हवामानबदल आणि ‘ग्लोबल वॉर्मिग’ यांचा धोका आहे की नाही, यावरले वाद केवळ निष्फळ नव्हे तर अयोग्यही ठरावेत, इतके हे संकट स्पष्ट झाल्याचे मत सध्या सुरू असलेल्या दोहा शिखर बैठकीत व्यक्त झाले.. गरीब आणि श्रीमंत देश यांच्यातील मतलबी मतभेद कदाचित इथेही कायम राहतील, पण जो धोका दिसतो आहे, तो नाकारण्यात अर्थ नाही..
कतारची राजधानी असलेल्या दोहामध्ये आता पुन्हा श्रीमंत देश विरुद्ध गरीब देश यांच्यात जुंपली आहे. निमित्त आहे, दोहा येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामानबदल परिषदेचे! ही परिषद शुक्रवारी (७ डिसेंबर) संपत आहे. त्यात गरीब देशांच्या दोन मागण्या प्रमुख आहेत- १. जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन डायऑक्साईड, मिथेन यासारख्या वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी श्रीमंत देशांनी घ्यावी, २. हवामानबदलाच्या पाश्र्वभूमीवर गरीब देशांसाठी १०० अब्ज डॉलरचा निधी उभारण्याच्या वचनाची श्रीमंत देशांनी पूर्तता करावी. श्रीमंत देशांनी हा निधी उभारण्याचे आश्वासन कोपनहेगन येथे २००९ मध्ये झालेल्या परिषदेत दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी श्रीमंतांनी कालबद्ध नियोजन करावे, अशी इतर देशांची मागणी आहे. याचबरोबर आणखी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू आहे, पण आतापर्यंतचा सूर पाहता लक्षणीय असे काही घडण्याची शक्यता धूसरच आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी या परिषदेत एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. अमेरिकेत नुकतेच मोठे नुकसान करून गेलेल्या ‘सँडी चक्रीवादळा’ चे उदाहरण देत, ‘हवामानातील अनियमित घटना हाच आता नियम बनला आहे. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिगबाबत शंका घेणाऱ्यांना आता खोटे ठरविण्याची हीच वेळ आहे,’ असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर अर्थातच प्रतिक्रिया उमटल्या. अशा एका घटनेवरून लगेच हवामानाच्या आपत्तींचा जागतिक तापमानवाढीशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढायला नको, असे म्हणणे विरोधी मताच्या तज्ज्ञांनी म्हटले. यातून पुन्हा ग्लोबल वॉर्मिगच्या खरेपणाचा मुद्दा चर्चेला येईल. या विषयावर दोन्ही बाजूने तज्ज्ञ जोरकसपणे मते मांडतात आणि आपलीच बाजू वस्तुस्थिती असल्याचे सांगतात. दोहामधील चर्चेच्या निमित्तानेही हेच घडत आहे, ते पुढेही सुरू राहील. या विषयाचा फारसा अभ्यास नसलेल्या जनसामान्यांसाठी ही चर्चा निव्वळ गोंधळ वाढविणारी ठरते.
तापमानवाढीच्या मुद्दय़ात आता शंका घेण्यासारखे काहीही राहिले नाही. औद्योगिकरण, वाढते नागरीकरण आणि वाहतुकीच्या सुविधांमध्ये प्रचंड प्रगती झाल्यामुळे साहजिकच कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूंचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड व मिथेन यासारखे वायू अधिक प्रमाणात वातावरणात वाढले आहेत. त्याच वेळी दुसरीकडे कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणारी जंगले व समुद्रातील जीव यांच्यावर आघात केला जात आहे. त्यामुळे तापमानवाढ घडवून आणणाऱ्या एका प्रमुख वायूचे वातावरणातील प्रमाण आता वाढतच आहे. हा व इतर कार्बन वायू उष्णता धरून ठेवत असल्याने त्यांचे प्रमाण वाढल्याने वातावरणाचे तापमान वाढणे स्वाभाविक आहे. हे तापमान वाढले तर त्याचा हवामानाच्या विविध घटनांवर परिणाम घडून येणार. कारण मान्सून, वाऱ्याचे विविध प्रवाह, पर्जन्यमान, उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळे अशा हवामानाच्या विविध घटनांमध्ये तापमान प्रमुख भूमिका बजावते. याशिवाय ध्रुवीय प्रदेशातील-उंच पर्वतांवरील बर्फ वितळणे, समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, ऋतूंमध्ये घडून येणारी स्थित्यंतरे, त्याचा शेती व इतर गोष्टींवर होणारा परिणाम यातसुद्धा दुमत असण्याचे कारण नाही. मतभेद असू शकतात ते तापमानवाढीचा या घटकांवर किती प्रमाणात परिणाम होईल, याच्या तपशिलाबाबत. या संदर्भात इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या आंतरराष्ट्रीय समितीतर्फे प्रसिद्ध होणारी आकडेवारी वादाच्या भोवऱ्यात असते. तापमानवाढ, त्यामुळे बर्फ वितळण्याचे प्रमाण, समुद्रपातळीत होणारी वाढ, चक्रीवादळांची तीव्रता, शेती-दुष्काळ-पूर यांच्यावर होणारा परिणाम आणि या सर्व गोष्टींमुळे एकूण अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण याबाबत आयपीसीसीने भाष्य केले आहे. त्याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. त्यासाठी काही तांत्रिक, तर काही ऐतिहासिक गोष्टींचे दाखले दिले जात आहेत.
