पक्की मुरलेली आहे. सत्यच फक्त अस्तित्वात असते. त्याला मंगलाचे रूप धारण करायचे असते आणि सौंदर्यच निर्माण करायचे असते. सत्याची उपासना करणाऱ्याला साधुत्वाची ओढ निर्माण व्हायला हवी आणि सौंदर्याचे स्वागत करण्याची उत्कंठा लागावी. म्हणून सत्यच साधुत्व होते आणि सत्यच सौंदर्य होते. आपणच आपल्या मनात असत्याची निर्मिती करतो. मग आपल्यामध्ये असाधुत्व म्हणजे वाईट विचार जागे होतात ते विकारांकडे ओढून नेतात. मग सौंदर्य जपून त्याचा विकास करण्याऐवजी त्याचा उपभोग घेऊन नाश करून टाकण्याची विकृती निर्माण होते.
मला जाणवणाऱ्या गोष्टी म्हणजे हा देह, ही इंद्रिये, ही बुद्धी, हा अहंकार, हे मन, हे सारे म्हणजेच मी असा गैरसमज पिढय़ान् पिढय़ांच्या संस्कारांनी पक्का होऊन गेलेला असतो. या साऱ्यांचे सुख जोपासणे म्हणजेच मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता असेच वाटत राहते. इतरांच्या वाटय़ाला सुख येऊ देणे म्हणजे त्यांच्यावर मेहेरबानीच करणे. ते कितीही जवळचे असले तरी माझ्या सुखाच्या आड येत असले तर माझे शत्रूच वाटायला लागतात. मी सत्ता आणि संपत्ती मिळविली आहे. मला व्यसनांची आवड आहे. मला वेगाची आवड आहे. माझ्या वाहनाला, मला अग्रक्रम द्यायला हवा. त्याच्या खाली इतर कोणी चिरडून मेले तर मला त्याची पर्वा नाही. माझ्या बंगल्यात सर्व उत्तम वस्तू असतील, माझी बाग सर्वात सुंदर असेल. मी सतत पंचपक्वान्नांचे जेवण करीन. माझ्या घरातली घाण मी बाहेर टाकणार. ती इतरांनी सहन करायला हवी. अशा वृत्तींनी साधुत्वाची आणि सौंदर्याची उपासना कशी करता येईल?
सुखाच्या शोधात निघालेले स्वत:वरचे नियंत्रण हरवून बसतात आणि त्यांच्या वाटय़ाला दु:खच येते.
वासनांची वखवख ज्याला असेल त्याला स्त्रीचे खरे सौंदर्य कळतच नाही. तिच्याकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहणाऱ्याला आतून येणारी तृप्ती आणि प्रसन्नता हे तिचे खरे अलंकार आहेत, हे कसे समजणार? साधुत्वाचे संस्कार बंद होऊन वासनातृप्तीचेच संस्कार झाले तर माणसाच्या आयुष्याचा ताबा विकृतीच घेतात आणि त्या रेटय़ापुढे कोणतीच संस्कृत टिकून राहू शकत नाही.
सौंदर्यनिर्मितीसाठी निसर्गातल्या साऱ्याच महाशक्ती आपल्यातले साधुत्व जपतात आणि मग बीमधून रोप, रोपामधून वृक्ष निर्माण होतात. नंतरच फुलांच्या सौंदर्याची निर्मिती होत असते. यात त्या बीचेसुद्धा आत्मसमर्पण असते, वृक्षाच्या इतर सर्व भागांचेही असते. मग आकर्षक फुले निर्माण होतात. त्यांचेही सौंदर्य आपले कार्य पूर्ण झाल्यावर नाहीसे होते आणि गळून पडल्यावर त्याचे खतच होत असते. फुलांच्या पुढच्या पिढय़ाही सुंदर निर्माण व्हाव्यात यासाठी यातूनच साऱ्या सृष्टीचा विकास शक्य आहे.
भारतभूमीने जगाला पवित्र करू शकणारी विचारधारा निर्माण केली आहे. आम्ही आनंदाच्या ऐवजी सुखाचा शोध पत्करून सारी नासाडी करून टाकली. आमचे शुचित्व, साधुत्व परत मिळविता आले तर इथे परत बाग फुलेल आणि खरेच आपण गर्वाने म्हणू शकू – ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा’!
सत्यम् शिवम् सुंदरम्!
शुचित्व, साधुत्व यांच्याशी सौंदर्याची कल्पना भारतीय संस्कृतीने जोडली. त्याचे आज अनेकांना विस्मरण होते आणि जगणे सुंदर असावे म्हणजे काय, याचे भान उरत नाही.. आनंदाऐवजी सुखाचा शोध घेत माणसे गुरफटतात, ती हे भान सुटल्यामुळे..
First published on: 19-12-2012 at 03:47 IST
मराठीतील सर्व आनंदयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: True real beauty