नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आज तिसऱ्यांदा शपथविधी होत असताना, मोदी यांनी गुजरात विधानसभेत बहुमत मिळवण्याची हॅट्ट्रिक केल्यानंतर ‘हा विजय सहा कोटी गुजराती जनतेचा’ , असा जो दावा केला होता, त्यातील सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी पुरेसे आकडे आता हाती आलेले आहेत, याचीही नोंद घ्यायला हवी. कुणाच्या बदनामीचे राजकारण फार तर प्रसिद्धी मिळवून देईल, पण मते व प्रसिद्धी यांचा संबंध कमी असतो, हे आता मोदीसमर्थकांनीही ओळखायला हवे..
विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा बहुमत मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत गुजरातच्या सहा कोटी जनतेचे आभार मानले आणि आपला विजय सहा कोटी लोकांचा आहे असेही सांगितले. निवडणूक प्रचारात इतक्या खोटय़ानाटय़ा गोष्टी बोलल्या जात असूनही त्यातून गुजराती जनतेने सत्य शोधून काढले याबद्दलही त्यांनी जाहीरपणे आभार मानले. यावर उपस्थित समर्थकांनी टाळ्या पिटलेल्या असल्या तरी मोदी जे सांगत आहेत ते खचितच सर्वस्वी खरे नाही. मात्र, मोदींची बोलण्याची आक्रमक शैली, आपले म्हणणे ठासून सांगण्याची रीत आणि आपलेच म्हणणे अंतिम आहे हे समोरच्यांच्या गळी उतरवण्याची त्यांची क्षमता यामुळे खरोखरंच संपूर्ण गुजरात त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे चित्र निर्माण होऊ पाहते आहे.
डिसेंबर २०१२च्या निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला तब्बल ४९ टक्के मते आणि काँग्रेसच्या सुमारे दुप्पट जागा मिळालेल्या असल्याने मोदींच्या नेतृत्वाचा निश्चितच विजय झालेला आहे. अलीकडे सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकणे मुश्किलीचे झालेले असताना मोदींनी सत्तेवर येण्याबाबत हॅट््ट्रिक साधलेली आहे, हेही त्यांच्या यशाचे प्रतीक आहे. यशाची ही हॅट््ट्रिक काठावर पास न होता दणदणीत विजयाने साजरी केली गेली आहे, हेही खरेच आहे. परंतु या यशाचा मोदी जो अर्थ काढत आहेत तो तितकासा खरा नाही, हे गुजरातमधील निकालांचे विश्लेषण केल्यास लक्षात येते. पाचच दिवसांपूर्वी निकाल लागलेले असल्याने विस्तृत विश्लेषण करण्याएवढे नेमके आणि अधिकृत आकडे हाताशी आलेले नाहीत. मात्र, उपलब्ध आकडेवारीही मोदींचे म्हणणे तपासण्यास पुरी ठरणारी आहे.
२.६० कोटी विरुद्ध २.१२ कोटी
गुजरातमधील सर्व सहा कोटी जनता आपल्या पाठीशी उभी आहे, असा नरेंद्र मोदींचा नेहमीच दावा राहिलेला आहे. निवडणुकीत विरोधी पक्षाने म्हणजे काँग्रेसने गुजरातच्या बदनामीची मोहीम हाती घेतली आहे आणि गुजरात ती कधी सहन करणार नाही, असे मोदी म्हणत आले आहेत. खरे पाहता, कोणताही राजकीय पक्ष एखाद्या घटकराज्याची किंवा त्यातील जनतेची बदनामी करणे संभवत नाही. शिवाय असे कुण्या पक्षाने अथवा नेत्याने केल्याचे ऐकिवातही नाही. प्रत्यक्षात प्रचारकाळात काँग्रेस मोदींच्या सरकारच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारत होती व मोदींच्या कार्यकाळात गुजरातमधील ग्रामीण, गरीब व आदिवासी जनतेची आणखी पीछेहाट झाली असा आरोप करत होती. मात्र, असा आरोप करणे म्हणजे गुजरातची बदनामी करणे, असे मोदींचे तर्कट होते. निवडणूक निकालांमुळे आणि मोदींच्या विजयामुळे हे तर्कट सहा कोटी जनतेने स्वीकारले, असे कुणासही वाटू शकते. परंतु मोदींच्या या तर्कटाला नाकारणारी गुजराती तब्बल ५२ टक्के आहेत, हे न विसरलेले बरे. त्यातील भाजप बंडखोरांची मते सोडून दिली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, गुजरात परिवर्तन पार्टी व जनता दल (सं) यांची एकत्रित मते (जी मोदींविरोधावर उभी आहेत) मोदींना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ निम्मा गुजरात आणि निम्मी गुजराती जनता मोदींच्या विरोधात आहे. कालच्या निवडणुकीत भाजपला ६३ टक्के जागा मिळालेल्या असल्या तरी मते मात्र ४८ टक्के आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच मोदी दडपून सहा कोटी जनतेच्या वतीने बोलत असले तरी त्यांना फक्त २ कोटी ६० लाख मते मिळाली आहेत. (आणि निवडणुकीत सर्वस्वी पराभूत झालेल्या काँग्रेसलाही तब्बल २ कोटी १२ लाख मते मिळाली आहेत.)
विजयी झालेच, ते कसे?
मोदींचा विजय हा जसा सहा कोटी जनतेने घडवून आणलेला नाही तसाच तो सर्व घटकांनी मिळून घडवलेला नाही. गुजरातच्या चारही विभागांमधून भाजपचे बक्कळ उमेदवार विजयी झालेले असले, तरी या विभागांतील काही पट्टय़ांमध्ये मतदारांनी भाजपच्या बरोबरीने काँग्रेसला निवडून दिले आहे. उत्तर गुजरात व मध्य गुजरातमधील पूर्वेकडील पट्टय़ात काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिलेली आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये ज्याला ‘पूर्व पट्टी’ म्हटले जाते त्या बनासकांठा ते उमरगाव या आदिवासी पट्टय़ातही भाजपशी समसमान सामना केला आहे. सौराष्ट्रातही दक्षिण व मध्य भागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व गु.प. पार्टी यांनी भाजपला चांगलेच आव्हान दिले आहे. शिवाय, एकुणात गुजरातमधील ग्रामीण भागात भाजपची पीछेहाट करण्यातही काँग्रेस बऱ्याच अंशांनी यशस्वी झालेली आहे. ही माहिती वाचल्यावर कुणालाही असा प्रश्न पडेल, की काँग्रेसने एवढे मोठे आव्हान उभे केले असेल तर मग मोदींचा एवढा मोठा विजय कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काही आकडे देतात.
पहिली गोष्ट म्हणजे गुजरातमधील चारही विभागांत भाजपला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळालेल्या असल्या तरी त्यात शहरी जागांचा वाटा मोठा आहे. या निवडणुकांआधी विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना केली गेली व त्यात तब्बल ४० ग्रामीण मतदारसंघांचे अस्तित्व संपुष्टात आले. त्या जागी नवे २० निमशहरी मतदारसंघ तयार झाले. शिवाय गुजरातमधील बडय़ा चार शहरांमधील मतदारसंघांची संख्याही वाढली. नेमक्या याच शहरांमधून मोदींचं मॅजिक चाललेले दिसते. उदाहरणादाखल, अहमदाबादमधील १७ पकी १५, सुरतमधील १६ पकी १५, बडोद्यातील ५ पकी ५, राजकोटमधील ४ पकी ३ आणि गांधीनगरमधील २ पकी २ असे निभ्रेळ यश मोदींना मिळाले आहे. या चार-पाच शहरांतील ४४ जागांपकी तब्बल ४० जागा भाजपला मिळाल्या आहेत. इतर शहरांमध्येही काँग्रेसपेक्षा भाजपला मिळालेल्या जागा जास्त आहेत. याचा अर्थ भाजपला शहरी-महाशहरी भागात सर्वाधिक आणि भरभरून पािठबा होता असा निघतो, मात्र मोदींना शहरांमध्ये अशा प्रकारे ९० टक्क्यांपर्यंत यश मिळत असताना ग्रामीण भागांत मात्र हेच यश निम्म्यापर्यंत घसरलेले दिसते. शहरांमध्ये ४४ पकी ४० जागा जिंकणारे मोदी बिगर महाशहरी भागात १३८ पकी ७५ जागाच जिंकतात. यशाचे हे प्रमाण या भागात ५४ टक्क्यांपर्यंत घसरते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. याचा अर्थ मोदींच्या काळात झालेला गुजरातचा विकास आपल्यापर्यंत न पोचल्याचे ग्रामीण जनतेचे म्हणणे आहे. मात्र, त्यांचा हा आवाज मोदींच्या आग्रही आवाजासमोर टिकू शकत नाही.
ते फुटले की हे वाढले?
गुजरातमध्ये आदिवासी व मुस्लीम हे दोन सामाजिक घटक पारंपरिकरीत्या काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. यंदा मात्र ३३ मुस्लीमबहुल मतदारसंघांपकी तब्बल २२ ठिकाणी भाजपचे िहदू उमेदवार निवडून आले आहेत. या निकालांचा अर्थ आता मुस्लीमही मोदींना स्वीकारू लागले आहेत असा काढला जाऊ लागला आहे. हा दावाही तपासून पाहायला हवा. मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये गेल्या वेळेपेक्षा खूप जास्त मतदान झाले; मात्र हे मतदान िहदू मतांची टक्केवारी वाढवून झाले आहे का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, दंगलींमध्ये मारली गेलेली आणि मोदींच्या विकासधडाक्यातूनही वगळलेली माणसे मोदींना मतदान करतील असे संभवत नाही. त्यामुळे िहदू मतांच्या जोरावरच हा चमत्कार घडला असण्याची शक्यता आहे.
डमी मुस्लीम उमेदवार उभे करणे किंवा काँग्रेसशिवाय अन्य पक्षांच्या उमेदवारांना आतून मदत करून मुस्लीम मतांचे विभाजन करणे, अशी हातचलाखीही मोदींनी अमलात आणल्याचे सांगितले जात आहे. हे खरे असेल अथवा नसेल मुस्लिमांचाही मोदींनाच पािठबा आहे, हा दावा तितकासा पचणारा नाही. दुसरीकडे, आदिवासींसाठी राखीव असलेल्या २७ व त्यांचे ठळक अस्तित्व असलेल्या १५ अशा एकूण ४२ मतदारसंघांपकी २२ ठिकाणी काँग्रेस, १८ ठिकाणी भाजप व १ ठिकाणी जनता दल (सं)चे उमेदवार विजयी झाले आहेत. या क्षेत्रात भाजपने गेल्या वेळेपेक्षा जास्त मुसंडी मारली असून, या भागात वाढलेले निमशहरी क्षेत्र त्यास कारणीभूत आहे, असे म्हटले जात आहे. शहरी-नवनिमशहरी भागातील नवमध्यमवर्गाला किंवा या वर्गात येऊ इच्छिणाऱ्याला अन्नसुरक्षा आणि रोजगार हमीपेक्षा नव्या आधुनिक रोजगाराची किंवा व्यवसायसंधीची आस जास्त असते. ही आस मोदींच्या विकास अजेंडय़ापुढे पूर्ण होऊ शकेल अशी आशा वाटल्याने आदिवासींमधला एक गट काँग्रेसकडून भाजपकडे खेचला गेला, अशी शक्यता मांडली जात आहे. या सगळ्याचा अर्थ असा, की मोदींच्या विजयात गुजरातच्या शहरी नवमध्यमवर्गाचा व महाशहरी मध्यम-उच्च मध्यम वर्गाचा वाटा लक्षणीय आहे. असे असेल, तर गुजरातमधील शहरी गरीब आणि ग्रामीण मतदार भाजपसोबत नाहीत? हेच स्पष्ट होत नाही काय, ज्या रीतीने आणंद, खेडा, बनासकांठा, साबरकांठा या ग्रामीण भागांत भाजपचा सडकून पराभव झाला, त्यातून तरी हीच गोष्ट पुढे येते.
बोलक्या वर्गाचे प्रतिनिधी..
खरे पाहिले तर, निवडणूक म्हटले की हार-जीत आलीच. निवडणूक जिंकणारा पक्ष कुठे ना कुठे हरत असतोच. या हारजीतीसह पक्ष किंवा नेते बहुमत मिळवून विजयी होत असतात. अशाच हार-जितीसह मोदी विजयी झाले आहेत; परंतु त्यांचा एकूणच खाक्या वेगळा असल्याने आपणच सर्व काही जिंकलो, असे ते म्हणू लागले आहेत. गुजरातमधील बोलक्या वर्गाचा जबरदस्त पािठबा मोदींना असल्याने कदाचित त्यांना गवसलेले सत्य हे खरोखरच सत्य म्हणून तिथे स्वीकारले जात असेल. परंतु उद्या हेच मोदी आपल्या पाठीशी सहा कोटी गुजराती आहेत, असे म्हणत राष्ट्रीय राजकारणात उतरू शकतात. म्हणून हा आकडेमोडीचा खटाटोप!
मोदींच्या विजयामागील सत्यासत्य
नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आज तिसऱ्यांदा शपथविधी होत असताना, मोदी यांनी गुजरात विधानसभेत बहुमत मिळवण्याची हॅट्ट्रिक केल्यानंतर ‘हा विजय सहा कोटी गुजराती जनतेचा’ , असा जो दावा केला होता, त्यातील सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी पुरेसे आकडे आता हाती आलेले आहेत, याचीही नोंद घ्यायला हवी.
First published on: 26-12-2012 at 04:23 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trueness in modi victory