ग्लोबल वॉर्मिगला विरोध करताना बऱ्याचदा विविध गोष्टींची सरमिसळ केली जाते. त्याच्या दोन प्रातिनिधिक उदाहरणांची चर्चा करायला हवी.
१) हवेतील बाष्प हा वातावरणात सर्वाधिक तापमानवाढ घडवून आणणारा घटक आहे, असे सांगितले जाते आणि वातावरणातील कार्बन वायूंचे प्रमाण वाढत असल्याबाबत बाऊ करायला नको, असे सुचवले जाते.. बाष्प अधिक उष्णता धरून ठेवते व वातावरणाचे तापमान वाढवते हे वास्तवच आहे. पण म्हणून कार्बन वायूंचे प्रमाण वाढत असल्याचे गांभीर्य कसे कमी होईल? हवेतील बाष्पाचे पावसात म्हणजेच पाण्यात व हिमामध्ये रूपांतर होत असते. त्यामुळे त्याचे वेगवेगळ्या प्रदेशाच्या वातावरणातील प्रमाण बदलत राहते. अगदी दिवसात व वर्षांच्या विविध ऋतूंनुसारही त्यात बदल होतात. मात्र, हे कार्बन डाय ऑक्साईड किंवा मिथेन या वायूंचे प्रमाण असे कमी-जास्त होत नाही. त्यामुळे त्यांचे वातावरणातील प्रमाण वाढले तर ते दीर्घकाळ राहण्याचा धोका असतो, म्हणूनच ती गांभीर्याने घ्यावी लागते.
२) समुद्राच्या पातळीत वाढ होऊन मालदीवची बेटे पाण्याखाली जातील ही भीती आहे. मात्र, प्रत्यक्षात या बेटांचा भूभाग उंचावला जात आहे, असे ग्लोबल वॉर्मिगबाबत शंका घेणारे सांगतात.. मात्र, या विधानात पुन्हा दोन गोष्टींची सरमिसळ आहे. मालदीवचा भूभाग उंचावत असला तर ती भूशास्त्रीय बाब आहे. पृथ्वीवरील काही भूभाग उंचावत असतो, तसा काही खालावतही असतो. हे निसर्गत: घडते. पण असे होते म्हणून समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्याचे गांभीर्य व धोका कमी होत नाही. मालदीवचा भूभाग उंचावत असल्याने तिथे समुद्राची पातळी वाढण्याचा फार परिणाम होणार नाही. पण म्हणून तो इतरत्र होणार नाही, असे नाही.
ग्लोबल वॉर्मिगच्या परिणामांच्या तपशिलाबाबत मतभेद असू शकतात. आयपीसीसी किंवा इतर संस्था, संशोधक यांच्या वक्तव्यांमध्ये अतिशयोक्ती असेल, अनेकांच्या विधानांमध्ये ती असतेसुद्धा! हवामानाची एखादी मोठी आपत्ती घडली की तो ग्लोबल वॉर्मिगचाच परिणाम असल्याचा निष्कर्ष काढणे अतिघाईचे ठरते, कारण हवामानाच्या घटनांमध्ये निसर्गत
चढ-उतार असतात. तरीही हवामानाच्या मोठय़ा आपत्तीचा संबंध लगेचच ग्लोबल वॉर्मिगशी जोडला जातो. तेच अमेरिकेत आलेल्या ‘सँडी चक्रीवादळा’ च्या निमित्ताने पाहायला मिळाले. पण या काही लोकांच्या अशा उताविळपणामुळे ग्लोबल वॉर्मिगचे वास्तव बदलत नाही. त्यामुळे उगाचच तांत्रिक मुद्दय़ांवरून जागतिक तापमानवाढीबाबत शंका घेणे योग्य ठरणार नाही. त्याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराचा. जीवाष्म इंधन, खनिजे यांची निर्मिती होण्यास लाखो-कोटय़वधी वर्षांचा काळ लागतो. आपण मात्र काही शे वर्षांमध्ये ते संपवत आहोत. त्याचप्रमाणे जंगले, माती व विविध परिसंस्थासुद्धा नष्ट होत आहेत. वाढती लोकसंख्या, वाढवलेल्या गरजा, आरामदायी जीवनशैली आणि हाताशी प्रगत तंत्रज्ञान या गोष्टींमुळे हे घडून येत आहे.
.. त्यामुळे अभ्यासकांची भाषा व त्यांच्यातील वाद लक्षात आले नाहीत, तरी सध्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या टंचाईचे मोठे संकट माणसासमोर उभे आहे हे वास्तव आहे. तापमानवाढीमुळे त्यात पडली तर भरच पडणार आहे, वाढत्या प्रदूषणामुळे समस्या आणखी चिघळणार आहेत. म्हणूनच या वादात पडले अथवा न पडले तरी साधनसंपत्ती जपून वापरण्याचा मंत्र अंगीकारायलाच हवा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा