सध्या ५० रुपयांत पुस्तक या योजनेचा मोठा बोलबाला चालू असतानाच लोकसत्तेत (८ फेब्रु.) पायरसीची बातमी छापून आली आहे. मला तरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. जी पुस्तकं लोकप्रिय आहेत, चांगली चाललेली आहेत त्यांच्या स्वस्त आवृत्त्या काढण्याचे प्रयोग प्रकाशकांनी केले नाहीत म्हणून ही वेळ आली आहे. आणि मग यावरची प्रतिक्रिया म्हणून कुठे पायरसी कर किंवा मग ५० रुपयांत पुस्तक विकून मोकळं हो असं चालू आहे. राजहंस प्रकाशनाने काही पुस्तकांच्या स्वस्त आवृत्त्या काढलेल्या आहेत.
िहदीमध्ये पॉकेटबुक्स नियमित प्रकाशित होतात. तिथे असल्या वाईट प्रवृत्ती बळावलेल्या नाहीत. आपणही पु.ल.देशपांडे, रणजित देसाई, शिवाजी सावंत, वि.स.खांडेकर यांच्या पुस्तकांच्या पॉकेट बुक्स आवृत्त्या काढायला पाहिजेत. मराठी प्रकाशक याबाबत फारच संकुचित वृत्तीचे आहेत. मृत्युंजयसारख्या पुस्तकाची स्वस्त आवृत्ती आजपर्यंत का प्रसिद्ध झाली नाही? (अचानक पायरेटेड आवृत्तीच मुंबईच्या फुटपाथवर कशी दिसू लागली?) हे पुस्तक तर चांगले चालेलेले आहे. मग या पुस्तकावर प्रयोग न करून प्रकाशकाने काय मिळवले? याच पुस्तकाची डिलक्स आवृत्ती, लहान मुलांसाठी संक्षिप्त आवृत्ती, रंगीत मोठी आवृत्ती असं का नाही केलं गेलं? न चालणाऱ्या पुस्तकांबाबत आपण समजू शकतो की तिथे अर्थकारण आडवं येतं. पण जी पुस्तकं अतिशय लोकप्रिय आहेत, त्यांना मराठी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे त्या पुस्तकाबाबतही असं का व्हावं? एक सामान्य वाचक आणि साहित्यप्रेमी म्हणून मला तरी असं वाटतं. यामुळे प्रकाशकाला फटके बसत असतील तर चांगलंच आहे. काहीच न करण्याची त्यांची उदासीनता तरी यामुळे संपेल अशी एक आशा वाटते.
–  अ‍ॅड. मिलिंद महाजन,
उंडणगांव (ता. सिल्लोड, औरंगाबाद)

अभिरुचीचा शोध घेऊन साधणार काय?
यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे आपल्या एक वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील मराठी वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेणार असल्याची बातमी (लोकसत्ता, ६ फेब्रु.) वाचून काही प्रश्न पडले.
अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षांनी फक्त महाराष्ट्रातील वाचकांच्याच अभिरुचीचा शोध का घ्यावा? बरे हा शोध घेण्यासाठी ते महाराष्ट्रातील विविध भागांतील निवडक ग्रंथालयांना भेटी  देणार असून, या भेटीतून वाचक नेमके काय वाचतात, कोणती  पुस्तके वाचक अधिक वाचतात, का वाचतात, कोणते लेखक अधिक लोकप्रिय आहेत आणि का, त्याची विशेष कारणे काही आहेत काय? या बाबी तपासण्याचे कामही डॉ. कोत्तापल्ले करणार असल्याचे समजते.
संगणकावर मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा, तो वाढावा, यासाठीदेखील ते प्रयत्न करणार असे समजते त्या बातमीवरून, हे एक वेळ ठीक आहे.. मात्र त्यांच्याच म्हणण्यानुसार, जर हे युग माहिती, तंत्रज्ञानाचे आहे तर वाचकांच्या अभिरुचीचा शोध तुम्हाला घरबसल्या का घेत येऊ नये? त्याकरिता गावोगावच्या ग्रंथालयांना भेटी देऊन काय साधणार? आणि मुळात आता या ग्रंथालयीन अभिरुचीला बिचाऱ्या, शोधून तरी नेमके काय करणार?
दुसरे असे की ज्या लेखकांची पुस्तके वाचली जातात, अशांचे वावडे साहित्य संमेलनांना असते. किंबहुना तेच अशा संमेलनांपासून कटाक्षाने दूर राहतात. आजच्या व्यवस्थेत त्यांना स्थान तरी कुठे आहे? मग अभिरुचीचा शोध कशाकरिता?
की, वाचकांच्या या अभिरुचीमागची भूमिका आणि कारणेही संमेलनाध्यक्ष तपासणार आहेत?
– प्रभाकर येरोळकर, लातूर</strong>

विचारांचा सामना विचारांनीच करायचा असतो
 विक्रम गोखले  यांच्या पत्राला उत्तर म्हणून ‘लोकमानस’मध्ये (४ फेब्रु) छापल्या गेलेल्या पत्रासाठी मला अनेक प्रतिक्रिया आल्या. २ व ३ फेब्रुवारी रोजी बीड येथे झालेल्या लेखिका संमेलनात असल्यानं वर्तमानपत्र पाहिलं नव्हतं आणि विक्रम गोखले यांचं पत्रही वाचलं नव्हतं त्यामुळे थोडी गोंधळून गेले. त्या पत्राला प्रतिक्रिया लिहिणाऱ्या व्यक्तीच्या व माझ्या नावात साम्य असल्यानं हा गोंधळ झाला असल्याचं मग लक्षात आलं. या आधीही काही लोकांनी या नावानं आलेल्या प्रतिक्रियांविषयी मला फोन केले होते.
‘नीरजा’ नावाने प्रतिक्रिया लिहिणारी ही व्यक्ती नेमकी कोण आहे? याची मलाही कल्पना नाही. मी यापूर्वी ‘लोकमानस’ मध्ये केव्हाही प्रतिक्रिया लिहिली नाही. विक्रम गोखले व नीरजा या व्यक्तीने लिहिलेलं पत्र अशी ही दोन्ही पत्रं मी वाचली. विक्रम गोखले यांच्या पत्रावर मी प्रतिक्रिया लिहिली असती तर तिची भाषा या प्रकारची नसती. विशेषत ‘देवच त्यांचं भलं करो’ किंवा ‘अर्थशून्य बडबड करू नये. आपलं काम बरं आणि आपण बरं अशा वृत्तीनं जगण्यात त्यांचं भलं आहे’ वगरेसारखी भाषा माझ्या स्वभावाला रुचणारी नाही. चुकीच्या विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो यावर माझा विश्वास आहे.
 गेलं वर्षभर मी ‘लोकरंग’मध्ये ‘शब्दारण्य’ या माझ्या स्तंभातून माझे विचार मांडले आहेत. यापूर्वी २००० साली लोकसत्तामध्ये लिहिलेल्या ‘साहित्य संस्कृती’  या सदरातून ‘हत्या व्यक्तीची की विचारांची?’ हा गांधीहत्येविषयीचा लेख लिहिला होता. ‘चिंतनशलाका’ या माझ्या पुस्तकात तो आहे. या विषयावरील माझे विचार मी त्यात मांडले आहेत.
सांगायचा मुद्दा हाच आहे की ‘नीरजा’ नावाच्या अनेक व्यक्ती आहेत. पण आडनाव न लावणारी मी एकच आहे असा माझा गरसमज होता, तो दूर झाला. या ज्या कोणी ‘नीरजा’ असतील त्या मी, म्हणजे ‘कवयित्री नीरजा’ नाहीत, एवढेच नमूद करते.
– कवयित्री नीरजा

९४ व्या वर्षी तरी सर्वोच्च सन्मान मिळेल?
वयोवृद्ध झाल्याने आरोग्य तपासणी, तब्येतीत चढउतारांमुळे रुग्णालयात दाखल करावे लागणे, घरी आणणे, पुन्हा बरे वाटेनासे होणे.. या चक्रातून जात असतानाच ‘प्राण’ ऊर्फ अभिनेते कृष्ण सिकंद यांचा ९४ वा जन्मदिवस १२ फेब्रुवारीस (येत्या मंगळवारी)  आहे.
श्रेष्ठ खलनायक म्हणून १९६० पासून त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले. ठिकठिकाणच्या संस्थांचे  ६० पुरस्कार निराळेच, परंतु महाराष्ट्र राज्याने ‘राज कपूर पुरस्कार’ आणि केंद्राने ‘पद्मश्री’ (२००१) देऊन त्यांचा गौरव केला आहे. मात्र गेली दोन/तीन वर्षे, देशाच्या चित्रपट-क्षेत्रातील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी प्राण यांचे नामांकन, शिफारस होऊनही कधी दक्षिणेकडचे तर कधी बंगालचे कलाकार तो पटकावत असल्याने प्राण यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.  रुपेरी पडद्यावरून गेली दहा वर्षे संन्यासच घेतल्यानंतरही, आजदेखील देशाच्या कानाकोपऱ्यांत तितकीच लोकप्रियता टिकवून ठेवणाऱ्या या गुणी कलाकाराला प्रत्येक वेळी डावललेच का जावे, हे समजण्यापलीकडचे आहे.
साठ वर्षांची प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द असताना, प्रेक्षकांच्या तीन पिढय़ांचे मनोरंजन केलेले असताना, भूमिकांचे वैविध्य टिकवत हजारो सहकाऱ्यांबरोबर तेवढेच समरसून काम केलेल्या या अजातशत्रू कलावंताला उलट हा सन्मान आधीच मिळायला हवा होता. आता ते ९५ वर्षांचे होण्याची वाट न पाहता याच वर्षी त्यांना हा मान मिळावा, अशीच त्यांच्या चाहत्यांची शुभेच्छा असणार.
– अनिल ह. पालये, कुळगांव-बदलापूर

ही अवहेलना नव्हे, अनभिज्ञताच!
कमल शेडगे यांचे नीलेश जाधवच्या ‘लोकसत्ता’तील चित्रासंबंधीचे पत्र वाचले. त्यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.. हा चित्रकार खरोखरच अष्टपैलू आहे. त्याची (एग्झिबिशनमधील) काही ‘अमूर्त’ पेंटिंग्ज त्याच्यातील वेगळ्या प्रकाराची ‘ऊर्जा’ दर्शवतात. मात्र ‘शेडगे’ यांचे ‘लोकसत्ता’ वाचकांची कलेविषयी अव्हेलना (?) हे मत पटत नाही.. मात्र वाचक अनभिज्ञ नक्कीच असू शकतात.
– दयाळ पाटकर, वांद्रे
(प्रिसिलिया मदन, पनवेल यांनीही याच आशयाचे पत्र पाठविले आहे)

Story img Loader