ट्विटरला कालच आठ वर्षे पूर्ण झाली. त्याआधी मागच्या आठवडय़ात ट्विटरवर १२-१६ मार्च दरम्यान दुसरा ट्विटर फिक्शन फेस्टिव्हल (म्हणजे ट्विटरेचर फेस्टिव्हल) भरला होता. अमेरिकन प्रकाशन, पेंग्विन-रँडम हाऊस आणि ट्विटर यांच्या सौजन्याने भरलेल्या या महोत्सवात जगभरातल्या ११ देशातल्या लेखक, कवी, ब्लॉगर आणि इतर अनेकांनी भाग घेतला होता. भयकथा, प्रणयकथा, रहस्यकथा, विनोद-उपहास, विज्ञानकथा, नाटक, कविता आणि वास्तववाद यापैकी कुठल्याही वाङ्मयप्रकारात आपलं कौशल्य दाखवता येणार होतं. या ट्विटरेचर महोत्सवात ट्विट स्वरूपात १४० अक्षरांच्या तुकडय़ातुकडय़ात लिहिलेलं वाङ्मय. हे आव्हान पेलून जगभरातल्या अनेक लेखकांनी ते स्वीकारलं. त्यात चित्रंही देता येत होती. इंग्रजी, स्पॅनिश आणि इटालियन अशा तिन्ही भाषांत ट्विट करण्याची मुभा असल्याने या महोत्सवात अनेकांनी मोठय़ा प्रमाणावर भाग घेऊन आपली प्रतिभा पणाला लावली. त्यात २२ लेखकांना पुरस्कार मिळाले. त्यात मेघना पंत आणि अंकुर ठक्कर या दोन भारतीय लेखकांचा समावेश आहे. मेघना पंत यांनी एक लाख ओळींचं महाभारत १०० ट्विटमध्ये पुनर्कथन केलं, तर अंकुर ठक्कर यांनी व्हिज्युअल ट्विटमध्ये बॉलिवुड सादर केलं. पंत पाचव्या तर ठक्कर २१वे विजेते ठरले.  हे या महोत्सवाचं दुसरं वर्ष. पहिला महोत्सव २०१२ साली भरवण्यात आला होता. त्या वर्षी फक्त ललितेतर साहित्यासाठी हा महोत्सव होता. या वर्षी मात्र ललितवाङ्मय आणि त्यासोबत छायाचित्रात्मक मांडणी यांचाही समावेश करण्यात आला होता. तुम्हाला या विजेत्या लेखकांचं साहित्य वाचायचं असेल वा त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर    http://twitterfictionfestival.com या संकेतस्थळावर जाऊन पाहायला काहीच हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा