विश्वास दिल्याने वाढतो. एकदा दिला की परतफेड होतेच होते. हे विधान भाबडे नसून शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल जबरदस्त विश्वास निर्माण करणे हा नेतृत्वातील महत्त्वाचा गुण. केवळ करिश्मा असून भागत नाही. त्याला विश्वासाची जोड द्यावी लागते. करिश्मा बेभरवशी असू शकतो, विश्वासाचे तसे नाही.
परस्परांवरील विश्वास हा उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा शोध आहे. मनुष्याप्रमाणे प्राणिजगतातही ताकदीबरोबर सहकार्याची गरज असते. त्यासाठी विश्वास लागतो. अनाहूत लोकांशीही आपण सतत व्यवहार करतो ते या विश्वासाच्या आधारावर. कुटुंबापासून अर्थव्यवस्थेपर्यंत, सर्व संस्था परस्परांवरील विश्वासावर आधारित असतात. कोर्टकज्जे होत असले तरी नव्वद टक्के व्यवहार हे विश्वास टाकून होतात. विश्वास दिल्याने वाढतो. एकदा दिला की परतफेड होतेच होते. हे आता शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध झाले आहे. विश्वासाचे हे तंत्र जाणीवपूर्वक वापरले तर लोकसंग्रह होतो आणि लोकसंग्रहातून नेतृत्व येते.
विश्वासाची भावना ही निसर्गाची जैवरासायनिक प्रक्रिया आहे. आईच्या मनात मुलाबद्दल परकेपणाची भावना आली तर नवा जीव जीव जगणार कसा? म्हणून निसर्गानेच आईच्या मनात अपत्यप्रेम निर्माण केले व स्तनातील दुधातून ते प्रगट केले. दूध पाजण्याची प्रेरणा निर्माण होण्यासाठी मेंदूमध्ये विशिष्ट रसायन पाझरावे लागते. ऑक्सिटोसिन हे त्याचे नाव. त्याने अन्य ग्रंथी उद्दीपित होतात आणि पान्हा फुटतो.
अपत्यसंभवासाठी होणारे मीलन व अपत्य जन्म येथून परस्परांवरील विश्वासाची सुरुवात होते आणि मग तो विस्तारत जातो. पॉल झाक या शास्त्रज्ञाला ही भावना अधिक समजून घ्यावीशी वाटली. मज्जासंस्था व अर्थशास्त्र यांच्यातील परस्परसंबंधांवर झाक काम करतात. ज्या देशांमध्ये परस्परांवरील विश्वासाची भावना बळकट व तीव्र असते ते देश आर्थिक समृद्धी लवकर साध्य करतात असे त्यांना आढळले. मोठय़ा गुंतवणुकीसाठी विश्वासाची गरज असते. करार जिथे पाळले जात नाहीत वा कोर्टात दाद मागण्यास जिथे खूप वेळ लागतो त्या देशांमध्ये आर्थिक प्रगती मंदपणे होते. भारतात तसे होते म्हणून गुंतवणुकीसाठी भारताला प्राधान्य मिळत नाही असे जागतिक बँकेने म्हटले आहे. समृद्धीसाठी विश्वास आवश्यक आहे हे सिद्ध झाल्यावर विश्वासाची प्रक्रिया काय असते ते तपासून पाहण्यास झाक यांनी सुरुवात केली. तेव्हा ऑक्सिटोसिनचे शरीरातील प्रमाण व विश्वास देण्याघेण्याची प्रेरणा याचा थेट संबंध वेगवेगळ्या प्रयोगांत स्पष्टपणे दिसून आला.
झाक यांनी यासाठी ‘ट्रस्ट गेम’ खेळण्याची व्यवस्था केली. यामध्ये स्वयंसेवकांच्या जोडय़ा असतात, मात्र आपला जोडीदार कोण हे माहीत नसते. प्रत्येक स्वयंसेवकाला दहा डॉलर देण्यात आले. त्यांचे अ व ब असे स्वतंत्र गट करून त्यांना स्वतंत्र खोल्यांत ठेवण्यात आले. अ गटाला दोन पर्याय देण्यात आले. त्याने दहा डॉलर स्वत:जवळ ठेवायचे किंवा आपल्या अनोळखी जोडीदाराला त्यातील काही रक्कम देऊ करायची. अ गटातील स्वयंसेवक जितकी रक्कम देईल त्याच्या तिप्पट रक्कम ब गटातील स्वयंसेवकाला मिळेल असेही अ गटाला सांगण्यात आले. इतकी जास्त रक्कम मिळाल्यावर त्यातील काही ब गटातून आपल्याकडे परत येईल या अपेक्षेने अ गटाने आपल्याकडील रक्कम द्यावी. समजा, अ गटातील एकाने दहापैकी सहा डॉलर ब गटातील जोडीदाराला देऊ केले तर जोडीदाराला सहाच्या तिप्पट म्हणजे १८ अधिक त्याच्याजवळील दहा असे एकूण २८ डॉलर मिळतील. आता हे २८ डॉलर ब गटातील जोडीदार पूर्णपणे स्वत:जवळ ठेवू शकतो वा त्यातील काही रक्कम पुन्हा अ गटातील जोडीदाराला परत देऊ शकतो. अ गटाला जशी अजिबात पैसे न देण्याची मुभा होती तशीच ब गटाला अजिबात पैसे परत न करण्याची मुभा होती.
अनोळखी व्यक्तीसाठी खिसा मोकळा करणे अत्यंत कठीण असते. तेच करण्यास हा प्रयोग सांगतो. एकतर दहा डॉलर खिशात टाका किंवा त्यातील काही रक्कम दुसऱ्याला, त्याच्याकडून परताव्याची अपेक्षा नसताना द्या. फळाची अपेक्षा न करता माणसे दुसऱ्यावर विश्वास टाकू शकतात का? तसा तो टाकतात, असे झाक यांना आढळले. अ गटातील ८५टक्के लोकांनी ब गटावर विश्वास टाकला व अनोळखी माणसाला पैसे दिले. या विश्वासाला ब गटातून ९८ टक्के स्वयंसेवकांनी प्रतिसाद दिला हे अधिक महत्त्वाचे. अ गटाने विश्वास दाखविल्यावर ब गटाने अधिक विश्वास दाखवून परतफेड केली. या प्रयोगाच्या दरम्यान ऑक्सिटोसिनचे रक्तातील प्रमाण व विश्वासाची भावना याचा थेट संबंध आढळून आला.
अ गटातून पैसे येणे हा एक ‘ट्रस्ट सिग्नल’ असतो. तो सिग्नल मिळताच ब गटातील जोडीदाराच्या शरीरातील ऑक्सिटोसिनचे प्रमाण वाढले. त्यातून मिळालेले संदेश मेंदूच्या मध्यभागात ग्रहण केले जातात व त्यानुसार परतफेड करण्याचे आदेश मिळतात. परतफेडीची अशी पावती मिळाली की अ गटामध्येही ऑक्सिटोसिन वाढलेले आढळते. मग झाक यांनी अ गटामध्ये बाह्य़तंत्राने ऑक्सिटोसिन वाढविले व पुन्हा प्रयोग केला. तेव्हा अ गटाकडून ब कडे जाणाऱ्या पैशाचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढले. सर्व दहा डॉलर देणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली हे विशेष.
 प्रथम मिळणारा ‘ट्रस्ट सिग्नल’ येथे सर्वात महत्त्वाचा आहे. माणसाला आजूबाजूच्या परिस्थितीतून सतत सिग्नल्स मिळतात व त्यानुसार त्याच्या शरीरातील अंत:स्राव कमीअधिक होतात. या अंत:स्रावानुसार तो कृती करतो. कधी परिस्थिती अशी असते की ऑक्सिटोसिनला अटकाव करण्याचा निर्णय शरीराला घ्यावा लागतो. हे सिग्नलवर अवलंबून असते. अ गटातील जोडीदार आपल्यावर किती विश्वास टाकीत आहे हे ब गटाकडून आपोआप तपासून पाहिले जात होते व त्यानुसार त्यांच्या रक्तातील ऑक्सिटोसिनचे प्रमाण कमी-जास्त होत होते. अ गटाने कंजूषपणा दाखविला की ब गटातूनही तसाच प्रतिसाद मिळत होता.
अ व ब गटातील पाच टक्के स्वयंसेवक कृपण वा कंजूष होते. त्यांच्या शरीरातील ऑक्सिटोसिनचे संदेश ग्रहण करणारी यंत्रणा कमकुवत वा थंड पडलेली होती असे आढळून आले. अशा व्यक्तींमध्ये विश्वासाची भावना निर्माणच होत नाही. मात्र दुसऱ्याच्या मनात तशी भावना आपल्या एखाद्या कृतीने ते निर्माण करतात व त्यातून मिळालेला फायदा फक्त स्वत:कडे ठेवतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यामध्ये मग फसगत झाल्याची भावना येते. बहुतेक नेते जनतेमध्ये प्रथम विश्वासाची भावना निर्माण करतात व मते मिळवितात. मात्र त्याची परतफेड तितक्याच तीव्रतेने करीत नाहीत. जनतेच्या दृष्टीने हा आतबट्टय़ाचा व्यवहार होतो. जनतेची फसगत होते. अशा वेळी ऑक्सिटोसिनच्या जागी टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते. मारामारी करण्यासाठी उपयोगी पडणारा हा अंत:स्राव आहे. स्पर्धेसाठी तो अत्यावश्यक असतो. सध्याच्या स्पर्धाशील जीवनात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते व ऑक्सिटोसिन कमी होते व समाजातील विश्वास घटलेला आढळतो. स्पर्धेतील यश क्षणभंगूर असते तर विश्वासातून आलेले यश टिकावू असते. टेस्टोस्टेरॉन अत्यावश्यक असले तरी ऑक्सिटोसिन तितकेच महत्वाचे असते.
प्रयोग करताना कृत्रिमरीत्या ऑक्सिटोसिन दिले असले तरी त्याची निर्मिती करता येत नाही. ते फार हळवे रेणुद्रव्य आहे. शरीराबाहेर ते अवघे तीन मिनिटे टिकते व पोटात तर त्याचे त्याहून कमी वेळात विघटन होते. ऑक्सिटोसिनचा फवारा मारून वा रक्तात सोडून विश्वासाची भावना वाढविणे शक्य नाही. मात्र ‘मी तुझ्यावर बिनशर्त विश्वास टाकतो’ असे संदेश आपल्या वागण्याबोलण्यातून व्यक्त करीत गेलो तर संपर्कात येणाऱ्यांच्या शरीरातील ऑक्सिटोसिन आपण वाढवीत नेतो. विवाहवेदीवर वधूच्या रक्तात ऑक्सिटोसिनचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र वरामध्ये ऑक्सिटोसिनबरोबर टेस्टोस्टेरॉनचेही प्रमाण वाढते. कारण वरामध्ये त्या वेळी जबाबदारीची भावनाही उद्दीपित झालेली असते.
परस्परविश्वासाचे संदेश देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मोकळेपणे आलिंगन देणे. मुन्नाभाईच्या ‘प्यार की झप्पी’ या ट्रस्ट सिग्नलचा डॉ. झाक जोरदार पुरस्कार करतात. ‘तुमचा आक्षेप नसेल तर मी तुम्हाला आलिंगन देऊ इच्छितो’, असे ते स्वच्छपणे सांगतात. आलिंगनातून ऑक्सिटोसिन वाढते. ज्या समाजात परस्परांना मैत्रीपूर्ण, दृढ आलिंगन देण्याची प्रथा आहे तेथे एकोप्याच्या भावनेची तीव्रता अधिक असते. भारतील समाजाने स्पृश्य-अस्पृश्यतेचा आत्यंतिक विचार केला व समाजातील सहकार्य संपले. भारतीय समाज हा अन्य समाजांप्रमाणे एकसंध का नाही याचे उत्तर कदाचित झाक यांच्या या संशोधनात सापडेल.
वारकरी संप्रदायात हा विचार झाला असावा. वारकरी संप्रदायातून ज्ञानदेवांनी अनेक क्रांतिकारी कल्पना समाजात रुजविल्या. मात्र वैज्ञानिक अभ्यासाचा अभाव असल्याने त्याची मानसिक व सामाजिक उपयुक्तता ठसठशीतपणे समाजासमोर मांडली गेली नाही. ‘प्रथम भेटी आलिंगन, मग वंदावे चरण’ ही विठ्ठलाला भेटण्याची वारकरी परंपरा आहे. विठ्ठलाला देव नव्हे तर सखा मानण्यात आले आहे. देवाबद्दल आदर, श्रद्धा असू शकते, पण विश्वास हा फक्त मित्राबद्दल असतो. ज्ञानदेवांचा ईश्वर भक्ताला भेटतो तो ‘आलिंगावयालागुनी, तयाचे आंग’ या रूपात. वारकऱ्यांमध्ये उराउरी भेट अनिवार्य असते. भारतीय रक्तात खोलवर रुजलेल्या स्पृश्यास्पृश्य परंपरेला छेद देणारी आणि वारकऱ्याप्रमाणे प्रत्यक्ष देवाला घट्ट आलिंगन देणारी कृती समाजात रुजल्याशिवाय ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ उभी राहणार नाही हे संतांना माहीत असावे. भक्तीच्या पलीकडे जाऊन समाजस्वास्थ्याच्या नजरेतून या नव्या परंपरेचा डोळस स्वीकार झाला असता तर महाराष्ट्राचे जातीय चित्र कदाचित पालटले असते.
परस्परांना मिठय़ा मारून समाजातील सर्व प्रश्न एकदम सुटतील असा भाबडेपणा अर्थातच या प्रतिपादनात नाही. पॉल झाकही तसे म्हणत नाहीत. मात्र विश्वासाचे सिग्नल देणे आपल्या हातात आहे व विश्वासाच्या कृतीत प्रतिविश्वासाची हमी आहे हे विज्ञान दाखवून देते. परस्परविश्वासाचे संदेश देऊन आपण नेते झालो नाही तरी आजूबाजूचे वातावरण विश्वासार्ह करू शकतो. आणि वातावरण विश्वासार्ह असेल तर नेत्याची गरजही लागत नाही. नेतृत्वापेक्षा मित्रत्वाची समाजाला आस असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा