‘तेलावरचे तरणे’ हे संपादकीय (८ जाने.) जागतिक आíथक सद्यस्थिती अन् भारतीय बाजारावरील त्याचा परिणाम याचे योग्य विश्लेषण करणारे होते. मंगळवारी मुंबई भांडवली बाजाराचे जे काही झाले त्याला १०० टक्के खनिज तेलाचे घसरते भाव आणि ग्रीसमधील संभाव्य आर्थिक संकट जबाबदार असून या दोन्ही कारणांवर आपले नियंत्रण नसल्याने नजीकच्या काळात ‘अच्छे दिन’ येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. खनिज तेलाचे घसरते भाव आपल्याला कितीही सुखावह वाटले तरीही अशी स्थिती येणाऱ्या काळात जागतिक आíथक संकट येण्याचे संकेत देणारी आहे.
सद्यस्थितीत सौदी अरेबियाने युरोपला कमी किमतीत तेल विकण्याचा निर्णय घेऊन आपल्या उत्पन्नापेक्षा जागतिक तेल निर्यातीतला वाटा कायम ठेवण्यात प्राथमिकता दिलेली दिसते. याचे मूळ कारण उत्तर अमेरिकेत वाढलेल्या तेल उत्पादक कंपनीच्या संख्येत आहे. भारतासारख्या प्रचंड खनिज तेल आयात करणाऱ्या देशात असे वातावरण ग्राहकांना व सरकारला ‘फिल गुड’ वाटणारे असेच आहे. त्यामुळे जगातील जास्त वाढ असलेल्या क्षेत्राकडे गुंतवणूक आकर्षति होईल. मात्र दुसऱ्या बाजूने विचार करता खनिज तेलाचे घसरते भाव रशिया, इराण व व्हेनेझुएला अशा तेलनिर्यात देशांचे कंबरडे मोडणारे असून त्या देशांच्या आíथक वृद्धीवर तीव्र परिणाम करणारे ठरेल. संभाव्य घसरण महागाई दराला धोक्याच्या पातळीखाली घेऊन जाऊ शकत असल्याने खनिज तेलाच्या घसरत्या भावाचे जगातल्या अनेक अर्थतज्ज्ञांनी स्वागत न केल्याचे दिसते.
अगोदरच खनिज तेलाच्या घसरत्या भावाने युरोझोन संकटात आणला आहे. त्यामुळे या वर्षांत जागतिक आíथक स्थिती ही खनिज तेलाच्या भावावर अवलंबून असणार हे मात्र नक्की. येणाऱ्या काळात सौदी अरेबियाने आपले सद्य तेलधोरण कायम ठेवल्यास तेलाचे भाव २० डॉलर प्रतिबॅरल येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन कमी करण्याचे आधीच नाकारल्याने तेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी फक्त अमेरिका व कॅनडा या देशांना पुढाकार घेऊन आपले तेल उत्पादन कमी करावे लागेल. युरोपमधील मंदी व चीनमध्ये कमी झालेली मागणी यामुळे एकंदरीत तेलाची मागणीही कमी राहील असे वाटते. आपण अचूक म्हटल्याप्रमाणे ‘अच्छे दिन’ वास्तवात येण्यासाठी व सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी भारताला जागतिक परिस्थितीवर अवलंबून न राहता नवीन आíथक धोरणे आखून ती योग्य रीतीने राबवावी लागतील.
-सचिन मेंडिस, वसई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा